देव भावाचा भुकेला
✍️ प्रतिभा परांजपे
"आई मी निघते, मला कदाचित यायला उशीर होऊ शकतो डिलेव्हरीच्या दोन केस आहेत ." डॉ विद्युल्लताने आपल्या सासुबाईना सांगितले.
"आणि क्लबतर्फे बाल आरोग्य कॅम्प आहे तिथे ही दोन तास जायचं आहे.
ताईंची गाडी अकरापर्यंत येईल. किती तरी वर्षांनी ताई येतात आहे.
ताईंना घ्यायला स्टेशनवर ड्रायव्हरला जायला सांगितले आहे तो गाडी घेऊन जाईल.
आणि हो ताईच्या आवडीची भाजी कमलाला करायला सांगितली आहे."
कुसुम ताई हसून मान डोलवत म्हणाल्या, "हो-- हो तू काळजी नको करू! आसावरी राहणार आहे चार दिवस आणि, मी आहेच घरात."
पण-- "तू कशी जाशील??"
मी --"हॉस्पिटलची व्हॅन बोलावली आहे . येतच असेल."
आसावरी, कुसुमताईंची मुलगी, घरी पोचली तेव्हा कुसुम ताईंनी भाकर तुकडा ओवाळून तिच स्वागत केले
"किती वाळलीस ग आशू", म्हणत मिठीत घेतले.
जेवता जेवता कुसुमताईंनी तिच्या घरच्या माणसांची विचारपूस केली. आग्रह करकरुन खायला लावले. जेवण होईस्तोवर नातवंड ही आली .
शुभ्रा व रोहन, रोहन कॉलेजला तर शुभ्रा बारावीत.
शुभ्राने आसावरीच्या पाया पडून नमस्कार केला व आत्या म्हणत गळ्यात पडली.
जेवण होताच मुलं त्यांच्या कोचींगला गेली.
"वाs जेवण तर अगदी माझ्या आवडीचा बनवल होते, दोन घास जरा जास्तच झाले . मग काय माहेरी आली आहे न? आता जरा आराम कर, विद्याला यायला उशीर होईल."
आसावरी व कुसुमताई दुपारच्या जरा झोपल्या.
संध्याकाळी चहापाणी झाल्यावर देवापाशी दिवा लावायला कुसुमताई उठल्या. सोबत आसावरी हि आली . पूर्वीच देवघर दिसेना पाहून आसावरी ने विचारले, "आई देव्हारा कुठे आहे? देव दिसत नाही"
"हे काय आहे."
आसावरीने पाहिलं कुलदेवतेचा एक मोठा फोटो लावलेला होता त्यावर ताज्या फुलांचा हार घातलेला.
कुसुमताईंनी डोळे मिटून शुभंकरोती म्हणत दिवा लावला.
आसावरी आश्चर्याने आईच्या तोंडाकडे पहातच होती.
"आई तुझी अन्नपूर्णा, गोपाळकृष्ण, शंकराची पिंडी, घंटा, गंगा, कितीतरी देव होते न आपल्या घरी तीन पिढ्यांचे?
बाबा साग्रसंगीत पूजा करायचे ते कुठे आहे? बाबा गेले तशी सर्व काढून टाकले?
काय हे.. आई आणि तू करून दिलेस वहिनीला??"
"अगं- हो हो- शांत हो किती चिडतेस ? देव म्हणतेस तर ही आहे ना महालक्ष्मी आपली कुलदेवता बघ ना."
"फक्त फोटो?? बाकी मुर्त्या कुठे?"
"काय आहे आसावरी, तुझे बाबा जेव्हा धडधाकट होते तेव्हा ते करत असत पूजा-अर्चा सगळं व्यवस्थित किती तरी देव होते तीन पिढ्यांचे पण-- मग त्यांना लकवा झाला आणि ते बेडरिडन झाले. पुढे ते गेलेच.
मग मी करत असे पूजा पण वयापरत्वे मला खाली बसणे शक्य नाही आणि उभ ही राहवत नाही तेव्हा---"
"मग काय झालं? बाकी --वहिनी दादा वगैरे तर आहे ना??"
" हे बघ आसावरी, विद्या डॉक्टर, स्त्री रोग विशेषज्ञ किती तरी केसेस असतात, दिवसभर, कधीकधी तर जेवण ही धडपणे होत नाही तिचे, आणि दादा तुझा त्याच्या तर चक्री आहे पायाला. दोन दोन दिवस घरी नसतो."
"म्हणून काय-- देव काढून टाकायचे? कमाल आहे वहिनीची.?"
"विद्याने नाही हो काढले देव, ती तर म्हणाली होती आपण ब्राह्मण बोलावून घेऊ रोज देवपूजेसाठी."
"मग, कुठे माशी शिंकली ? खवचटपणे आसावरी बोलली, "लागले असते पैसे जरा."
"आशु अगं पुजार्याकडून पूजा करायची त्यात कसला ग भक्तिभाव ?ते केवळ कर्मकांड, मग मीच म्हटलं विद्याला, आपल्याला झेपेल असं नेटकं देवघर करूया म्हणून हा कुलदेवतेचा फोटो लावला."
"अगं पूर्वी मोठ्या घरी देव होते पण मग भाऊजी वहिनी गेल्यावर त्यांच्या मुलांनी इकडे पाठवले त्यांना ते कुळाचार वगैरे करणे जड वाटत होते. आजकाल सुना ही नौकरी करतात. त्यांना इतका वेळही नसतो आणि आवड ही, मग उगाचच देव देव्हाऱ्यात धूळखात ठेवण्यात काय अर्थ आहे?"
