तुलना

तुलना 

✍️ सविता किरनाळे

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

अवनी आणि पूर्वा साधारण एकाच वेळी लग्न होऊन घरकुल हौसिंग सोसायटीमध्ये प्रवेश कर्त्या झाल्या. योगायोगाने त्यांची घरंही एकाच मजल्यावर होती. साहजिकच दोन्ही कुटुंबात चांगला घरोबा होता. अवनी आणि पूर्वाची मैत्री व्हायला ही फारसा वेळ लागला नाही. दोघी एकत्रच बाजारात, काही कार्यक्रमाला जात असतं. मंगलाकाकू अवनीची सासूबाई तर शारदाकाकू पूर्वाच्या. अतिशय समजदार, सुशिक्षित, सुसंस्कारीत होती दोन्ही कुटुंबं. अवनी, पूर्वा अगदी दुधात साखर विरघळावी तश्या आपापल्या कुटुंबात समरस झाल्या. 


नवलाईचे नऊ महिने सरले. पूर्वाला रोज तेच तेच रूटीन फॉलो करून कंटाळा यायला लागला. तिने वेळ घालवण्यासाठी तसेच शिक्षणाचा सदुपयोग व्हावा या हेतूने नोकरी करण्याचा विचार केला. एक दिवस धाडस करून तिने रात्रीच्या जेवणाच्या वेळी सासुसासरे आणि नवऱ्यासमोर हा विषय काढला. 

"आई मी बीकॉम graduate आहे. तुम्हाला माहीतच आहे, लग्नाआधी CA कडे नोकरीही करत होते. आता घरातली कामं करूनही बराच वेळ मिळतो. तो असाच टंगळमंगळ करून वाया घालवण्यापेक्षा पार्ट टाईम का होईना नोकरी करावी असा माझा विचार आहे... अर्थात तुमची परवानगी असेल तरच." तिने घाईघाईने पुस्ती जोडली.

सासूबाई हसल्या आणि म्हणाल्या, "पूर्वा खरंच खूप चांगला विचार आहे हा. मग आमचा नकार का बरं असेल. तू नोकरी शोधायला सुरुवात कर. घरची कामं आपण दोघी मिळून एकमेकींच्या सोयीने करू."

"आणि पूर्वा आम्ही पुरुषही शक्य तशी घरकामात मदत करु बरं का. हल्ली सगळ्यांनीच आपल्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. काळजी नको करू, मी करेन तुझ्या सासूला मदत." सासरे हाताने पोळी वाढून घेत म्हणाले.

"अरे बापरे, तुम्ही मदत करणार म्हणजे माझी वाट लागणार दिसतंय. परवा चहा बनवतो म्हणून चहा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला घातला होता तुम्ही चहात." शारदाकाकूंनी कपाळावर हात मारण्याची ॲक्शन केली आणि डायनिंग टेबलवर हास्याचा फवारा उडाला. 


पूर्वाने आपण नोकरी शोधत असल्याची बातमी अवनीला दिली.

"पण तुला नोकरी करायची गरजच काय? नवऱ्याला चांगलं पॅकेज आहे. सासरेबुआ अजून कमावते आहेत." अवनीची प्रतिक्रिया पाहून पूर्वा थक्क झाली.

"अगं गरज आहे म्हणून मी नोकरी करणार नाही तर वेळ आणि शिक्षण सत्कारणी लागवा, चार पैसे कमवून स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, बाहेरच्या जगाशी कनेक्ट राहता यावं म्हणून मी नोकरी शोधतेय." 

"काहीतरीच तुझं बाई पूर्वा. अगं हेच तर दिवस आहेत आपले मौज मजा करण्याचे. मस्त खाओ, पिओ, मजा करो. फेसबुक, व्हॉट्स ॲप, यूट्यूब सारखी साधनं असताना वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच कसा पडतो तुला. आणि शिवाय घर नोकरी दोन्ही manage करताना धावपळ होईल ते वेगळंच."

अवनीचा युक्तीवाद ऐकून ऐकून पूर्वाने विषय बदलला आणि पुन्हा तिच्यासोबत या विषयावर न बोलण्याचे ठरवले. 


