ती एक कोणीतरी

 ती एक कोणीतरी

✍️ सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

तशी दिसायला छानच होती ती, निमगोरा रंग, ठीकठाक ऊंची आणि काळेभोर लांबसडक केस. 

फक्त एकच गोष्ट नव्हती तिच्याकडे, ती म्हणजे बापाची श्रीमंती.

जर ते ही असतं तर आज नक्कीच कुठल्यातरी मोठ्या पदावरून बापाचं,

 घराण्याचं नाव रोशन करताना दिसली असती.

पण ती होती हातातोंडाशी गाठ असलेल्या दोन भावांवर झालेली तिसरी मुलगी, कदाचित नकोशीच.

पण असं स्पष्टपणे कोण सांगेल म्हणून भावांना राखी बांधण्यासाठी जन्मलेली बहीण म्हणायचं.

असो...


जरी शेंडेफळ असली तरी लाड मात्र कमीच व्हायचे तिचे,

कारण आर्थिक परिस्थितीच तशी होती ना.

पण ती मात्र समजूतदार होती बरं,

कसला म्हणजे कसलाच हट्ट करायची नाही.

कुणी न सांगताच एक बेडी पायात अडकवून घेतली होती तिने.

भावांनी अर्धवट वापरलेल्या वह्या आनंदाने वापरायची,

त्यांची फाटकी पुस्तकं कव्हर घालून शाळेत चांगले गुण आणायची.

होतीच ती गुणाची... 

नाही नाही तिला आपल्या मर्यादा ठाऊक होत्या म्हणायचं.


दहावी झाली, चांगलेच मार्क मिळाले हो तिला,

अगदी दोन खोल्यांच्या घरात, 

चार माणसांच्या धबडग्यात,

आईला मदत करत आणि

बापाचं आजारपण काढत.

कधी आणि कशी अभ्यास करायची?

तिलाच ठाऊक. 

टॉपर क्लासेसवाले आले घरी हार पेढे घेऊन.

"आम्ही तुझा फोटो वापरू जाहिरातीत, 

त्याबदल्यात पैसे देऊ, तेही पंचवीस हजार...

आहेस कुठे!"

तिने विचार केला,

"मी तर मुलाखत ही देईन पण पंचवीस नाही, 

चाळीस हजार."

क्लासवाल्याने विचार केला,

'चाळीस हजार तर एका पोराची सहा महिन्याची फी.

हिच्यामुळे अशी कित्येक पोरं येतील,

होऊ दे खर्च.'


ते पैसे ती पुढच्या शिक्षणासाठी वापरणार होती.

चौकशी ही केली होती.

शहरातील नंबर वन कॉलेजमध्ये पहिल्या फेरीतच नंबर लागला असता तिचा.

आपल्याला अभ्यासात गती नाही हे ओळखून

आतापर्यंत छोटी मोठी कामं करून थोडं रांगेला लागलेल्या भावांनी होकार भरला.

पण आई मात्र नाराज होती.

"अगं तू एकटी कशी राहशील शहरात,

आणि तो खर्च आपल्याला झेपणार आहे का,

बघ बाई, विचार कर.

त्याच चाळीस हजारात इथे तुझं शिक्षण पूर्ण होईल.

हवं तर दोन चार चांगले ड्रेस घे त्यातून,

एखादं लॉकेट करु तुझ्यासाठी.

तसंही अजून एक दोन वर्षं,

त्यानंतर लग्न करावं लागेल तुझं,

मगच भावांच्या लग्नाचं बघता येईल ना."


आता मात्र तिचं डोकं  ‌‌फिरलं,

"हे बघ आई,

तुला जे काय बोलायचंय ते बोलून घे

पण मी ऐकणार नाही.

मला नाही राहायचं या कोंडवाड्यात...

आत्तापर्यंत मी काही मागितलं?

नाही ना.

मग आता मागते,

जाऊदे मला.

