अनुबंध

 #अनुबंध (लघुकथा)

  सुखवास आश्रमशाळेत गणपती उत्सवानिमित्त विविध गुण दर्शन स्पर्धा चालू होत्या. कार्यक्रमाची सुरूवात  चार वर्षांच्या  एका चिमुरडीने केली,  गणपती स्तोत्र व अथर्वशिर्ष इतकं अस्खलित स्पष्ट आवाजात म्हणत होती ते ऐकून वीणा ताईंच्या डोळ्यातून कौतुकाने अभिमानाने , घळाघळा आनंदाश्रु वहायला लागले . टाळ्यांच्या कडकडाटाने सगळ्यांनीच तिला भरभरून दाद दिली. बाकीचे कार्यक्रम पण खुप छान पार पडले. पण  त्या चिमुरडीने सगळ्यांची मने जिंकली होती. कार्यक्रमाची सांगता त्या चिमुरडीच्याच आवाजातील पसायदानाने झाली व त्यानंतर बक्षिस समारंभ झाला. अर्थातच पहिल्या क्रमांकाचे नाव पुकारले गेले "धारा, होय तीच चिमुरडी धारा. खणाचे परकर पोलकं घातलेली परकराचा सोगा सांभाळत भराभरा परत स्टेजवर  बक्षिस घ्यायला आली. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिला पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले. मोरपंखी रंगाच्या परकर पोलक्यात, टपोर्या डोळ्यांची ती गोरी गोमटी  धिटुकली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. वीणा ताईंनी सगळ्याच छोटुकल्यांसाठी तशी परकर पोलकी शिवून घेतली होती.

आलेल्या प्रमुख पाहुण्या ह्या  प्रसिद्ध मराठी सिने दिग्दर्शिका, निर्मात्या, नावाजलेल्या लेखिका होत्या. त्यांची नजर देखील तिच्यावरून हटत नव्हती. बक्षिस घेऊन ती पुन्हा तरा तरा जायला निघाली तेव्हा पाहुण्या बाईंनी तिला विचारले, "कोणाकडून शिकलीस हे तू?" 

त्यावर तिने उत्तर दिले, "माझी वीणाई रोज  सकाळी संध्याकाळी देवासमोर बसून हे म्हणत असते ते ऐकून ऐकून माझे पाठ झाले. मीच शिकले."

तिचे ते बोल ऐकून सगळ्यांच्या चेहर्यावर कौतुकमिश्रित हास्य फुलले. वीणा ताईंचे डोळे परत वाहू लागले. पाहुण्या बाईंनी तिला उचलून घेतले तिची पापी घेऊन तिला म्हणाल्या, "तू खुप मोठी होणार खुप नावाजली जाशील. या आश्रमा बाहेरच्या दुनियेतही तुला अशीच खुप खुप बक्षिसे मिळतील."

 त्यावर ती म्हणाली, "नको मला आश्रमाबाहेरचे बक्षिस. मी माझ्या वीणाईला सोडून नाही जाणार कुठे."

 त्यावर सगळेच जोरजोरात हसू लागले. कडेवरून खाली उतरून तुरूतुरू पळत जाऊन ती वीणा ताईंना बिलगली. "वीणाई मी नाही तुला सोडून जाणार. तू येशील तरच जाईन."

त्यावर वीणाई म्हणाली, "हो गं बाई येईन मी."

  कार्यक्रम संपला. आश्रमातील मुलींची जेवणे उरकली. सगळ्या झोपी गेल्या. धाराला पण वीणाताईंनी थोपटून थोपटून एकदाचे झोपवले. झोपवण्यापुर्वी पोरीची दृष्ट काढायला त्या विसरल्या नाहीत. गाढ झोपी गेलेल्या धाराच्या निरागस चेहर् याकडे बघून पुन्हा त्यांना गहिवरून आले. आंथरूणावर पडल्या पडल्या विचार करू लागल्या आज पर्यंत इतक्या मुली आश्रमात शिकल्या मोठ्या झाल्या लग्न होऊन मार्गी लागल्या पण इतकी मी कोणामधे गुंतले नव्हते. या पोरीत का माझा जीव अडकतोय? काहीतरी मागच्या जन्मीचे ऋणानुबंध असावेत. 

