Different strokes

 Different strokes     

✍️ अपर्णा पाटोळे   

सिद्धांती आणि अभिराजचे लग्न यथासांग पार पडले आणि आता रिसेप्शन.

मोठ्ठा लाॅन , हाय क्लास इव्हेंट मॅनेजमेंट, जगाच्या नकाशातील कित्येक देशांमधले मेन्यू , वेडिंग कपलचे डिझायनर काॅस्च्युमस. सगळा करोडोंचा मामला!!

का नसणार?

पुण्यातील प्रथितयश कार्डीयाक सर्जन डाॅ. मोने यांची लाडकी लेक आणि न आर आय बिझिनेसमन  मि.देसाई यांचा  धाकटा हॅन्डसम मुलगा यांचा विवाह सोहळा होता तो!!

अभिराज हा देसाईंचा धाकटा सुपुत्र तर आर्यन थोरला. अभिराजने नुकतेच एम बी ए केले आणि वडीलांच्या कंपनीचा भार उचलला. आर्यन थोडा वेगळा होता त्याला पेंटिंगची, लिखाणाची, फोटोग्राफीची आवड होती. तसे त्याने इंजिनिअरींग कंप्लिट केले होते वडलांच्या इच्छेखातर.

अरविंद देसाई आणि रमा देसाई यांचे हे दोघे चिरंजीव. 

अरविंदराव बरेच वर्ष यू स मधे एक कंसट्रक्शन फर्म चालवत होते. तर रमा ताई इंडियन रेस्टाॅरंट चालवत होत्या. बघता बघता दोघांच्याही बिझिनेसचा पसारा वाढत गेला. अरविंदरावांनी मेडिकल इक्विपमेंटस , फार्मसी यातही इनव्हेस्टमेंट केली. रमा ताईंच्या रेस्टाॅरंट चेन्स वाढत गेल्या. 

  जाॅर्जिया टेक युनिव्हर्सटीमध्ये  शिकत असताना सिद्धांति आणि अभिराजची ओळख झाली. रमा ताईंच्या अभिआर्य इंडियन कॅफेची सिद्धांति फॅनच होती. 

परदेशात राहून असे रूचकर मराठी पदार्थ चाखायला मिळणे म्हणजे पर्वणीच होती सिद्धांतीसाठी .

  अभि सिद्धि ची मैत्रि वाढत गेली , मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.दोघांचेही मास्टर्स झाले आणि आता लग्न ही.

तर मग आता आर्यन चे काय? त्याने लग्न का नाही केले? आलेल्या सगळ्या गेस्टस्च्या मनात हाच प्रश्न घुटमळत होता.

        गोरापान, राजबिंडा, प्रचंड बडबडा, म्युझिक, डान्स, खाण्याची आवड असलेला तसेच वेगवेगळ्या रेसिपीज हौसेने बनवणारा आर्यन वेगवेगळ्या कलासुद्धा जपणारा  होता. ऊत्साह ,चैतन्य त्याच्यामधे अखंड सळसळत होते. बिंगहॅमटन युनिवर्सीटी न्युयाॅर्कमधे शिकत असताना  सगळ्या इव्हेन्टस, अॅक्टीविटीजमधे टाॅपर होता. 

त्याला आधीपासून ओळखत असलेल्यांना आज या लग्न सोहळ्यात  त्याला बघून हाच आर्यन आहे हा विश्वासच बसत नव्हता. तो कोणाशी फारसे बोलताना दिसत नव्हता. कोणामधे मिसळत नव्हता. अगदी एकटा ,अलिप्त कोपरा पकडून उभा होता. अधूनमधून रमाताई त्याला बोलवून कोणाकोणाची ओळख करून देत होत्या. स्मित हास्य करून पुन्हा हा आपला कोपरा पकडत होता. लग्न रिसेप्शन सगळे पार पडले. अरविंदराव ,रमाताई आर्यन यू स ला परतण्याच्या तयारीला लागले . अभि आणि सिद्धी  नंतर येणार होते. 

सकाळ पासून डाॅ. मोनेंना अभिनंदन, कौतुक यानिमित्ताने फोन येत होते. त्याच बरोबर आर्यनसाठी स्थळे ही सूचवत होते. डाॅ. मोने बघतो, विचारतो, बोलतो अरविंदरावांशी अशी उत्तरे देऊन वेळ निभावत होते.