यथावकाश पूर्वाला हवी तशी नोकरी मिळाली. ती घरच्या लोकांच्या मदतीने व्यवस्थित घर, नोकरी सांभाळू लागली. शारदाकाकू सुनेचं कौतुक करताना थकत नसतं. काही महिन्यात पूर्वाच्या व्यक्तिमत्त्वात एक आगळा आत्मविश्वास झळकू लागला. अखेर स्वयंपूर्णतेचे तेज काही आगळेच असते. दर महिन्याला काही पैशांची बचत करून तिने स्वतःसाठी छानसे सोन्याचे कानातले, नवऱ्याला साखळी, सासू सासर्याना भारी कपडे घेतले. कौतुकाने तिने ते सगळं अवनी, तिच्या कुटुंबियांना दाखवले. सगळ्यांना तिचे खूप कौतुक वाटले. पूर्वा अवनीपेक्षा बरीच पुढे गेली असली तरीही अवनी आणि पूर्वाची मैत्री तशीच अबाधित राहिली आणि अवनीही तशीच ध्येयहीन राहिली होती. तिला पूर्वाबद्दल कौतुक तर होतं पण स्वतःही काही करावं, निदान घरबसल्या काही छंद जोपासावे असेही वाटत नव्हते.


इकडे एक व्यक्ती मात्र हे सगळं पाहून व्यथित होत होती. ती व्यक्ती म्हणजे अवनीच्या सासूबाई मंगलाकाकू. सगळी सोय असताना फक्त करावसं वाटत नाही म्हणून अवनीने उगाच वेळ घालवणे त्यांना पटत नव्हते. शेवटी एक दिवस त्यांच्या संयमाचा बांध फुटला.

"अवनी, आपल्या सोसायटीमधील तुझ्या वयाच्या अनेक मुली नोकरी, काही व्यवसाय करत आहेत. तुझा काय प्लॅन आहे? जर घरातच बसायचं असेल तर निदान एक मूल तरी होऊन जाऊ दे." 

सासूबाईंचे स्पष्ट बोलणे ऐकून अवनी हबकलीच. 

"काहीही काय आई, आत्ता तर मी तेवीस वर्षांची आहे. अजून तीन वर्ष तरी मूल नको असं आमचं प्लॅनिंग आहे."

"मग नुसती दिवसभर मोबाईल बघत बसण्यापेक्षा काही नोकरी, व्यवसाय किंवा छंद जोपासायला सुरु कर." मंगलाकाकू आज सोक्षमोक्ष लावायचाच असा विचार करून बसल्या होत्या.

"आई मोबाईल बघणे हाच माझा छंद आहे. आणि नोकरी बिकरी करणे मला जमणार नाही. तसंही आपली परिस्थिती इतकीही खराब नाही की मी नोकरी करावी." अवनी चक्क तिथून उठून गेली. पण मंगलाकाकूंनी एक खूणगाठ मनाशी पक्की बांधली होती.


दुसऱ्या दिवशी अवनीचा दिवस उजाडला तोच मुळी किचनमधून ऐकू येणाऱ्या आदळआपटीने. गडबडीने उठून तिने पाहिले तर मंगलाकाकू ओट्यावर चहाची भांडी आपटून मांडत होत्या. त्यांना अवनीची चाहूल लागली. मागे वळून पाहत त्यांनी टोमणा मारला. 

"चला उठल्या एकदाच्या महाराणी साहेबा. मॅडम तुमचं झालं असेल तर आम्हा पामरासाठी चहा बनवाल का, की रोजच्या सारखं आजही आम्हीच स्वतः बनवून तुम्हालाही द्यायचा?"

सासूबाईंच्या बोलण्यातील विखार ऐकून अवनी थरारली. 

"न.. नाही आई मी बनवते ना," तिने हात पुढे केला. 

"खबरदार अशी पारोश्याने जर भांड्यांना हात लावला तर. आज मी बनवतेय पण उद्यापासून मी उठायच्या आधी तू अंघोळ वगैर आवरून किचनमध्ये चहा नाश्ता बनवताना दिसली पाहिजेस." काकू कडाडल्या.

किचनमधून बाहेर पडताना अवनीच्या कानावर आवाज आला, "दुर्दैव म्हणतात ते हेच, सून असताना सासूला कामं करावी लागतात आणि या बसणार दिवसभर मोबाईल खाजवत."

अवनीच्या डोळ्यात पाणी तरळले पण ती गुपचूप तिथून निघून गेली. 


त्या दिवसापासून अवनीचे जणू ग्रहच बदलले. मंगलाकाकू उठता बसता तिच्या कामात खोट काढत. पावलोपावली तिची आणि पूर्वाची तुलना करत. पण सासरे आणि मुलगा घरी असले तर मात्र त्यांच्या वागण्यात एकशे ऐंशी अंशाचा फरक पडे. तेव्हा त्या अवनीशी अशा वागायच्या जणू ती सून नसून मुलगीच आहे.


