परतफेड

 परतफेड

✍️ योगेश साळवी

   काही आठवणी अशा असतात त्या आठवल्या नाहीत विस्मरणात गेल्या तरच बरं असतं. प्रधान काकूंची ती आठवण मी अशीच मनाच्या खोल तळाशी गाडून टाकायचा प्रयत्न आजही करतो. पण ती कधी कधी उसळून वर येतेच. आठवण ही अशी आहे की ऐकून कोणीही विश्वास ठेवणार नाही. उलट माझ्याकडेच संशयाने पाहतील म्हणून मग मी ती कोणाला सहसा सांगत नाही.

       ' शर्वरी ' सोसायटीतले प्रधान हे आमचे शेजारी. एकेका मजल्यावर तीन फ्लॅट असायचे आमच्या ' शर्वरी' हाऊसिंग सोसायटीत. त्यातल्या मधल्या फ्लॅट मधल्या 

मेंहदळे कुटुंबांपेक्षा प्रधान आणि देशमुख कुटुंबीय म्हणजे आम्ही एकमेकांच्या फार जवळकीचे होतो. प्रधान काकी आणि प्रधान काका आम्हाला सख्या काका काकी सारखेच वाटायचे. प्रधान कुटुंबात काका काकी शिवाय प्रधानांचे आई-बाबा , दिपाली वय वर्ष सात आणि सर्वेश वय वर्ष तीन राहायचे. त्यातला सर्वेश काकीचा मुलगा नव्हता तर भाचा होता त्यांचा. सख्ख्या बहिणीचा मुलगा... त्याविषयी सांगायचं आहे.. पण ते नंतर...

        अडल्या नडल्याप्रसंगी काका काकींची फार मदत व्हायची.... आधार वाटायचा. माझे बाबा मंत्रालयात सरकारी नोकरीत असल्याने प्रधानांची काही महत्त्वाची कामे आपल्या ओळखीवर बाबा कधीकधी करून द्यायचे.

उदाहरणार्थ प्रधान आजी-आजोबांचे पेन्शनचे काम त्यावेळी बाबांनी त्वरित करून दिल्याचे पुसटसे आठवते.

       त्या रात्री जो प्रकार घडला तो घडला नसता कदाचित तर सर्व काही आलबेल चालले प्रधानांच्या घरात असंच आम्ही समजलो असतो. प्रधान म्हणजे आपल्यासारखंच एक पांढरपेशी मध्यमवर्गीय सरळमार्गी कुटुंब... या भावनेला माझ्या बाल वयात थोडासा का होईना तडा गेला

तो अबाधित राहिला असता.

       त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. माझ्या आईने उद्यापनाची पूजा यथासांग करून.. नैवेद्याचे गोड जेवण खाऊन, आमचे देशमुख कुटुंब अंमळ लवकरच रात्रीच्या झोपेच्या आधीन झालेलं. स्वयंपाक घरात देव्हाऱ्यापाशी जमिनीवर ठेवलेल्या समईचा प्रकाश सोडला तर अंधार करून सर्व देशमुख कुटुंबीय उद्याची स्वप्न पाहत होतो.

        अचानक दारावर धाड धाड आवाज करत कोणी धडका मारते असं वाटलं. रात्रीचे सव्वा बारा वाजले असतील. चांगले चार-पाचदा दार ठोठावलं गेलं. अशा मध्यरात्री आडनीड वेळेला दारावर कोणी आलं की छातीत धडकीच भरते... विचार करत दरवाजा उघडला तर चक्क प्रधान काकी दारात उभ्या होत्या. दिपाली आणि सर्वेश बरोबर. त्यांचा गोरा.. उजळ चेहरा घामाने निथळलेला होता. केस विस्कटलेले. मोठालं.. जवळजवळ एक रुपयाच्या नाण्यावर ठसठशीत लाल कुंकू त्या त्यांच्या उंच कपाळावर लावायच्या ते किंचित पुसलं गेलं होतं. कसल्या तरी अनामिक भीतीने धापा टाकत उभ्या.

