अविघ्न

 अविघ्न

✍🏻 सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

आज नमिताचं कशात लक्षच लागत नव्हतं. शिवाय हातही अगदी यंत्रवत चालत होते. करणार काय? तीन चार दिवसांपासून तिला सर्दी खोकला होता. आणि दुपारी तर चक्क थोडा ताप आला. म्हंटल्यावर नमिताबाई एकदम घाबरल्या की. सार्थक, तिचा नवरा, वर्क फ्रॉम होम मुळे घरातच होता. त्याने पण दोन तीन दिवसांचं सगळं तालमाल बघून तिला सांगितलं," नमू, मला काय वाटतं आपण एकदा टेस्ट करूनच घेऊयात. Negative आली तर चांगलंच आहे पण positive आली तर वेळेवारी औषधं चालू होतील न. काय वाटतंय तुला?" नमिता पण विचार न करता लगेचच म्हणाली," मी पण हेच म्हणणार होते. उगीच रिस्क कशाला?आपल्याकडे रोहन पण आहे १० वर्षांचा आणि काय असेल ते होऊन जाऊदे. शिवाय गणपती बाप्पा पण येतातच आहेत. आता आपल्याकडे असतो रे गणपती बाप्पा. काय होतंय ते बघुयात." हे सगळं ऐकायला रोहन होताच तिथे. त्याला तर एकदम रडूच फुटलं. आई quarantine होणार म्हंटल्यावर भोकाडच पसरलं त्याने. चार पाच महिन्यांपूर्वी सार्थक ला झाला होता कोरोना. पण थोडक्यातच निभावलं होतं. त्यावेळी नमिता ने घेतलेली त्याची पूर्ण काळजी, औषधोपचार आणि वेळेवारी गरम- गरम जेवण यामुळे तो अजूनच पटकन बरा झाला. हे सगळं रोहन ने पाहिलं होतं पण त्यावेळी आई होती करायला. आता तीच जर एका खोलीत राहिली तर कसं होणार आपलं? शिवाय अजूनही दिवसातून एकदा तरी तिला मिठी मारण्याचा त्याचा नियम मोडला असता तो वेगळाच.

इकडे सार्थक ने त्याच्या आईबाबांना कल्पना देऊन ठेवली पण ते तरी कसे मदत करणार होते. एकतर ते गावाला. शिवाय त्यांचं ही वय ६५च्या पुढे. आणि त्यात घरात सार्थक चे आजोबा होते. म्हणजे तर अशक्यच त्यांचं इथे येऊन मदत करणं. नमिता ने ही तिच्या माहेरी सांगून ठेवलं पण तिथेही काही वेगळी परिस्थिती नव्हतीच. 