शेवटी डाॅ. मोनेंनी अरविंदरावांशी बोलायचे ठरवले.

आता आर्यनच्या लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे. त्या सगळ्यातून आता तो बाहेर आलाय.

अरविंदराव विचारात पडले. म्हणाले, "कोण मुलगी  त्याचा भूतकाळ  ऐकुन त्याच्याशी लग्न करायला तयार होईल? मला कोणाची फसवणूकही करायची नाही."

   हे संभाषण ऐकून रमाताईंचे मन चार वर्ष मागे हरवले.

  युनिवर्सिटीमधे शिकत असताना ज्युनिअर
सिनिअर ग्रुप प्रोजेक्टसची लगबग चालु होती. आर्यन सिनिअर्सचा प्रोजेक्ट लिडर होता तर नभा ज्युनिअर्सची टीम लीडर . 

धांदरट , सतत बडबडी , कुरळ्या केसांची, पिंगट डोळ्यांची , रंगाने गोरीपान हनुवटीवर परमनंट खळी असलेली अशी नभा . डोक्यात प्रोजेक्टच्या भन्नाट आईडिया . त्यामुळे अमेरिकन गोरी मुलं ,सगळे प्रोफेसर्सदेखील तिच्यावर इंप्रेस्ड होते. 

एकत्र प्रोजेक्ट करत असताना आर्यन आणि तिची ओळख झाली.

नभा चिटणीस मुळची मुंबईची . तिला देखील पेंटिगची, भटकण्याची , खाण्याची प्रचंड आवड. सतत बडबड आणि हसणे . 

मग काय आर्यनचे आणि तिचे सूर जुळायला वेळ लागला नाही. दोघांची चटकन गट्टी जमली . थोड्याच दिवसात एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. सतत एकत्र ,एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. पार्टीज ,मुव्हीज, नाईट क्लब्ज नवनवीन ठिकाणी भटकंती ,खादाडी चालूच होती.

आर्यनचे ग्रॅज्युएशन झाले. त्याचेच सेलिब्रेशन म्हणून दोघे liberty island ला गेले होते . गप्पांमधे रमले होते. 

 तेवढ्यात एक आफ्रिकन माथेफिरू अवतरला आणि फायरिंग चालू केले. सगळ्यांची धावपळ चालू झाली.

आर्यन नभा पण घाईने पळू लागले. तिथेच नियतीने घात केला , नभाला गोळी लागली, ती खाली कोसळली आणि तिथेच तिने प्राण सोडला. आर्यनच्या हाताला गोळी घासून गेली ,तो थोडक्यात बचावला पण बेशुद्ध होऊन खाली कोसळला . पोलिस त्या माथेफिरूला घेऊन गेले. अॅम्बुलन्स आल्या, डेड बाॅडीज ऊचलल्या जात होत्या. आर्यनला हाताला जखम झालीच होती. तो ही हाॅस्पिटलमधे दाखल झाला. इकडे नभाचे आई वडिल आले सगळ्या प्रोसिजर्स पुर्ण करून थोड्याच दिवसात मुंबईला परतले. थांबून करणार तरी काय होते?

काही दिवसांत आर्यनला डिसचार्ज मिळून तो घरी परतला. एकसारखा तो नभाची चौकशी करत होता. पण त्याला कोणी काहीच सांगत नव्हते. तिला काॅल करून , टेक्स्ट करून तो हैराण झाला होता. काहीच रिस्पाॅन्स मिळेना म्हणून कोणालाही न जुमानता त्याने थेट युनिव्हर्सिटी गाठली. तिथे त्याला ती न्यूज समजली.  त्याचे हात पाय हळूहळू पूर्ण शरीर सुन्न झाले. कसाबसा घरी पोहोचला.

नभा बरोबर पाहिलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती.

