रिटायरमेंट

 "रिटायरमेंट"

✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

"आई, अगं बाबा कुठे आहेत? वरच्या खोलीत पण नाहीयेत. बाहेर गेलेत का कुठे?" प्रयाग वरतून खाली वडिलांच्या नावे तणतणतंच आला.

 "अरे मला काय माहिती! फॅक्टरीत गेले असतील." त्यावर अजूनच चिडून प्रयाग म्हणाला, "छे ग! गेले ८ - १० दिवस असे कुठे जातात कोण जाणे. ऑफिसमध्ये येत नाहीत. सगळं काम माझ्यावरच पडतं. सकाळी निघतात ते एकदम संध्याकाळी येतात हजेरी लावल्यासारखे."

  मृदुलाबाई आश्चर्याने म्हणाल्या, "होच का? मला तर हे ही माहीत नव्हतं. आणि काय रे प्रयाग हे काय बोलणं तुझं. आपल्या वडिलांविषयी असं बोलतात का? पण तू सांगितलंस म्हणून बरं झालं. त्यांना विचारलं तर म्हणतील, "गेलो होतो ऑफिसच्या कामासाठी बाहेर. आज आता रविवारी पण काय काम करतात कोण जाणे? या निशाला पण तिकडे बसून माहिती आहे बहुतेक यांचं काय चाललंय ते. काल तिला विचारलं तर म्हणते सांगतील ग लवकरच. देवा! काय करावं बाई या बापलेकीचं. काही पत्ता लागू देत नाहीत. जाऊदे, प्रयाग तू तरी आवरून घे. आत्ताच तुझ्यासाठी खायला आंबोळी केलेय. मी चहा घेते तुला झाकून ठेवते. आणि थोड्या वेळाने बाहेर जाऊन भाजी घेऊन येते." 

चहा कपात घेऊन खिडकीत शांतपणे बसून त्या विचार करू लागल्या. सौ. मृदुला महेश सोनटक्के हे नाव त्या अगदी गर्वाने लावत होत्या गेली ३५ वर्ष. मृदुलाबाई आणि महेशराव यांचं लग्न ही थोडं उशिरा झालं आणि त्याकाळी असल्याने मुलं व्हायला ही अंमळ उशीरच म्हणायचा. लग्नानंतर ६ वर्षांनी पहिले निशा आणि पुढे ३ वर्षांनी प्रयाग अशी दोन गोंडस मुलं झाली. नाशिकमध्ये श्री. महेश सोनटक्के यांना बरीच लोकं ओळखत होती. 'श्री इंडस्ट्रीज' चा बराच बोलबाला होता नाशिकमध्ये. महेश रावांनी आपलं नाव आणि आब चांगलाच राखला होता. नुसती पैशाअडक्याने श्रीमंती नाही तर दान देण्यात ही ते बरेच पुढे होते. नावाप्रमाणे अगदी भोळे सांब होते. फक्त एवढ्या सगळ्या नादात घरात अजिबातच लक्ष घालू शकत नव्हते. पण मृदुलाबाई तशा खमक्या. सगळं घर त्या अगदी छान आणि मनापासून सांभाळत होत्या. मृदुला आणि महेश यांची दोन्ही मुलं गुणी आणि शिकलेली. फक्त प्रयाग आणि महेशरावांचं खूप काही पटायचं नाही एकमेकांशी. दोघे म्हणजे, ते म्हणतात न, एकाच समुद्रातील दोन बेटं! अगदी तसंच काहीतरी. पण निशा मात्र महेशरावांची लाडकी होती आणि प्रयाग मृदुलाबाईंचा लाडका. निशा चं ४ वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न झालं तिला आता एक मुलगा ही आहे. सगळं छान चाललंय तिचं. आता प्रयागचं लग्न पण करायचं होतं.सगळं ठरलंय फक्त बोहोल्यावर चढायचं बाकी आहे.

