कायापालट

 कायापालट ...

✍️ योगेश साळवी

  "संगीता.S ... काईंडली चेक हाउ मच पेशंटस् आर वेटिंग आऊटसाईड..." डॉक्टर अहिरे यांनी आपल्या असिस्टंट ला सांगितलं.

    " सर.. आता इथून गेलेले पेशंट आपले शेवटचे होते. वेटिंग रूम मध्ये आता कोणीही नाही." संगीता म्हणाली.

   "ठीक आहे. साधारण पंधरा मिनिटे वाट पाहू.. त्यानंतर क्लिनिक बंद करू. तू   आवराआवर करायला घे."

    "ठीक आहे सर." संगीता.. डॉक्टर अहिरे यांची एक हुशार असिस्टंट. डॉक्टर अहिरे आठवू लागले.... हीच संगीता दोन वर्षांपूर्वी आपल्या क्लिनिकमध्ये तिच्या आईबरोबर रुग्ण म्हणून आलेली. सारखी चिडचिड करणारी ,जीवनाला वैतागलेली, असाध्य दुखणं स्वतःला झाले असे समजणारी ... पण तिच्यावर आपण उपचार केले. नंतर स्वतःच तिने संमोहन शास्त्राचा अभ्यास करून आपल्या वेदनेवर ...भावनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतः उपचार करण्याचा सराव सुरू केला. तिची प्रगती पाहून आपणच तिला आपली असिस्टंट होण्याची जॉब ऑफर दिली. अतिशय हुशारीने ती तिचे काम आज कुशलतेने  करतेय. त्यांच्या डोळ्यापुढे संगीता आणि तिची आई पहिल्यांदाच क्लिनिक मध्ये आले तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहिला.

    दोन वर्षांपूर्वी एक साठीची प्रौढ स्त्री आणि तिच्याबरोबर तिची मुलगी एक तिशी पार केलेली स्त्री डॉक्टर अहिरे यांच्या क्लिनिक मध्ये आल्या. त्याची प्रौढाव होती तिच्याशी त्यांचं बोलणं आधीच झालं होतं. त्यात वासंती बाईंनी आपल्या मुली बाबत जुजबी माहिती दिली होती. त्याशिवाय त्या मुलीच्या.. संगीताच्या संदर्भातील केस फाईल मधील कागदपत्रे डॉक्टरांनी तपासून पाहिली होती. संगीताला एक वेगळाच आजार झाला होता. तिच्या स्नायूमध्ये मध्ये अनामिक वेदना व्हायच्या. .. असहय अशा... हात अगदी स्थिरच ठेवावा लागायचा... जरा हलवला की खांद्यातून कळा यायच्या. बऱ्याच ऑर्थोपेडिक्स तज्ञ डॉक्टरांना आणि नामवंत सर्जन ना तिला दाखवून झालेले. पण त्यांनी क्ष किरणांनी काढलेल्या आणि इतरही रिपोर्ट्स मध्ये काही चिंताजनक आढळलं नव्हतं. सगळ्या डॉक्टरांनी एकदाच सांगितलेलं की हे सगळे मनाचे खेळ आहेत. त्यांना काहीच झालं नाहीये. एखाद्या मनोविकार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला त्यांना मिळाल्याने शेवटी वासंती बाई संगीताला घेऊन डॉक्टर अहिर यांच्या क्लिनिकमध्ये आल्या होत्या.

"हे बघा ..संगीता मॅडम, मला वासंती ताईंनी तुमच्याबद्दल आणि तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले आहे. याशिवाय तुम्हाला तुमचं वेगळं असं खाजगी काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगा." डॉक्टर अहिरेनी असं म्हणून वासंती बाईंना बाहेर थांबायला सांगितलं.

     आई बाहेर गेली असं बघून संगीता सांगू लागली.

  " डॉक्टर ,माझं लग्न या माहेरच्या माणसांनी एका सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणा बरोबर लावून दिलं. आमचं लग्न फक्त शारीरिक संबंधा पुरतं मर्यादित राहिलं. आमच्या मनाच्या तारा कधी जुळल्याच नाहीत. पहिलं बाळंतपण झालं. मुलगा झाला. घरच्यांच्या म्हणण्यानुसार बाळंपणानंतर मला वेडाचे झटके यायला सुरुवात झाली. मी म्हणे त्यावेळी फार चिडचिड करू लागले. अतिशय उदास राहू लागले. सारखी आदळ आपट करायची. असंबद्ध बडबडायची. म्हणून माझ्या नवऱ्याने वेड्यांच्या इस्पितळात मला भरती केलं.