अभिराज , अरविंदराव रमाताई त्याला सावरायचा प्रयत्न करत होते पण काहीच उपयोग होईना. उत्साहाचा चैतन्याचा झरा पा...र आटून गेला होता.आर्यनने खाणे पिणेही सोडले. आर्यन नैराश्याच्या गर्तेत सापडला आणि हळूहळू ड्रग्जच्या विळख्यातही.
आर्यनची ही अवस्था पाहून रमाताई तर फार खचून गेल्या. तो घरी कोणाशीही बोलेनासा झाला. कोणी काही त्याच्याशी बोलायला गेले तर तो नीट उत्तरे देत नव्हता. तुसडेपणाने वागत होता. अरविंदराव पण त्याच्या काळजीने विचाराने अस्वस्थ  झाले होते. अभिराजलाही त्याचे काॅलेज अभ्यास सोडून जास्त काळ थांबता आले नाही. या सगळ्याचा त्याच्यावर ,अभ्यासावर परिणाम नको म्हणून अरविंदरावांनी त्याला त्याच्या हाॅस्टेलला जायला सांगितले. आर्यन पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेला. त्यातून त्याला बाहेर काढणे अशक्यप्राय झाले हेते. अभिराज विकएंडला येउन आई वडिलांना सावरत होता, धीर देत होता. हसत्या खेळत्या आनंदी कुटुंबाला  जणू काही नजर लागली होती.
तिकडे अभिराजही खुप डिस्टर्ब होता. या सगळ्यात सिद्धांती त्याला धीर देत होती. "तूच असा खचून गेलास तर कसे चालणार ?तुला सगळ्यांना सावरायला हवे. मी कायम तुझ्या सोबत असेन आपण यातून मार्ग काढू."
आर्यन व्हाॅयलंट व्हायला लागला होता. शेवटी अरविंदराव , अभिराज व सिद्धांती यांच्या महत्प्रयासाने आर्यनला रिहॅबमधे दाखल केले. तिथूनही त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला.

आर्यनला रिहॅबमधे दाखल केले. त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही . त्याला रिहॅबमधे राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही . 

तिथे त्याच्या फिजिकल मेंटल हेल्थची योग्य काळजी घेतली जात होती. 

अभिराजचे एम बी ए कमप्लिट झाले तो घरी आला . त्याने बिझीनेसमधे लक्ष द्यायला सुरूवात केली. आणि अरविंदरावांचा भार थोडा हलका केला. वर्षभरात आर्यनमधे पण बरीच सुधारणा झाली. काहीच दिवसात त्याला घरी जायची पण परवानगी मिळाली. फक्त काऊन्सेलिंग सेशन्स चालू ठेवायला सांगितले होते. देसाई कुटुंब हळूहळू सावरायला लागले. हरवलेला आनंद परतायला लागला होता. या सगळ्याचा अंदाज घेऊन डाॅ. मोनेनी फोन करून अभि सिद्धीच्या लग्नाचा विषय काढला. लग्न ठरले आणि देसाई पुण्याला दाखल झाले. लग्न, रिसेप्शन सगळं काही छान पार पडले, आता अरविंदराव रमाताई आर्यन यू एस ला परतायच्या तयारीला लागले होते. अभि सिद्धी नंतर जाणार होते. 

अभिराजला एक कल्पना सुचली. काही दिवस आर्यनला आपल्याबरोबर इंडियात थांबवावे. वेगळ्या वातावरणात त्याला बरे वाटेल. अरविंदरावानाही हे पटले. सिद्धांती आणि अभिराजने खूपच लावून धरल्यावर आर्यन थांबायला तयार झाला अन् अरविंदराव व रमाताई  दोघेच निघून गेले. 

अभि सिद्धी आर्यनला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जात होते. कधी म्युझिक काॅनसर्टस् ला पेंटींग एक्सिबिशन्सला, सिद्धांतीच्या फ्रेंडस् बरोबर पार्टीजला. पण आर्यन कोणामधे मिसळत नव्हता . त्याची पेंटीगची आवड बघून डाॅ. मोने नी त्याला पेंटींग मटेरियल गिफ्ट केले पण त्याने ते सोडलेच होते. 