शिकून काहीतरी बनायचंय मला,

हे घर,

हे चिमुटभर जिणं

थोडंसं पसरायच आहे पुढं.

भाऊ आणि दादा नाही करू शकत ते...

नाही म्हणजे त्यांना शिक्षणाचे मजबूत पंख नाही मिळाले ना म्हणून

जर मी करू शकते ते तर का नाही करायचं.

ऐक माझं,

तुला कसली भीती वाटते माहीत आहे मला.

ऐकलंय मी कालच तुझं आणि काळे काकूंचं बोलणं.

अगं शिकायला बाहेर जाणाऱ्या सगळ्याच मुली वाईट मार्गावर जातील असं नसतं.

विश्वास ठेव माझ्यावर,

तुमचं नाव खराब होईल असं मी काहीच करणार नाही."


आई नुसती पाहत राहिली.

तिच्याही डोक्यात नुसता गोंधळ सुरू होता.

कुणाचं ऐकावं,

डोळ्यासमोर मोठ्या झालेल्या पोटाच्या पोरीचं

की फुकटचे सल्ले देणारे नातेवाईक, शेजाऱ्यांच...

शेवटी लेकीच्या हट्टापुढे काही चाललं नाही तिचं.


सोळा वर्षांची पोर  शहरात हॉस्टेलवर राहू लागली.

इकडे आईच्या डोळ्याला डोळा लागेना.

त्यातच येणारे जाणारे-

"वहिनी मनूला शिकायला शहरात ठेवलं म्हणे,

पहा बरं, लक्ष ठेवा.

आजकालची तरूण पिढी...

तिला स्वातंत्र्य म्हणजे मौजमजा करायची संधी वाटते."

ताई जर तू उद्या मनुसाठी स्थळ बघ म्हणालीस ना

तर मी नाही मध्ये पडणार.

कारण शहरात एकटी राहणारी मुलगी म्हटलं

 की जरा दूरच सरकतात चांगल्या घरची मुलं."

बिचारी आई सैरभैर झाली.

तिची पोर पायातील गरिबीची बेडी तोडण्यासाठी मेहनत करत होती,

अन् जग तिचं वागणं डोळ्यात तेल आणि हातात दिवा घेऊन तपासत होतं.

आपले म्हणवणारे ही परक्यासारखे वागत होते.


कसाबसा सहा महिने आईने धीर धरला

आणि एक दिवस लेकीला फोन केला.

"बाळ, येऊन जा रविवारी."

आवाज ऐकून ती चरकली आणि

लगेच येऊन ठेपली 

आईचे खोल गेलेले डोळे,

हातापायाच्या काड्या पाहून घाबरलीच.

अशी नुसती टेकलीच होती,

मोहिते काकू डोकवल्याच.

"आली का मनू, 

बरं झालं बाई तुमच्या जीवाला घोर लागला होता नुसता."

आई दचकली आणि

हिचे डोळे विस्फारले.

सगळं लक्षात आलं तिच्या.


तो दिवस कसाबसा काढून दुसऱ्या दिवशी सकाळीच बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या अगरवाल डॉक्टरांकडे गेली.

फॅमिली डॉक्टर होते ते...

त्यांच्या मिसेस ही खूप चांगल्या होत्या.

"अरे मनू, काय झालं बाळ,

काय म्हणते कॉलेज?"

दोघांनी तोंड भरून चौकशी केली.

काकूंनी आतून खोपरा पाकच्या वड्या आणून हातावर दिल्या. 

"काका एक काम होतं....

मला मेडिकल सर्टिफिकेट लिहून द्याल का,

तब्येत बरी नसल्याने कॉलेज अटेंड करणं जमणार नाही म्हणून...

मी फक्त परीक्षा द्यायला जाईन."

"का ग, काय झालं?"

उत्तरादाखल तिचे डोळे भरले फक्त.


एका कोषात गेली ती.