       " बाजू व्हा... मला आधी आत येऊ दे हो पटकन.."

काकी घोगऱ्या आवाजात म्हणाल्या.

      काकींना मी आत घेतलं. त्यांच्या हाताला धरून तीन साडेतीन वर्षाचा सर्वेश... दिपाली आत आले. त्या दोन लहानग्या जीवांच्या चेहऱ्यावर घाबरलेले अश्राप भाव होते.

दिपाली त्यातल्या त्यात मोठी असल्याने ती जास्तच घाबरलेली वाटत होती.

       सर्वेश काकूंचा भाचा. त्यांच्या लहान बहिणीचा मुलगा.

ब हिण अकाली गेल्यामुळे त्याच्या मावशीकडे म्हणजे प्रधान काकींकडे राहायचा. आता ही गोष्ट शेजारी म्हणून आम्हाला माहित होती. एरवी काका काकी आणि आजी-आजोबा सर्वेशला मुला.. नातवासारखाच वागवायचे. सर्वेशच्या बाबांबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं. मीही लहान म्हणजे साधारणपणे तेरा चौदा वर्षाचा असल्याने जास्त चौकशा कधी केल्याच नाहीत. आणि त्या काळात मोठ्यांच्या गोष्टीत लहान मुलं लक्ष घालत नसत.

       " मारतील मला... मारून टाकतील... मी आज रात्री तुमच्याकडे झोपू का?? खूप भीती वाटते हो..." काकी चांगल्या धास्तावलेल्या होत्या. आम्ही जास्त चौकशी न करता त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रधान काका दाराबाहेर ओशाळलेल्या चेहऱ्याने उभे होते.

       मी, माझा भाऊ आणि बहीण चांगलेच घाबरलेलो. तसं तिघांचे नकळते वय होतं. मी मोठा. पण भीती.. आश्चर्य असं सगळंच वाटत होतं.

       मग परत दिवे वगैरे मालवून निजानीज झाली. देवघरातल्या समईचा प्रकाश तेवढा भिंतीवर हलत राहिला.

वारा येऊन ज्योत हलली की घर.. घराच्या भिंती.... आजूबाजूच्या वस्तूंच्या सावल्या हलत वर खाली होत होत्या.

       बाकीच्यांचं मला माहित नाही... पण माझ्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर माजलं होतं.

      काय झालं असेल नक्की ?? सातवी आठवीत असेन त्यावेळी मी... हुंडाबळी, विवाहितेचा छळ, आत्महत्या, खून  अशा घटना जगात...आजूबाजूला घडतात हे अवांतर वाचनामुळे माझ्या माहितीत नुकतच येऊ लागलेलं.

        इतकं प्रेमळ, सर्वांना मदत करणारे प्रधान काका काकींना मारत वगैरे असतील? चष्मा लावून शांतपणे आराम खुर्चीवर रेलून पेपर वाचन करणारे प्रधान आजोबा आपल्या सुनेचा मानसिक छळ करत असतील?? शांत हळुवार बोलणाऱ्या कधी आवाज न चढवणाऱ्या प्रधान आजी छानसा स्वयंपाक करताना आपल्या सुनेला टोमणे मारत असतील?? 

       वयाला न शोभणारे विचार माझ्या मनात पिंगा घालू लागले होते. विचारांच्या त्या वावटळीत एक दीडच्या सुमारास मला झोप लागली वाटते.

        बाहेरच्या खोलीत मी बाबांबरोबर आणि लहान भावाबरोबर झोपलो होतो. आतल्या खोलीत आईबरोबर बहीण, काकी दिपाली, सर्वेश होते.... आईच्या किंचाळण्याचा आवाज आला जोरात.. आणि आमचं घर थरारून जागं झालं. बाबा धावलेच उठून बेडरूमच्या दिशेने.

        बेडरूम मधले दृश्य थरारक अनाकलनीय होतं.