    डॉक्टर अहिरेंनी संगीताच्या डोळ्यात निरखून पाहिले. अर्थात तिचे लक्ष नसताना. तशी ती त्यांच्याकडे पहात बोलत नव्हतीच. क्लिनिकला असलेल्या खिडकीतून दूरवर पहात ती आठवत बोलू लागली.

     " वेड लागलं म्हणून मला लवकरच घटस्फोट दिला त्यांनी. मी बरी झाल्यावर हॉस्पिटल वाल्यांनी डिस्चार्ज दिला मला. आईकडे माहेरी आल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एक बरं झालं मुलाचा ताबा मला मिळाला. काही जवळच्या नातेवाईकांनी खटपट करून मला माझ्या शिक्षणाच्या आधारावर सरकारी कार्यालयात नोकरी लावली. पगारही चांगला म्हणावा असा होता. वर्ष दीड वर्ष बरं चाललं..."

        संगीता पुढे बोलली." पण गेल्या काही वर्षापासून स्नायूंच्या  खोबणीमध्ये काहीतरी जड वस्तू ठेवल्यासारखं वाटतं. हात खाली वर करता येत नाही. आतून काळा निळा पडला हो माझा हात... असह्य वेदना होतात मला... आणि एकजात सगळे वेडे डॉक्टर म्हणतात की मला काही झालं नाही म्हणून..." 

      संगीताने बोलणं संपवलं . बोलताना तिला किंचित धाप लागली होती. डॉक्टरांनी तिला पाणी प्यायला दिले आणि थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं. असिस्टंट ला सांगून वासंतीबाई ना आत बोलवलं.

      "वासंती मॅडम तुमच्या मुलीचं दुखणं शारीरिक नाही तर मानसिक आहे. हा त्रास खरं तर पंधरा वर्षांपूर्वी ती बाळंत झाली तेव्हा सौम्य प्रमाणात चालू झाला. बालपणा नंतर काही स्त्रियांना असे नैराश्याचे ,उदासीनतेचे झटके येऊ शकतात. अर्थात अशी स्त्री हजारामध्ये एखादी असते. या गोष्टीचे प्रमाण अत्यल्प असतं आणि हे झटके सुद्धा सौम्य स्वरूपाचे असतात. खरंतर अशा वेळी त्यांना जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची, आधाराची गरज असते. तिच्या नवऱ्याने.. सासरच्या माणसांनी उलट तिच्या या मानसिक स्थितीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग केला. बरे तो भूतकाळ झाला. आपण यावर आता उपाय काय करता येईल ते पाहू. नजीकच्या काळात ही शरीर दुखण्याची तक्रार सोडली तर मागे होऊन गेलेल्या वेडाची लक्षणे तुम्हाला सध्या कधी दिसण्यात आलीत का? " डॉक्टर अहिरे नी विचारलं.

      "हो डॉक्टर .मी वाट पाहत होते तुम्ही कधी विचारता याची. आजचीच गोष्ट घ्या.. आता येताना आम्ही बसमधून आलो. बस मध्ये खिडकीपाशी संगीता बसलेली. ही खिडकी बाहेर पाहत होती. ट्रॅफिक मध्ये बस थांबल्यावर हिला बाजूच्या टॅक्सी मध्ये एक लहान मुलगी दिसली. मुलगी बिचारी आपल्या धुंदीत चॉकलेट का चुईंग गम खात होती. तिला बघून संगीताचा रागाचा पारा चढला. शिव्या द्यायला लागली. तिला वाटत होतं किती लहान मुलगी तिला चिडवून दाखवते म्हणून. अगदी तिचा गळा दाबून तिच्या तोंडातले चॉकलेट बाहेर काढेन म्हणत होती. बरं झालं ट्रॅफिक सुटला नाही तर सगळे लोकं चेष्टा करू लागले असते... मला तर इतके लाजल्यासारखं झालं..."