  चार वर्षांपुर्वीचा तो दिवस त्यांना आठवला. ऑगस्ट महिन्याची सहा तारीख . बाहेर श्रावण सरी बरसत होत्या. सकाळची आठची वेळ असावी आश्रमाबाहेर दुपट्यात गुंडाळलेले गोरे गोमटे, बाळसेदार बाळ कोणीतरी सोडून गेले होते. जोर जोरात ते रडत होते. आवाज ऐकून आश्रमातील मदतनीस पारूताई पळत बाहेर आल्या. त्या बाळाला उचलून जवळ  घेतले. त्याचे रडणे थांबवायचा प्रयत्न करत होत्या पण काही केल्या थांबायला तयार नव्हते ते. वीणा ताईंची पुजा चालली होती. पारूताईंनी फार्म्युला मिल्क बनवून आणले. त्या वाटी चमच्याने ते पाजायचा प्रयत्न केला पण ते बाळ काही ते पीत नव्हते. रडे काही केल्या थांबत नव्हते. वीणाताई आवाज ऐकून पुजेमधून  गणपती स्तोत्र म्हणत म्हणतच उठून बाहेर आल्या. त्या बाळाला स्वतः जवळ घेतले जादू झाल्याप्रमाणे ते शांत झाले. स्तोत्र म्हणत म्हणत त्या बाळाला घेऊन देवघरात गेल्या मांडीवर घेऊनच पुजा उरकली. रामरक्षा, अथर्वशिर्ष, पसायदान सगळं त्याला मांडीवर घेऊनच झालं. टपोर् या डोळ्यांनी टुकुटुकु बघत त्या बाळानी पण सगळं ऐकून घेतलं. पाय अवघडला म्हणून त्यांनी पारूला हाक मारून बाळाला तिच्याकडे दिले. पुन्हा जोरजोरात रडे चालू झाले. त्याचे कपडे ,दुपटे बदलून झाले पण काही केल्या थांबायलाच तयार नाही. वीणाताईंची पुजा उरकली त्यांनी उठून तिला जवळ घेतली आणि रडे परत शांत झाले. त्यांनी पारूला दुधाची वाटी चमचा आणायला सांगितला बाळाला पायावर घेऊन गाणे गुणगुणत ते तिला पाजू लागल्या, वीणाताई मधुर आवाजात गात होत्या, 

मनोरथा चल त्या नगरीला

भुलोकीच्या अमरावतीला

 ही पठ्ठी जणू काही गाण्यातल सगळं कळतय अशी शांतपणे ऐकत होती. पोट भरले आणि शांत झोपी गेली. 

पारू म्हणाली, "हिचं नाव काय लिहायचं ,काय नावाने नोंद करायची?"

 वीणा ताई म्हणाल्या, "आली तेव्हा बाहेर कोसळणाऱ्या आकाशातल्या धारा  आणि हिच्या डोळ्यातल्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या धाराच म्हणूया  हिला." वीणाताईंनी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. 

थोड्या वेळाने झोपेतून उठली तशी परत तिचे रडे चालू झाले. कोणाकडेच थांबायचे नाव घेईना . वीणा ताईंनी परत तिला जवळ घेतले ही थांबली. वीणा ताईंना ही चिकटूनच रहायला लागली. हळुहळु मोठी होत होती पण सगळीकडे वीणाईच्या मागे मागेच त्यांचे शेपुट होऊन असायची. वीणाताईंना देवपुजेची फार आवड दोन दोन तास त्यांचे पुजा पठण चाले. सगळ्या पोथ्यांचे वाचन स्तोत्र पठण झाल्याशिवाय त्या उठत नसत. ही देखील देवघरात त्यांना चिटकून असायची. त्यांचं ऐकून ऐकून तिचे उच्चारासहीत अस्खलित पाठांतर झाले. रामरक्षा, गीतेचे बरेचसे अध्याय ,सगळी स्तोत्रे घडाघडा म्हणायची. आजच्या कार्यक्रमात तिला ऐकून, आलेले पाहुणे अवाक् झाले. वीणा ताई म्हणाल्या, "दैवी देणगीच आहे तिला सरस्वतीचा वरदहस्त आहे तिच्यावर. वरूनच बरोबर घेऊन आली ही." 