      प्रधान काकू मोठाले डोळे करून जमिनीवर सर्वेशच्या शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये वेडाची झाक होती. विस्फारलेले त्यांचे डोळे भलतीकडेच बघत होते. सर्वेशच्या गळ्याभोवती त्यांच्या हाताची पकड होती. काकी चक्क सर्वेशचा गळा दाबताना आम्ही सर्वांनी पाहिलं.

      " मारून टाकते याला... मारून टाकते " काकू काय वाटेल ते बडबडत होत्या. झोपेत होत्या म्हणावं तर डोळे चक्क उघडे होते. सर्वेश च्या गळ्याभोवतालची त्यांची पक्कड सोडवायला आईचा जोर कमी पडत होता. बाबांच्या मदतीने आईने काकूंना सर्वेश पासून लांब केलं.

       काकूंच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके वगैरे मारून त्यांना बाथरूमला वगैरे नेऊन आणून आई झोपायची पुन्हा तयारी करू लागली. इतक्यात काकी ताडकन उठून बाहेरच्या खोलीत म्हणजे मी ,बाबा झोपलो होतो त्या खोलीत आली.

तिनं आपला हात आमच्या बिछान्याखाली सरकवला आणि काहीतरी चाचपत शोधू लागली.

       " इथं कोणी चाकू, सुरा, कात्री वगैरे लपवलंय का.. नाही ना... मला मारू नका..." काकी रडत होती. तोंडाने वाटेल ते बरळत होती.

       " अहो वहिनी.. हा बघा पूर्ण बिछाना ...काही नाहीये खाली..." बाबांनी विचारा पूर्ण उलटा करून दाखवला.

        दिवे मालवले गेले पुन्हा. आईने काकींना पुन्हा बेडरूम मध्ये झोपवलं. घर पून्हा अंधारात बुडाले. खिडकीतून आत झिरपणारा चंद्रप्रकाश मृतवत अगदी निस्तेज वाटत होता. त्या निस्तेज प्रकाशात आम्ही सारे एखाद्या प्रेतासारखे पुन्हा लवंडलो.

        पंधरा-वीस मिनिटं मला झोप लागली असेल फार तर.

    " गिळीन.... कचाकचा खाऊन टाकेन... कुणाला सोडणार नाही...." 

      कुणीतरी माझ्या कानात केवळ मलाच ऐकू जाईल असं खुसपुसलं आणि माझी झोप चाळवली. डोळे उघडतात जरा जरा फिरणारा पंखा आधी दिसला. मी घाबरत नजर सभोवती फिरवली आणि अंथरुणात उठून बसलो. माझ्या शेजारी... अगदी शेजारीच कुणीतरी बसलय अशी अस्वस्थ करणारी जाणीव मनाला झाली. देवघरातील समईचा प्रकाश मंद झाला होता पण पूर्णपणे विझला नव्हता. तो फिकट उजेड बाहेरच्या खोलीतही भिंतीवर पसरला होता.

       अंधाराला नजर सरावली आणि शेजारी शांतपणे घोरत पडलेले बाबा मला दिसले.

        मला कशाने नेमकी जागा आली आठवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ... एखादे वाईट भयंकर स्वप्न पडलं असणार असं मनाला समजावत मी पुन्हा लवंडणार तोच कुणीतरी अगदी जवळून कानाशी कुजबूजले.

        " नाश करीन... सर्वांचा नाश करीन... कुणाला सोडणार नाही....". आणि मग पाठोपाठ खोकल्याची उबळ आल्यासारखं कुणीतरी हसलं.

       कोणीतरी जोरजोरा श्वास घेत होते जवळच... श्वास घेण्यापेक्षा श्वास जोराने बाहेर टाकण्याची क्रिया जोरात चालली होती. आणि इथं माझा श्वास घशात अडकला होता.

       " कोण आहे?   कोण आहे? ..." घरातल्या सर्वांचा झोपेचा पुन्हा विचका होईल याचा विचार न करता मी मोठ्याने बोललो. सर्व आवाज अचानक थांबले त्यानंतर एकदम सारं शांत झालं.

