वास्तुशांती
✍️ अपर्णा पाटोळे
"हॅलोsss शेखर अरे किती वेळ लागणार आहे?
आज सकाळची OPD लवकर संपव म्हणून सांगितलं होतं ना तुला?
वास्तुशांतीला जायचं आहे मोसमीच्या घराच्या, उशीर होतोय !
विसरला नाहीस ना?"
"हो हो शेवटचे दोन पेशंट आहेत ते झाले की निघतोय".साडे अकराचा मुहूर्त आहे ना? पोहोचू आपण वेळेत! सगळं लक्षात आहे!"
"अरे दहा वेळा फोन येऊन गेला तिचा ताई कधी येताय दोघं? सगळी तयारी झालीय, ताई लाल रंगाची पैठणी घालून ये!"
आणि मग पुढे तिची बडबड काही थांबेल तर मोसमी कुठली!!
"हो हो आता तुझी बडबड थांबली तर मी लवकर निघू शकेन ना? "
"ओके ठेवते मी फोन तू लवकर निघ ,माझं आवरून झालंय!"
शेखर आणि मंजिरी ऋतुरंग सोसायटीत पोहोचले , विंग बी मध्ये शिरताच बोर्डवर नाव दिसलं *503: मोसमी राणा*
मंजिरी क्षणभर स्तब्ध होऊन त्या नावाकडे आनंदाने बघत राहिली.
"मंजिरीताई उशीर होतोय ना? सगळे खोळंबले आहेत ना आपल्यासाठी?"
"हो रे चल चल!!"
लिफ्ट पाचव्या मजल्यावर पोहोचली, सुंदर लाल रंगाची भरजरी साडी नेसून, नटलेली, गजरे माळलेली मोसमी दोघांच्या स्वागताला सज्जच होती!
मोसमीला पाहून मंजिरीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या.
"अगं ताई रडू नको बाई ,काजळ उतरलं बघ तुझं! फोटो नाही चांगला यायचा मग."
"अगं याला रडणं नाही म्हणत , आनंदाश्रू आहेत हे , या आनंदाला नजर लागू नाही ना कोणाची म्हणून ते येतात आपोआप!"
"बरं चल आत लवकर उशीर झालाय आधीच,
थांब थांब एक मिनिट ,येऊ नको."
मोसमीने पटकन कुंकू कालवलेलं एक तबक दारात आणून ठेवलं ,
"अगं हे काय आता?"
"हम्मम ,
डॉक्टर साहेब आणि तू एकेक पाऊल यात ठेवा आणि या कॅनव्हास वर तुमची पावलं उमटवा , ही लक्ष्मी नारायणाची पावलं ,मी फ्रेम करून घरात ठेवणारे!"
"काय गं ,काहीही?"
"ताई चल लवकर तुम्हाला पूजेला बसायचं आहे, दोघांना! "
शेखर आणि मंजिरी ने कुंकवाच्या तबकात पाय ठेऊन कॅनव्हास वर पावलं उमटवली आणि त्यांचा मोसमीच्या घरात गृहप्रवेश झाला!
मंजिरीने सांगितल्याप्रमाणे मोसमीने सगळी तयारी करून ठेवली होतीच, गुरुजी पण पोहोचलेच तितक्यात. मंजिरी आणि शेखर दोघांच्या जोडीने वास्तुशांतीचे विधी, पूजा यथासांग पार पडले.
शेखरला हॉस्पिटल visit, संध्याकाळची ओ पी डी अशी घाई होती म्हणून मोसमीला पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देऊन तो घाईने निघून गेला.
मोसमीच्या आग्रहाखातर मंजिरी आणखी थोडा वेळ थांबायला तयार झाली. त्याला कारणही खास होतं.
सगळी आवरा आवर झाल्यावर मोसमी म्हणाली, "ताई चल वस्तीत हे जेवण वाढून येऊ. मी कालच सांगून ठेवलंय. तुझ्या हातून हे पुण्य होऊ दे".
आगं माझ्या हातून काय? चल दोघी मिळून करू!!
जेवणाचे पॅकेट्स घेऊन दोघी वस्तीत पोहोचल्या, तेवढ्यात वस्तीतली चिल्ली पिल्ली पळत आलीच मोसमी जवळ .
