आपलं माणूस

 आपलं माणूस

✍️ अमृता देशपांडे 

रात्रभर पडत असलेला पाऊस आता थांबला होता. रात्रभर कोसळुन तोही आता दमला होता. सुरेखाने तृप्त मनाने पडदा बाजूला सारला. ती प्रसन्न मनाने निसर्ग सौंदर्य न्याहाळू लागली.  सकाळच्या कोवळ्या उन्हात पानांवर दवबिंदू चमकत होते.  रात्रभर पडलेला पाऊस पिऊन झाडं देखील तृप्त डोलत होती. ते  पाहून तिलाही बरं वाटू लागलं...


सुरेखानं मागं वळून  शांत झोपलेल्या शेखरकडे बघितलं, आणि   तिला कालची संध्याकाळ आठवली. काल संध्याकाळी शेखर थोडा उदास होऊनच घरी परतला. 


'अहो काय झालंय?  असे का बसलात?  ऑफिसमध्ये काही घडलंय का?  डोकं दुखतय का तुमचं?... मी चेपून देऊ?'  सुरेखा


'तू चेपून देशील?   खरंच सुरेखा,  तू माझं डोकं चेपून देशील?...’ शेखरने आश्चर्याने विचारले


'हो, का नाही?  बायको आहे मी तुमची, तुम्ही मानत नसलात तरी... ‘सुरेखाच्या या वाक्यावर शेखर तिच्याकडे बघतच बसला. सुरेखानं केलेल्या तेल मालिशीमुळे त्याला छान झोप लागली. पुढचे चार दिवस त्याने तापात काढली. याकाळात सुरेखाने त्याची मनापासून सेवा केली. त्यामुळेच कि काय, पण  ज्वराच्या उष्णतेचा शेखरला जितका त्रास झाला नाही, तितका तो सुरेखाच्या बाबतीत केलेल्या चुकांबद्दल पश्चात्तापाच्या आगीत होरपळून निघाला...


'चल, छान तयार हो, आपण बाहेर जाऊया जेवायला...'  थोडे रिलॅक्स वाटल्यावर शेखर म्हणाला.  आता थक्क होण्याची वेळ सुरेखाची होती.  ती आनंदाने तयार होण्यास आंत गेली.


सुरेखा आणि शेखरचं अरेंज मॅरेज. शेखरच्या वडिलांनी जबरदस्तीने त्यांचं लग्न लावलेलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री शेखरनं सुरेखाला लताबद्दल सांगून टाकलं.  आणि हे निक्षून सांगितलं की, ' मी तुझ्याशी हे लग्न केवळ जगाला दाखवण्यासाठी केलंय,  तेव्हा  जगासमोर तू माझी बायको म्हणून कितीही मिरव,  पण आपल्या दोघात नवरा-बायकोचं नातं कधीच असणार नाही. माझं लतावर प्रेम आहे आणि मी लताकडे जाणार...' 


लग्नानंतरही शेखरला लताकडे जात राहिला,  तिच्यावर पैसे उधळत राहिला. सुरेखा एक शब्दही त्याला त्याबाबत बोलत नव्हती. शेखरला सुरेखाच्या मनाचं कोडऺ काही सुटत नव्हतं. त्याला वाटलं होतं,  लताबद्दल ऐकल्यावर सुरेखा थयथयाट करेल,  आपल्याशी भांडेल,  माहेरी निघून जाईल,  किंवा घटस्फोटही देईल. पण तसऺ काहीच झालं नाही. सुरेखानं स्वत:ला घरकाम, बागकाम आणि लहान मुलांच्या ट्यूशन्समध्ये गुंतवून घेतलं. शेखरशी तिचा संवाद अगदीच जुजबी, कामापुरता असे. कधीकधी शेखरला तिची कीव येई,  अपराधीपणाचाही भाव येई... पण लतावरचं त्याचं प्रेम त्याला सुरेखा जवळ जाऊ देत नव्हतं.


पण ज्या लतावर शेखर इतकं जीवापाड प्रेम करायचा त्या लताचं होतं का शेखरवर प्रेम?  लतासाठी शेखर म्हणजे केवळ एक क्रेडिट कार्ड होता.  शेखर एक प्रथितयश इंजिनीयर होता.  काही वर्षे एका मल्टिनॅशनल कंपनीत पुण्यात काम केल्यावर मग त्यानी त्याच्या मित्रासोबत नागपुरात स्वतःची कंपनी टाकली.  प्रचंड मेहनत करून त्यांनी आपली कंपनी नावारूपाला आणली होती,  त्या कंपनीतच त्याची आणि लताची भेट झाली,  तिचे कुरळे केस,  घारे डोळे, गोरापान रंग आणि लाडिक वागणं याचीच शेखरवर भुरळ पडली होती. आणि शेखर तिच्या प्रेमात वहावत गेला होता.


