हळदी कुंकू

हळदी_कुंकू

✍️ बीना बाचल

"किर्ती, अग सगळं सामान घेतलंस न नीट?आज दोन बॅग्स  आहेत तुझ्याकडे, तेव्हा सांभाळून चढ ट्रेन मध्ये, जास्त गर्दी असेल तर ती ट्रेन सोडून दे आणि हो लेडीस डबा असेल तिथेच थांब, बायकांचा घोळका बघून येईलच लक्षात तुझ्या कुठे थांबायचे ते , शिवाय गर्दीत चढताना मध्ये उभी राहू नकोस,बाजूने चढ म्हणजे पटकन डब्यात शिरशील!" किर्ती च्या सासूबाई ना आपल्या नव्या सूनेला किती सूचना देऊ अन किती नको असं झालं होतं, एक तर नुकतंच लग्न झालेलं शिवाय मुंबई शहर अगदीच नवखं तिच्यासाठी! आणि भर म्हणून की काय घरापासून बऱ्याच लांबच्या उपनगरात लागलेली नविन नोकरी ,त्यामुळे किर्ती पेक्षा तिच्या सासूबाईंना च जास्त धाकधूक वाटत होती की ही वेळेवर आणि सुखरूप पोहोचते की नाही ते!

कीर्ती नव्यानेच मुंबईत आलेली एक तरुणी,पण मुंबई जशी सर्वांना आपल्या पोटात सामावून घेते तशीच किर्ती लाही मुंबईनं  सामावून घेतलं तीही हळूहळू ह्या शहरात , ईथल्या वातावरणात रुळत होती.

हल्ली ती रोज ठराविक वेळेत ट्रेन पकडू लागली तशी मुंबई च्या लोकल ची खासियत असणारा बायकांचा एक छान ग्रुप तिला मिळून गेला.सगळ्या तिच्यापेक्षा वयानं मोठ्या असल्यानं उलट किर्ती चं जास्तच कौतुक होऊ लागलं . आणि वर्षाचे सगळे सणवार, मनातल्या गुजगोष्टी ,दुखणं खुपणं, खाणं पिणं असं सगळं ट्रेनच्या त्या तासाभराच्या प्रवासात घडू लागलं.

किर्ती चा नवरा तर ट्रेन दिसली की ,'हे बघ तुझं चालतं फिरतं माहेर!'म्हणून चिडवायचा तिला.

मकरसंक्रांत सुरू झाली तशी ट्रेन मध्ये हळदी कुंकू समारंभाच्या कार्यक्रम आखणी साठी चर्चाना उधाण आलं! शेवटी सगळ्या ग्रुप च्या ड्युट्या, घरचं time table अशी कसरत करत आजचा शुक्रवार हळदी कुंकवासाठी पक्का ठरला.

काळ्या रंगाच्या काठपदरी साड्या, तिळगुळ लाडू, वड्या , वाण अगदी सगळं सगळं ठरलं.

वेळेनुसार प्रत्येक जण आपापल्या स्टेशनला ठराविक वेळेत चढल्या.

किर्ती तर नवी कोरी साडी ,हातातल्या पिशव्या, डब्याची वेगळी पिशवी असं सगळं संभाळत सज्ज होती.ट्रेन प्लॅटफॉर्म वर आली, नेहमीप्रमाणे  मुंगी सारखी गर्दी बाहेर पडली आणि आत चढणाऱ्या साऱ्या हिरकण्या आपल्या बॅग्स ,सामान ,ओढण्या इ गोष्टी पोटाशी धरून तयारीत उभ्या राहिल्या, किर्ती ही त्यातलीच एक!पण ती चढणार तोच तिच्या मानेकडे जबरदस्त हिसका बसला आणि तिनं मागे वळून पाहायला आणि ट्रेन सुटायला एकच गाठ पडली! बरं अर्धी आत ,अर्धी बाहेर अशी तिची विचित्र परिस्थिती, शेवटी प्लॅटफॉर्म वरच कोणीतरी "मरना है क्या" म्हणत तिला खाली खेचलं.

किर्ती ला दोन मिनिटं काहीच सुचेना! तिनं नीट पाहिलं तेव्हा समजलं की तिचा त्या नवीन साडीचा भला मोठा पदर कोणाच्या तरी पायाखाली आला होता आणि त्यामुळे तिला हिसका बसला होता! 

त्यामुळे पिन अप केलेल्या ठिकाणी तिची साडी थोडी फाटली देखील होती! किर्ती ला साडी फाटल्याच, थोडक्यात बचावल्याच आणि ट्रेन सुटल्याने मैत्रिणी ही पुढे गेल्याचं सगळंच दुःख दाटून आलं, डोळे भरून आले." श्या, सगळा प्लॅन च फ्लॉप झाला!किती हौसेनं आईंनी तयारी करून दिली होती, किती मजा करणार होतो आपण ,सगळं च राहिलं!" त्याच रडवेल्या आवाजात तिनं ट्रेन मधल्या एका मैत्रिणीला फोन केला आणि तुम्ही हळदी कुंकू उरकून घ्या,मी उद्या देईन माझं असं म्हणत फोन ठेवला.