        आता झोप येणे शक्य नव्हतं .मी उठलो आणि उभा राहिलो. सर्वांग थंडी भरल्यागत थरथरत होतं. पाय लटपटत होते. माझ्या हालचालींकडे माझ्यावर कोणीतरी अगदी बारीक लक्ष ठेवून होतं.

         जवळून येणारा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू झाला. माजघरातून देवासमोरील समईतून येणारा उजेड फडफडला... थोडा मोठा झाला आणि मग समई विझली.

        तूप जळाल्याचा वास आला. शापित चंद्र प्रकाशाची काय आता ती सोबत होती. अख्ख घर त्या म्लान चंदेरी प्रकाशात झोपले होते. पण नाही... माझ्या घरात कुणीतरी माझ्याशिवाय जागं होतं. वेळ येताच माझ्यावर झडप घालून मला जणू सावज बनवणार होतें.

        आमची बाहेरची खोली म्हणजे हॉल आणि बेडरूम याच्यामध्ये जो पॅसेज होता तिथे आमचा माळा होता. माळ्यावर आम्ही जुन्या पेट्या, इतर असंच किडूक-उडुक सामान ठेवायचो. पण इतकं सारं ठेवूनही बरीच रिकामी जागा माळ्यावर होती.

       माळ्याच्या त्या रिकाम्या जागेत.. आपोआप तयार झालेल्या चौकटीत ती बसली होती.

        फतकल मारून. डोळे आढ्याला खिळलेले. अंगावर हिरवा पोलका आणि स्कर्ट घातलेला. कपाळाला काकी लावतात तशी मोठी टिकली.

       बोबडी वळून मी अंधारात खिळून पाहत राहिलो सर्व शरीराचा नुसता लोळागोळा झालेला. अंगातलं सगळं त्राण निघून गेलेलं.

        ' कोण होती ती..?? काय करत होती अपरात्री माळ्यावर बसून आमच्या घरात...??'

      तिच्या चेहऱ्यावर अभद्र हसू होतं. एखादा ओठ रंगवलेल्या सर्कशीतल्या जोकरला लाजवेल इतके तिचे ओठ त्या अभद्र हसण्याने या कानापासून त्या कानापर्यंत ताणले गेले होते.

      माळ्यावरून एखादा मोठा कोळी किंवा तत्सम कीटक उतरावा तशी ती खाली उतरली. चार पायांवर रांगत ती घरभर फिरू लागली. माझ्याकडे अजून तिचं लक्ष गेलेलं दिसत नव्हतं. तिचे केस कमरेपर्यंत वाढलेले होते ते खांद्यावरून खाली ओघळले होते.

        सर्व माणसे झोपेच्या एवढी अधीन झाली होती की एक श्वापद अंधारात फिरत आहे याची मी सोडून कोणालाच खबरबात नव्हती. पुढे आयुष्यभर मला आठवत राहिलेल्या त्या घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो.

        घरात एक वेगळाच वास पसरला होता. तुम्ही कधी मोरीत किंवा बाथरूम मध्ये एखादा ओले फडके दोन-तीन दिवस तसेच कुजलं तर कसा वास येतो ते अनुभवले आहे ?? तसाच काहीसा. घरातील सर्व माणसांना हुंगत.. हिंस्र आवाजात  गुरगुरून शेवटी ती प्रधान काकीजवळ 

फतकल मारून बसली. अचानक झुलू लागली. मागं पुढं घुमू लागली. तिच्या झुलण्याचा वेग वाढला.... आणि मग हृदयाचे ठोके बंद पडतील असं भयानक हसली.

        दुसऱ्या दिवशी मी थोडा उशिराच उठलो. प्रधान काकू आवरून त्यांच्या घरात गेल्या होत्या मुलांना घेऊन. काळजाचा भयंकर थरकाप उडवणाऱ्या  त्या काल रात्रीची वाच्यता आम्ही कोणापाशी केली नाही. मी सुद्धा कोणापाशी बोललो नाही. कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही .मलाच वेड्यात काढतील ही समज त्या वयातही मला होती.