"चलो चलो एकेक करके आजाओ , हा हा सबको मिलेगा,"
म्हणत मोसमी पदर खोचून मुलांना रांगेत उभं करून बाकीच्या लोकांना बोलवायला गेली.
रांगेतल्या मुलांना मंजिरीने पॅकेट्स वाटायला सुरुवात केली.
मोसमी बाकीच्या लोकांना गोळा करून घेऊन आली, तेवढ्यात रांगेत उभी राहिलेली दोघं मुलं भांडताना मोसमीने बघितलं, दोघंही एकमेकांना शिव्या देत भांडत होते, मोसमीच्या कानावर त्या शिव्या पडल्या आणि ती जोरात ओरडली ए ssss शिव्या देऊ नकोस , भांडायचं तितकं भांड पण शिव्या नाही द्यायच्या…. "
मोसमीच्या त्या वाक्याने मंजिरीला हसूच आलं एकदम!!
हसणाऱ्या मंजिरीला अंगठा दाखवत मोसमीही जोरात हसायला लागली.
हसणाऱ्या मोसमीला मंजिरी म्हणाली, "चक्क तू म्हणतीयस हे?"
"मग माझा आणि शिव्यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही आता, आता ना मी कोणाला कोसत ना कोणाला काही वाईट साईट बोलत, ताई तू म्हणाली होतीस ना, आपण जे बोलतो चांगलं किंवा वाईट ते काय फिरत रहात आणि ते आपल्याकडे परत येतं आणि आपलेच बोल आपल्याला लागतात! ते पटलंय मला, चांगलं बोललं तर चांगलंच पदरात पडतं आपल्या."
"हम्म तसं नाही ,आपण जे काही बोलतो ते या ब्रह्मांडात फिरत रहातं आणि त्या शब्दांच्या उच्चारांच्या लहरी आपल्याकडेच परत येतात आणि आपल्या शरीरावर मनावर त्यांचा परिणाम होतो. म्हणून नेहमी आपल्या मुखातून चांगले शब्द बाहेर पाडावेत मोसमी देवी."
"बरं माताजी" हसत हसत मंजिरी पुढे म्हणाली झालं असेल तर चला निघायचं का आता?
"होय चला…
तुला घरी सोडते तुझ्या आणि मी पुढे जाते,चल कॅब आलीच बघ."
दोघी निघाल्या आणि पुढे जाऊन कॅब सिग्नलवर थांबली तशी मोसमी मंजिरीला म्हणाली, "ताई ,याच सिग्नलवर पहिल्यांदा आपली भेट झाली ना ? आठवलं का?"
"हो हो चांगलंच आठवतंय, सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांच्या काचांवर टक टक करून टाळ्या वाजवत भीक मागणारी मोसमी!
माझ्याकडेही अशीच टाळ्या वाजवत भीक मागायला आली होतीस त्या दिवशी!
चांगली धडधाकट तरुण आणि भीक कसली मागतेय म्हणून रागच आला होता मला खूप आणि मी काहीही दिलं नाहीच आणि गाडीची काच खाली करून रागाने तुला निरखत राहिले फक्त , मी काही दिलं नाही शिवाय माझी ती रागीट नजर पाहून तू मला कोसू लागलीस ,मग मी आणखीनच रागावले आणि तुला म्हणायला लागले ,काम नको यांना आयतं हवं सगळं!"
"मग तर तुझा जो पारा चढला ….कोण काम द्यायला तयार असलं तर ना? आमच्या सारखे चालतील का ?कुट काम करायचं ?काय करायचं? लागलीय ग्यान शिकवायला आणि तुझ्या तोंडातून शिव्यांचा भडीमार चालू झाला!!"
तितक्यात सिग्नल सुटला पण मी त्या शिव्या ऐकून फार भडकले होते ,गाडी साईडला घेतली आणि तुझ्यावर जोरात ओरडले, "ए ssss काय समजते तू स्वतःला? भीक घातली नाही म्हणून तू कोसणार आम्हाला? आणि मग घाबरून तुला भीक घालायची आम्ही? फार झालं तुमचं!! तुही तावातावाने बोलायला लागलीस,मग आणखी शिव्यांची भर पडली!
ट्राफिक पोलीस पण आले आपली भांडणं सोडवायला ,ताई कुठं यांच्या नादी लागता ,चला गाडी काढा..
