गवसले ते हरवले

गवसले ते हरवले

✍️ प्रतिभा परांजपे 

ट्रेनने ग्रीन सिग्नल दिला तशी नीता आपल्या बर्थवर  येऊन बसली. स्टेशन वर पोचवायला तिची मुलगी निकिता आली होती...



            रात्रीचे नऊ वाजले होते . साईड लोअर सीट असल्याने नीताला झोपायची घाई नव्हती. तिने आजूबाजूच्या प्रवाशांकडे पाहिले. प्रत्येक जण आपल्याच दुनियेत मग्न होते. थोड्याच वेळाने कंटाळून नीता झोपण्याचा प्रयत्न करू लागली. 


 सकाळी पाच ते सहापर्यंत भोपाळ  येईल. गाडी वेगाने पुढे धावत होती पण नीताचे मन मात्र मागे जात होते.


         काल ,अनु वहिनीचा फोन आला होता, आपली सानू डॉक्टर झाली  तिला गोल्ड मेडल मिळणार आहे, त्या समारोहाचे पालक म्हणून आपल्याला निमंत्रण आहे तर ,तुलाही यायचंच आहे. 


वहिनीचा आनंद शब्दाशब्दातून ओसंडत होता. या दिवसासाठीच तिने खूप मेहनत घेतली होती.


सानुला, 'आपल्या सानुला' या शब्दावर नीताचे मन अडकले, अनु वहिनी नेहमीच 'आपलीं सानु' म्हणते पण-- आपली म्हणायचा हक्क आपण स्वतः सोडून बसलो आहोत...



 भूतकाळ नीताच्या मनःपटलावर उलगडू लागला.


अनुराधा तिची बाल मैत्रीण, दोघींचे खूप छान जमत असे. पुढे निरज दादाचे व अनूचे प्रेम जमले व अनुराधा तिची अनु वहिनी झाली..


एक-दोन वर्षाने नीताचे समीरशी लग्न झाले व ती नाशिक स्थायिक झाली..


समीरचा गाड्यांचे पार्ट बनवायचा छोटा उद्योग होता. नीता ही शाळेत नोकरी करत होती. दोघांचे छान जमलं होतं. वर्षभरातच निकिताचा जन्म झाला ..



आता नोकरी करून लहान बाळाला संभाळणे कठीण म्हणून एक बाई कामाला ठेवली. निकिताच्या पाठोपाठ एक वर्षातच नुपुरचा ही जन्म झाला. निकीता व नुपुरचे करण्यात पूर्ण दिवस जात असे.



 समीरला खूप काम असे, पण काही दिवसांपासुन समीर त्रासलेल्या दिसत होता. नीताने विचारले तेव्हा कळले कि समीरला उद्योगात तोटा आला. खूप कर्ज झाले, ते फेडणे व दोन लहान मुलींचा सांभाळ या सर्वात नीताच्या तब्येतीची वाट लागली.  नोकरीही सोडावी लागली..




     राखीचे निमित्त म्हणून दादा व अनु वहिनी , नीताकडे आले होते. दोन्ही मुली लहान आणि नीताची तब्येत व घरची एकंदर परिस्थिती पाहून थोडे दिवस माहेरपणा साठी नीताला व मुलींना घेऊन गेले.




 वहिनीने दोघी मुलींचे भरपूर लाड केले व नीताला पूर्ण आराम दिला.


          नीताला येऊन एक महिना झाला, तरीही तिच्या तब्येतीत काही फरक नव्हता, थकवा जात नव्हता आताशा जेवण ही नीट जात नसे,  मधून मधून मळमळते असे. तेव्हा डॉक्टरला दाखवून आणले त्यांनी नीताला परत दिवस गेले असे सांगितले.


 हे ऐकून नीताला धक्काच बसला, तिने समीरला कळवले. समीरने एकंदर परिस्थिती पाहता "हे मुल आपल्याला नको तेव्हा काय तो निर्णय तू घे " असे स्पष्ट सांगितले, हे कसे झाले व आपल्याला कळले कसे नाही याची नीताला लाज वाटू लागली.