       मी पाहिलेला तो प्रसंग त्या घटना खऱ्या होत्या.. तो भास नव्हता हे काही दिवसातच मला कळलं. झालं असं की प्रधानजी काही कामासाठी मला घरात घेतलं होतं. त्या दिवशीच्या त्या विचित्र रात्रीपासून आम्हा मुलांचे प्रधानांच्या घरात जाणं आपसूकच कमी झालं होतं.

       प्रधान आजींना उंचावरून काहीतरी काढून हवं होतं  म्हणून मी त्यांच्या स्वयंपाक घरात गेलो. स्वयंपाक घराला लागून असलेल्या बेडरूमचे दार बंद होतं .आत कोण असणार याची पुसटची जाणीव होती मला.. पण तिथं मला लक्ष द्यायचं नव्हतंच. काम आटपल्यावर तिथून पळ काढायच्या विचारात मी होतो.

        इतक्यात बाहेरच्या खोलीत खेळणारा छोटा सर्वेश बेडरूमचे दार उघडू लागला. कोणाला काही करायचे आत क्षणात दार उघडलं गेलं.

     

          आणि मग मला ते दृश्य दिसलं. असं दृश्य की जे प्रधान कुटुंबीयातल्या कोणत्याही मोठ्या माणसाला मी पहावं असं निश्चितच वाटत नसणार.

      बिछान्यावर काकी हिरव पोलकं आणि स्कर्ट घालून बसल्या होत्या. एक सहा सात वर्षाची पोर असलेल्या काकींना ते स्कर्ट पोलके खूप विचित्र वाटत होतं. कपाळावर त्या दिवशी तिने जी टिकली लावली होती तेवढीच मोठी टिकली लावली होती. लाल भडक रंगाची. नेहमीची मोठी वेणी न घालता त्यांनी दोन छोट्या आखूड वेण्या घातल्या होत्या. एखाद्या सतरा अठरा वर्षाच्या पोरी सारख्या. त्यांच्या छातीचा उभार पोलक्यामध्ये स्पष्ट दिसत होता. स्कर्ट सुद्धा तोकडा असल्याने त्यांचे गुडघ्याच्या घोट्यापासूनचे गोरे पाय दिसत होते. खरं सांगू तर काकूंचं आरस्पानी गोरे सौंदर्य हिरव्या पोलक्यात उठून दिसत होतं. तशी जाणीव मला त्या आडनिड्या वयातही झाली.

      प्रधान आज्जीनी लगबगीने पुढे होऊन दार लावून घेतलं. सर्वेशला बाहेर पिटाळलं. प्रधान काकी त्या खोलीत बेडरूममध्ये एकटयाच होत्या. बाहेर कोणी बाहेरचं आलं की नेहमीच त्या खोलीचे दार बंद करून ठेवण्यात येई. पण किती झाकून ठेवला तरी कोंबडा आरवायचा थांबत नाही.. तसं प्रधान काकी  स्कर्ट पोलके घालून घरी असतात... नोकरी सोडून... हल्ली वेडे चाळे करतात ही खबर सोसायटीत पसरलीच.

      एकदा ही बातमी या कानाची त्या कानाला गेली आणि मग आपापल्या परीने लोक सल्ला देऊ लागले. काय तर म्हणे अमावस्येला चौकात नारळ फोडून ठेवायचा. लिंबू कापून हळद गुलाल.. पिंजर ठेवायची. एकदा कोणी म्हात्रे नावाचा माणूस आलेला काकूंच्या अंगात काय आलेलं ते उतरवायला. आम्ही अगदी घरातल्या सारखे म्हणूनच प्रधान आजी कडून ही गोष्ट आम्हाला कळली.

      रात्री बेरात्री, सकाळी, दुपारी वेळ काळ न पाहता प्रधान काकी अंगात उन्माद येऊन ओरडू लागत. त्या अशा आक्रस्ताळेपणा करू लागल्या की पूर्ण सोसायटीतील लोकांच्या काळजाचा थरकाप उडे. प्रधान कुटुंबातल्या माणसांना विशेषतः प्रधान काकांना तर बाहेर पडताना मेल्याहून मेल्यासारखंच वाटत असणार. ती दोन लहान मुलं दिपाली आणि सर्वेश तर जीव मुठीत  घेऊन असायची दिवसभर. आपल्या आईला काही आजार झाला आहे दिपालीला कळत असणार... प्रधान काकींच्या छोट्या बहिणीचा तो मुलगा सर्वेश तर या सगळ्या प्रकाराबद्दल अनभिज्ञ च असणार.