नमिता मनातून घाबरली होती. स्थिर असल्याचं दाखवत होती पण मनात असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं होतं. १५ दिवसांवर बाप्पा येऊन ठेपलेत आणि हे काय अचानक होऊन बसतंय. तिला एकदम मागच्याच्या मागच्या वर्षी सासूबाईंनी सांगितलेले शब्द आठवले. त्या म्हणाल्या होत्या," नमिता आता माझं वय झालं. गौरी गणपती आले की उठबस काही कमी नसते. शिवाय आपला गोतावळा थोडा जास्त आहे. तू इतकी वर्ष पाहतेच आहेस की. तेव्हा मला असं वाटतं की आता ही परंपरा तुमच्या पिढीने हातात घ्यावी. तू मोठी सून आहेस घरची. त्यामुळे तुम्ही दोघांनी हा वारसा पुढे न्यावा. काही लागलं सवरलं तर आम्ही दोघे आहोतच ग. पण आता सासरेबुवांचं पण खूप करायला लागतं. बघा! दोघांनी विचार करा आणि सांगा. पण एकदा जबाबदारी घेतलीत की घेतला वसा टाकायचा नाही हो. मध्येच अडम तडम नको." तेव्हा आपण मोठ्या तोंडाने बाप्पाची स्वारी आपल्याकडे आणायला होकार दिला. मागच्या वर्षी आणले सुद्धा गणपती बाप्पा आपल्याकडे. अगदी धुमधडाक्यात केल्या गौरी पूजन आणि विसर्जन. सासूबाईंनी जाताना डोळ्यात पाणी आणून सांगितलं ही होतं, "नमे, छान केलंस हो सगळं. अगदी निगुतीने आणि आनंदाने. खूप बरं वाटलं बघ. माझा वारसा तू चालवशील यात शंका नव्हतीच मला. पण आता अगदी शिक्कामोर्तब झाले." मला ही खूप हायसं वाटलं होतं. ती आठवणीतून वास्तवात आली. डॉक्टरांच्या सांगण्यावरून संध्याकाळी जाऊन तिने टेस्ट करून घेतली आणि आल्यावर हात पाय धुऊन, मास्क साबणाने स्वच्छ धुऊन मग शांत बसली एके जागी डोळे बंद करून. डोक्यात उद्यापासून काय बदल करायला लागतील याची मोठीच्या मोठी यादीच बनत चालली होती. पहिले आता उद्यापासून सकाळ संध्याकाळ डबा लावूयात. आज रात्रीच स्वतःला एका खोलीत ठेवूयात. आपलं सगळं सामान वेगळं छोट्या बेडरूम मध्ये नेऊन ठेवूयात. म्हणजे या दोघांना काही नको व्हायला. तरी बरं आपल्याकडे वेगळी खोली आहे. नाही त्यांच्याकडे कसं होत असेल याचा विचारच न केलेला बरा.. रोहन ची शाळा, त्याचा अभ्यास, रोजचं सगळं कसं होणार? शिवाय सासूबाईंना पुन्हा यावर्षी तिथेच गावाला गणपती आणायला लागणार आणि आपल्याला जाता तर येणार नाहीच, शिवाय त्यांची उठबस होऊन दमतील परत... या आणि अशा असंख्य चिंतेने समोर अंधारीच आली तिच्या. मग ती अचानकच उठली आणि देवाजवळ सांजवात केली. त्या खोलीभर पसरणाऱ्या तेजाळलेल्या ज्योतिकडे एकवार बघून मनापासून हात जोडले आणि बाप्पाला मनातच सांगितलं," हे काय रे गणोबा, मागच्या वर्षी काही कमी झालं का रे माझ्याकडून म्हणून असं रुसायचं ठरवलं आहेस?  मी तर मनापासून केलं सगळं. पण आता दुसऱ्याच वर्षी हे कुठलं विघ्न आलं बाप्पा? माझं घर माझ्यावरच आहे रे. एक बाई आजारी की सगळं घर कसं मरगळुन जातं हे तुला सांगायला नकोच.  शिवाय मी तर सगळी काळजी घेत होते. सार्थक ला झाला तेव्हा पण आम्ही दोघे म्हणजे मी आणि रोहन अगदी सुखरूप होतो. ते केवळ तुझ्याचमुळे. मग आता असं नको करुस रे! मला या ही वर्षी तुझी सेवा करायचं भाग्य लाभूदे. या तुझ्या लेकीचं एवढं ऐक नं! हे विघ्नहर्त्या, हे विघ्न येता येताच माघारी परतवून लाव." तिच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. पण तरीही ते पुसून ती कामं करत होती. पुढच्या दिवशी सुद्धा सगळं घर गप्प गप्प होतं. सार्थक आणि रोहन ची अवस्थाही विचित्र झाली होती. तिकडे सासूबाई आणि आई ने तर देव पाण्यात ठेवले, नवस बोलले. नमिताचं मन मात्र म्हणत होतं," हे सगळं करून जे व्हायचं ते होणारच आहे. एक लस घेऊनही आपण या कोरोनाच्या विळख्यात फसणार असं दिसतंय."  सध्या देशभरात कोरोना प्रकरण कमी असल्याने दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी नमिता कामात मग्न असताना अचानक फोन वाजला. मेसेज आला होता रिपोर्ट बद्दलचा. तिने देवाचं नाव घेऊन उघडून पाहिला आणि एकदम ओरडलीच अत्यानंदाने. "अरे सार्थक, रोहन आपण सुटलो. रिपोर्ट negative आला आहे. मला कोरोना नाहीये. हुश्श...संकट टळलं म्हणायचं." सगळे खूप आनंदले. सार्थक ने आदल्या रात्री वेगळं करून ठेवलेलं त्याच्या लाडक्या नमूचं सामान परत जैसे थे आणून ठेवलं. रोहन ने काल आईला न मारता आलेली मिठी मारून घेतली अगदी जोरदार! दोन्ही घरी सांगितलं. देव पाण्याच्या बाहेर आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. १५ दिवसांनी असलेले बाप्पा पण अगदी दणक्यात विराजमान झाले. नेहमीप्रमाणे घरच्यांच्या पंगती उठल्या. आणि मग बायका जेवायला बसल्या. तेव्हा नमिता ची जाऊ नमिता ला लाडात म्हणाली," जाउबाई, एवढ्या मोठ्या संकटाला पळवून लावलंत मग आता एक उखाणा होऊन जाऊ दे की". सगळ्यांनीच आग्रह केल्यावर नमिता ने छानसा उखाणा घेतला.

"सार्थक ची साथ आणि रोहन चं प्रेम आजन्म असंच राहूदे,

बाप्पाकडे यावर्षी ही एकच मागणं की हे कोरोनारूपी विघ्न आता कायमचं टळू दे."

"तथास्तु" असं म्हणून सासरेबुवांनी सगळं वातावरण हलकं केलं. 'गणपती बाप्पा मोरया' चं पुन्हा एकदा उच्चारण झालं आणि नमिताने बसल्या जागीच हात जोडले आणि पुनःश्च केलेल्या अखंड कृपेबद्दल त्या 'अविघ्ना' चे आभार मानले. 

।।शुभम् भवतु।।

वरील कथा अतुला मेहेंदळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post