न उमललेलं प्रेम

 न उमललेलं प्रेम

✍️ अमृता देशपांडे 

दिवाकर आज भल्या पहाटेच उठला होता. आज मुग्धाचा वाढदिवस! तिच्या आवडता गाजर हलवा करण्याचा बेत त्याने मनात आखला होता, त्यासाठी रात्री तीनदा-चारदा त्याने युट्यूबवरची रेसिपी बघून घोकून ठेवली होती. मग त्याने हळूच मुग्धाच्या खोलीत डोकावले... ती शांत झोपली होती...


'रात्री जेवलीपण नाही पोरं... मला एकटं सोड, एकटं सोड म्हणत खोलीत जाऊन बसली... मध्यरात्रीपर्यंत आईचा फोटो छातीशी कवटाळून रडत-रडत झोपली... काय खुपत असेल हिच्या मनात? आपण कितीदा विचारलं, पण बोलली नाही ... ' दिवाकर मनातल्या मनात विचार करू लागला. 'आपण कितीही ठरवलं, आईचं आणि बापाचं दोघांचंही प्रेम द्यायचं, तरी एका 'आई'ची उणीव नाही पुरी करू शकत एक पुरूष...' स्वतःशी पुटपुटत तो कामाला लागला...


किचनमध्ये गाजरं किसत-किसत दिवाकर मुग्धाच्या जन्मापासूनच्या आठवणींना उजाळा देत बसला... अठरा वर्षांपूर्वीची ती रात्र, बाहेर धुव्वाधार पावसाचा तार स्वरातला आवाज आणि घरात सीमाच्या विव्हळण्याचा आवाज, दोघांची जणू जुगलबंदी चाललेली... दिवाकरला तर काहीच सुचेना, पावसामुळे एकही टॕक्सीवाला आणि रिक्षावाला यायला तयार नव्हता. अशावेळी शेजारचे सावंत अगदी देवासारखे धावून आले. त्यांनी आपल्या मारूती व्हॕनमधून सीमाला दवाखान्यात पोचवले. त्यानंतर दीड तासांच्या खडतर प्रतीक्षेनंतर एक गोंडस गुलाबी बाळ, सुती कापडात गुंडाळून नर्सने दिवाकरच्या हातात आणून दिलं. दिवाकर तर तिला पाहून पार हरखून गेला... मग तिच्या  बाळलीलांमध्ये दिवाकर हरवून गेला. तिचं पहिल्यांदा 'बाबा' बोलणं, रांगणं, चालणं सगळं-सगळं दिवाकरला आठवू लागलं... दिवस असेच आनंदात चालले होते, आणि दहा वर्षांपूर्वीची ती काळरात्र आलीच... सीमाचा अॉफिसमधून परतताना ट्रकची धडक लागून अपघात झाला, आणि घटनास्थळीच मृत्यू. सीमा आठ वर्षांच्या मुग्धाला आणि दिवाकरला सोडून निघून गेली...


'बाबा, बाबा... मला लवकर का नाही उठवलंस? तुला माहितेय ना मला लवकर उठून अभ्यास करायचा असतो...' मुग्धाच्या आवाजाने दिवाकर आठवणींच्या विश्वातून बाहेर आला. समोर कपाळावर मोठ्ठ आठ्यांचं जाळं पसरवून वैतागलेली मुग्धा उभी.


'हो गं बाळा, आज एका मुलीचा वाढदिवस नाही का! मग आज अभ्यासाला सुट्टी!' दिवाकर


'काय रे बाबा, महिन्याभरावर परीक्षा आलीये, आणि तू अभ्यासाला सुट्टी घ्यायला सांगतोयस?...' मुग्धा


'अभ्यास होईल गं, काल रात्री उशीरापर्यंत आईचा फोटो छातीशी धरून रडत बसली होती ना...' दिवाकर


'म्हणजे तू चोरून बघत होतास तर, सांगितलं होतं ना मी, मला एकटीला राहू दे...' मुग्धा नाराजीने बोलली.