      काकींना मग प्रधानांनी शेवटचा उपाय म्हणून कुठल्याशा मानसोपचार केंद्रात हलवलं. अशावेळी या उपचार केंद्रांना वेड्याचे इस्पितळ असं नाव होतं. तीन साडेतीन महिने जवळजवळ काकी तिथं होत्या. मग एके दिवशी काळ्यापिवळ्या टॅक्सीतून त्यांना घरी आणलं.... तेव्हा त्यांना बघायला सोसायटीतील प्रत्येक घरातील माणसं आपापल्या गॅलरीतून जमा झाली होती.

      उपचार घेऊन आल्यानंतर प्रधान काकी जरा माणसासारखं... शहाण्यासारखं वागू लागल्या. व्यवस्थित साडी वगैरे घालून सोसायटीच्या आसपास जवळच्या परिसरात कधी कधी त्या दिसू लागल्या. मात्र झाल्या प्रकाराने काकूंच्या आतून काहीतरी हरवलं असल्याची कोणीतरी खऱ्या काकींना त्यांच्या आतून काढून घेतल्याची जाणीव त्यांना पाहताच व्हायचीच. उदाहरणार्थ... त्यांच्या चेहऱ्यावरचं ते निर्व्याज हास्य दुर्मिळ म्हणण्यापेक्षा नाहीसे झालं होतं. त्यांच्याशी बोलताना सर्वच माणसं घाबरूनच.. जपून बोलत. वेड्यांच्या इस्पितळातून बरी होऊन आलेली एक वेडी... ही एक नवी न पुसता येण्याजोगी ओळख काकीला मिळाली होती. अर्थात यात कोणाचा दोष नव्हताच. आधीच थोड्याशा अबोल असणाऱ्या प्रधान काकी आता बऱ्याच घुम्या वाटू लागल्या.

      " अरे बाळा.. आमच्या सर्वेशला बघितलास का रे कुठे?" प्रधान आजी विचारत होत्या.

        शनिवारची संध्याकाळ. सात साडेसात वाजले असतील... यावेळी सर्वेश घरी येऊन हातपाय पुसून शुभंकरोती वगैरे म्हणत असे. आजीनेच शिकवलं होतं त्याला ते.

     बाहेर येऊन मी कानोसा घेतला तेव्हा कळलं की सर्वेशसाठी शोधा शोध सुरू होती. तीन-चार वर्षाचा आईविना असलेला पोरगा... प्रधान कुटुंबाचाच काय तर आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचा लाडका... कुठे सापडेनासा झालेला. सोसायटीतील प्रत्येक घरात.. आजूबाजूच्या परिसरात शोधून पाहिला त्याचा पत्ता नाही.

संकटे यावी एखाद्यावर तर किती यावी किती बाजूने यावी.

इथे तर प्रधान कुटुंबीयांवर संकटांची मालिका च सुरू झालेली. न राहून शेवटी पोलिसात तक्रार केली गेली. प्रधान कुटुंबीयांची आणि आजूबाजूच्या सगळ्यांची झाडाझडती सुरू झाली.

       दोन दिवस झाले असतील नसतील. शाळेतून घरी आल्यावर जिने चढताना बेसूर रडण्याचा आक्रोश केल्याचा आवाज ऐकू आला. पाहिले तर प्रधानांच्या घरी काकींचं प्रेत पांढऱ्या चादरीखाली छिन्नविचिन्ह अवस्थेत झाकून ठेवलेलं. रेल्वेमधून उडी मारून का रूळावर पडून आत्महत्या केली म्हणे त्यांनी.... यापेक्षा जास्त मला त्या वेळी कळलं नाही.... मी सांगितलं ना तुम्हाला... त्या काळात लहान मुलं मोठ्यांच्या भानगडीत अजिबात लक्ष घालत नसत.