आईने 'लोक काय म्हणतील' ची बेडी जी पायात अडकवली होती.

फायनल परीक्षा संपल्यावर कुणाला न सांगता टीसी घेऊन आली

अन् गावातल्या कॉलेजला आर्ट्सला एडमिशन घेतली.

डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न पाहणारी ती

आता खालमानेन समाजशास्त्र शिकू लागली.

अव्वल क्रमांक पटकावणारी फक्त गरजेपुरता अभ्यास करायला लागली.


एक दिवस मामा घरी आला.

"मनू विशाखा पुण्यात राहून डिप्लोमा करायचं म्हणतेय,

जरा सांग काय आणि कसं करावं."

"दादा एडमिशन मिळालं का तिला?"

आईने चौकशी केली.

"नाही, मी डोनेशन भरलं, लाख रुपयांचे."

"पण मामा पोरीच्या जातीला असं बाहेर पाठवायला कसा तयार झालास तू!"

मनूने विचारलं.

"त्याला काय होतंय, 

माझा विश्वास आहे माझ्या पोरीवर."

मामा ताडकन बोलला आणि हिने विद्ध नजरेने आईकडे पाहिले.

आईने नजर चुकवली.

हा तोच मामा,

ज्याने बाहेरगावी शिकणाऱ्या मनूसाठी भविष्यात स्थळ बघणार नाही म्हणून सांगितलेलं.

तोच भाऊ ज्याने बहिणीने मुलीला स्वतः जवळ ठेवावं म्हणून दबाव आणलेला.

आपण बोलण्यात चुकलो पाहून मामा न बोलता उठून गेला.

आईला उमजले,

आपण उगीच मुलीच्या पायात आपल्या प्रेमाची बेडी अडकवली.


दिवस पुढे सरकत होते. 

दोघे भाऊ लग्नाला आले होते.

पण घरात बहीण ठेऊन कसं लग्न करावं!

म्हणून हिच्यासाठी वरसंशोधन सुरू झालं.

पण आर्ट्समधून पदवीधर झालेली,

घरची गरिबी असलेली मुलगी...

दिसायला छान असली म्हणून काय झालं,

जावयाची हौस मौज करायची तर ऐपत असली पाहिजे ना...

सगळीकडून फक्त

नकार, नकार आणि नकारच.


अजून किती वर्ष वाट पाहायची.

भावांनी लग्न उरकून घेतली.

दोन खोल्या पार्टीशन घालून तीन करण्यात आल्या.

पाच बाय पाचची गॅलरी पडदे लावून घरात घेतली गेली.

ती सव्वीस वर्षांची झाली.

दोघी वहिन्या नोकरी करायच्या

आणि ही घर बसल्या शिकवण्या घ्यायची.

मामाची विशाखा डिप्लोमा पासच्या जोरावर

मोठ्या घरात पडली.

तेव्हा हीचं ऐकलं असतं तर...

आईच्या मनात विचार यायचा.


ही खरंच एकटी पडली होती.

पायाची जुडी पोटाशी घेऊन बसायची.

जणू मणामणाच्या साखळदंडाने बांधलेली.

कधीतरी हाताशी ठेवलेल्या डायरीत काही खरडायची.

अशातच एक स्थळ आलं,

दोन गल्ल्या सोडून राहणाऱ्या विनायकच.

आताशा इतक्या ठिकाणाहून नकार मिळाला होता की

काही उभारी राहिली नव्हती. 

"दहावीला मेरीट मध्ये आली होतीस ना?"

त्याच्या आईने कुतूहलाने विचारलं.

"हो", एकाक्षरी उत्तर.

"मग पुढे काही प्रोफेशनल शिक्षण का नाही घेतलं?"

आईशी नजरानजर झाली,

"तेव्हा ऐपत नव्हती... "

स्पष्ट उत्तर पण डोळ्यातील भाव वेगळंच सांगू पाहत होते,

एक दुःखी छटा... 

