नजर

 नजर......

✍️ योगेश साळवी
   

  राधा ताईंना... मंदारच्या आईला अचानक हॉस्पिटलात ऍडमिट व्हावं लागलं.

       मंदारच्या आईला राधाताईंना वर्टिगोचा त्रास आधीपासूनच होता. या आजारात चालताना तोल वगैरे जाण्याचा संभव असतो. झोपेतून उठल्यावर अख्खं जग  आपल्या भोवती गरगरा फिरतय असं वाटतं, चक्कर येते वगैरे जुजबी माहिती मंदारला होती. या जोडीला आता आईला जेवण न जाणे.., सारखंच झोपावेसे वाटणे, नैराश्य या प्रकारचा नवीन त्रास सुरू झाला. डॉक्टरने सांगितलं 'तशा त्या बरे आहेत, कदाचित जास्त ताण घेतल्यामुळे तसं झालं असेल. आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतो त्यांना..

पण दोन-तीन दिवसात परत जाणार नाही आणि त्रास पुन्हा सुरू झाला आता परत ऍडमिट करावे लागेल.'

     राधाताईंची आपल्या मुलाच्या कुटुंबात रत्नागिरीला राहायची बैठी जागा होती. रत्नागिरीला बरीचशी घर तशीच असतात. त्या घराला लागून असलेली एक खोली मंदार च्या काकांची होती. काका मुंबईला विरारला राहायचे... काकी आणि मुलगी निशाबरोबर. निशाने काकांच्या आणि काकीच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला आणि नवऱ्याबरोबर सासरी गेली राहायला. काका काकींना हा प्रेमविवाह फारसा मंजूर नव्हता असे मंदारच्या कानावर आलेलं होतं. सात आठ दिवसापूर्वी मंगलाकाकी रत्नागिरीला येऊन गेली होती. गावाकडची जागा ...त्यांची खोली मंदारच्या घराला लागून असलेली बघायला. स्मिताच्या भावाला मंदारला विचारून तिथलं सामान काढून खोली ठीकठाक करून घेतली. तिथं त्या स्वतः राहायला येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

      मध्यंतरी  मंदार काका काकीला भेटायला म्हणून मुंबईला विरारला आलेला. त्यावेळी एक प्रस्ताव त्यांने काका- काकी समोर ठेवला . मंदारचे म्हणणं होतं की एरवी त्यांच्या रत्नागिरीच्या घराला लागून असलेली काका काकींची एका खोलीची जागा रिकामीच आहे. नाहीतरी अडगळीचे सामानच तिथे पडलेले असतं... तर ती जागा काका काकीने मंदारला विकत द्यावी. हवं तर वाजवीपेक्षा थोडे जास्त पैसे घेऊन. म्हणजे त्याच्या घराची जागा मंदारला थोडी मोठी करता येईल. त्याच्या वाढलेल्या कुटुंबाला म्हणजे आईला, मंदार आणि त्याची बायको, झालं तर दोन मुलं यांच्यासाठी ऐसपैस घर होईल.

    &nbsp ; काका या गोष्टीला एका पायावर तयार झाले. पण काकी कुणास ठाऊक चक्क नको म्हणाली. म्हणे.. मला पुढे मागे तिथे येऊन राहायचं आहे.... मंदार तर जाम वैतागलेला तेंव्हा काकींवर.. पण मनातल्या मनात... काका..काकीचा निरोप घेवून तो रत्नागिरीला परत आला. तेंव्हा पासून त्याच्या कुटुंबात मंगला काकीबद्दल सूक्ष्म अढी मनात तयार झालेली. काकी जागा द्यायला सरळ नकार देईल असं राधा ताईंना ... मंदारच्या आईला पण वाटलं नव्हतं.

