पश्चाताप

 *पश्चाताप*

✍️ स्मिता मुंगळे

      शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या, नव्याने उभारण्यात आलेल्या त्या सुसज्ज हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये आबा अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. आत खोलीमध्ये त्यांची पत्नी नलिनीताई शांत झोपल्या होत्या. झोपल्या कुठल्या.... डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन दिल्यामुळे झोप लागली होती बिचाऱ्याना. आत्तापर्यंत आयुष्यात कित्येक रात्री त्यांनी जागून काढल्या होत्या. नलिनीताईंच्या या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत हे आबांना चांगलेच माहिती होते आणि त्यामुळेच ते जास्त अस्वस्थ झाले होते.

      आबांची नजर त्यांच्याही नकळत सारखी खोलीत बेडवर झोपलेल्या नलिनीताईंवर जात होती. एखाद्या लहान बाळासारखे निरागस भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. राग,लोभ,प्रेम या सगळ्या भावभावनांच्या पलीकडे जाऊन त्या आता पोहोचल्या होत्या. इतके वर्ष स्वतःचा अहंकार जपणाऱ्या आबांना आता वाटत होते की नलिनीताईंनी त्यांच्यावर चिडावे, रागवावे, गेली कित्येक वर्षे धरलेल्या अबोल्याचा जाब विचारावा. पण आबांची ही इच्छा आता पूर्ण होणार नाही याची त्यांना जाणीव होती. काल रात्री अचानक झटका येऊन हिंस्त्र वागणारी हीच का ती आपली पत्नी हा विचार राहून राहून त्यांच्या मनात येत होता.

        अधूनमधून म्हणता म्हणता हल्ली नलिनीताईना असे झटके वरचेवर येत होते. अचानक त्या हायपर होत आणि मोठमोठ्याने हातवारे करत जुन्या कोणत्यातरी गोष्टी आठवून गोंधळ घालत. इतके वर्ष मनात साठलेले अशा वेळी बाहेर येत असे. सुरुवातीला आबांनी त्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर त्यांना या प्रकाराचे गांभीर्य जाणवू लागले. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली पण फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर मात्र त्यांच्याच सल्ल्याने प्रसिद्ध मानसोपचार तज्ञांकडे आबा नलिनीताईना घेऊन गेले. डॉक्टरांकडे जाताना देखील त्या खूप त्रास देत. अगदी लहान मुलांप्रमाणे गोड बोलून त्यांना दवाखान्यात न्यावे लागे. पण काल मात्र हद्द झाली. नलिनीताईना आवरणे आबांना मुश्किल झाले म्हणून त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

        सुरुवातीला जेव्हा या प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञांकडे नलिनीताईना आणले तेव्हाच डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारून ताईंकडून त्यांच्या मनातील बऱ्यापैकी विचारून घेतले आणि सांगितले होते की त्यांच्या मनात गेली अनेक वर्षे कितीतरी गोष्टी साठलेल्या आहेत. त्या सगळ्या भावना अव्यक्त राहिल्याने मनावरचा ताण वाढून त्या मानसिक आजाराची शिकार झाल्या आहेत. आबांना त्यांची चूक उशिरा का होईना लक्षात आली होती पण डॉक्टरांनी सांगितल्यावर तर आपल्या पत्नीच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत याची त्यांना खात्रीच पटली. ते मनातल्या मनात स्वतःला दोष देत होते पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही याची त्यांना कल्पना होती.

       नलिनीताई जाग्या झाल्याचे लक्षात आल्यावर आबा खोलीत आले.
"नलू, तुला काही हवंय का ग?थांब,मी तुला सफरचंद चिरून देतो", आबा म्हणाले... तसे नलिनीताईंनी त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि त्या तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटल्या. त्यांचे बोलणे आबांना नक्की समजले नाही पण त्यांच्या डोळ्यातील तिरस्कार बरंच काही सांगून गेला. त्यामुळे आपण चिरून दिलेले सफरचंद त्या खाणार नाहीत याची आबांना खात्री पटली. आता लेक आल्यावरच आपल्या आईला खायला देईल असा विचार करून ते गॅलरीत उभा राहून लेकीची वाट बघू लागले. खरेतर दुसरे काही आता त्यांच्या हातात राहिलेच नव्हते.

        खरं तर मुलीलादेखील आईच्या या अवस्थेला आपले वडीलच कारणीभूत आहेत हे चांगले माहिती होते फक्त ती अजूनतरी तसे स्पष्ट बोलली नव्हती. पण तिच्या नजरेत असणारी आबांविषयीची नाराजी आबांना सगळं काही सांगून जात होती. त्यामुळे एकदातरी नलूने आपल्याशी मनातले बोलावे, भांडावे आणि नंतर आपल्याला माफ करावे नाहीतर आपण तरी तिची क्षमा मागावी असे राहून राहून आबांना वाटत होते. निदान त्यासाठी तरी नलिनीताई बऱ्या व्हाव्यात हीच त्यांची इच्छा होती.

        काही वेळात लेक आली तसे आबांकडे रागाने बघणाऱ्या नलिनीताईच्या डोळ्यातील भाव एकदम बदलले आणि त्या प्रेमाने लेकीशी बोलू लागल्या. तिच्याबरोबर त्यांनी चहा घेतला. आबा लांबूनच सगळं बघत होते. पण त्या दोघींच्या वर्तुळात त्यांना आता स्थान नव्हते. कितीतरी वेळ ते उगाच रस्त्यावरची रहदारी बघत गॅलरीत उभे राहिले आणि नकळत भूतकाळात हरवून गेले अगदी पन्नास वर्षे मागे.