का कुणास ठाऊक त्या माऊलीला भिडलं ते.

समजूतदारपणे त्या लोकांनी मान डोलावली.

होणाऱ्या सासूने मुलाकडे पाहिलं,

त्याने किंचीत मान डोलावलेली पाहताच

' पसंत आहे मुलगी' ची घोषणा केली.

ती चकीत...

हे काय भलतंच

हे काय आक्रित...


चार दिवसात फक्त मुलगी आणि नारळाची पाठवणी झाली 

इथे सगळंच वेगळं होतं.

लहान दीर, सासरे, सासू सगळे एकत्रच हसत खेळत बसायचे!

' बाईच्या जातीने असं जोरात खिदळू नये '

म्हणणारी आजी नव्हतीच

तर "छान झालाय हो शिरा" म्हणत 

हिच्या गळ्यात बोरमाळ घालणारी सुरकुतलेली सासूची नणंद होती.

तिला आठवले,

 सुनेच्या डोक्यावरील पदर नुसता खाली पडला म्हणून थयथयाट करणारी तिची आत्या.

अचानकच तिला हिच्यावर बंधनं घालणारी आई उमजल्यासारखी वाटू लागली.

पण दुसरं मन म्हणे,

का तिला नव्हता का विश्वास,

 आपण केलेल्या संस्कारावर.

आज कुठल्या कुठे पोहोचले असते मी...


लोकं म्हणतात लग्नाची बेडी अवजड असते,

पण हिला या लोकांच्या संगतीत

माहेरी असतानाची घुसमट आठवू लागली.

एक दिवस आपले लांबसडक केस ओले होते म्हणून तिने मोकळे सोडले

आणि बसली गॅलरीत पेपर वाचत.

आतून सासूबाई आल्या, 

तुळशीला पाणी घालायला.

मोकळा केशसंभार पाहून थबकल्या.

वाटलं, ओरडतील नक्की,

'चांगल्या घरातील बायका असं केस सोडून गॅलरीत बसत नाहीत.'

कुठंच काय,

गोड हसून निघून गेल्या.


"संध्याकाळी तुझे ब्लाऊज शिवायला टाकायला जाऊ ग," 

सासूबाई म्हणाल्या.

शिंपिणीला माप देताना डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहून हिने सांगितले,

"बाह्या जरा लांबच ठेवा हो."

"तुला लांब आवडतात का?"

थेट प्रश्न.

बावचळलीच ही.

"असं नाही,

मला छोट्या आवडतील

पण आपल्या घरी चालतील का? 

लोक काय म्हणतील?"

"लोक म्हणू देत काहीही,

आम्हाला चालतील.

कर तू आवडेल तसं."

अजून एक बेडी सैल झाली.


"तुला पुढे शिकायचं असेल तर शिक,

नोकरी करायची असली तर कर."

नवऱ्याने प्रस्ताव मांडला.

"हो वहिनी, शिक तू

आपण दोघे मिळून अभ्यास करू."

दीर उत्साहाने म्हणाला.

"हे काय भलतंच,"

लाजली ती.

"भलतंच काय त्यात...

इच्छा असेल तर शिक ना,

सुदैवाने आमची ऐपत आहे, 

हात पाय धड आहेत अजून आणि शिवाय..."

"शिवाय काय बाबा?"

"तुझ्यासारख्या हुषार मुलीने फक्त चूल आणि मूल न करता

स्वतःच विश्व निर्माण करावं असं वाटतं आम्हाला.''

सासऱ्यांनी वाक्य पूर्ण केलं.

आणि तिचं पुन्हा शिक्षण सुरू झालं,

यावेळेस मनापासून,

उत्साहाने.


चार पाच वर्षे लोटली. 

चांगली सरावली, 

मुक्त वातावरणाला.

आणि अचानक घाला पडला.

जीवघेण्या अपघातातून फक्त सासरे आणि ही हातीपायी धड वाचली.