      नंतरच्या दोन दिवसात सर्वेश सुद्धा मिळाला पोलिसांना. तो मिळाला ती जागा आमच्या सोसायटीतून 

दुरून दिसणाऱ्या मोठ्या विहिरीत... जिला कठडा नव्हता बांधलेला... होती एवढेच. त्याच्या गळ्यात एक मोठा थोरला दगड बांधला होता. पाण्यात बुडून ..पाणी चांगलंच पोटात जाऊन टम्म फुगलेल्या अवस्थेत सर्वेश मिळाला.

चेहऱ्यावर बऱ्याच पांढऱ्या खपल्या भरल्या होत्या त्याच्या.

अगदी बघवत नव्हतं त्याच्याकडे. त्या अमृता वस्तीतल्या सर्वेशला बघताना आठवलं की दोन दिवसांपूर्वी.. त्याच्या मावशी बरोबर.. प्रधान काकी बरोबर कुठेतरी पाहिला होता मी.... कुठे बरं..?? अरे हो... या विहिरीच्याच बाजूला कुठेतरी... गणपती विसर्जनाच्या वेळेला या विहिरीचा उपयोग व्हायचा.  एरवी ती झाडीने वेढलेली विहीर तिच्या पाण्यात क्रिकेट वगैरे खेळताना चेंडू गेला तरच लक्षात यायची. पण सर्वेश ला त्याच्या मावशी बरोबर या विहिरीच्या बाजूला मी पाहिलं... ते मला थोडं खटकलं का नाही. बरं एवढं सगळं होऊन सुद्धा मी कुणाला सांगितलं तसं नाही... सांगायला हवं होतं कुणाला तरी... निदान आई किंवा बाबांना तरी... सर्वेश मिळत नाही म्हटल्यावर. तरी मी गप्प बसलो... लहान मुलं मोठ्यांच्या भानगडीत फारशी पडत नसत त्याकाळी.

      मनात लपवून ठेवलेल्या ... अगदी मनाच्या 

सांजीकोपऱ्यात तळाशी.... घटना मी तुम्हाला सांगतोय याचं कारण परवा बारमध्ये प्रधान काका आणि मी निवांत बसलेलो. रविवारची टळटळीत दुपार होती ती. मधल्या काळात बरेच वर्ष आधी प्रधान काकांनी दुसरे लग्न केलेले.

त्या लग्नापासून त्यांना एक दुसरी मुलगी सुद्धा झालेली. त्यांची पहिल्या लग्नापासून ची दिपाली लग्न होऊन 

एव्हाना सासरी गेलेली. दुसरी मुलगी आता तीन-चार वर्षात लग्नाची होईलच. प्रधान काका मुन्सिपाल्टी मधून रीतसर निवृत्त झालेले. व्यवस्थित पेन्शन वगैरे सुरू होती.

      थंडगार बियरचे घोट घेता घेता असा कोण जाणे अचानक सर्वेशचा विषय निघाला.

        " दिपाली तेव्हा वर्ष दीड वर्षाची असेल... आम्ही गावाला गेलेलो. मी  मुन्सिपाल्टीत आणि ही

पण सरकारी नोकरीत असल्यामुळे गेलो की महिना दीड महिना गावाकडेच मुक्काम असायचा. दिपाली लहान असल्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी.. बरोबर मदतीला 

श्यामाला... तुझ्या प्रधान काकींची धाकटी बहीण... घेतली होती. श्यामा फार तर सतरा अठरा ची असेल तेव्हा. स्कर्ट आणि पोलका तिचा फेवरेट... विशेष आवडीचा. .. किंवा सवय असल्यामुळे असेल नेहमीच तो घालायची.... बहिणीची सवय हिला तिच्या अखेरच्या काही दिवसात लागली होती... स्कर्ट ... पोलका घालायची. काही काही वेळेला तर असंच वाटतं की शामाच मोठी झाली आहे आणि घरात वावरतेय. " प्रधान काका काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाले.