पण ते म्हणतात ना,  कोणतीही परिस्थिती फार काळ टिकत नाही?  शेखरच्या मित्राने  त्याच्यासोबत धंद्यात दगाफटका केला,  आणि शेखर रस्त्यावर आला.  त्याबरोबर लतानेही त्याचा हात सोडला...


अशा बिकट परिस्थितीतही सुरेखाने मात्र त्याची साथ सोडली नव्हती. शेखरला राहून राहून याच गोष्टीचे कोडे पडे... आज त्याने ह्याचे  कारण जाणून घ्यायचे ठरवले.  त्यासाठीच  शेखर सुरेखाला घराबाहेर घेऊन आला होता.  त्यांनी एका चांगल्याशा हॉटेलमध्ये जेवण घेतले.  आणि घरामागच्या मोकळ्या रस्त्यावर शतपावलीच्या निमित्ताने फिरायला आले.


'सुरेखा, रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारू?' शेखर


'असं का विचारताय' शेखर?  विचारा ना...’ सुरेखा


'सुरेखा, आज पाच वर्ष झालीत आपल्या लग्नाला.  या 5 वर्षात  मी कधी तुझ्याशी धड बोललो नाही,  ना तुझ्या अंगाला स्पर्श केला... आपल्यात नवरा-बायकोचं नातं कधी निर्माण झालंच नाही. आणि तरीही तू  अजूनही माझ्या सोबत आहेस?  विनातक्रार?  तुला वाईट वाटत नाही या गोष्टीचं?  राग येत नाही माझा? सोडून निघून जावंसं  कधी वाटलं नाही?'  शेखरने  एका दमात सगळे विचारून टाकले.  तरीही सुरेखा शांतच आहे हे बघून तो पुढे म्हणाला,


'हे बघ सुरेखा, माझ्यासाठी हे फार मोठं कोडं आहे. तुझ्याकडे बघितलं की मला खूप अपराध्यासारखं वाटतं... प्लीज सुरेखा माझ्या प्रश्नाचे उत्तर दे...’ शेखर


'तुम्हाला आज पाच वर्षांनी का होईना आज हे मला सगळं विचारावंसं वाटतंय यातच सगळं आलं.  तुम्ही प्लीज स्वतःच्या मनातील अपराधीपणाचा भाव का डून टाका. कारण खरंतर आपल्या नात्यातील ही अलिप्तता, हा दुरावा मलाही हवाच होता.'  सुरेखा


'तुलाही दुरावा हवाच होता म्हणजे? मी समजलो नाही सुरेखा,  प्लीज मला जरा सविस्तरपणे सांग. म्हणजे तुझ्याही मनात दुसरं कोणीतरी...' शेखर



"नाही शेखर, तसं काही नाही.  माझ्या भूतकाळात अशा काही घटना घडल्या आहेत की त्यामुळे माझ्या हृदयातील प्रेमाचा,  प्रेमभावनेचा कप्पा कधी उघडलाच गेला नाही.  किंवा असं समजा,  तो कप्पा तयार होण्याआधीच उध्वस्त झाला..." सुरेखा शून्यात नजर वळवत बोलली.


' एक मिनिट, एवढं कोड्यात बोलू नकोस ना!  मला काहीच समजत नाहीये.  नेमकं काय घडलंय तुझ्या भूतकाळात?'   शेखरच्या मनाचा आता पुरता गोंधळ उडाला होता.


' शेखर  माझं बालपण काही फार सुखात गेलं नाही.  दीड वर्षांची असताना रेल्वे प्रवासात आई बाबा वारले. पुढे मी वाढली  माझ्या मामाकडे.  मामाला माझ्याबद्दल खूप वाटायचं,  पण मामीनं  माझा खुप राग राग केला, खूप छळ केला. मामी माझ्याकडून घरातली सगळी कामं करवून घ्यायची,  तिच्या मुलांना ताजं अन्न, तर मला शिळं पाकं खायला द्यायची.  मी हा सगळा छळ निमूटपणे सहन केला पण...'


