शापित भाग सात

 शापित भाग ७

✍️ सोनाली जाधव.


मागील भाग इथे वाचा

👇

भाग सहा

बाबाने जे सांगितले त्यामुळे माधव अजूनच व्याकूळ झाला.

नाही! नाही! हे कस शक्य आहे माझा काय संबंध ? मी परदेशी राहिलो. कोणत्याही गावी कधी गेलो नाही.फक्त माझं नाव माधव आणि तिचे राधा आहे म्हणून काही आमचं नातं होत नाही.

मुळीच नाही. पण मग मला तिची कहाणी ऐकल्यापासून तिच्याबद्दल आपुलकी का वाटते आहे?राधा नाव ओळखीचं का वाटतें आहे? का?का? माधवचे विचारचक्र सुरू होते.

तो सारखं आठवायचा प्रयत्न करत होता.

राधा! राधा! राधा! कोण आहे राधा?

माधव काहीं केल्या विचार थांबवू शकत नव्हता.

माधवचे मामा हे सगळ बघत होते. त्याच्या मनाची घालमेल त्यांनाही समजत होती.

"ताई मला असं वाटत आपण माधवला सगळं सांगून टाकले पाहिजे. नाही तर त्याला ही वेड लागेल. तू हॉस्पिटलमधले लोकं पाहिलेस ना!"

मामाला मधेच  टोकून माधवची आई म्हणाली, 

"नाही !नाही! भैया असं होता कामा नये. आपण हवं तर माधवला पुन्हा परदेशी पाठऊ पण त्याला यातलं काही ही कळू द्यायचे नाही."

माधव त्यांचं हे बोलणं चोरून ऐकत होता .

मामा आणि आई कश्याबद्दल बोलता आहेत हे आता माधवला थोडं थोडं समजू लागले. आई कधीच काही सांगणार नाही म्हणून मामानाच खरं ते विचारलं पाहिजे. माधव योग्य संधीची वाट बघत होता.

आणि लवकरच त्याला ती संधी भेटली.

एक दिवशी आई काही कामानिम्मित बाहेर गेली. घरी मामा आणि माधव दोघेच होते.

"मामा मला खरं काय ते सांगा! काय लपवता आहात तुम्ही माझ्यापासून. जे काही माझ्या बाबतीत घडले ते माझ्या भूतकाळविषयीच आहे ना! प्लिज मला खर काय आहे सांगा नाही तर माझा विचार करून करून जीव जाईल हो. मामा! ही राधा कोण आहे? माधवच्या तोंडून राधा नाव ऐकताच  मामाचे चेहऱ्याचे भाव बदलले.

"हे तुला कुणी सांगितले माधव, तू पुन्हा तिकडे गेला तर नव्हता ना!"

मामांचा सूर आता काळजीचा वाटत होता.

"हो मी गेलो होतो. पण तिकडे नाही, जवळच्या गावात." माधवने खरं ते सांगितले .

"मी तुझ्या आई बाबांना वचन दिले आहे. याबद्दल तुला काही ही सांगणार नाही असे." मामा बोलले.

"ठीक आहे मग मी स्वतः खरं काय ते शोधून राहील."

माधवचे
बोलण ऐकून मामा थोडे घाबरले .

"नको माधव पुन्हा त्या शापित गावात जाऊ नको. मी सांगतो तुला खर काय ते. ताई भाऊजी मला माफ करा. मी तुम्हाला दिलेले वचन तोडतो आहे." मामांनी हात जोडून माफी मागितली.

मामा आता माधवला सांगायला लागले.

"माधव ऐक तुला आठवते का, तू, तुझे आई बाबा आणि मी आपण आधी एका गावात राहत होतो."

माधव विचार करू लागला.

"नाही आठवत."

"तू जेव्हा दोन तीन वर्षाचा होता स तेव्हाची गोष्ट आहे. आपण चौघे ही एक गावात राहत होतो त्याच नाव होते ' शक्तीपुर '.

"हो मग !" माधवने प्रश्न केला.

"हेच ते गाव राधापूर."

"काय?" माधव एकदम आश्चर्यचकित झाला.

