शपथ

 शपथ


✍️ दीपाली थेटे-राव

'उद्या रिटायर्ड होणार तुम्ही महेश कुळकर्णी. 

परवापासून ऑफीसला जाण्याची गरज नाही', महेश राव मनातल्या मनात बोलत होते. 

        खरंतर आयुष्याची चाळीस वर्षे काढली या ऑफीसमध्ये. ऋणानुबंध इतक्या सहज कसे काय तुटणार होते? मन कातंर कातंर होत होतं. 

       सकाळी उठल्यानंतर नेहमीसारखी लगबग जाणवलीच नाही घरातही आणि त्यांच्या मनातही. सगळ्या हालचाली यंत्रवत होत होत्या. एक अनामिक दडपण आलं होतं मनावर.

नेहमीचं धावपळ करत आवराआवरी करणं....

....सुधाच ओरडणं , 

" डबा ठेवलाय हो टेबलवर. आवरा. चहा नाश्ता घ्या"

        " सुधा माझा रुमाल कुठे ठेवला आहे आणि पाकीट ही दिसत नाहीये "

"शी बाई! सगळं हातात द्याव लागतं या माणसाला. जरा म्हणून आपलं आपण काही करणार नाही. "

     एका हातात लाटणं घेऊन पोळ्या लाटता लाटता सुधा बाहेर यायची आणि ड्रावर मधलं पाकीट रागारागाने बघत माझा हातावर आपटायची. 

हिला कसं सापडायचं कोण जाणे सगळं. आपण थोडे वेंधळेच. 

आठवणी... आठवणी..

उगाच पिंगा घालताहेत मनात कधीपासूनच्या.

  सुधा म्हणजे अजब रसायन आहे. लग्न होऊन माझ्याबरोबर घरी आली. 

लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्याकडून वचनच घेतलं तिनं,

"तुम्हाला रोज झोपेतून उठवायचं भाग्य मला मिळू दे. नव्हे तसं वचनच द्या. "

"म्हणजे? आणि असं का ग? "

"तुम्ही सरकारी ऑफिसात नोकरीला. कधीही कोणतेही चुकीचे काम करू नका, जेणेकरून तुमची झोप उडेल. चुकीचे काम केले नाही तर शांत आणि समाधानाची झोप मिळेल आणि ते समाधान मला तुमच्या चेहऱ्यावर सकाळी उठवताना दिसेल. मला कळून जाईल की तुम्हाला कोणतीही चिंता नाही मग माझाही जीव समाधान पावेल.

 म्हणून म्हणते तुम्हाला उठवण्याचे भाग्य मला लाभू दे रोज."

या तिच्या बोलण्यावर स्तिमित पहात होतो आपण. 

   खरंच ती होती म्हणून पावलं कधी चुकीच्या वाटेवर वळलीच नाहीत आणि ती होती म्हणून आजतागायत समाधानाची झोप घेत आलो आपण. 

माहित होतं.. माझं हास्य, समाधान कोणाचा तरी आनंद आहे. 

.......

आज विचारांचा नुसता गुंता.. गुंता आहे डोक्यात. किती भराभर जातोय वेळही.

इतरवेळी आटपायचं नाही वेळेवर आणि आज इतकं सावकाशीने आवरूनही...

महेश राव आवरून बाहेर आले.

    आज मात्र काहीही बोलायच्या आधीच चहा, नाष्टा आणि डब्याबरोबरच रुमाल आणि पाकीट ही टेबलवर आहे. .. हो शेवटचा दिवस नाही का आज. 

      ही हुरहुर लागलेली मनात...बाहेर कशी कळणार कोणाला. सुधाला कळेल? तिला न सांगताही. 

"अहो नीट जा आणि लवकर या. मन शांत ठेवा. " नेहमीचाच निरोप आजही. 

'माझ्या मनाची अवस्था कोणालाच कळत नाहीय का? 

सगळेच आपापल्या कामांमध्ये दंग आहेत. मी...मी मात्र अस्वस्थ आहे. समजून घ्या रे कोणीतरी...'

सारं आठवत मनाशीच संवाद चालू होता त्यांचा. 

      तसेच निघाले. ऑफिसमध्येही फारसं ठीक वाटतच नव्हतं. पुन्हा पुन्हा स्वतःच्या टेबल-खुर्ची वरून हात फिरवून बघत होते ते. सगळ्यांशी भेटून आले...बोलून आले. 

शेवटचा निरोप....रिटायर्ड...

      समारंभाला ऑफिसमधल्या जवळच्या मित्रांनी भाषण केलं. खूप सारे गिफ्ट्स आणि शुभेच्छा मिळाल्या.

शेवटच्या दिवशी सगळेजण चांगलेच बोलत होते...कितीतरी आठवणी.. जुन्यापुराण्या..पुन्हा पुन्हा आठवल्या जात होत्या...

      भारावून गेले होते महेशराव. वाटत होतं..हे क्षण संपूच नयेत. 

