वहिनीचा कानमंत्र

 वहिनीचा कानमंत्र

✍️ प्रतिभा परांजपे 

     संध्याकाळचे फिरायला म्हणून ऊषा निघाली‌ आज.  तिला सुषमा बाजारातून येताना दिसली .

 बरेच दिवसांनी भेटली. स्कूटरवर दोन मोठ्या पिशव्यांमध्ये भाज्या आणि किराणा सामान दिसत होते.

 ऊषाने विचारले, "बरेच सामान क्या बात है,  काही पार्टी वगैरे आहे वाटत?"

"यांचे आई-बाबा येत आहेत उद्याला"

सुषमाचा चेहरा जरा चिंतेत दिसत होता. सासू सासरे येणार याचे तिला बहुतेक टेन्शन आलेले दिसत होते . 

बोलता बोलता म्हणाली, "आता नेहमीसाठीच येतात आहे. आईना मध्ये बरे नव्हते"

"मग ठीकच आहे आहे . इथे राहून काळजी करण्यापेक्षा समोर असलेले बरे.

आणि टेंशन नको घेऊ होईल सगळं ठीक हळूहळू."

सुषमा निघून गेली.

 उषाच्या लक्षात येत होते सुषमाला कशाचे टेन्शन आले आहे.

कधीतरी पाहुणे म्हणून येणारे , ते आपले आई-बाबा असो की सासू सासरे  तेव्हाची गोष्ट वेगळी असते. आता एकत्र रहाणार . ह्या गोष्टीची काळजी.

  दोन दिवसांनी सकाळी फिरायला निघताना ऊषाची नजर सुषमाच्या घराकडे गेली. तिचे सासू-सासरे फिरायला निघाले होते.

 सुषमा खालीच भेटली, "काय म्हणते सर्व ठीक ??"

   " हो ग,  जमतंय हळूहळू.".

दोन दिवसांनी सुषमा दुपारी घरी आली .

"ताई-  तू ये ना घरी  एकदा, आईंना भेटायला. अजून आजूबाजूला फारशी ओळख नाही.

 त्या एकट्या खूप कंटाळतात.

' हो येईन की ,बस  तू.'

"मी आज चकल्या केल्यात चहाबरोबर घे ", म्हणत  ऊषाने सुषमाला  बसवले.

"तुझे ट्यूशनचे काम कसे चालले??"

 "आहे चालू आहे आता वेळ जरा बदलते आहे. आई म्हणाल्या,  तू आपले क्लासेस घे कामाची काळजी करू नको."

सुषमा गेल्यानंतर ऊषा रोजच्या कामात लागली.

रात्री झोपताना तिला सुषमाच्या जागी  स्वतः ऊषा दिसत होती. 

उषा आणि अरुण दोघ शहरात तर सासू सासरे गावी रहात होते.

ऊषाचा अथर्व तीन वर्षाचा झाल्यावर तिने परत शाळेतली नोकरी सुरू केली.

अथर्वची प्लेस्कूल होती त्यानंतर तो दोन तास पाळणाघरात रहात असे. ऊषा शाळेतून परत येताना त्याला घेऊन येतं असे. मग दिवसभर उषा घरीच असे.

अथर्वची तब्येत जरा नाजूक होती .एक दोन वेळा त्याला शाळेत ताप भरला, पाळणाघरातून बाईंचा ऊषाला शाळेत फोन. शाळेतून सुट्टी घेऊन ऊषाला यावे लागायचे. अरुणना बरेचदा टूरवर जावे लागे.

उन्हाळ्यात ऊषा आईकडे गेली असताना ती आईजवळ  बोलली,

 "नोकरी सोडून द्यावी असे वाटते, अथर्वकडे पहायला कोणी नाही"

"अग  अरुणरावांचे बाबा रिटायर्ड झाले न मग ते दोघ तिथं येऊन राहिले तर  तुला नोकरी सोडावी नाही लागणार."

"ह्यांनी बरेचदा म्हणून पाहिले."

"तू म्हंटले कां त्यांना तिथे चलण्याविषयी?"

"म्हणजे??"

"मुलाने म्हणणं आणि तू आग्रह करण यात फरक पडतो."

"कसा??"

          "सुनेने बोलावलं कि त्यांना जाणवेल कि तू त्यांना मनापासून स्विकारले आहे तेव्हा त्या नक्की येतील."

"अस कां बरे"?

"वाटत गं, कुणाला आपली गरज असावी, अडचण नसावी. तू म्हण, मग त्या मनापासून आपल घर समजून राहतील."

"हे अस असत!??" त्यांवर आईने मान हलवली.

रात्री वहिनीशी पण ऊषाचे हितगुज झाले . वहिनी म्हणाली,

"काय असतं न ऊषावन्स , थोडं थोडं एडजस्ट सर्वांनाच करावे लागते . पण खर सांगू, मनापासून स्विकारले कि जमत." 