प्रेमळ सासू आणि जीवनाचा जोडीदार

जागेवरच....

दिराच्या हातापायात रॉड्स.

जगणं सैरभैर झालं.

आताशा कुठे सुरु झालं म्हणता

थांबूनच गेलं...

कुणी कुणाला सावरावं...


आई बाबा म्हणे,

पोरी चल तू सोबत आम्हाला जड नाहीस.

भाऊ वहिन्यांचे डोळे मात्र काही दुसरंच सांगू पाहत होते.

बरोबरच होतं,

त्यांचे संसार वाढले होते पण

जागा आणि मिळकत अजून तेवढीच होती.

सासऱ्यांनी बरोबर ओळखलं ते...

"बेटा, तू जो निर्णय घेशील विचारपूर्वक घे."

त्यांनी तिच्या डोक्यावर हलकंसं थोपटलं.


आई बाबा सोबत माहेरी आली.

दोन चार दिवस वातावरण गंभीरच राहिलं.

डोकं अजूनही विचार करण्याच्या अवस्थेत नव्हतं.

एका सकाळी सहजच हाती लागली ती साडी नेसून दाराला टेकून बसली होती तर

"वन्सं, अशा साड्या नाही नेसायच्या यापुढे,

ती समोर आहे बघा लव्हेंडर कलर आणि पांढऱ्या फुलांची,

ती नेसा."

चपापून तिने स्वतःकडे पाहिलं,

राणी गुलाबी रंगाच्या साडीवर

पिवळी, चिंचेच्या चिगुरासारखी मोहक फुलं होती.

"हो बाई, आता फिके रंगच निवडत जा.

असले भडक आणि छान रंग चालणार नाहीत तुला." 

मामीने री ओढली.

मुकाट्यानं तिने साडी बदलली,

लव्हेनडर कलर आणि पांढरी फुलं...


महिन्याभराने दुःखाचा भर ओसरल्यावर

सहजच एका संध्याकाळी दाराबाहेरच्या ओट्यावर विसावली तर आईची हाक 

"मनू घरात ये,

अशी तिन्ही सांजेची बाहेर नको बसत जाऊ,

येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा चांगल्या नसतात."

"शिवाय काल लेले बाईंची सून म्हणत होती,

पुरुष माणसं ऑफिसातून यायच्या जायच्या वेळी त्यांना घरात बसायला सांग म्हणून.

तुम्ही चांगल्या आहात हो वन्स,

पण लोकांचं काय सांगता येत का?

आम्ही काय आणि किती जणांना उत्तर द्यावं..."

लहान वहिनीचा आवाज.

झटक्यात तिला सासूबाई आठवल्या,

तू कर बिनधास्त, 

लोकांना काय सांगायचं ते बघू आम्ही म्हणणाऱ्या...



अचानकच मन तुलना करू लागलं,

'पोरीच्या जातीने असं करू नये,

आपली ऐपत नसताना मर्यादेत रहावं,

तू चुकलीस तर लोक काय म्हणतील,

घरंदाज बायका असं बसत नसतात,

कितीही शिकलीस तरी चूल नी मूलच तर सांभाळायचं आहे,

तूच असं केलंस तर मी काय करू मनू,

निदान आईचा तरी विचार कर'

एक न अनेक बेड्या 

काही घरच्यांनी घातलेल्या

तर काही स्वतःहून घालून घेतलेल्या.

लग्नाच्या बेडीत अडकल्यावर

सासरच्यांच्या प्रेमाने कधी या बेड्या निखळल्या तिला समजलंच नाही.



आणि झटक्यात भानावर येऊन सासऱ्यांना फोन लावला.

"बाबा मी परत येतेय,

आपल्या घरी..."


समाप्त

©️ सविता किरनाळे 


वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा देखील वाचून पहा.

👇

अविघ्न

Post a Comment (0)
Previous Post Next Post