      " इतकी वेड्यासारखी करते कधी कधी... बस मध्ये बसायला जागा मिळावी म्हणून कामावर एक तास आधी निघते. कामावर कशी काय जाणे बरोबर वागते... पण घरी येताना हिला कधी कधी बस मध्ये बसायला जागा मिळत नाही... तर ही चक्क रडू लागते...मोठ्याने.. बसलेल्यांना वाटतं की हिला काहीतरी त्रास होतोय म्हणून. त्यांच्यापैकी एखादा उठून तिला बसायला देतो. ही बसते तर खरी... पण मग नंतर बस मधल्या सर्वांना... अगदी त्या सीट दिलेल्या माणसाला सुद्धा चांगली वीस पंचवीस मिनिटे शिव्या देते."वासंती बाई आता गंभीर होत चालल्या होत्या.

      "आपल्या विरुद्ध सारेजण कटकारस्थान करतात.. असं सारखं वाटतं तिला. ती सांगत असलेल्या गोष्टीवरून कळतं. कधी कधी माझ्यावर सुद्धा संशय घेते... मला हडळ .. चेटकिन सुद्धा बोलते... आणि एकदा का तिच्या हात दुखीचा,कंबर दुखण्याचा त्रास सुरू झाला... की सारं घर डोक्यावर घेते."

      वासंती बाई बोलत असताना डॉक्टर अहिरे समोरच्या कागदावर नोंद घेत होते. भरभरा लिहीत होते. वासंतीबाई ना त्यांनी तात्पुरती काही औषध लिहून तळमजल्यावरच्या औषधाच्या दुकानातून घ्यायला सांगितली. पुढे कधी भेटायचं हे नक्की केलं.

      डॉक्टर अहिरे यांनी त्यांच्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये अशा बऱ्याच मानसिक रुग्णांना बघितले होते. आताही या नवीन रुग्णावर काय उपचार करायचे याचा विचार ते करू लागले. संगीता सारे जगावरच वैतागलेली वाटत होती. त्यांना वासंती बाईंनी सांगितलेला मगाचा ट्रॅफिक सिग्नल पाशी घडलेला प्रसंग आठवला. त्या लहान मुलीचा काही संबंध नसताना संगीता तिच्यावर वैतागली होती. नव्हे तिचा संताप एवढा होता की त्या मुलीचे प्राण घ्यायला सुध्दा तिने मागेपुढे पाहिलं नसतं. या प्रकरणात त्यांनी त्यांचे सहाय्यक मित्र प्रसिद्ध संमोहन तज्ञ डॉक्टर आगाशे यांची मदत घ्यायचं ठरवलं. मागच्या काही केसेस मध्ये श्री आगाशे यांची मदत त्यांनी घेतली होती. आकाशी सरांनी देखील 

का कू न करता आनंदाने ती केली होती. मोबाईलवर डॉक्टर आगाशे यांच्याशी त्यांनी बोलून घेतलं.

      पुढच्या सत्राला जेव्हा वासंती आणि संगीता आल्या तेव्हा संगीताला त्यांनी एका वेगळ्या खास तयार करून घेतलेल्या रूममध्ये पाठवलं. वासंती ताई शी बोलून एक सहमतीचा फॉर्म सही करून घेतला.

     डॉक्टर आगाशे यांनी संगीताचे त्या संमोहन सत्रासाठी ठरवलेल्या रूममध्ये स्वागत केलं. एका विशिष्ट सुविधा असलेल्या खुर्चीवर तिला बसवलं. तिच्या डोक्यावर किरणे फेकत असलेला एक प्रखर प्रकाशाचा दिवा होता. अर्थात त्याची प्रखरता सोयीप्रमाणे कमी जास्त करता येत होती. आगाशे वयस्कर होते. त्यांनी संगीताला सांगितलं.

    "बेबी... आता तू डोळे मिटून घे. शरीर एकदम हलके ..हलके सोडायचे. तुझ्या मनातले विचार आता हळूहळू कमी होत आहेत... एकदम छान प्रसन्न हलकं वाटतंय तुला... शांत.... शांत..."

      डॉक्टर आगाशे यांनी संमोहनातल्या खास सूचना द्यायला सुरुवात केली. असे शारीरिक दुखण्याने त्रस्त झालेले, वेगवेगळे उपचार करून थकलेल्या रुग्णावर त्यांच्यावर संमोहन उपचार करून घेण्यासाठी येत... मग आपल्या खास तंत्राने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीत आगाशे त्यांचे लक्ष त्यांच्या पिडीत व्याधी आणि दुसऱ्या भागावरून काढून घेत... त्यांना मनाच्या एका तरल सुखद अवस्थेत स्वतःहूनच कसं घेऊन जायचं हे शिकवत.