 डॉक्टरने स्पष्ट सांगितले की तीन महिने झाले तेव्हा एबार्शन शक्य नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली.


      समीर  अडचणीत असताना आपण त्याला काहीही मदत करू शकत नाही आणि आता हे नवीन टेन्शन, नीताला रडूच फुटले.  तिला रडताना पाहून तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत तिला शांत करत दादा म्हणाला 


    "नीतू, एक विचारू का? तू पाहतेच आहे  कि आमच्या  लग्नाला सहा वर्ष झाली, पण अजून आमच्या संसार वेलीवर फूल यायचे चिन्ह नाही सर्व टेस्ट व उपाय करून झाले. हे येणारे बाळ तू तुझ्या वहिनीच्या ओंजळीत घालशील का? विचार कर , तुम्हाला हे बाळ नको आहे व तिकडे अनु मातृत्व सुखासाठी झुरते आहे." 


  "पण, पण दादा, वहिनीला चालेल का?"


    "अगं, तिचाच विचार आहे , पहा तू, पूर्ण विचार कर समीररावांना ही विचार, मग निर्णय घे." 


      सकाळी चहा पिता पिता नीताला मळमळायला लागले. बाथरूम मधून येऊन बेडवर बसली व रडू लागली तिच्या पाठीवर हात फिरवत अनु वहिनी तिला शांत करू लागली. वहिनीचा हात आपल्या पोटावर ठेवत, "आज पासून हे बाळ तुझे तू त्याला स्वीकारून मला मला एका धर्म संकटातून वाचवले आहेस"- असे म्हणत नीता वहिनीच्या कुशीत शिरली.



      नववा महिना पूर्ण होताच नीताने एका नाजूकश्या मुलीला जन्म दिला. सानिका हे नाव ठेवून दादा वहिनींनी समीरच्या परवानगीने तिला दत्तक घेतले. काही दिवस आराम करून नीता आपल्या दोन मुलींसह नाशिकला परत गेली. 



निकिता , नुपूर दोघी अजाण असल्याने त्यांनी सानिकाला मामाची मुलगी म्हणून स्वीकारले.



गाडी भोपाळच्या स्टेशनवर पोहोचल्याची सूचना डिस्प्लेवर दिसायला लागली. इतर प्रवासी सामान आवरून दाराकडे जायची घाई करु लागले. तशी  नीता वास्तवात आली.


 आपली बॅग व पर्स घेत  गेटपाशी आली. स्टेशनवर दादा व वहिनी दोघे तिला घ्यायला आले होते . नीताची नजर सानिकालाच शोधत होती.  



घरी पोचताच नीरज म्हणाला, "हे बघा, आपल्याला बरोबर दहा वाजता  युनिव्हर्सिटीत पोहोचायचे आहे, तेव्हां तुम्ही बायका पटापटा आवरा गप्पा काय होतच राहतील.  बरे जेवण आपण बाहेरच जेऊ."      


      चहाचे कप धुता - धुता वहिनीने मुलींची व समीरची चौकशी केली. 



तेवढ्यात बेडरूम मधून सानिका उठून आली. 

"अरे वा, आत्या तू केव्हा आली? आई तू मला उठवले का नाही?" असे म्हणत नीताला वाकून नमस्कार केला.



  आणलेली मिठाई सानिकाच्या हातात देत नीताने तिला जवळ घेतले नि तिला जाणवले की सानुच्या स्पर्शात ती स्वतःला शोधते आहे.



        बरोबर दहा वाजता दिक्षांत समारोह सुरू झाला. कुलपतींचे भाषण होऊन मेडल व डिग्री वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. नीता , अनु वहिनी व नीरज तिघेजण हॉलमध्ये मांडलेल्या खुर्च्यांवर बसून सर्व दृश्य पहात होते.