मोठी झाली तशी अभ्यासात देखील हुशारच होती. वीणाताईंना गाण्याची आवड आवाजही गोड त्यांचं ऐकून ही पण आवडीने गाणी म्हणायची. गाण्याची आवड बघून त्यांनी तिला गायनाचा क्लास लावला. सुर, ताल, स्वर सगळं पक्कं जणू काही जन्मजात शिकून आल्यासारखी ती गायची. पाठांतरातही सगळ्यांना मागेच टाकत होती. वयाच्या नवव्या वर्षी संपूर्ण गीता उच्चरासहित मुखोद्गत झाली होती तीला.

 दहावी बारावी झाली.  वीणाताई तिला म्हणाल्या, "तू संगीताचीच डिग्री मिळव, त्यातच शिक्षण घे."

एका  टि व्ही चॅनलवर वर चालू होणार् या रियालिटी शो साठी ऑडिशन द्यायला गेली सिलेक्ट झाली, पुढे शो जिंकून देखिल आली. बाहेर च्या जगात तिचे नाव व्हायला लागले. प्लेबॅक सिंगिंगच्या ऑफर्स तीला मिळु लागल्या. प्रसिद्धी पैसा तिच्या मागे धावू लागले. तिची वीणाई पण आता वयोमानाने थकली होती. आश्रमाची जवाबदारी दुसर् या एका संस्थेला सोपवण्याच्या विचारात होत्या. पण त्याच मायेने आपुलकीने मुलींचे संगोपन होणार का या काळजीने बेचैन होत्या. नाईलाजास्तव त्यांना निर्णय घेणे भाग होते. 

एकीकडे त्यांची लाडकी धारा नावारूपाला येत होती . तिचा अभिमान वाटावा अशीच गुणी बाळ होती ती. तिच्या आवाजासारखीच स्वभावानेही गोड होती. सगळे तिला वीणाताईंची झेराॅक्स काॅपीच म्हणत.

  वीणाताईंनी आंथरूण पकडले. आश्रमात त्यांचा जीव अडकला होता. रोजच्या दिवसाला काळजीने मन पोखरत होते. त्यांच्याकडे बघून धाराही अस्वस्थ होत होती. एक दिवस वीणाताई अगदीच अत्यावस्थ झाल्या होत्या. त्यांच्या जीवाची चाललेली घालमेल धाराला जाणवत होती. रात्रंदिवस ती त्यांच्या उशाशी बसून असायची. वीणाईचे हाल तिला बघवत नव्हते. तिच्या वीणाईचा हात हातात घेऊन तिने त्यांना वचन दिले, आश्रमाचे कार्य पुढे असेच चालू राहील. मी त्याची जवाबदारी घेईन. माझ्या सारख्या धारांना मी नावरूपाला आणेन. तुझे कार्य तुझा वसा मी पुढे नेईन. तु काळजी सोडून दे. ते ऐकून वीणाताईंनी शांतपणे डोळे मिटले कायमचे. वीणाई गेली आणि धाराई जन्माला आली. पारू सगळ्यांना सांगत होती, त्या वरच्या परमेश्वराला सार् यांची काळजी असते. त्यानेच त्या दिवशी या धाराला आश्रमात धाडली वीणाताई चे काम पुढे चालवायचा वसा घेऊन. 

 समाप्त:

©(ADP)

वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

प्रेमात पडताना

Post a Comment (0)
Previous Post Next Post