'अगं हो बाळा, पण मला सांग माझी प्रिंन्सेस झोपल्याशिवाय मला का झोप लागेल...' दिवाकर


'बाबा,तू पण ना...' असं म्हणून मुग्धा जोरात हसायला लागली.


'अरे, माझ्या प्रिन्सेसला तर खोटं खोटं हसताही येत नाही...' दिवाकर


'बाबा...' मुग्धा आश्चर्याने


' हो मग, तुला काय वाटलं...  तुझ्या डोळ्यांच्या  कडा ओलावलेल्या मला दिसणार नाहीत?  तुझ्या चेहऱ्यावरची उदासी मला कळणार नाही? सांग नं बाळा,  नेमकं काय झालंय?  तुझा बाप परका झालाय का आता तुला?'  दिवाकर


' बाबा, आता तुला कसं समजावू रे...  बरं ते जाऊदे,   दे मी गाजर किसते...' मुग्धा


'मुळीच नाही, आज तुझा वाढदिवस आहे ना?  मग नेहमीप्रमाणे मीच सगळा स्वयंपाक करणार. अगं तुझी आई असती तर तिने अजून काय काय केलं असतं, मी आपलं थोडसंच करतो झालं... ' दिवाकर डोळे पुसत म्हणाला 


'ए काय रे बाबा, आज माझा वाढदिवस आणि तू रडतोस? आता मीसुद्धा रडेन हं...' मुग्धा


'कालसुद्धा रडतच तर होतीस...हो, मी विसरलोच होतो, मुली सगळ्या गोष्टी बापाला कुठे सांगत असतात? तुझी आई असती तर तुला असं मनातल्या मनात घुसमाटावं लागलं नसतं...' दिवाकर


'असं काही नाहिये रे बाबा, जे तुला सांगण्यासारखं नाही... माझं ना ब्रेकअप झालंय...' मुग्धा दुसरीकडे तोंड फिरवत म्हणाली.


'काय सांगतेस! ब्रेकअप झालं? म्हणजे माझी मुलगी आधी कुणाच्या तरी प्रेमात पडली, आणि आता ब्रेकअपही झालं? आणि हे मला आज कळतंय?? नो वे बेटा, धिस इज नॉट डन! आता बाबा रूसला...' दिवाकर


'असं रे काय बाबा? मी तुला सांगणारच होते सगळं पण...' मुग्धा अडखळत


'बरं हरकत नाही, आता तर सांगशील? पण मला सगळं - सगळं सांगायचं, कुठे भेटले? कशी ओळख झाली?... अगदी सगळं'  दिवाकर


'ओळख कॉलेजमध्येच, अनिकेत गोखले त्याचं नाव, मला एक वर्ष सिनियर आहे...  आमची ओळख कॉलेजच्या पहिल्या दिवशीच रॕगिंगच्या  वेळेला झालेली,  रॕगिंग विशेष काही नाही रे बाबा, अगदी सहज कुणाला गाणं म्हणायला लाव,  तर कुणाला डान्स करायला लाव इतकंच...  त्यादिवशीच पहिल्यांदा त्याने मला आवाज छान आहे म्हणून गुलाबाचं फूल दिलं...' मुग्धा


' हम्मम्म इंटरेस्टिंग!  पुढे?'  दिवाकर

' मग पुढे नोट्स घेण्याच्या निमित्ताने ओळख वाढत गेली.  एक दिवस त्यानेच मला कॉफी साठी इन्व्हाईट केलं...  मग आमच्यात मैत्री झाली...' मुग्धा


' आणि मग प्रेम, खरं ना...'  दिवाकर

' हो तसंच काहीसं, पण खरं सांगू का बाबा, मला तो पहिल्या दिवशीच आवडला होता...'  मुग्धाने लाजत लाजत सांगितले


' ओ हो, म्हणजे माझी लिटिल प्रिन्सेस आता मोठी झाली तर!  बर पण मग गाडी  नेमकी कुठे अडली?  दिवाकर उतावळेपणाने


'बाबा... ते आता कसं सांगू तुला...'   मुग्धा अडखळत


' बोल बेटा, अगदी बिनधास्त बोल, बोलण्यानेच प्रश्न सुटतात कीनाई?'  दिवाकर  तिच्या पाठीवर थोपटत बोलला.


