पैज

 *पैज*

✍️ स्मिता मुंगळे

    दारात मांडव....घराला लायटिंग...

सगळीकडे केशरी आणि पिवळ्याधमक  झेंडूच्या माळा लावलेल्या...

घरभर गप्पागोष्टी  आणि हास्याची कारंजी....

हॉलमध्ये रंगलेला महिला वर्गाचा मेंदीचा कार्यक्रम.....

त्याच्या मनात आले....घर कसं दृष्ट लागण्याजोगे दिसतेय.

तो कामाच्या गडबडीत....

येताजाता लाडक्या एकुलत्या एक लेकीला लांबूनच डोळे भरून बघतोय.

तिच्या जवळ गेलो तर न जाणे भावनांचा बांध फुटेल याचीच मनात भीती.

उद्या संध्याकाळी सीमांतपूजन.....

उद्या दुपारीच हॉलवर निघायचंय.

आजची राहिलेली सगळी कामे दिवसभर आवरून आता रात्री जेवून पाहुण्यांना आणायला त्याला निघायचं होतं.

एकदा का उद्या सकाळी नवऱ्या मुलांकडचे लोक आले की फक्त त्यांच्याकडेच लक्ष द्यावं लागणार.

मग कुठलं लेकीला जवळ घेता येणार?

हसतखेळत जेवणं पार पडली.

जेवताना तर तो डोळ्यात पाणी येईपर्यंत हसला.

"चला....निघतो आता.पाहुणे मंडळी दिल्लीहून वेळेत येतायेत.आपण महाराष्ट्रीअन माणसं सुद्धा वेळेचे पक्के आहोत हे त्यांना कळायला हवं"...असं म्हणून तो धाकट्या भावासोबत बाहेर पडला."रात्रीची वेळ आहे,सावकाश ह"...इति बायको.

निघताना हॉलमध्ये नजर फिरवली तर लेक हातावर कोपरापर्यंत मेंदी काढून बसलेली.आता पायावर मेंदी काढणं सुरू होतं.

क्षणात आठवलं,लेक लहान असताना मेंदी काढली की "बाबा,तू जेवायला घाल".....असा हट्ट करायची.कौतुकाने बाबाला मेंदी दाखवायची.

आज तिची मेंदीची डिझाइन स्पष्ट दिसेल की नाही  शंका वाटते...डोळ्यातल्या पाण्यानं दगा दिला तर....

तो शांतपणे गाडीत जाऊन बसला.

भाऊ म्हणाला,"दादा,दिवसभर धावपळ करून दमला आहेस.तू बस...मी गाडी चालवतो."

पडत्या फळाची आज्ञा मानून तो बसला.

"दोन मिनिटं"....भावाला म्हणाला अन खाली उतरला.

धावत घरात शिरला तशी लेक मेंदी काढता काढता उठली अन येऊन बाबाला घट्ट बिलगली.

"तेच म्हटलं...बाबा मला न भेटता कसा निघाला?"लेक स्फुंदत बोलली.

तो निःशब्द.....

समोरून बायकोने डोळ्यानेच खुणावले.

तिच्या डोळ्यातले ते न उच्चारलेले वाक्य त्याला कळाले.

कायम बायकोला 'रडुबाई' म्हणणारा तो...लेकीचं लग्न ठरलं तसा हळवा होत चालला होता.

बायको म्हणाली..."कायम मला रडुबाई म्हणता ना,आता मी बघतेच लेक सासरी जाताना निरोप देतेवेळी कोण जास्त रडतंय.... तुम्ही की मी?"

मग मात्र दोघांची पैज लागली....लेकीच्या पाठवणी वेळी न रडण्याची.दोघेही ठाम होते..."मी नाही रडणार.तिला हसत हसत निरोप देणार."बघूया....ठरलं तर.

आत्ता बायको त्याच पैजेची आठवण त्याला डोळ्याने करून देत होती.

त्याने स्वतःला सावरलं.

लेकीला म्हणाला,"बच्चा...असा जातो अन असा येतो बघ 'जमाई राजा' ला घेवून.

सकाळी मी येईपर्यंत तुझी मेंदी छान रंगलेली असेल.बायकोकडे तिरका कटाक्ष टाकून म्हणतो कसा,"जितके जोडीदाराचे प्रेम जास्त,तेवढी मेंदी जास्त रंगते.तू पण लवकर आवर आणि घे मेंदी काढून वधूमाय.मी सकाळी आल्यावर बघतो तुझी मेंदी किती रंगलेली आहे ते."

"आता निघा लवकर,तरच वेळेत पोहोचाल आणि लवकर याल",बायको म्हणाली.

उत्साहाने तो भावाबरोबर व्याह्यांना आणायला निघाला.

भाऊ खूप काही बोलत होता...लग्नसमारंभ, देणं घेणं,डेकोरेटर,मेनू.

हा मात्र लेकीच्या बालपणीच्या आठवणीत हरवलेला.

बघता बघता आपली इवलीशी परी लग्न करून सासरी निघाली की...

लहानपणीची ही हट्टी पोर आता लग्नात उगाच जास्त खर्च करू नका म्हणून मलाच वेळोवेळी बजावत राहते.तिला काय माहिती,लहानपणी बाहेर गेल्यावर दिसेल ती गोष्ट हवीच...म्हणून किती हट्ट करायची ते.

मुली किती लवकर मोठ्या होतात नाही....या विचारासरशी त्याला उगाच हसू आलं.

पूर्ण प्रवासभर त्याने लेकीचं बालपण पुन्हा आठवणीतून अनुभवलं.

नाहीतरी लग्नाच्या तयारीत गेले दोन महिने निवांतपणा तरी कुठे मिळाला होता?