कामाच्या ठिकाणी महेशराव प्रयाग ला पूर्ण सहभागी होऊ देत नव्हते. त्याला जमेल का किंवा तो कसं करेल सगळं? याची त्यांना जरा चिंता होती. त्यामुळेच त्यांना त्याच्या हातात हा एवढा मोठा वाढवलेला पसारा देववत नव्हता. खरंतर आपण थकतोय हे त्यांना पण कळत होतं. आणि मृदुला बाईंना पण कळत होतं की महेशरावांचा आता जरा म्हातारपणामुळे जवानीतला जोर चांगलाच कमी झाला होता. दिवस कसे भर्रकन गेले आणि आता आपण साठीकडे झुकत चाललो. पण ह्यांनी आपल्याला म्हणावा तेवढा वेळ दिलाच नाही याची बोच सतत त्यांना होतीच अगदी मनाच्या आत कुठेतरी! या विचारात असतानाच प्रयागच्या हातून स्वयंपाकघरात भांड पडलं आणि मृदुलाबाईंची तंद्री भंगली. आत जाऊन पाहतात तो काय, चहा ओट्यावर सांडला होता. 

"आई सॉरी! अग भांडं खूप गरम होतं ना म्हणून जरा सांडला चहा. पण तू नको येऊ इथे. मी घेतो सगळं पुसून." 

"अरे प्रयाग, घोड्या ,२७ वर्षांचा झालास तरी हे असं. कधी होणार रे मोठा तू! आता बायको आणायची वेळ झाली तरी हे असं. मग ती आल्यावर कसं होणार कोण जाणे? अगदी ह्यांच्यावर गेलायस. जरा म्हणून स्वयंपाकघरात कामं नको करायला. राजेशाही थाट हवा नुसता.." असं प्रयागला ओरडत असतानाच महेशराव आत आले. 

आणि म्हणाले, "काय आमच्या नावाचा उद्धार चाललाय. चिरंजीवांनी काय केलं आता?"  "काही नाही हो. आलात तुम्ही. थांबा चहा देऊ का?" असं मृदुलाबाईंनी विचारल्यावर महेशराव हात हलवतच म्हणाले, "अहो नको हो. तुम्ही या इथे. आम्हाला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला." बाबा आले म्हंटल्यावर प्रयाग वरच्या खोलीत जायला निघाला. तेव्हा त्यालाही महेशरावांनी थांबवलं.

  "चिरंजीव! तुम्ही पण थांबा. मला दोघांनाही काहीतरी सांगायचं आहे. किंबहुना द्यायचं आहे म्हणा ना?" तसा प्रयाग थोडा घुश्यातच म्हणाला, "म्हणजे हे दुपारपासून गायब असतात. कुणाला काही सांगत नाहीत. ह्यांच्या लाडक्या मुलीला तिकडे पुण्याला राहून सगळं माहीत. पण आम्हाला घरातल्या घरात काही माहिती नसते. बाबा, तुम्ही आईला काहीच कशी हो मदत करत नाही. ती दिवसभर राबते आणि तुम्ही बाहेर कामासाठी फिरत असता तुम्हाला काहीच वाटत नाही का हो. सारखा आपला बाहेरचा गोतावळा. मी नाही बाबा असं करणार लग्न झाल्यावर. आम्हालाही वेळ देत नाही तुम्ही. आणि मला तुमचा 'हा'च स्वभाव पटत नाही."

  मृदुलाबाई प्रयाग ला तिथेच अडवत म्हणाल्या, "प्रयाग, तू कुणाशी बोलतोयस कळतंय का तुला? बाबा आहेत ते तुझे. मला काही त्रास नाहीये. मी आनंदाने करते सगळं. तू गप्प बस बघू." त्यावर महेशराव हलकेच हसत म्हणाले, "असूदे मृदुलाबाई, त्याला मोकळं होउदे. आता तो मोठा झालाय." 

प्रयाग अजूनच चिडला आणि म्हणाला, "हो म्हणूनच आता मी हे बोलू शकतोय. त्या निशासारखं मी नाही तुमच्या मागे-मागे करत ना म्हणून तुम्हाला राग आहे माझा." असं म्हणून तो तावातावाने जायला निघाला पण आईच्या वटारलेल्या डोळ्यांकडे बघून होता तिथेच उभा राहिला. सगळीकडे स्तब्ध शांतता पसरली. 