' बाबा, खरं म्हणजे अनिकेत खूप चांगला मुलगा आहे.   त्याला कसलंही व्यसन नाही,  किंवा इतर कुठल्या मुलीकडे बघतही नाही. पण...  त्याला माझ्यासोबत फिजिकल व्हायची इच्छा आहे,  तो सारखा मागेच लागला आहे त्यासाठी,  मी त्याला खूप प्रकारे समजावलं. पण तो ऐकतच नाही,  शेवटी काल आमचं ब्रेकअप झालं, म्हणजे मीच केलं...'   मुग्धा खाली मान घालून सांगू लागली...


' अच्छा, असं आहे तर...  हे बघ बेटा,  तुम्ही ज्या वयात आहात,  त्या वयात असं होणं खूपच नॉर्मल आहे...' दिवाकर


' बाबा, तुला राग नाही आला ?'  मुग्धा आश्चर्याने

' राग?  नाही मुळीच नाही. मी तुला सांगितलं ना,  या वयात हे असं होतच असतं बेटा,   शरीरातले काही हार्मोन्स कारणीभूत असतात त्याला...' दिवाकर


' अरे हो बाबा पण...'  मुग्धा

' हो बेटा, शांत हो, मला कळतंय, आणि मला खूप अभिमान वाटतो तुझा, कि तू या अशा मोहाच्या क्षणाला बळी पडली नाहीस याचा.  हे वयच असतं असं,  कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचं,  कुणाचीतरी ओढ लागण्याचं... पण बेटा,  हेच वय असतं  स्वतःचा शोध घेण्याचं, कर्तृत्व गाजवण्याचं...' दिवाकर


' हो बाबा, मी माझं करिअर विसरलेली नाही...' मुग्धा


' शब्बास बेटा!  आणि हीच गोष्ट अनिकेतनी देखील  समजून घ्यायला हवी.  या वयातलं प्रेम  हे प्रेम नसून केवळ आकर्षण असतं.  कसं होतं ना,  आपल्याला सगळं अगदी इन्स्टंट हवं असतं,  पण त्या मिळवण्याच्या नादात आपण निर्मितीतला  आनंद हरवून बसतो...' दिवाकर


' बाबा, तू काय बोलतोयस ते मला नीटसं कळत नाहीये...'  मुग्धा


' बरं सोपं करून सांगतो, एखादं फूल असतं ना,  त्याच्या पाकळ्या हळूहळू  उमलतात... कळी असतानाच जर त्याला  खुडलं,  तर ते फूल कधीच उमलत नाही... तसंच नात्यांचंही असतं,  नातंही हळूहळू  उमलायला हवं,  अगदी हळूहळू नात्यातील एक एक पदर उमलायला हवा,  तरच ते नातं बहरत जातं आणि मग  बाहेरच्या कुठल्याही कीटकांमुळे त्याला कीड लागत नाही...'  दिवाकर


' बाबा, किती सुंदर बोलतोयस रे तू...  ऐकतच राहावं वाटतंय...  थांबू नको ना,  तू बोलत रहा...' मुग्धा


' अगं बेटा, म्हणण्याचा तात्पर्य इतकंच, की एखाद्या माणसाच्या खूप जवळ जाण्या आधी,  त्या माणसाला पूर्णपणे ओळखणं जास्त महत्त्वाचं नाही का?  त्या व्यक्तीचे  आयुष्याबद्दल बद्दल विचार काय? ध्येय काय? तो आपल्याबद्दल काय विचार करतो?  हे सगळं जाणून घेणं जास्त गरजेचं नाही का?'  दिवाकर