         " त्यादिवशी गावातल्या काहीतरी कारणावरून दोन गटांमध्ये ... दंगल झाली. वरच्या आळीतील माणसं जाळपोळ करत... तलवारी, सुरे ,कोयते वगैरे घेऊन खालच्या आईतील लोकांना बाया बापड्यांना मारू लागली.. भोसकू लागली. त्यातल्या काहींच्या डोळ्यात न मावणारा राग होता... तर काहींच्या डोळ्यात चक्क वासना.... घराची नासधुस केल्यानंतर काही मंडळी घरातल्या स्त्रियांवर आपली वासना शमवून घेत. आपली हवस पूर्ण करायची संधी साधून एखादी तरणी, वयाने लहान, प्रौढा कोणालाही सोडत नसत. वासनापूर्ती करण्याची संधी... साधन एवढी एकच गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची असे. " प्रधान थांबले त्यांनी बियरचा एक घोट घेतला आणि समोरच्या चकलीचा तुकडा तोंडात टाकला.

        " त्या कातर वेळी घरात माझी पत्नी... तुझी काकी छोट्या दिपाली बरोबर त्या भक्षकांच्या तावडीत सापडली.

मी नेमका तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी गेलेलो. स्वतःचा जीव तसंच अब्रू वाचवायला माझ्या बायकोने लगेच 

न्हाणी घराकडे बोट केलं...."

          " बाळंतपणानंतर ही काय च्या काय सुटली होती. बेढव झाली होती. घरात दुसरी तरुण मुलगी आहे हे त्यातल्या मवाल्यांना चांगलंच ठाऊक होतं. न्हाणी घरात शामा आंघोळ करत होती का लपली होती कुणास ठाऊक.

हीने बोट दर्शवताच ते भुकेलेले मवाली श्यामाकडे वळले. कोवळ्या काकडी सारखी दिसणारी पोलके आणि स्कर्ट घातलेली श्यामा त्यांनी कचाकचा खाऊन टाकली. लचके तोडले त्यांनी तिचे. इतक्यात मग आमच्या आळीतले लोक पोलीस घेऊन तिथं आले आणि मग दंगा करायला आलेले मवाली तिथून पांगले. " प्रधान बोलले आणि त्यांनी एक मोठा सुस्कारा टाकला.

        " पण जाण्याआधी त्यातल्या कित्येक जणांनी आपला कार्यभाग साधला होता. होय... श्यामावर सामूहिक बलात्कार झाला होता."

        " या बलात्कारातून श्यामा गरोदर राहिली. नको असलेलं... वासनेचे प्रतीक असलेलं ते मूल तिने पोटात वाढवलं. ते मुल म्हणजेच सर्वेश. सर्वेशच्या जन्मानंतर मात्र तिने नदीत जीव दिला. तुझ्या काकीला अपराध केल्याची बोचणी लागली होती. केलेल्या पापाची भरपाई म्हणून तिने मूल वाढवायचा... त्याचे संगोपन करायचा निर्णय घेतला."

काका पुन्हा धाप लागल्यामुळे मध्ये थांबले.

        " पण शामा मला वाटतं तिच्या या अनौरस, नकोश्या मुलाचा स्वतः मेल्यानंतरही तिरस्कार करायची. आपल्या आयुष्याची दैना झालेली असताना आपली बहीण मात्र सुखात, आनंदात आहे हे जाणवून द्वेष, मत्सर मेल्यानंतर वाटत होता तिला. शेवटी केलेल्या अपराधाची शिक्षा काकीला मिळालीच." काका पुढे काही न बोलता आढ्याकडे बघत बसले.

        मनात आलं... प्रधान काका.. आता एवढा मोठा झाल्यावर तुम्ही सगळं मला सांगताय. पण तुम्ही तरी काय करणार म्हणा... त्यावेळी मोठी माणसं सुद्धा लहान मुलांना त्यांच्या गोष्टी सांगत नसत.

   ✍️ योगेश साळवी 

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post