 वहिनीने दिलेला कानमंत्र घेऊन ऊषा सासरी आली.

काही महिन्यांनी सासू सासरे गावं सोडून शहरात ऊषा अरूणबरोबर रहायला कायमचे आले.

सुरवातीला ऊषाला कळत नसे कि कामाचे नियोजन कसे करावे? म्हणजे सासूबाईंना काय काम झेपेल?आपण नौकरीवर गेल्यावर त्यांना अथर्व त्रास तर देणारं नाही. अश्या अनेक अनेक कुशंका मनात होत्या. पण लवकरच त्याचे समाधान झाले.

एक दिवस सासूबाई स्वतः म्हणाल्या, "अग इतक्या सकाळी सकाळी लवकर उठून सर्व स्वैपाक नको करू तु फक्त तुझा टिफीन बनव."

"पण --बाकी सर्व तुम्हाला एकट्याला"--- 

"अगं भांडी, झाडलोट करायला तर आहेच बाई आणि चार जणांना कितीस लागत?"

ऊषाच मन आनंदाने भरून आले.

सासु-सासरे आल्याने घराला घरपण आल्या सारखे झाले, पण तरीही कामाचा बोजा एकट्यावर नको म्हणून ऊषाने पोळीवाली लाऊन घेतली.

आई बाबा आल्याने अरुण ही खुश होते.

आता कामावरून घरी आल्यावर अथर्व जेवण करून आजोबांच्या बरोबर खेळताना दिसे. आजी बरोबरच संध्याकाळी शुभंकरोती म्हणायचा.

 

संध्याकाळी मात्र ऊषा स्वैपाक करत असे, आई विचारत काही मदत लागली तर सांग.

"कर्तव्य, आणि जबाबदारी बरोबरच प्रेम आणि आपुलकीच्या धाग्यांची  सुंदर, घट्ट वीण  घातल्याने नात्याचे उबदार वस्र विणले गेले. ते तिने व सासुबाईंनी उसवू दिलें नाहीं." " 

नंतर काही वर्षांनी सासुबाई थकल्या, अथर्वही मोठा झाला. मग मात्र उषाने नौकरी सोडली.

पुढे सासू सासरे दोघेही निर्वतले. 

हे सर्व आठवताना ऊषाला ससासूबाईंची आठवण आली. डोळे पाणावले होते ते समाधानाने पुसून ती झोपली.

ऊषाने सुषमाला संध्याकाळी भेटायला बोलावले.

"ताई, अजून आईंना किती काम झेपेल, आणि सांगितलेले आवडेल कि नाही उगाच त्या वरून वाद न हो, ह्याची मनात भिती वाटते. कस मैनेज करावे??"

"अगं, माझ्या सासूबाई आणि माझ्यात ही मतभेद असायचे आणि ते असणारच ग, दोन वेगवेगळ्या घरच्या आपण, आणी बरीच वर्षे  स्वतंत्र संसार केलेला. खर सांगू तुला आमच्या आईंच्या नी माझ्या कामाची पद्धत ,स्वैपाकाच्या चवीत वेगळेपण होत. त्या नागपूरकडच्या मी कोकणातली, त्यांना तिखट, झणझणीतची आवड, मला गोडसर."

"आणि खर सांगू आमच्या दोघींच्यात छोटे मोठे वाद ही सुरवातीला होत असत पण ते फार वेळ ताणून  धरले नाही . आम्ही एकमेकींना सहकार्य केले. हळूहळू माझ्या हातची फणसाची भाजी तर त्यांनी केलेल्या सांबर वड्यावर मी ताव मारायला लागले."

"तुम्ही दोघं व सासु सासरे एकत्र बसून मोकळेपणाने बोला."

"अर्थातच प्रत्येक व्यक्ती बरोबर परिस्थितीही वेगळी असतेच ग पण-- काही गोष्टी  ठरवाव्या लागतात.   जसे कामाची वाटणी , उठण्या झोपण्याच्या वेळा, टीव्ही बघण्याचे टाईम या छोट्या छोट्या गोष्टींवरून ही बरेचदा वाद-विवाद होतात. पण त्यातही लवचिकता हवी.

 तसेच घर खर्चाचे नियोजन हा महत्वाचा विषय, त्याशिवाय बारीकसारीक असतातच पण  ह्या सर्व सामंजस्याने सुटतात."

"हो ताई आले लक्षात माझ्या. दोघींनी मनापासून स्वीकारले की जमतं सर्व."

असे सुषमाने म्हणताच उषाबरोबर सुषमाही हसायला लागली..

--------------------+-------------------

लेखन सौ. प्रतिभा परांजपे

---------------------------------------

वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा वाचून पहा.

👇

वसा

Post a Comment (0)
Previous Post Next Post