आता मात्र महेशराव उठले आणि थेट प्रयागकडे आले. त्यांनी काही पेपर्स प्रयागच्या हातात ठेवले. "हे काय आहे?" प्रयागने त्रागा करतच विचारलं. "प्रयाग, हे आपल्या फॅक्टरी आणि ऑफिसचे पेपर आहेत. जे मी तुझ्या आणि माझ्या जॉईंट नावावर केले आहेत. पण पहिलं नाव तुझं घातलं आहे. आता तू सांभाळायचा आपला उद्योग समूह. आणि हा बंगला आमच्या मृदुलाबाईंच्या नावावर केला आहे. पुण्याचं पेठेतलं घर निशाला दिलं आहे. त्या सगळ्यांचे हे पेपर आहेत. अहो तुम्ही पण घ्या बघून." 

प्रयाग हे सगळं अचंब्याने बघतच राहिला. मृदुलाबाई मात्र हळव्या झाल्या. "अहो हे काय बोलताय तुम्ही. ही निर्वाणीची भाषा कशासाठी चाललेय म्हणते मी. 

त्यावर महेशराव म्हणाले, "अहो निरवानिरव वगैरे काही नाही हो. मी गेले काही दिवस यासाठीच आपल्या शेटे वकिलांकडे ये-जा करत होतो. दोन महिन्यांपूर्वी आलेल्या छोट्याश्या हार्ट अटॅक ने मी अगदी अंतर्मुख झालो आहे. मला त्या आरामाच्या दिवसांमध्ये पुरेपूर जाणीव झाली की, आपण स्वतःला बैलासारखं दावणीला बांधून घेतलं आहे. 

तात्या गेले आणि जेमतेम २१ वर्षांचा मी, हा छोटासा असलेला आपला बिझनेस वाढवण्याच्या इतकं मागे लागलो की आपली नाती दूर जातायत ते विसरूनच गेलो. कुणालाच वेळ नाही देऊ शकलो. मुलं अजून लहानच आहेत असंच वाटत होतं मला. 

पण प्रयागने माझ्या आजारपणात जी मोठ्या माणसाची भूमिका निभावली आणि आपलं घर शांत ठेवलं, सगळी परिस्थिती छानप्रकारे हाताळली. तेव्हा मला कळून चुकलं की आपला प्रयाग ही मोठा झालाय आता. आणि आपली सगळ्यांतून निवृत्ती घ्यायची वेळ झाली आहे हे मी तेव्हाच ठरवून टाकलं. त्यालाही संधी द्यायला हवी. किती दिवस मुलाला आपल्या पंखाखाली घेऊन बसायचं. आता त्याला काम समजून घेऊदेत. त्याला वाटतं न मी पहिल्यापासूनच त्याला हवं तसं नाही वागू दिलं मग आता त्याला हवं तसं वागूदेत. त्याचे निर्णय त्याला घेऊदेत. त्याला ही येऊदेत पुढच्या खाचखळग्यांचा अंदाज." असं म्हणून ते प्रयाग कडे वळतात.

  प्रयागच्या खांद्यावर हात ठेवून, "प्रयाग आता तू मोठा झालायस हे मला कळतंच नव्हतं. प्रत्येक बापाला आपली मुलं लहानच वाटतात न रे! आपणच सगळं करत बसलो की, त्यांना आपल्या पुढे जाऊन आपल्यापेक्षा जास्त भरारी घ्यायला जमतच नाही. तुझी धडपड समजत होती रे मला. पण माझ्यातला पुरुष आड येत होता. जेव्हा चाकात खिळा रुतला तेव्हा चाकाला कळलं की आता आपल्या जागी दुसरं चाक लावायला हवंच आहे. माझंही तसंच झालं. मी कामात इतका गुरफटलो की त्या नादात तुझे सक्षम खांदे मला दिसलेच नाहीत. 