"दादा,मागे जाऊन बस...एक डुलकी काढ, बरं वाटेल."

आज्ञाधारकपणे तो खाली उतरला आणि मागच्या सीटवर बसला.

पहाटे कधीतरी त्याला क्षणभर डोळा लागला.

भावाला आपल्या दमून झोपलेल्या मोठ्या भावाकडे बघून उगाच भरून आलं.

झालं...आता अर्ध्या तासात एअरपोर्टवर पोहोचू.मगच दादाला उठवू.

आणि........

काही कळण्यापूर्वीच गाडी डिव्हायडरवर जाऊन उलटी झाली.अंधारात वेगात असणारी गाडी कधी आणि कशी ....कळलेच नाही.

सीटबेल्ट लावल्याने भावाला थोडेफार लागले पण हा.....जागेवरच.सगळं संपलं होतं.

लेकीच्या लग्नाची स्वप्नं बरोबर घेऊनच तो एका क्षणात अंनताच्या प्रवासाला निघून गेला होता.

सगळे सोपस्कार पार पडले.

कितीही अवघड वाटले तरी घरी बातमी सांगावीच लागणार होती.

त्याच्या बायकोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी, शब्दांची आदलाबदल करून बातमी पोहचली...शब्द उलटसुलट केले तरी बातमी तीच असते ना.

पहाटेपर्यंत मेंदीच्या रंगात आणि हास्याच्या लकेरीत सजलेले ते लग्नघर शांत झोपेत असतानाच बातमी येवून धडकली होती.वैऱ्यावरही येऊ नये असा प्रसंग.

कायम 'रडुबाई' बिरुद मिरवणारी त्याची बायको घडलेल्या घटनेने स्तब्ध.

ना बोलणं...ना रडणं.

समोर आक्रोश करणारे आप्तस्वकीय,

लाडकी लेक धाय मोकलून रडतीये पण ही....

डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही की

 तोंडातून चकार शब्द नाही.

शून्यात हरवलेल्या तिला कोणीतरी हातावरची मेंदी धुवायला लावली.तिने जे कोणी  सांगेल ते ते  केले...यांत्रिकपणे.

तिची मेंदी नेहमीपेक्षा जरा जास्तच रंगली होती यावेळी.

"जोडीदाराचे प्रेम जास्त असले की....."..तिला त्याचा रात्रीचा डायलॉग आठवला आणि त्यानंतरचे त्याचे खट्याळ हसणे.

काय खोटं बोलला होता तो?

होतंच त्याचं जीवापाड प्रेम तिच्यावर.

मग....असा कसा मला एकटीला मागे सोडून गेला?

आणि....ती कन्यादानाची दोघांनी एकत्र पाहिलेली स्वप्नं.

लेकीच्या पाठवणी वेळी न रडण्याची...लेकीला हसत हसत निरोप देण्याची लावलेली पैज.

नक्की काय खरंय?

तो नाहीये हे की त्याने पैज जिंकलीये हे.

समस्त महिला वर्ग तिने रडावं यासाठी प्रयत्नात.

कोणी त्याच्या आठवणी काढतायेत तर कोणी त्याच्या स्वभावाचे गोडवे गातायेत.

ती मात्र ढिम्म.

जे काही सुरू आहे ते जणू तिच्या मेंदूत शिरतंच नाहीये.

दिवसभर सांत्वनासाठी येणारी माणसं, तेच ते परत परत बोलणं....

आणि एका क्षणी तिच्या कानावर पडलं... एवढ्या लांबून मुलाकडची माणसं आली आहेत.नवरीला न घेता गेली तर म्हणे त्यांच्याकडे अपशकुन मानतात.

म्हणजे आता एकुलती लेक देखील निघाली?

काल तो परत न येण्यासाठी गेला आणि आज लेक सासरी निघाली सुद्धा.

जड अंतःकरणाने तिला विचारायला कोणीतरी आले.

हिने मानेनेच लग्न लावून द्यायला होकार दिला.

तिच्याकडे दुसरा पर्याय होता कुठे?

त्या दोघांनी एकत्र बघितलेलं स्वप्न अशा विचित्र परिस्थितीत पूर्ण होत होतं.

मात्र ती एकटीच ते बघणार होती आणि तो स्वर्गातून त्याच्या लाडक्या लेकीवर आशीर्वादाची फुलं उधळणार होता.

लेक सासरी जायला निघाली.

 सगळ्यांना वाटलं आता तरी ती रडेल...पण कसलं काय.

ही अजूनही स्तब्ध आणि निःशब्द.

लेक आईला घट्ट मिठी मारून पोटभर रडली.

"आई,काळजी घे ग"...असे पुन्हा पुन्हा बजावत राहिली.

काय नव्हतं त्या मिठीत?

अचानक बाबा गेल्याचं दुःख...एकट्या पडलेल्या आईची काळजी,आणखी खूप काही.....

सांगता न येणारे.

आईच्या आतड्याला पिळ पडत होता पण डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नव्हता जणू त्याने तिला दिलेलं 'रडुबाई' हे बिरुद तिला आता पुसून टाकायचे होते.

तिनं मान वर करुन आकाशाकडे पाहिले.जणू ती त्याला सांगत होती... "मी जिंकलेय ह पैज...लेकीच्या पाठवणीवेळी डोळ्यातून पाणी नाही काढलं."

आणि वरून तो डोळ्यानेच तिला खुणावत होता....."मी पण पैज जिंकलोय.....मी पण नाही रडलो."

पैज दोघांनी जिंकली होती....फक्त परिस्थिती बदलली होती.

    ✍️ स्मिता मुंगळे.

वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
Post a Comment (0)
Previous Post Next Post