 अवनीची मधल्या मध्ये कुतरओढ होऊ लागली. नवऱ्याला सांगावे तर तो आईवरच विश्वास ठेवणार. सुंदर, प्रफुल्लित दिसणारी अवनी कोमेजू लागली. तिला कामाचा ताण येऊ लागला. परिणामस्वरूप ती आजारी पडली. या आजारपणात काकूंनी सुनेची खुप काळजी घेतली. अगदी पौष्टीक, चविष्ट पदार्थ खाऊ घालून तिला जाडजूड बनवली. अवनीला वाटले पूर्वीच्या मंगलाकाकू परत आल्या. पण तिला काय माहीत काकूंच्या मनात काय आहे!


एकदिवस त्याचा उलगडा झालाच. शारदाकाकू सहज गप्पा मारायला म्हणून घरी आल्या होत्या. अवनी आधीसारखी बेडरूम मध्ये टाईमपास करत होती. आपले नाव ऐकून तिने कान टवकारले. मंगलाकाकू म्हणत होत्या, 

"शारदा वहिनी तुम्ही खरंच नशीबवान हो, पूर्वासारखी सून तुम्हाला मिळाली. घरचं, बाहेरचं कसं आत्मविश्वासाने हॅण्डल करते. हल्ली अजूनच सुंदर दिसायला लागली आहे हां पूर्वा. स्वकमाईचा आनंदच वेगळा असतो नाही का? नाहीतर आमच्या नशिबात ही धोंड. नुसतं खायचं आणि बसायचं. कशी फुगलीय बघा दीड वर्षातच. मी म्हटलं ही, की मी घरकामात मदत करते तूही काहीतरी कर. पण दगड आहे नुसती. आईबापाने एवढे पैसे खर्च करून शिकवलं तरी कशासाठी कुणास ठाऊक."


सासूचे शब्द ऐकून अवनीच्या मनावर डागण्या उठल्या. तिने चंग बांधला, आता बस झाले. गोष्ट आईबाबापर्यंत पोहोचली आहे. मी स्वतःला सिद्ध करणारच. कुणाच्याही नकळत ती वर्तमानपत्रात येणाऱ्या छोट्या जाहिराती बघू लागली. गुपचूप अर्ज करू लागली. कधी कधी काही कारण सांगून मुलाखतीसाठी ही जाऊ लागली. पण म्हातारीने किती ही झाकून ठेवलं तरी कोंबडा आरवतोच. मंगलाकाकूंना याची कुणकुण लागलीच. पण त्यांनी चक्क दुर्लक्ष केले. आपला खाष्ट, कजागपणा चालूच ठेवला.


आणि एक दिवस अवनीच्या प्रयत्नांना यश आले. तिला एका शाळेत रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली. शाळा थोडी दूर होती पण रिक्षाने प्रवास करण्यायोग्य होती. आनंदाने अवनी पेढे घेऊन घरी आली. तिने मोठ्या आनंदाने आणि अपेक्षेने सासूबाईंना ही बातमी सांगितली. मंगलाकाकूंनी पेढा तर खाल्ला पण तोंड वाकडं करून म्हणाल्या, "बघू किती दिवस करतेस नोकरी. दिवसभर पोत्यासारख पसरणे अंगवळणी जे पडलं आहे."


अवनी ध्येयहीन जरुर होती पण मूर्ख अजिबात नव्हती. तिने आता ठाम निश्चय केला होता. काहीही झाले तरी आता नोकरी करणे सोडायचं नाही. नोकरीसाठी वणवण भटकंती करताना नोकरी मिळवणे किती अवघड आहे हे तिच्या लक्षात आले होते. शिवाय तिची खास मैत्रीण पूर्वामधला सकारात्मक बदल तिच्या लक्षात आला होता. स्वतःची चूक अवनीच्या लक्षात आली होती. 


अवनीने कामाला जायला सुरुवात करताच, मंगलाकाकू पहिल्यासारखं घरकामात मदत करू लागल्या. अवनीचे काम हलकं करू लागल्या पण सासू सूनेत पहिल्यासारखे संबंध काही निर्माण झाले नाहीत. काकू थोड्या अलिप्त राहत. आणि अवनी ही घाबरून दूर राही.


पाहता पाहता अवनीचा पहिला पगार झाला. तिने बँकेतून काही रक्कम काढून आणून काकूंच्या हाती ठेवली.

"हे काय आहे?" काकूंनी विचारले.