"आपल्या शेजारी राधा तिचे आई वडील आणि एक मानलेला भाऊ राहत होते. त्यांचा आणि आपला खूप घरोबा होता. एवढा की तुझं आणि राधाचं मोठे झाले की लग्न करायचं अशी वचने ही एकमेकांना देऊन टाकली होती.

राधा ही त्यांची मुलगी नव्हतीच. खरं तर ती त्यांच्या मित्राची मुलगी होती. तिचे आई वडील ती अगदी लहान होती तेव्हाच वारले होते म्हणून त्यांनी तिला दत्तक घेतली होती. त्यांना ही मूलबाळ नव्हते.

ते गावातले पंडित होते.लमारुतीच्या देवळात रोज पूजापाठ करायचे. तुझ्या वडिलांची  आर्थिक परिस्थिती  त्यावेळी खूप चांगली नव्हती. तेव्हा नवीन धंदा करायला त्यांनीच मदत केली होती. त्याची परतफेड म्हणून तुझ्या वडिलांनी त्यांना वचन दिले होते की राधा त्यांच्या घराची सून होईल म्हणून. पुढे तुम्ही दोघे पण खूप छान मित्र झाले. तुमचं एकमेकाशिवाय पांन ही हलत नसे. दिवस भर राधा !राधा !राधा! करत फिरायचा तू. पण एक दिवशी तुमच्यात दुरावा आला जसा काही तो प्रत्येक राधा आणि माधवमधे ठरलेलाच आहे.

तुझ्या बाबांना शहरात नवीन व्यापार करायची संधी चालून आली होती. खूप मोठी संधी होती ती. तेव्हा राधाच्या वडिलांनीच तुझ्या बाबांना शहरात जाण्यास प्रोत्साहित केले. प्रगती कर म्हणून आशीर्वाद दिला. तुम्ही मोठे झाले की तुमचं लग्न लाऊन देऊ असेही वचन दिल.

त्या दिवशी तू आणि राधा खूप रडले. तू तर दोन दिवस काही खाल्लेही नाही. आजारी पण पडला .

पण वेळ ही सगळ्या गोष्टी वर औषध असते. पुढे तू ही हळूहळू या वातावरणात रुळून गेला आणि राधाला विसरलास. पण राधा तुला विसरली नाही. तिने शिक्षण पूर्ण केले. ती सतत तुझी आठवण करायची. ती खूप सुंदर होती देहाने आणि मनाने ही. लहान मुलं तिला फार आवडायची. हसरी होती खूप. नेहमी सांगायची बघा एक दिवस माधव नक्की येईल. मी अधून मधून तिकडे जात असायचो.

तुला तुझ्या बाबांनी परदेशी पाठवले. तुला या सगळ्यापासून दूर ठेवण्यात आले. राधा तुझी अहोरात्र वाट बघायची. मी तिला खूपदा सांगितले एकदा भेट किंवा बोल तरी. पण तिने सांगितले माधव नक्की येईल एक न एक दिवस मला भेटायला.

मी तिला तुझी बितंमबातमी देत होतो. तुझे फोटो दाखवायची तर ती लाजेने पार गोरीमोरी होऊन जायची. खूप छान पोर होती रे ती."

असं म्हणून मामा रडायला लागले. माधवचे डोळेही भिजले.

"मामा मग पुढे काय? माधवने विचारले.

"तिचे तुझ्यावर जीवापाड प्रेम होते. पण दैवाला काही दुसरेच मान्य होते.

एके दिवशी शहरात शिकायला गेलेला सावकाराचा मुलगा गावात परत आला. त्याची वाईट दृष्टी राधावर पडली. त्याने  राधाला मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. पण राधा आणि तिचे आई वडील काही तयार होत नव्हते. मग एकेदिवशी त्याने राधाला जबरदस्ती पळवून नेले. तिला त्याने त्यांच्या शेताच्या एका खोलीत डांबून ठेवले.

तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या झटापटीत राधाच्या हाती जे लागलं ते तिने त्याच्या डोक्यात मारले.स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी तिने त्याला डोक्यात दोन तीन फटके मारले. तसे तो तिथेच गत प्राण झाला.सावकाराला जेव्हा हे सगळ समजले तेव्हा तो बदले  चया भावनेने पेटून उठला. त्याने गावात अशी अफवा पसरवली की राधा एक डाकीण आहे आणि तिने त्याच्या मुलाला मारले आहे.तिला गावातल्या विहीर जवळ एका झाडाला बांधून ठेवले.तिच्या वर खूप अत्याचार केले.लोकांनी पण पुढचा मागचा काही विचार न करता तेच सत्य मानले जे सावकाराने सांगितले. तिला दगड मारण्यात आली, चाबकाचे फटके मारण्यात आले. गरम पाणी टाकण्यात आले. तिचे हातपाय बांधून तिला झाडावर लटकविण्यात आले. तिच्यावर हा अन्याय बघून तिच्या आई वडिलांनी सगळ्यांनाकडे मदतीची भीक मागितली पण कुणी ही मदत केली नाही.अखेर तिच्या आईला हे सगळं सहन झालं नाही आणि तिने विहिरीत उडी मारून जीव दिला. आपली बायको आणि मुलगी आपल्या डोळ्यादेखत मरताना बघून पंडितजींना पण हार्ट अटॅक आला आणि ते ही तिथेच मेले. राधा हे सगळ बघत होती जिवाच्या आकांताने रडत होती पण कुणी ही तिची मदत केली नाही. ज्यांनी कुणी मदत केली त्यांना सावकाराचे माणसे खूप मारायचे. म्हणून कुणाची ही हिम्मत होत नव्हती. मी पण तेव्हा इकडे होतो. तिच्या मानलेल्या भावाने खूप प्रतिकार केला तर त्याला बेदम मारण्यात आले. अजून ही त्याचं काय झालं कुणाला ही माहिती नाही.सशेवटी राधाची ही सहन शक्ती संपली आणि एखाद्या जखमी वाघिणीप्रमाणे तिने डरकाळी फोडली. तिचे रूप बदलले डोळे लाल झाले. चेहरा पांढराफक पडला.

तिच्या त्या किंकाळीने पूर्ण परिसर हादरला. तिने सगळ्या गावाला शाप दिला.

मी ब्राम्हणपुत्री राधा! सगळ्या गावाला श्राप देते की जशी मी आणि माझे परिवार तरफडून मरतो आहे तसे हे संपूर्ण गाव नष्ट होईल. मला डाकीण म्हनणारे तुम्ही पण एक दुसऱ्याला खाणार. न जगणार न मरणार. रोज तुम्ही मरण मागणार पण मरणार नाही. प्रत्यक्ष  परमेश्वर पण तुमची मदत करू शकणार नाही.
असे म्हणून तिने प्राण सोडला .

राधा कधीच अशी नव्हती. तिने नेहमी स्वतःआधी दुसऱ्याचा विचार केला. पूर्ण गावाला ती आपला परिवार  समजायची. पण जेव्हा तिला मदतीची गरज होती तिला कुणीही मदत केली नाही. तिचे ते बोलणे ब्रह्म वाक्य ठरलं. त्या दिवसापासून ते गाव शापित झाले. तिथे पीकपाणी नष्ट झाले, दुष्काळ पडला.

शापाची बातमी आजूबाजूच्या गावात पण पसरली. आजूबाजूचे गावाचे लोक त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करेनासे झाले.. सगळे गाव काही दिवसातच होत्याचे नव्हते झाले. तू जे काही तिथे पाहिले ते सगळम सत्य आहे माधव."असे म्हणून मामांनी राधाचा एक फोटो पाकिटातून काढून माधवसमोर धरला. तिला बघताच माधव मटकन खाली बसला.

त्याचे डोळे घळाघळा वाहू लागले. त्याला त्याची बालमैत्रीण राधा आठवू लागली.

राधा ! राधा! माफ करशील का ग ! मला मी तुला भेटायला का नाही आलो? कसा विसरलो ग मी तुला? तू का ?नाही आठवण करून दिली ग मला आपल्या प्रेमाची. माधव लहान मुलासारखा जोरजोरात रडू लागला. 

माधव आता काय करेल कसा मुक्त करेल तो गावाला आणि राधाला 

बघुया पुढच्या भागात.

पुढील भाग इथे वाचा

👇

भाग आठ

क्रमशः
वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.

    

Post a Comment (0)
Previous Post Next Post