    खुप वर्षांपूर्वी म्हणजे राधा ताई जेंव्हा नविन लग्न होवून आपल्या सासरी आल्या तेंव्हां ह्या त्यांच्या मोठ्या दिराचा... मंदारच्या काकांचा मुंबईला कसलासा व्यवसाय होता. त्यावेळीं त्या व्यवसायात एकदा मोठं नुकसान झालं त्याचं. अगदीं सोने नाणे गहाण ठेवण्याची पाळी आली. तेंव्हां मंगला काकी आणि निशा रत्नागिरीला राहायला आल्या होत्या. राधाताईंनी स्वतः पुढाकार घेवून आपल्या नवऱ्याला काकांना आर्थिक मदत करायला लावली. अर्थात ते पैसे काकांनी परिस्थिती सुधारल्यावर थोडे थोडे करून परत केले होते. पण राधाताई त्या कठीण प्रसंगी आपल्या भावजयीपाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. झालंच तर, सरला काकीना रत्नागिरी डेपो जवळ वर्तमानपत्र आणि पुस्तकांचं एक छोटेखानी दुकान पण त्यांनी उघडून दिलं होते. एवढं करूनही, सरला काकीनी मागचे सारे ऋणानुबंध विसरुन आपल्या खोली.. जागेचा मोह धरावा याचं नाहीं म्हटलं तरी राधाताईंना वैषम्य वाटलंच.

      आता सरला काकी स्वतः राहायला यायचं म्हणत होत्या. राधाताईंना पण बरं वाटलं. तेवढीच सोबत झाली असती त्यांना सरला काकीची. पण ह्यावेळी त्यांना सरला काकी काही वेगळ्या नजरेनं त्यांच्या घराकडे.. मंदारच्या संसाराकडे ..त्यांच्याकडे पाहतेय असं वाटलं त्यांना. सरला यावेळी नेहमी सारखी अजिबातच वाटली नाही. थकलेल्या चेहऱ्याची, ओढलेल्या गालांची, डोळ्याखाली काळी वर्तुळे आलेली सरला कसल्यातरी विचारात असल्यासारखी वाटली. परत मुंबईला चाललेली सरलाकाकी त्यांना भेटायला म्हणुन त्यांच्या घरी आली तेंव्हा राधाताईंकडे एकटक पाहून म्हणाली, "वा वा... तब्येत सुधारली वहिनी तुमची... घर पण छान ठेवलंय तुम्हीं. " मग पुढं असं च काहीबाही बोलली.... मंदारच्या बायकोशी.. मुलांशी थोडेसे.. आणि मग निरोप घेवून गेली.

          त्याच रात्री राधाताईं ची तब्येत बिघडली. जुना वर्टिगोचा त्रास उफाळून वर आला. जेवण जेवलेले उलटी होवून बाहेर आले. भूक लागायची बंद झाली. राधा ताईंनी अंथरूण पकडलं ते अगदीं आता हॉस्पिटलला ऍडमिट करेपर्यंत.

       राधाताईंना ठामपणे वाटू लागलं की हे सर्व झालं ते सरला काकी भेटून गेल्यामुळे. तब्येत छान झाली आहे वगैरे त्या बोलल्या म्हणून.... नजर लागली जणू त्यांना त्यांची. कारण तोपर्यंत तर सगळं व्यवस्थित चाललेलं त्याचं. सरला काकीनी कौतुक केलं आणि तेंव्हां पासुन हे शुक्लकाष्ठ त्यांच्या पाठी लागलं. सरला काकीच्या मनात घराच्या जागेबद्दल आणि एकूणच त्यांच्या सध्याच्या बऱ्या परिस्थितीबद्दल आकस असल्यानं असं झालं.

      हॉस्पिटलमधुन घरी आणल्यानंतरसुध्दा ताईंच्या तब्येतीत उतार पडला नाही. एक दिवस व्यवस्थित जेवल्या वगैरे म्हणुन दुसरे दिवशी थोडे चालायला म्हणुन बाहेर घेवून जावं तर लगेच थकून.. गळून जायच्या. पुन्हा जेवण जात नाहीं... बाहेर येतं.. असं म्हणुन दिवसभर पडून.. निजून राहायच्या. खरं तर राधाताई म्हणजे कामाला वाघ असायच्या. मंदारचे वडील मंदारच्या लहानपणी वारले... मोठ्या हिंमतीने राधा ताईंनी मंदारला शिक्षण देवून मोठं केलं... घरी खानावळ चालवून.. लोकांचे डबे तयार करून संसार चालवला. मंदार रत्नागिरीच्या शाळेत शिक्षक म्हणुन नोकरीला लागला... बऱ्यापैकी कमवू लागला तेंव्हा चांगली सुशील मुलगी बघून त्याला संसार थाटून दिला.