खूप चरफड झाली तिची पण मुंबई तुम्हांला धड चिडू ही देत नाही! पुढची ट्रेन येताना दिसली आणि किर्ती ने मघाचची चूक सुधारत पदर ही नीट सावरून घेतला, ह्या ट्रेन मध्ये ती सहज आत शिरू शकली, चक्क बसायला ही मिळालं तिला ,पण काय उपयोग! आज आपण एकट्याच ;तिकडे बाकीच्या काय मजा करत असतील! हसणं चिडवणं खाणं सगळं कसं मस्त सुरू असेल!

तिला अजूनच राग आला स्वतः चा.

तिची चिडचिड सुरू असतानाच एक एक जण ट्रेन मध्ये चढू लागल्या.

शेजारच्या दोघी तर रोजच्याच एकत्र जाणाऱ्या असाव्यात कारण एक दुसरीला समजावत होती, "किती छान दिसतेय बघ ही माळ, अग घरातले आता तो नाही म्हणून मंगळसूत्र घालू देत नव्हते न , पण आता त्याच मंगळसूत्राची माळ बनवून घेतलीस, तुझ्यासाठी त्याच्या आठवणी जतन झाल्या आणि इतरांची तोंड ही बंद झाली!" तिनं दोघींकडे हसून पाहिलं.

तोच पोटाशी बाळ घट्ट धरून भीक मागणारी दीनवणी भिकारीण डब्यात फिरू लागली, तिच्या पाठोपाठ एक कानातले विकणारी आपलं सामान सांभाळत आत शिरली, तिच्या पाठोपाठ बायकांना लाजवेल अशी सुंदर साडी आणि नटलेला तृतीय पंथी चढला , तिच्या सारखीच किंबहुना तिच्याहून ही नवखी अशी एक नुकतंच लग्न झालेली ,हातभर हिरवा चुडा भरलेली एक तरुणी घाईत आत शिरली.

ह्या सगळ्या जणींना बघून किर्ती ला काय सुचलं कोण जाणे , पण ती तोल सावरत उठली. अजून स्टेशन यायला बराच वेळ होता आणि' ही काय मधेच उठली, नवीन दिसतेय कोणीतरी' अशा अर्थाचे भाव तिच्या बाजूला बसणाऱ्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर दिसले पण तिकडे दुर्लक्ष करत तिनं तिच्या बॅग मधून भराभर हळदी कुंकवाचे सामान काढलं आणि तुम्हाला सर्वांना हळदी कुंकू देऊ शकते का म्हणून त्यांची परवानगी घेतली , तोवर पलीकडे बसलेल्या एक आजी,  'अग हळदी कुंकू द्यायला परवानगी कसली मागतेस? दे की सर्वांना' म्हणत तिला होकार देऊन टाकला. तिनं शेजारच्या मंगळसूत्र मोडून माळ बनवलेल्या ताईपासून सुरुवात केली.

कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल असं वाटलं, तिच्या मैत्रिणीनेच तसं सांगितलं, तिलाही हळदी कुंकू देत तिनं पुढे त्या भिकारीण, कानातले विकणारी आणि चक्क त्या तृतीय पंथियाला ही हळदी कुंकू दिलं!'आपल्याला माणसात तरी गणतात की नाही कोण जाणे हे बाकीचे आणि ही हळदी कुंकू देतेय 'असे गोंधळलेले भाव तिघींच्या ही चेहऱ्यावर दिसत होते!

पण मग तिनं सर्वांना वाण आणि आणलेला खाऊ वाटून टाकला तेव्हा प्रत्येकीला आनंद झाला हे जाणवलं.

शेवटी तिनं त्या लांब बसलेल्या आजींना ही हळदी कुंकू, वाण, खाऊ देऊन वाकून नमस्कार केला तेव्हा आजींनी, "छान केलंस हो मुली ; सर्वांना हळदी कुंकू देऊन! नाहीतर आपण आपल्या आपल्यातच ते उरकतो, पोट आणि सुख दोन्ही भरलेलं असलेल्या आपल्या सर्वांना त्याचं काही विशेष ही वाटत नाही, एकीकडून दुसरीकडे हळदी कुंकू घेत आणि मिळालेलं वाण दुसऱ्या दिवशी कोपऱ्यात ठेवून देऊन विसरून ही जातो पण आज तू ज्यांना हळदी कुंकू  दिलंस आणि सोबत हा आनंद ही वाटलास न तो मूळ उद्देश असतो हळदी कुंकवाचा;समजलं! असो, नवीन पिढीत ही दुसऱ्या बद्दल थोडी जाण आहे हे पाहून बरं वाटलं ग! सुखी राहा आणि असंच आनंद वाटत तुझं हळदी कुंकू पार पडू देत दरवर्षी!"आजींनी पोटभर आशीर्वाद दिला आणि  आपली ट्रेन चुकूनही हळदी कुंकू मात्र उत्तम पार पडल्याचा आनंद किर्तीच्या चेहऱ्यावर पसरला होता.

✍️ सौ बीना समीर बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा देखील वाचून पहा.

👇

ती एक कोणीतरी

2 Comments

Post a Comment
Previous Post Next Post