      संगीता पूर्णपणे ट्रान्स... गुंगीच्या अवस्थेत गेली होती. एखादं स्वप्न बघताना लहान मुलांच्या पापण्या मिटल्या असताना सुद्धा कशा फडफडतात... त्यांची बुबुळे हलतात. तशा प्रतिक्रिया तिच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. पण त्याही अवस्थेत ती डॉक्टरांच्या सूचनांचा अनुसरण करत होती.

      "हा ...आता डोळे हळू उघड.. तू आता जागृत अवस्थेत येते आहेस...." डॉक्टरांनी अशा सूचना देऊ लागताच संगीता समोर प्रक्रियेतून बाहेर पडली.

       डॉक्टरांनी तिला कसं वाटतंय विचारलं. तिने खूप छान हलकं वाटत असल्या चे सांगितलं. मग तिला बाहेर वेटिंग रूम मध्ये बसायला सांगून डॉक्टर आगाशे वासंती बाई आणि डॉक्टर अहिरे असलेल्या खोलीत आले. सर आले म्हटल्यावर दोघे उठून उभे राहिले. डॉक्टर आगाशे यांचा हसतमुख ,आत्मविश्वास पूर्ण चेहरा आणि त्यांनी विजयाचे चिन्ह म्हणून दाखवलेला अंगठा सारं काही आलबेल असल्याची ग्वाही देऊन गेला.

         तरी वासंती बाईंनी आईच्या काळजीने विचारलेच.

 "डॉक्टर संगीतामध्ये काही सुधारणा होईल ना.?"

      "अगदी योग्य वेळी तुम्ही तिला डॉक्टरांना दाखवले ते बरं झालं. हो ती उपचारांना प्रतिसाद योग्य तऱ्हेने देतेय. मनोरोगाचा इतिहास आहेच तिचा, त्यात उशीर झाला तर दुभंग व्यक्तिमत्व  होण्याची भीती होती. ती आता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. परिवर्तन नक्कीच होईल... पण त्याला आपल्याला वेळ दिला पाहिजे... घाई करून उपयोग नाही.. अजून पाच सहा सत्र तरी आपल्याला तिच्याबरोबर करावी लागतील." आगाशे सर समजावणीच्या सुरात म्हणाले.

      "संमोहन उपचार पद्धतीत आम्ही रुग्णाची विकृती कमी करत बसण्यापेक्षा त्याची मानसिक क्षमता वाढवण्याकडे लक्ष देतो. संगीताला प्रत्येकावर आणि प्रत्येक गोष्टीवर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून सरळ सरळ दोषारोप करण्याची सवय लागली होती. त्यासाठी जणू रागाचा... संतापाचा एक प्रचंड साठा तिच्याकडे राखीव होता. जिथे तो व्यक्त करता येईल तिथे तो व्यक्त करायची.. पण बरेच ठिकाणी सामाजिक बंधनांमुळे त्या राखीव संतापाला बाहेर पडायची वाट सापडत नसे... तू मग तिच्या दुखण्यातून ..शारीरिक व्याधीमध्ये व्यक्त होऊ लागला." डॉक्टर आगाशे यांनी आपलं म्हणणं पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी या सत्रातील संमोहन पद्धतीची ध्वनिफीत संगीताला दिली.

    " डॉक्टर क्लिनिक बंद करूया का...?" संगीता विचारत होती. डॉक्टर अहिरे त्यांच्या विचार चक्रातून बाहेर आले.

    " हो.. हो अगदी... मी ड्रॉप करतो तुला घराशी... आज तसा बराच उशीर झालाय." डॉक्टर घड्याळाकडे पाहत म्हणाले. 

     थोड्याच वेळात अशा बऱ्याच मनोरुग्णांना आशेचा दिलासा देणारे डॉक्टर अहिरे यांचे क्लिनिक त्या दिवसापूरते विसावले.

✍️ योगेश साळवी 

वरील कथा  योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखकाच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.
     

    

   

    

Post a Comment (0)
Previous Post Next Post