एक दिवस डाॅ. मोने आर्यनला प्रभात रोड वरच्या आर्ट गॅलरीमधे असलेल्या एक्सिबिशनला घेऊन गेले. एक्सिबिशनचे नाव होते Different Strokes. तिथे काही वेगळ्याच प्रकारची पेंटिंगज होती. अंध ,अपंग, लास्ट स्टेज कॅन्सर पेशंटस्, मानसिक विकलांग, दुष्काळग्रस्त शेतकरी, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांचे कटुंब अशा सगळ्यांच्या भावना त्यातून व्यक्त केल्या होत्या. आर्यन त्या पेंटींगजचे बारकाईने निरिक्षण करत होता. ते बघून त्याचे मन हेलावून गेले. दुःखद ,अवघड परिस्थितीतही हे लोक आपला जीवन प्रवास चालू ठेवतात. परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतायत तर आपले दुःख, नैराश्य  या सगळ्यांसमोर काहीच नाही. याची त्याला जाणीव झाली. तिथेच एक जण आलेल्या गेस्टस् ला पेंटिंगज एक्सप्लेन करत होती. तिच्या आवाजात इतके माधुर्य होते की आलेला प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. आर्यन ही ऐकत होता. आर्यनला तिच्याबरोबर काहीतरी चर्चा करताना डाॅ. मोनेनी बघितले व ते ही चर्चेत सामिल झाले. आर्यनला कोणाशीतरी बोलताना बघून त्यांना फार बरे वाटले.  बोलता बोलता डाॅ. मोनेनी तिची माहीती काढून घेतली आणि काॅन्टॅक्ट नंबरदेखील.

ओवी महाजन M.sc सायकाॅलाॅजी झालेली , पुण्यातील कर्वे रोडवर मन करा रे प्रसन्न नावाचे  काउन्सेलिंग सेंटर चालवते. पुण्यातील बर्याच मोठया हाॅस्पिटलमधे काउन्सेलिंगला जाते शिवाय पुणे अंध शाळा, कामायनी, जीवन ज्योत , सुह्रूद मंडळ, निवारा वृद्धाश्रम अशा ठिकाणी कायम भेटी देते. स्वतः उत्तम पेंटर असून पेंटींगच्या माध्यमातून विकलांग मुलांच्या भावना सामान्य लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करते.  आवाजात अत्यंत गोडवा थोडी कमी बोलणारी पण इतरांना बोलतं करण्याची आणि त्यांना ऐकून घेण्याची  कला तिच्यामधे आहे. डाॅ. मोने तिच्यावर इंप्रेस्ड झाले. 

     मोनेनी फोन करून तिला आर्यनची केस ऐकवली आणि रविवारी घरी येऊन भेटण्याची विनंती केली. ठरल्या प्रमाणे ती आलीदेखील. आर्यनशी बराच वेळ गप्पा झाल्या. तिने जादू केल्या प्रमाणे आर्यन तिच्याजवळ बोलता झाला. अशाच तिच्याबरोबर भेटी चालू झाल्या , ओवी बरोबर तो हाॅस्पिटलस्, अनाथआश्रमात भेटी देऊ लागला. त्यातून त्याला  आनंद मिळत होता. आता पूर्वीचा आर्यन हळूहळू परत येत होता. ओवीबरोबर त्याची छान मैत्री झाली. अरविंदरावांना सिद्धीकडून सगळे अपडेटस् मिळत होते. देसाई कुटुंब आता सावरले होते. ओवीला आर्यनसाठी मागणी घालावी असे अरविंदरावांना वाटत होते कारण त्याला समजून घेणारी त्याच्याशी जुळवून घेणारी दुसरी कोणी मिळणे अशक्य होते. इकडे ओवीला ही आर्यन प्रथमदर्शनीच खूप आवडला होता. अरविंदरावांनी तिला लग्नाची मागणी  घातली.  तेव्हा तिचे म्हणणे होते आर्यनला अजून थोडा वेळ द्यावा. आर्यनने ओवीबरोबर एक ठरवले, या DIFFERENT STROKES ची जगभर ओळख करून द्यायची. वेगवेगळ्या देशांमधे हे पेंटीग एक्सिबिशन भरवावे असे त्याला वाटत होते. आणि  दोघांनी त्या दृष्टीने पावलेही उचलली. त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.  शेवटी न राहवून  एक दिवस ओवीनेच आर्यनला प्रपोज केले त्याने होकार ही दिला .आता लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकतील.

समाप्त:  

 लेखिका  : Aparna Dandawate P

वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
 
1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post