'पण काय सुरेखा?   आज मनातलं सगळं बोलून टाक, सगळे ऐकायची तयारी आहे माझी...’ शेखर


'शेखर, मामीचा छळ मी तरी सहन करत होती, कारण ती कशीही वागत असली तरी तिने मला आसरा दिला होता, पोटाला अन्न देत होती, नगरपालिकेच्या शाळेत शिकू देत होती. पण... मामाच्या मुलाने मात्र सगळ्या मर्यादा ओलांडल्या... शेखर,  मी फक्त 13 वर्षांची होती. जेव्हा त्याने माझ्यावर पहिल्यांदा बलात्कार  केला. मामा मामी ऑफिसला गेले,  की हा नराधम मला छळायला तयार करायचा... बोलायची तर कुठे सोयच नव्हती!'  सुरेखा रडत-रडत सांगू लागली.


'अगऺ पण तू तुझ्या मामा-मामींना याबद्दल कधी सांगितलं का नाहीस?' शेखर


'सांगितलं ना...  मला वाटलं होतं माझा कितीही राग राग करत असली तरी एक स्त्री म्हणून तरी मामी मला समजून घेईल... पण नाही!  मामीला माझा प्रचंड राग होता आणि  स्वतःच्या मुलावर आंधळा  विश्वास!  तिने उलट मलाच रागवले... ' माझ्या लेकराची बदनामी करू नकोस' म्हणून...  मग माझ्या मामेभावाला काय रान मोकळे मिळाले!  शेखर त्याने अगणित वेळा माझ्यावर बलात्कार केले,  आणि मी काहीच करू शकले नाही...' 


'भयंकर आहे गं हे सगळं सुरेखा... मी तर कल्पनाच करू शकत नाही तू त्या नरकात कशी काय राहिलीस...' शेखर


'शेखर, दहा वर्ष मला हा नरकवास भोगावा लागला... या एवढ्या वर्षात मी जे काही सोसलं ना, त्यामुळे स्त्री-पुरुष संबंधांविषयी माझ्या मनात फक्त किळस निर्माण झाली.  ज्या वयात एखादी मुलगी तिच्या स्वप्नातल्या राजकुमार विषयी स्वप्न रंगवत बसते त्या वयातच पुरुषांविषयी माझ्या मनात प्रचंड तिरस्कार निर्माण झाला.  त्यामुळे लग्न बिग्न करण्यात मला जराही रस नव्हता.  जसं तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तसंच ते मलाही करायचं नव्हतं...   त्यामुळेच जेव्हा  तू मला लताबद्दल सांगितलंस,  तेव्हा खरंतर मला बरं वाटलं. हो,  कोणीतरी प्रेमानं समजून घेणारं  आपलं माणूस असावं,  ज्याच्या डोळ्यात वासनेचा लवलेशही नसावा परंतु त्याच्या कुशीत निर्धास्तपणे निजता यावं,  ज्याला आपल्या मनातलं सारं काही सांगता यावं... असं कुणीतरी हक्काचा माणूस  हवं होतं,  जे मला कधीच मिळालं नाही...’ सुरेखा आता ओक्साबोक्शी रडू लागली.


शेखरनी  तिला जवळ घेतलं,  पाठीवरून हात फिरवला.  'सुरेखा, तुझा आणि माझा भूतकाळ वरकरणी वेगळा दिसतो.  तुला जबरदस्तीने  सगळं सहन करावं लागलं,  आणि मी जिच्यासोबत आनंद उपभोगत होतो, जिला आपल्या जवळचऺ समजत होतो, ती मला फसवत होती. आपल्या दोघांनाही कोणीतरी अमानुषपणे ओरबाडून गेलंय.  त्यामुळे ती नव्याची नवलाई आणि स्पर्शासुखाची ओढ दोघांचीही आता संपलीये.  आपल्या दोघांच्याही आयुष्यात  'आपलं माणूस' असं कुणीही नाही.  तेव्हा आपणच एकमेकांचे झालो तर?  आता आपल्याला एकमेकांची दुःखं तर कळलीच आहेत. यापुढचं आयुष्य तरी  आपण एकमेकांच्या आवडी निवडी जपत,  एकमेकांना सांभाळत पुढे जाऊया? एक वासनारहित प्रेमाचं जग वसवूया?’ शेखर

शेखरचे बोलणे ऐकून सुरेखा प्रसन्न हासली आणि शेखरला जाऊन बिलगली. तिच्या त्या वागण्यातूनच शेखरला त्याच्या प्रश्नाचं उत्तर गवसलं. एकमेकांचा हात हातात धरून दोघेही घरी परतले,  आणि एकमेकांच्या  कुशीतच विसावले. भावनांच्या महापुरात दोघांच्याही मनातील मळभ  वाहून जात  होते. बाहेर पावसाला सुरवात झाली होती. आज तोही मनसोक्त बरसणार होता...


 समाप्त

✍️ अमृता देशपांडे

वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post