पण मला खात्री आहे तू मिळालेल्या संधीचं खूप छान सोनं करशील. आपला उद्योग खूप मोठ्या पातळीवर घेऊन जाशील. आणि माझ्यापेक्षा जास्त प्रभावशाली आणि यशस्वी होशील. आणि हो काहीही लागलं अगदी कधीही तरी मी आहेच की! बाप म्हातारा झाला असला तरी त्याला विसरू नकोस. आणि अंतर तर अजिबात देऊ नकोस. उशिरा का होईना सुचलेलं शहाणपण आहे असं समजून या बापाला दूर करू नकोस. 

लहानपणी तुम्हा दोघांना खांद्यावर बसवून दुनिया दाखवली ते खांदे आता झुकलेत हे कळलंय मला आता. त्यामुळे मृदुलाबाई आजपासून मी रिटायरमेंट घेतली आहे. यापुढचा माझा सगळा वेळ तुमचा. नव्या नवलाईची आणि मधली अशी खूप वर्ष फुकट गेली पण आता आपली सेकंड इंनिंग जोरदार करूयात. मस्त एन्जॉय करूयात." 

हे सगळं ऐकून प्रयाग एका जागी थिजलाच. आणि मनातून थोडा खजील झाला. "बाबा मला माफ करा. मी खूप चुकीचं समजलो तुम्हाला. बाप, बापमाणूस असतो हे विसरूनच गेलो मी. कंपनीच्या प्रत्येक निर्णयात मला तुम्ही हवे आहात. तुमच्याशिवाय मला काहीच जमणार नाहीये. अहो आपलं पटत नसलं तरी एक नक्की सांगतो माझा 'रोल मॉडेल' फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. तुम्ही माझा आदर्श आहात.

  तुम्हाला थकलेलं आणि असं घरात बसलेलं माझ्याच्याने नाही बघवणार. तेव्हा हे पेपर वगैरे राहुदेत बाजूला. तुम्ही रोज जाता तसेच उद्या पण ऑफिसमध्ये जाणार. मी तुमच्या देखरेखीखाली काम करणार. मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. आणि हो, त्या भांडखोर निशा ताईला सांगा ही अशी मदत बाबांना करण्यापेक्षा भावाला जरा काही गोष्टी सांगत जा. त्याने जास्त भलं होईल म्हणावं." असं म्हणून तो महेशरावांना मिठी मारून रडायलाच लागला. 

मृदुलाबाई तर डोळ्याला पदर लावूनच बसल्या होत्या. तेव्हा स्वतःला सावरत महेशराव म्हणाले, "अहो, हे काय चाललंय. मी रिटायरमेंट घ्यायची ठरवली आहे आणि त्यात आता काहीही बदल होणार नाहीये. आणि मी आहे अजून. तुम्ही तर मी गेल्यासारख्याच रडताय." असं म्हणताच मृदुलाबाई एकदम ओरडल्याच,"अहो, काय हे अभद्र दिवेलागणीच्या वेळेला बोलताय. काही होत नाही तुम्हाला." 

"हो न मग आता मला माझं पुढचं आयुष्य तुमच्या सगळ्यांसोबत आनंदात घालवायचं आहे असं समजा. थोडे दिवसांनी प्रयागचं लग्न झालं की मग नातवंडांना खेळवण्यासाठी एनर्जी नको का जमवायला. त्याचीच सुरुवात आहे असं समजा हवं तर. काय रे प्रयाग? " असं म्हणताच प्रयाग गोड हसला, "काय हो बाबा कुठून कुठे पोहोचता तुम्ही. काहीतरीच तुमचं!" असं म्हणून आपल्या खोलीत गेला आणि मृदुलाबाईंना मात्र कळतच नव्हतं की, मावळत्या सूर्याला सांभाळावं की उद्याच्या उगवत्या नव्या सूर्याची साथ करावी. 

।।शुभम् भवतु।।

✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

वरील कथा सौ. अतुला मेहेंदळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post