निर्णय

 निर्णय 

✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

आक्का म्हणजे अगदी अबोल प्राजक्त जणू. कधी कुणाच्या अध्यात नाहीत की मध्यात नाहीत. अगदी नाकासमोर चालणाऱ्या साध्या आणि सरळ स्वभावाच्या. असणारच न कारण तात्या खुप रागीट होते. जरा कुठे काही कमी जास्त झालं की ह्याचं पित्त खवळलंच समजा. मग एक जण निखारा असल्यावर दुसरा पाणीच असायला लागतो न नाहीतर संसार होणार कसा?

तर तात्या जाऊन आता ५ वर्ष होत आली. आक्का आणि तात्यांची दोन्ही मुलं परदेशात राहायला. कोल्हापुरात इतका मोठा वाडा असून सुद्धा मुलं- सुना कधी फिरकले ही नाहीत. चौकशी नाही की आपुलकीने आक्का-तात्यांना पैसे पाठवणं नाही. तशी तात्यांना गरज नव्हतीच पण आईवडिलांवर प्रेम म्हणून काही असणं नाही. तात्यांच्या वेळी फक्त दिवस केले आणि आपापल्या बायकांसोबत गेले ही परत. पण आक्कांना नातवंडांचा खूप लळा लागला त्या दिवसात. निदान त्यांच्या किलबिलाटाने घराला घरपण आलं होतं. तात्यांचं नसण्यावरचं एक मलम च होती नातवंड म्हणजे. पण तेरा दिवस झाल्यावर सगळं घर सुनसुन झालं. ह्या विचारात असतानाच देवळात त्यांच्या बाजूला कधी सुधीरराव येऊन बसले त्यांना कळलंही नाही. सुधीर पाटील म्हणजे एक मोठं प्रस्थ कोल्हापूर मधलं. पण स्वभावाने अगदी मनमिळावू. त्यांच्या स्वभावाने त्यांनी सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. सुधीररावांची कारभारीण पण ८ वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली होती आणि ते एकटे पडले होते. मुलगा होता जवळ राहत पण तरी अर्धांगिनी ती अर्धांगिनीच. त्यामुळे तेही देवळात यायचे तेवढीच मित्रांशी भेटीगाठी होत. शिवाय रोज ते आणि आक्का एकमेकांशी गप्पा मारायचे. छान वेळ जात होता आणि दोघांना एकमेकांचा स्वभाव आवडायला लागला होता.

रोज देवळात मग रंकाळा वर फिरती असं करून दोघे घरी जात. तसा दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता हवाहवासा होता. पण तरीही काहीतरी खटकत होतं. समाजाची बंधनं आड येत होती. एक दिवशी सुधीररावांनी विचारलंच आक्कांना सहचर्याबद्दल. तेव्हा आक्कांना काय बोलावं सुचेचना. सुधीरराव म्हणाले, "काय झालं या वयात कुणाची साथ आवडणं म्हणजे अवखळपणा असं नाहीये. आयुष्याच्या शेवटपर्यंत कुणीतरी असावं बोलायला, फिरायला असं वाटणं यात गैर काय आहे. उगीच गावात नको ते पेव फुटण्यापेक्षा आपण एकत्र सहवासाने आपलं पुढचं आयुष्य व्यतीत केलं तर काय हरकत आहे? पण तुम्हाला नको वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही." आक्का शांतच होत्या. त्या म्हणाल्या, "पण मुलांचं काय?" तर सुधीरराव म्हणाले, "अहो आपण मुलांचं सर्व केलंच की आपापल्या संसारात होतो तेव्हा. मग आता ते त्यांच्या संसारात आहेत. त्यांच्या जबाबदारीतून आपण मुक्तता कधीतरी घायलाच हवी न. आणि आयुष्य आपलं आहे ते कुणी कसं कुणाबरोबर जगावं हा आपला प्रश्न आहे असं नाही का वाटत तुम्हाला?" आक्काना हे पटत होतं. पण त्यांनी सांगितलं, "मला वेळ हवाय विचार करायला." त्यावर सुधीरराव म्हणाले, "हवा तेवढा वेळ घ्या पण वेळ निघून जाईल एवढा मात्र वेळ लावू नका." आणि ते त्यांच्या भारदार मिश्यांमधून मोठ्याने गडगडाटी हसले.

        आक्का घरी गेल्या तो दारात त्यांना त्यांचा मोठा मुलगा दिसला. त्यांना आश्चर्य वाटलं. तो म्हणाला "असंच आलो तुला बघायला. आक्कांना काहीतरी काळंबेर वाटलं. अचानक कसा आला हा न सांगता आणि तेही इतक्या वर्षांनी. दोन दिवसांनी धाकटा लेक पण हजर झाला. त्या खूप आनंदल्या. दोन दिवस खूप छान छान करून घातलं त्यांनी मुलांना. अगदी प्रेमाने सगळं करत होत्या मुलांचं. पण हा आनंद जास्त टिकला नाही कारण त्या रात्री त्यांनी दोघांना घराच्या वाटणीबाबद्दल बोलताना ऐकलं आणि त्यांच्या डोक्यात तिरमिरी गेली. म्हणून हे दोघे असे ठरवून आलेत. त्यांनी खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सुधीररावांना घरी बोलावून घेतलं. त्या दिवशी त्या अगदी ठाम दिसत होत्या. मुलांनी विचारलं, "हे कोण?" त्यावर आक्का म्हणाल्या, "हे सुधीरराव आणि आम्ही आमचं पुढचं आयुष्य एकत्र घालवायचं निर्णय घेतला आहे."  मोठा मुलगा ओरडलाच एकदम, "आई अग काय ही थेरं? या वयात हे काय सुचतंय तुला?" त्यावर दुसऱ्यानेही री ओढली, "आई, अग काहीही काय लोक काय म्हणतील. आम्हाला हसतील लोकं." त्यावर आक्का खुर्चीतून उठल्या आणि पहिल्यांदाच मुलांच्या डोळ्यात डोळे घालून बोलल्या, "अरे तुम्हाला आईची लाज वाटते तर आलातच कशाला? इतके वर्ष ढुंकूनही पाहिलं नाहीत. आई जिवंत आहे की गेली याची साधी चौकशी केली नाहीत. आणि आता माझं वय झालं म्हंटल्यावर वाटे मागायला आलात? पहिले तुमचं सामान घ्या आणि चालते व्हा. तुम्हाला आई नकोय पण तिने सांभाळलेली ही प्रॉपर्टी हवी आहे. तात्यांनी उभी केली मी सांभाळली आणि त्यावर आता हक्क दाखवायला आलात? अरे आई काय असते तुम्हाला कधीच कळणार नाही. तुम्ही मला सोयीस्कर विसरलात आणि आता लोक काय म्हणतील म्हणून सांगताय मला. निघा इथून माझा निर्णय झालाय आणि 'हे' आणि मी आता याच घरात राहणार आहोत अगदी शेवटपर्यंत."

हे ऐकून मुलं खजील झाली आणि निघून गेली आणि आक्का मात्र अगदी धीरगंभीरतेने आणि ठामपणे तात्यांच्या फोटोकडे बघत राहिल्या. त्यांचा निर्णय झाला होता आणि सुधीरराव सुद्धा त्यांच्या निर्णयाचं मनातल्या मनात कौतुक करत होते.

।।शुभम् भवतु।।

✍️ सौ.अतुला प्रणव मेहेंदळे.

वरील कथा सौ.अतुला प्रणव मेहेंदळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
 

Post a Comment (0)
Previous Post Next Post