मी कुठली ऐकतेय ,तुझ्या दुप्पट आवाज चढवत ओरडले , ए sss भांडायचं तितकं भांड पण शिव्या नको देऊ sss .
शेवटी त्या ट्रॅफिक पोलिसाने कसं बसं दोघींना शांत केलं आणि मी गाडी काढली.
पुन्हा दोन तीन दिवसांनी मी शेखर बरोबर जात असताना तू सिग्नलला भेटलीसस , मला बघून परत फिरत होतीस पण मी तुला ए ss अशी हाक मारली आणि मी तुझ्या हातावर कार्ड ठेवलं आणि म्हंटलं काम करण्याची तयारी असेल तर या पत्त्यावर फोन करून भेटायला ये.
आणि दुसऱ्याच दिवशी तुझा फोन आला ,"ताई मी मोसमी बोलत हाय , सिग्नलवाली!
मी तिकडून म्हणाले ,मोसमी ss? कोण गं?
नाव कुठं माहिती होतं तुझं?
मग तू उत्तरलीस आव ताई शिव्या sss ,सिग्नल!!!
ते ऐकून माझी ट्यूब पेटली ,हम्म बोल काय?
ताई काम करायची इच्छा हाय ,तुम्ही म्हंटला होतात ना, फोन करून ये?
हो… काम करणारेस? भीक कोण मागणार मग? आयत मिळतंय ते सोडणा ssर?? आणि शिव्या कोण देणार ,लोकांना कोसणार कोण?
ताई खरंच काम करायची इच्छा आहे , तुमचा राग अजून बी गेलेला दिसत नई वाटतं!
राग नाही गं ,मला आश्चर्य वाटलं! बरं ये भेटायला या पत्त्यावर.
तू आलीस मी आणि शेखरने हॉस्पिटल कमिटी बरोबर वाद घालून तुला नोकरी मिळवून दिली, तू मनापासून काम करू लागलीस, कष्टाचं खाऊ लगलीस, नर्सिंगचा कोर्सही केलास पुढे! आता स्वतःचं छोटं घरटं ही उभारलंस!!"
"ताई काम करताना तुझे शब्द लक्षात ठेवले मी."
"मोसमी तू ना देवाने घडवलेली लिमिटेड एडिशन आहेस , पुरुषाची ताकद आणि स्त्रीचं कोमल मन याचं स्पेशल कॉम्बिनेशन आहेस, रुग्णांची सेवा कर मनापासून."
आणि इथपर्यंत पोहोचले बघ!
खरंच तुझ्यासारखे लोक आहेत म्हणून जगात चांगुलपणा आहे,देव आहे यावर विश्वास बसला माझा!!
माझ्यासारख्या अजून किती जणी असतील त्यांना पण तू भेटायला हवीस .
मी का? तू ही भेटलीस तर??
ताई खरंच गं मी तुझ्या मार्गाने चालायचा प्रयत्न करेन आता.
बरं बरं चल आलं तुझं घर!!
मोसमी गाडीतून उतरली आणि बाहेर येऊन मंजिरीच्या डोक्यावर ,गालावर हात फिरवत कडा कडा बोटं मोडत म्हणाली देव तुझं भलं करो , तुला सुखी करो!!
पाठमोऱ्या मोसमीला बघत मंजिरी तिला हसत हसत म्हणाली आता मी खरंच खूप सुखी होणार! हे शब्द ब्रह्मांडात फिरून त्याच्या लहरी तुझ्याकडे येणार!!
आणि मोसमी चालता चालता विचार करत होती
ताई खरंच तुझी माझी ती भेट घडली नसती तर काय असतं गं माझं आयुष्य? दुसर्यांना कोसणारी भीक मागून जगणारी आणि लोकांच्या चेष्टेचा विषय असणारी?
आता माझ्यासारख्या तृतीयपंथी लोकांना मानाने जगायला शिकवायचा वसा मी पुढे नेणार! समाजाशी कितीही भांडावं लागलं तरी मी आता हरणार नाही . पण भांडताना शिव्या नाई हा!! आणि मोसमी स्वतःशीच हसत हसत फ्लॅट नंबर 503 मध्ये पोहोचली आणि कॅनव्हासवरच्या त्या पावलांपुढे नतमस्तक झाली.
आणि वास्तुशांती सफळ संपूर्ण झाली.
©अपर्णा…(ADP)
वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
ही कथा वाचून पहा.