      नेहमी घड्याळ फार हळू चालायचं, आज मात्र इतकं जोरात का धावत होतं कळतच नव्हतं. निघायची वेळ झाली. ऑफिसच्या दारापर्यंत मित्र सोबत होते.      

      आता इथून कॅब करावी आणि घरी जावे कारण इतक्या सार्‍या वस्तू, गिफ्टस् कसे सांभाळणार होते ते. आठवणींप्रमाणेच तेही किती कसोशीने सांभाळले तरी ओसंडून जात होते. नजर धूसर होत होती.

आज सकाळपासूनच पाणी दाटत होतं डोळ्यांत. मन भरून आलं होतं.

समोर पाहिलं तर ओळखीचीच गाडी. 

      डोळे पुसले आणि नीट पाहिलं. मुलगा कार घेऊन ऑफिस बाहेर उभा होता. आज शेवटच्या दिवशी त्यांना घेऊन जाण्यासाठी आला होता. त्यांना बघताच पटकन पुढे झाला, त्यांच्या हातातल्या वस्तू घेऊन गाडीत ठेवल्या. 

      गाडीत बसायच्या आधी परत एकदा महेशरावांनी ऑफिसच्या इमारतीकडे डोळे भरून पाहिले आणि नमस्कार केला..

आता पुन्हा येणे नाही...

मन जड झालं होतं. 

      गाडीत बसले. मुलगा दिवसभराच्या कार्यक्रमाबद्दल विचारत होता आणि त्यांना शब्दही बोलवत नव्हता. 

      घरापाशी आले....पाहिलं तर घराला समारंभाच्या हॉलच रूप आलं होतं. दाराबाहेर सुरेख रांगोळी काढली होती. ते आत जायला निघाले तसे धावतच आरती घेऊन सुधा दरवाजापाशी आली. त्यांना औक्षण केलं. आत पाऊल टाकलं तसं त्यांच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत केलं. मुलं आणि सुधानंच हा कार्यक्रम ठरवला होता. त्यांना पत्ताही लागू न देता. 

सरप्राईज...

       भावना कधीच्या ओथंबून आल्या होत्या आणि हे सरप्राईज बघून आता डोळ्यांना थांबवणं फारच अशक्य वाटायला लागलं. ते घळाघळा रडत होते आणि परत परत सगळ्यांचे आभार मानत होते. आवेग ओसरला आणि मग स्वतःच्याच रिटायरमेंटचा सोहळा एन्जॉय करायला लागले. संध्याकाळ सरली. 

      एकेक करत सगळे जण आपापल्या घरी परतले. 

मुलेही झोपायला गेली. 

महेशराव रूममध्ये बेडवर नुसतं पडले होते. सकाळपासूनचे सगळे प्रसंग परत-परत आठवत...©®दीपाली थेटे-राव

    सुधा सगळं आवरून झाकपाक करून रूम मध्ये आली. मन भरून...डोळे भरून हसली. तसे ते उठून बसले. त्यांच्या शेजारी बसून हात हातात घेत ती म्हणाली, 

"आज परत एकदा मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. 

आजपर्यंत अनेक पावसाळे पाहिले. एकत्र जगलो. 

    आयुष्य म्हणजे सहजीवन..परस्परांना फुलवणं, स्वप्न बघणं, साद घालणं,

कधी सगळं तुटेल की कायसं वाटणं... आणि परत नव्याने सावरणं. 

आपल्या नात्याला अनेक कंगोरे.. अनुभवलेले अनेक प्रसंग...अनेक होकार, किती तरी नकार. 

तरीही एकमेकांचा गुणदेषांसह आपण केलेला स्वीकार.

मुलांचं आणि त्यांच्यासह परत एकदा आपलं नव्याने घडणं.. मोठं होणं

कुटुंब, गणगोत, आप्त, मित्र सामावून घेणं....दुखलेलं मन सहज ओळखणं

 तुटतांना, विरतांनाही दोघांनी हातात हात घट्ट धरून सोबत असणं. 

सगळं सगळं आतापर्यंत 'दोघांच'.... 

आता मात्र मला पुन्हा एकदा वचन हवं.. 

या आयुष्याच्या दुसर्या इनिंग मधेही दोघांनी सतत सोबत असायचं. वय वाढताना मनातलं मूल जपायचं.. पिलांना स्वातंत्र्य देत पाठीशी ठाम उभं रहायचं... 

आणि.. 

माझ्या आधी तुम्ही आयुष्यातून मात्र रिटायर्ड नाही व्हायचं... 

घ्या शपथ"

सुधा बोलत होती... 

महेशराव विचारातच होते.. 

"हे माझ्या डोळ्यांतून अखंड वहाणारं काय आहे? 

विश्वास?..समाधान?..प्रेम? तृप्तता?"

तिच्या नजरेत नजर मिसळून महेशराव हो म्हणाले आणि त्यांच्या ही नकळत पुन्हा एकदा त्यांनी तिच्या हातावर हात ठेवला......शपथ.

✍️ दीपाली थेटे-राव

वरील कथा दीपाली थेटे राव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा वाचून पहा.

👇
Different strokes

Post a Comment (0)
Previous Post Next Post