मंगळसूत्र

मंगळसूत्र 

✍️ बीना बाचल

तो एक सामान्य रिक्षा वाला,अत्यंत गजबजलेल्या शहरात सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा दामटवत आला दिवस ढकलण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असायचा. काबाड कष्ट करावेत आणि मिळेल ते दोन घास सुखाने खावे एवढाच काय तो जगण्याचा मंत्र! ह्या पलीकडे दुसरे जग असावे ह्याचा गंधही नसलेला तो म्हणजे ह्या महानगरातल्या हजारो लाखों पैकी एक अतिसामान्य माणूस!!

असाच नेहमीच्या सवयीने एक दिवस रोजच्या प्रमाणे घरातून निघताना  बायकोनं थांबवलं ,"अहो, आपल्या शेजारणींन ना छान सोन्याचं मंगळसूत्र घेतलंय काल! आपल्या वस्तीत कोणाकडेच नाही हो असलं,काय लखलखीत होतं सांगू! आम्ही सगळ्या बाया बघतच राहिलो बाई!" स्वतः च्या गळातल्या काळ्या पोतीशी खेळत  कालच अप्रूप सांगताना बायकोची  बडबड  सुरू होती.'आपल्याकडे ही असंच लखलखीत मंगळसूत्र असतं तर....'हा भाव न सांगता ही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.शेजारणीच्या नवीन मंगळसूत्रामुळे तिचं मनही असंच काही आपल्याला मिळावं म्हणून हिंदकळत होतं. 'आजवर कधी बोलली नाही ती , कधी हट्ट ही केला नाही पण आपण ही साधे सोन्याचे दोन मणी घेऊ शकलो नाही तिच्यासाठी' ही त्याची खंत त्याच्या मनात ही पुन्हा डोकं वर काढू पाहत होती,पण नाईलाजाने त्याने केवळ एक उसासा टाकत 'बघू यात आपल्याला कधी जमतंय ते ' असं म्हणत त्याने घर सोडले. त्याला पक्कं माहीत होतं ,असं बोलून आपण बायकोचं समाधान केलं असलं तरी सोन्याचा दागिना घ्यायची ऐपत नाही आपली! पण त्याला त्या अवघड प्रसंगतून स्वतः ची तात्पुरती सुटका करून घ्यायची होती आणि त्याने ती केली होती ,चटकन घराबाहेर पडून त्यानं तो विषय तिथेच थांबवला होता.

                सवयीने त्याने पहिले passanger घेतले आणि पुढे जाऊ लागला. रोज रिक्षेत मागे बसलेल्या  passenger चे संवाद,भांडणं ,प्रेमाच्या गुजगोष्टी असं बरंच काही तो ऐकत असे, कधी कधी त्या संवादात स्वतः ही उडी मारायला त्याला आवडायचं  पण आज  मात्र किती लोक(passanger) रिक्षात बसले ,किती नाही इकडे लक्ष लागत नव्हते त्याचे!  ते न पाहिलेले लखलखीत मंगळसूत्र पाठ सोडायला तयार नव्हते! सतत बायकोचा तो चेहरा आठवत होता.  फार अस्वस्थ वाटत होतं त्याला. त्याच विचारात बरीच passanger झाले त्याचे आज , त्याला संध्याकाळ झालेली ही लक्षात आले नाही!रोजच्या सारखा आज डबा खायला ही तो कुठेच विसावला नाही . आता संध्याकाळी घरी निघण्यापूर्वी शेवटचे passanger घेतले त्याने , नाही म्हटलं तरी दिवसभर रिक्षा चालवून, त्या मंगळसूत्र चा विचार करून आणि दिवसभर रिकाम्या पोटी तो थकला होता तो  ;पण तेवढ्यात मागचा सुख संवाद ऐकू येत होता, " अहो,इतकं महाग मंगळसूत्र घ्यायचं काही आवश्यक होतं का हो? लेकाच्या bike साठी साठवत होतात पैसे आणि मधेच ह्या मंगळसूत्राच काही अडलं होतं का?" 