          तीन बहिणींच्या पाठीवर जन्मलेला एकुलता एक मुलगा म्हणून आबांचे लहानपणापासून जरा जास्तच लाड झाले. घरची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम होती. त्यातच आबा अभ्यासात देखील हुशार होते. शाळेत असताना ते अनेक बक्षिसे मिळवायचे.सहाजिकच  ते घरात सगळ्यांचे लाडके बनलेच पण हट्टीसुद्धा झाले. प्रत्येक गोष्ट त्यांना मागताक्षणी हवी असे.नकार ऐकण्याची त्यांना सवयच नव्हती. मी म्हणेल तिच पूर्व दिशा असा काहीसा हटवादी स्वभाव हीच आबांची ओळख बनली होती. जात्याच हुशार असल्याने उत्तम मार्क मिळवून ते पदवीधर झाले आणि लगेच त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळाली. घरची परिस्थिती चांगली होतीच. लग्नासाठी आणखी काय हवं... असं काहीसं त्यांचं झालं होतं.

        लवकरच आबांना उत्तमोत्तम स्थळं सांगून येऊ लागली. ते मात्र प्रत्येक मुलीत काहीतरी खोट काढायचेच. पण त्यांच्या नात्यातीलच नलूचे स्थळ सांगून आले आणि आबांना मुलीत नावं ठेवण्याजागे काहीच दिसेना. नलू मुळात होतीच सुंदर, गोरापान रंग, चाफेकळी नाक, टपोरे डोळे आणि उंचीच्या प्रमाणात वजन. तीनेदेखील पदवीची परीक्षा नुकतीच दिलेली होती. आणखी पुढे शिकण्याची तिची इच्छा आणि तयारी दोन्ही होते. आबांच्या आई वडील आणि बहिणींना तर नलू पहाताक्षणी आवडली होती. त्यामुळे आबांनी फारसे आढेवेढे न घेता नलूला पसंत केले आणि लवकरच नलूने आबांच्या घरात आणि हृदयात प्रवेश केला.

        नलूच्या माहेरची परिस्थिती जेमतेम होती. सहाजिकच मोठ्या घरी आल्यानंतर ती थोडी दबूनच वागत होती. सुरुवातीला आबा नलिनीताईबरोबर अगदी व्यवस्थित वागत होते. पण हळूहळू त्यांचा मूळ स्वभाव जागा होऊ लागला. आबांच्या हट्टी आणि हेकेखोर स्वभावाचा नलूला त्रास होऊ लागला. लेकीचा जन्म झाला आणि आता तरी आबांच्या स्वभावात काही बदल होतो का बघू असे वाटून त्या सहन करत राहिल्या. बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या नलूताईना आणायला आबा सासुरवाडीला गेले. "राहू दे हो आणखी काही दिवस नलूला माहेरी"  सासऱ्यांच्या या साध्या वाक्याने आबा विनाकारण रागावले आणि त्यांनी नलुशी बोलणे बंद केले ते कायमचे.

      आपल्या वडिलांचे नक्की काय चुकले आणि त्याची एवढी कठोर शिक्षा आबा आपल्याला का देत आहेत हे तिला कळत नव्हते. स्वभाव रागीट आहे, होतील हळूहळू शांत असा विचार करत त्या शांत राहिल्या. पण आपल्या वडिलांच्या नकळत बोलण्याने विनाकारण दुखावलेल्या आबांच्या पुरुषी अहंकाराला बळी पडलेल्या नलिनीताई पुढे वर्षानुवर्षे आबांचा अबोला सहन करत संसार करत राहिल्या. बरं सांगणार तरी कोणाला? माहेरी सांगावे तर आई वडिलांना त्रास, लेक तर लहानच. तिला सांगून काय कळणार आणि सासरी सगळे आबांच्या दुराग्रही आणि अहंकारी स्वभावपुढे हतबद्ध होते.

        नलिनीताई कित्येक वर्ष मनातल्या मनात कुढत आणि न केलेल्या चुकीची शिक्षा भोगत राहिल्या.अन या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम  झालाच. यथावकाश एकुलती लेक लग्न होऊन सासरी गेली आणि त्या अन आबा एकाच घरात राहून दोन ध्रुवावर राहिल्यासारखे राहू लागले. एकाकीपण, नैराश्य याने त्या खचून गेल्या. त्यांना असे अधूनमधून झटके येऊ लागले पण हल्ली त्याचे प्रमाण आणि तीव्रता एवढी वाढली होती की आता त्यांना ऍडमिट करावे लागले.

        त्यांच्या अशी अवस्था पाहून आबा हतबल झाले होते. "पश्चाताप" करण्यापलीकडे आता ते काहीच करू शकत नव्हते. त्यांना फक्त एक संधी हवी होती.... नलिनीताईंची क्षमा मागण्याची पण ती मिळणे शक्य होईल असे आबांना वाटत नव्हते. 

    ✍️  सौ.स्मिता मुंगळे

        
वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
        

     

Post a Comment (0)
Previous Post Next Post