"हं, बरोबरच आहे ग ,आमच्या हि कडे असेच होते ग", आसावरी जरा नरमाईने म्हणाली.
"आमच्याकडे कुळाचार आहे, पूर्वी एकत्र कुटुंब होते त्या वेळी सर्व जावा एकत्र येऊन काम करत त्यामुळे कुळाचार नीट व्यवस्थित होत होते.
पण त्यानंतर नोकरीपायी सर्व वेगळे झाले, माझे सासरे मोठे म्हणून मोठ्या घरी सर्व देव मग कुळाचार ही इथेच. पुढे मी मोठी सून म्हणून सर्व माझ्यावर आलं.
अजुन ही कधीकधी दोघी जावा येतात मदतीला पण कधी त्यांच्या अडचणी येतात मग सर्व मलाच करावे लागते. थकून जाते पण काय करणार.?? तीन दिवस पुरवत काम.
आणि हे सर्व पाहून मुलगा म्हणतो, आई मला नाही हं हे सर्व जमणार.
मला जमतंय तोपर्यंत करावं लागेल."
"आशु, देव माणसांकरता आहे माणसं देवा करता नाही. मी असे नाही म्हणत की तूही हेच खरं पण, तुला जे सहजपणे जमेल तेवढेच कर. त्रागा आणि त्रास करून देवधर्म करण्यात काय अर्थ आहे? कोणी नाही आले मदतीला तरी आपल आपल्याला करता येईल असे पहावे. सुटसुटीत, मोजक, आणि आनंदाने. तूच विचार कर,
अग विद्या डॉक्टर आहे कितीतरी डिलिव्हरीच्या क्रिटिकल केसेस ती पार पाडते. दोन जिवांची सुटका करते , खूप मान आहे तिला.
तिचा देवावर ही खूप विश्वास आहे. तू एकदा तिच्या दवाखान्यात जाऊन तर पहा तिच्या रूममध्ये असाच फोटो आहे .
प्रत्येक केसआधी कुलदेवतेचे स्मरण करून केस हॅण्डल करते , आणि विद्या जे कार्य करते ती ही एक पूजाच आहे , अनेक पेशंटच्या घरचे तिच्या पाया पडतात. अर्थात आज तुला हे एकदम पटणार नाही."
संध्याकाळी विद्या आणि विश्वास त्यांचा मुलगा दोघं घरी आले..
"उद्या मला ऑफ आहे, आई आपण सर्व आउटींगला जाऊया ताईंना घेऊन", विद्या उत्साहात म्हणाली. "इथे जवळच एक जागृत देवस्थान आहे तेही ताईंना दाखवू या. ."
दिवसभर खूप फिरून जेवून संध्याकाळी सर्व घरी पोहोचले.
विद्याच्या मोबाईलवर एक मॅसेज, "एक क्रिटिकल केस आली आहे लवकर पोहोचावे."
"ताई-- मला जावे लागेल". विद्याने निघता निघता हॉस्पिटलमध्ये सिस्टरला तयारी करायला सांगितले, देवघरात जाऊन दिवा लावला नमस्कार करून ती निघाली.
"पाहिलेस ना आसावरी, अगं गरजू लोकांची सेवा करणे ही पण एक देव पूजाच आहे, पेशंट करता तर डॉक्टर देवासमान असतो ना? मग हे सेवा व्रत करणारी आपली विद्या, ही तिची देवपूजाच आहे."
दुसरे दिवशी आसावरी आपल्या घरी जायची म्हणून विद्याने सुट्टी घेतली होती.
"ताई आज तुम्हाला आवडेल ते करुया, सर्व एकत्र जेवण करु."
तेवढ्यात एक गाडी दारात आली त्यात एक वयस्कर स्त्री पेढ्यांचा पुडा व साडी घेऊन आली.
"डॉक्टर साहिबा आहेत कां?"
" कोण तुम्ही?"
"अहो काल माझ्या सुनेचा आणि नातीचा जीव वाचला डॉक्टरीण बाईंनी. डॉक्टर तुम्ही देवासमान आहात आमच्यासाठी."
"अहो ते तर माझं कर्तव्य होतं. आणि तुमच्या सुनेवर आणि नातीवर मातेचीच कृपा होती."
आसावरी सर्व पहात ऐकत होती तिच्या मनात साचलेल सर्व किल्मिश दूर झाले. कुसुमताईंकडे पाहत म्हणाली, "मला तुझे म्हणणे पटले आहे. नुसते देवदेव, कर्मकांड करण्यापेक्षा माणसात देव पाहून त्यांची सेवा करून जे आशीर्वाद मिळतात तेच खरं सुख , तीच खरी पूजा."
निघताना आसावरीने विद्याला मिठी मारत म्हटले,
" जिथे भाव तिथे देव आहे , तू तुझ्या कर्तव्यात देव पाहते आणि मनापासून कर्म करते म्हणूनच तुझ्यावर जग्नमातेची कृपा आहे. विद्या मला तुझा अभिमान आहे."
------लेखन. सौ. प्रतिभा परांजपे
वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
एक छान सकारात्मक कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.
खूप छान लिहिले आहे
ReplyDeleteखूप खूप छान.बदलत्या काळात विचार बदलला पाहिजे
Deleteखूप छान कथा विचार करण्यासारखी
ReplyDelete