"झालं !!इथेही आहेच का हे मंगळसूत्र!" आज हे मंगळसूत्र आपला पिच्छा सोडत नाही असं दिसतंय म्हणत त्यानं मागच्या संवादाकडे कान लावले.

"अग गेली कित्येक वर्षं ती काळ्या मण्याची पोत घालते आहेस, आणि बोलून दाखवल नाहीस तरी जाणत होतो की तुला मंगळसूत्राची किती हौस होती ती, पण मी तीही पुरी करू शकत नव्हतो,आज अखेरीस ठरवलं की तुला हे घ्यायचं" वगरे वगरे. रिक्षेत बसलेला कोणी एक आपल्या बायकोची कित्येक वर्ष अधुर राहिलेल स्वप्न पूर्ण करत होता आणि ह्याचा जीव उगाचच अस्वस्थ होत होता! काय नशीब म्हणावं आपलं असं म्हणत त्यानं रिक्षा पुढे नेली.

              तेवढ्यात मागच्या दोघांचं उतरायचं ठिकाण आलं आणि घाईत आणि अत्यानंदाने ते  दोघे उतरले देखील. हा मात्र 'त्या' दोघांचा सुख संवाद ऐकून अजूनच बेचैन झाला' आपण कधी असलं मंगळसूत्र  घेऊ शकू की नाही कोण जाणे !!त्याच  तंद्रीत त्याचं घर कधी आलं कळलं देखील नाही, तो रिक्षा जागेवर लावून उतरणार तोच त्याचं लक्ष मागच्या सीट वर गेलं,एक छोटीशी पिशवी तिथे कोणी विसरलं होतं, त्यानं उघडं करून पाहिलं तर त्या पिशवीत  चक्क सोन्याचं मंगळसूत्र!! काय नियती आहे बघा, सकाळपासून हे मंगळसूत्राचे विचार आपली पाठ सोडत नाहीयेत आणि दिवसा अखेर हे आपल्या हातात आहे, आता असेच हे पुडके बायकोच्या हाती नेऊन दिले तर आनंदाने वेडी होईल ती, काय करावं बरं?मनात काहूर माजलं, पण मगाशी पाठच्या सीट वरचा सुख संवाद आठवला आणि त्यानं मनाशी काही ठरवून पुन्हा रिक्षा आल्या दिशेला दामटली . दहा मिनिटात मगाच च्या सोसायटी समोर येऊन तो हजर झाला, तिथल्या watchman कडे त्याने चौकशी केली, तो watchman त्याला आत सोसायटीत घेऊन गेला, तो ते मगाच जोडपं अजूनही तिथेच उभं होतं,  दोघांच्या जीवाची घालमेल स्पष्ट दिसत होती. त्यातल्या तिची नजर तर भिरभिरत होती आणि खूप रडून झालंय हेही सांगत होती. दोघीही अगदी रडवेले झाले होते. आणि  तो अचानक त्यांच्या समोर उभा ठाकला आणि त्या दोघांनी काही बोलायच्या आत ती छोटी पिशवी त्यांच्या हाती सोपवत तो निघू लागला. अगदी त्या दोघांनी भानावर येत त्याचे आभार मानण्यापूर्वी च तो तेथून निघाला. फार काही बोलण्यासारखे नव्हतंच म्हणा आणि लवकरात लवकर त्या मंगळसूत्रा पासून लांब जाऊ तितकं बरं असं मनातल्या मनात  म्हणताना त्याचे डोळे ही पाणावले होते. आज त्याचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं होतं ,पण समाधान ह्याचं होतं की आपल्या सारखं अजून कोणीतरी हेच स्वप्न पाहिलं होतं, ते  पूर्ण करण्यात  मात्र आपला हातभार लागला हेही नसे थोडके!! बघू यात नशीब असेल तर आपणही बनवू  असं  मंगळसूत्र आपल्या बायकोसाठी! असं म्हणत त्यानं एक उसासा टाकला,  तो गेट बाहेर पडताना दारात एक गजरेवाला दिसला त्याला ,त्याच्याकडून मोगऱ्याचा गजरा घ्यायला मात्र तो विसरला नाही!!

सौ बीना समीर बाचल.

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post