' हो बाबा, पटतंय मला तुझं...' मुग्धा

' उलट मी तर असे म्हणेन, आपण एखाद्या नात्यात बांधले जाण्याआधी स्वतःला किती ओळखलंय, आपले ध्येय काय?   आणि आपण त्यात बांधले जायला आणि त्यातून  निर्माण होणाऱ्या जबाबदाऱ्यांना  पेलायला तयार आहोत का?  या सगळ्याचा विचार करूनच एखादं नातं स्वीकारावं... आणि एकदा स्वीकारलं तर ते मरेपर्यंत निभवावं...'   दिवाकर


' पण मग बाबा, आत्ता आम्हा दोघांच्या मनात एकमेकांबद्दल जी भावना आहे, तिला तुम्ही काय म्हणाल?'   मुग्धा


'आकर्षण आणि ओढ!  आता तुम्ही ज्या भावनेला  'प्रेम' म्हणताय,  ते केवळ आकर्षण आहे बेटा. आणि यात गैर असं काहीच नाहीये.  आज तुला अनिकेत आवडतोय,  उद्या दुसरा कोणी आवडेल...  एखाद्याचे व्यक्तिमत्व,   रंगरूप आवडायला काही वेळ लागत नाही,  वेळ लागतो तो माणूस समजून घ्यायला... आणि माणूस  समजल्या शिवाय  खरं प्रेम शक्य नाही...' दिवाकर


'तू जे म्हणतोय ते सगळं मला पटतंय बाबा, पण आता मला समजत नाहीये,  यापुढे मी अनिकेतशी कसं वागावं?'  मुग्धा


' कसं म्हणजे?  नेहमीसारखंच! एखाद्या मित्रासारखं...  पण मैत्रीची मर्यादा मात्र ओलांडायची नाहीस,  प्रॉमिस?'  दिवाकर


' हो बाबा, प्रॉमिस!  पण आता अनिकेतला कसं समजवायचं?'  मुग्धा


' ते काम तू माझ्यावर सोड, एखाद दिवशी बोलाव ना त्याला आपल्याकडे,  आजच बोलावते का?  तुझ्या वाढदिवसाचं निमित्तही आहे, तिघं मिळून मस्त पार्टी करूया... मग हळूच मी विषय काढतो. आणि हो,  त्याची गिटारही ऐकायचीये बरं मला...' दिवाकर


' बाबा यु आर ग्रेट!  तू हे सगळं किती  सहजतेने घेतलंस?   एखादा बाप असता,  तर मुलीचे कॉलेजच बंद करून टाकलं असतं, मला तीच भीती वाटत होती...'   मुग्धा


'काय मुग्धा! हेच ओळखलंस तू आपल्या बापाला...  बाळा,   तुझी आई गेल्यावर मला खूप लोकांनी दुसरं लग्न  करण्याविषयी सुचवलं.  पण माझ्या मनात तुझ्या आईविषयी जे अढळ स्थान आहे,  ते दुसऱ्या कुणाला देण्याचा मी विचारही करू शकत नाही,  हे असतं खरं प्रेम!'  दिवाकर


' बाबा, यु आर द बेस्ट फादर ऑफिस धिस वर्ल्ड!  शाळेत- कॉलेजमध्ये  इतर मित्र-मैत्रिणींच्या आयांना बघितलं,  की मलाही वाटायचं आपल्याला का नाही एक आई?  बाबानी का दुसरं लग्न केलं नसेल?  पण आज मला त्याचं कोड उलगडलं... आय लव यू...'  मुग्धा गहिवरून म्हणाली.


' लव यु टू बेटा, हम्मम्म...  चला,   अन्न गार होतंय,  लवकर लवकर जेवून घेऊया...'  दिवाकर


' हो बाबा,  आणि आज तू मला जेवण भरवायचंस!'   मुग्धा


'  येस!  इट्स माय प्लेजर बेटा...'  दिवाकर


 आणि त्या दोघांनी समाधानानी  जेवण केलं.  गाजरचा हलवा आज अधिकच गोड झाला होता...


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post