      ..... पण आता राधाताईंचा आजार बळावत चालला होता. मंदार आणि त्याची बायको तर उघड उघड म्हणू लागली होती, ' सरला काकी भेटायला आली आणि आईंनी अंथरूण धरलं. नजर लागली काकीची.....' पुढं पंधरा वीस दिवस असेच गेले राधा ताईंच्या आजार काढण्यात. शेजारी पाजारी यांचं ऐकून मध्ये गंडेदोरे पण बांधून झाले राधाताईंना या काळात. एकदा अचानक मुंबईवरून काकांनी फोन केला सरला काकी देवाघरी गेल्याचा. मंदारला सुट्टी घेवून मुंबई गाठावी लागली.

            सरला काकींचे कार्य वगैरे आटपून मंदार आईच्या पायाशी बसला होता. राधाताई नेहमीप्रमाणे ग्लानित होत्या.

काही वेळानं त्यांना पुर्ण जाग आली तेंव्हा किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी मंदारला पाहिलं.

     " आता कसं वाटतंय आई तुला? "

      " नेहमीसारखंच रे.... सरला गेली... त्यांची नजर लागली वगैरे आपण म्हणायचो आणि ही स्वतःच गेली. व्यवस्थित झालं का रे त्याचं कार्य? " राधाताईंनी चौकशी केली.

      " आई... सरला काकीला दोन वर्षांपूर्वी कॅन्सर झालेला... त्यातून कशाबशा त्या बाहेर पडल्या पण हे त्यांनी आपल्याला कळू द्यायचं नाहीं असं काकांना बजावून ठेवलं होते. डॉक्टर काकांना म्हणाले होते त्या जगतील तेवढ्या जगतील... काहीच निश्चिती नाहीं. काकीना पण कळून चुकलं होतं. आपल्याकडं आलेल्या दीड महिन्यापूर्वी... त्यावेळीं देखील तब्येत खालावलेली होती त्यांची... पण आपल्या कोणाच्याच लक्षात नाही आलं."

मंदार म्हणाला.

     " हो रे.... आपण देखील शेवटी माणसं... आपल्या आपल्यातच गुंतलो होतो." राधाताई म्हणाल्या.

      " नाही आई.... शेवटच्या दोन-तीन दिवस फारच अत्यवस्थ झालेल्या त्या. आता आपला जाण्याचा दिवस जवळ आलेला आहे हे त्यांनी ओळखलं. काकांना जवळ बोलावून घेतलं आणि बोलल्या कोणाबद्दल तर आपल्याबद्दल."

       " त्या म्हणाल्या, की आपल्याला आता मागेपुढे कोणी नाही. आपली निशा तिच्या नवऱ्याबरोबर सुखाने संसार करील. पण राधाताईंची तब्येत पूर्वीपासून तोळा मासा आहे. त्यात तिला वर्टिगोचा त्रास. पुढं तिचं वय होईल तेंव्हां काही सांगता येत नाही. मूल मोठं झालं की कसं वागेल काही भरवसा नसतो. अशा वेळी तिला कसला तरी आधार हवा म्हणुन ती गावाकडील खोलीची जागा आपण तिच्या नावावर करु. या वेळी तिला काही औषध पाणी किंवा काही लागलं सवरलं तर काहीतरी तिचं स्वतः चे असावं म्हणून तिला उपयोग होईल."

      " आई... जाता जाता सरला काकी आपल्या बाजूची त्यांची खोली तूझ्या नावावर करून गेली."

       राधाताईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. त्यांना समोरचं काही दिसेना...  सरला काकींचा त्यांच्याकडे प्रेमाने पाहणारा चेहेरा तेव्हढा त्यांच्या नजरेसमोर तरळला.

      

योगेश साळवी 

   वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.  

     

      

Post a Comment (0)
Previous Post Next Post