"माझा पहिला पगार." अवनीने खालमानेने उत्तर दिले.

"मग देवापुढे ठेव आणि राहू दे तुझ्या खर्चाला."

अवनी चकित झाली पण काही न बोलता तिने सांगितल्या प्रमाणे केले. दिवस जात राहिले आणि एक दिवस रिक्षाचा संप झाला. आता काय करायचे असा प्रश्न अवनीपुढे उभा राहिला. तिने पूर्वाला स्कूटरवर सोडण्याची विनंती केली. पूर्वाने होकार दिला पण मंगलाकाकूंनी टोमणा मारला,

"स्वतः गाडी शिकली असती तर आज असं हात पसरण्याची वेळ आली नसती."


अवनी चिडली पण शाळेतून येताना तिने दुचाकी आणि चारचाकी चालवण्याच्या क्लासला नाव नोंदवले. काही महिन्यांत अवनी सराईतपणे दोन्ही वाहने चालवू लागली पण मंगलाकाकूंनी कौतुकाचा शब्द नाही काढला तोंडातून.


पाहता पाहता अवनीचा वाढदिवस आला. पण मंगलाकाकूंनी साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 'दोन वर्षांपूर्वी किती उत्साहाने त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला होता,' अवनीच्या मनात आले. एक सुस्कारा सोडत ती स्कूटर घेऊन कामाला गेली. संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तर स्वयंपाकघरातून सुग्रास जेवणाचा सुगंध येत होता. सासूबाई छान तयार होऊन अवनीची वाट पाहत होत्या. तिचे आई वडील, पूर्वा, तिचे कुटुंबिय ही तिथे दिसत होते. भांबावलेल्या अवनीचे सासूबाईंनी हसून स्वागत केले आणि पटकन तयार होऊन ये असा आदेश दिला.


अवनी छानशी तयार होऊन आली. केक कापण्यात आला. अवनीवर भेटवस्तूनचा वर्षाव झाला. अगदी मंगलाकाकूंनी ही सूनेला महागडी साडी भेट दिली. सगळे आनंदात असतानाच मंगलाकाकूंनी सगळ्यांना थांबवले. त्या बोलू लागल्या,

"अवनी आज सगळ्यांनी तुला खूप छान छान भेटवस्तू दिल्या आहेत. पण या सगळ्यांत मौल्यवान वस्तू एकच आहे, जी तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. बाकी वस्तू काय आज आहेत आणि उद्या नाहीत. पण ती वस्तू चिरंतन टिकेल. ती भेट म्हणजे आत्मविश्वास, स्वयंपूर्णता जी तू स्वतःला दिली आहेस. गेलं पूर्ण वर्ष मी एखाद्या दुष्ट, धारावाहिक मालिकेच्या सासुसारखी तुझ्या सोबत वागत राहिले. मुद्दाम तुझी पूर्वाबरोबर तुलना करत राहिले. हे करताना माझं हृदय आतून तीळ तीळ तुटत होतं. पण मी असं जाणूनबुजून केलं. माझ्या सततच्या टोमण्याला कंटाळून तू घराबाहेर पडलीस. स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. तुला तुझ्या आयुष्यात काही फरक जाणवतो का?"


अवनीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आज आपण जे काही आहोत ते सासूबाईंच्या सततच्या तुलनेने हे तिला स्पष्ट जाणवले. म्हणजे स्वतःकडे कमीपणा घेऊन मंगलाकाकूंनी सुनेचे आयुष्य रुळावर आणले होते. आपल्या सासूचा मनसुबा लक्षात येताच अवनीच्या डोळ्यात पाणी तरळले. तिने मंगलाकाकूंना घट्ट मिठी मारली.

"आई तुम्ही अगदी बरोबर बोललात. या वाढदिवसाला मी स्वतःला सिद्ध करुन दाखवलं, याचं पूर्ण श्रेय तुम्हाला. मला वाटायचं का या नेहमी अशी तुलना करतात. पण आज मला कळलं काही तुलना लोकांमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी केल्या जातात. थँक यू सो मच आई."


तो भावूक प्रसंग पाहून सगळेच स्तब्ध झाले होते. शेवटी अवनीचे सासरे खाकरून म्हणाले, "तुमची भरतभेट संपली असेल तर आम्हा गरिबांना खायला मिळेल? आमच्या पोटातील कावळे बाहेर यायच्या तयारीत आहेत." अवघं घर हास्यकल्लोळात बुडून गेले.

समाप्त

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत. आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 

Post a Comment (0)
Previous Post Next Post