 सानिका चे नांव एनाउंस होताच डोक्याला केशरी पगडी व गाउन घालून ती स्टेजवर आली. मेडल धारकांचा तो ड्रेस कोड होता. 



सानिकाने निवेदकाच्या कानात काहीतरी सांगितले व माइक हातात घेत ती बोलली, "माझे हे गोल्ड मेडल मी माझ्या आईच्या हस्ते घ्यावे अशी माझी इच्छा आहे. "



  निवेदकाने मिसेस अनुराधा साने मे प्लीज कम आॅन दि स्टेज अशी सूचना केली. 


हॉलमधल्या सर्व लोकांच्या नजरा त्या दोघींकडे वळल्या. सानिकाने "आई  ये ना, अशी हाक मारली अनुराधा नीताकडे पाहू लागली, तसे नीरजने "अग अनु, उठ जा तुझी लेक तुला बोलावते आहे" असे म्हणत अनुला उठवले.



 स्टेजवर अनुराधा पोहोचताच हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अनुराधाने सानिकाच्या गळ्यात गोल्ड मेडल घातले. हिच्याच प्रेरणेने हे यश मला मिळाले असे मनोगत सांगून  मेडल अनुराधाच्या गळ्यात घातले. परत लोकांनी टाळ्या वाजवून दोघींचे कौतुक केले. हे सर्व  दृश्य पाहता पाहता आपण काय गमावले हे नीताला जाणवू लागले.



      कार्यक्रम संपल्यावर चौघेजण हॉटेलात जेवायला गेले जेवताना सानिका भरभरून बोलत होती तिच्यातला उत्साह पाहून व तिची बडबड ऐकून नीताला वाटले ही समीर सारखी बडबडी आहे. आता नीताचे लक्ष जेवणातून उडाले. आतून काहीतरी सतत ठसठसत आहे हे जाणवू लागले. 



जेवण आटोपून घरी जाण्यासाठी वेळ नव्हता, कारण परतीची गाडी चार वाजताची होती. तेव्हा स्टेशन वर पोचवायला तिघेही आले होते, "हे काय ग आत्या, एकच दिवसात परत जातीय आणि निकिता, नुपूर ला ही आणले नाही" - अशी गोड तक्रार ऐकता नीताला वाटले आत्या आणि आई या दोन्ही शब्दांमध्ये 'आ' जरी एक असला तरी दुसऱ्या शब्दाने ती  सानिकापासून कितीतरी दुरावली नी हे अंतर तिने स्वतः निर्माण केले होते मग , आता तिला ते का सहन होत नाहीये?



स्टेजवर सानिकाने ,"आई ये" असे म्हटल्यावर तिच्या हृदयाची धडधड का वाढली? कां,?  कां सानूमध्ये ती स्वतःला शोधते आहे? आज  जी सानिका तिच्यासमोर आहे ती अनु वहिनीने घडवलेली हुशार संस्कारी मुलगी आहे आणि ती फक्त एक निमित्त होती.



 एक हाडा-मांसाचा गोळा तिने अनुच्या हाती सोपवला पण त्यात पंचप्राण ओतून एक सुंदर अशी कलाकृती वहिनीने घडवली. त्यावर आता फक्त तिचाच हक्क आहे. 


आणि हा निर्णय  नीताने स्वतःच्या सुखासाठी घेतला होता.



       गर्भनाळ कापल्या बरोबर तिचा आणि सानिकाचा संबंध तिने संपवला मग त्या तुटण्याची वेदना आता तिला का बरे जाणवत आहे.


       गाडीने वेगाने परतीचा प्रवास सुरू केला नीताचे डोळे भरून वाहू लागले त्या अश्रूंच्या पडद्या आड स्टेशनवर हात हलवत टाटा करणारी सानिका दूर-दूर होत गेली....‌‌ .


*************************


प्रतिभा परांजपे.जबलपूर.

वरील कथा प्रतिभा परांजपे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.



Post a Comment (0)
Previous Post Next Post