आनंदाची बाग

       *आनंदाची बाग*

✍️ स्मिता मुंगळे 

      चालता चालता रमा आज बरीच लांब आली होती. विचारांच्या नादात आपण किती चालतो आहोत याचे भान तिला राहिले नाही. थंडीचे दिवस असल्याने अजून नीट उजाडले देखील नव्हते.तिला वाटले चालताना पावलांबरोबर मनसुद्धा गती घेते की काय? बऱ्याच वेळा चालताना पावलांची गती मंदावली तरी मन मात्र वेगाने भूतकाळात धाव घेत असते.

        चालताना समोर कोर्टाची इमारत दिसली आणि नकळत तिच्या मनात सकाळी सकाळी कडवटपणा भरून आला.खरे तर किती वर्षे लोटली त्या घटनेला पण आजही ही कोर्टाची इमारत दिसली की जुन्या जखमेवरची खपली निघते आणि ती जखम पुन्हा भळभळा वाहू लागते.याच कोर्टात राकेशशी घटस्फोट होईपर्यंत तिने अनेकदा चकरा मारल्या होत्या. इथेच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती आणि कायद्याने रियाचा ताबा मिळेपर्यंत कित्येक रात्री तिने जागून काढल्या होत्या.शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात ते किती खरंय हे तिने अनुभवले होते.

        आधी राकेशबरोबर वाद विवाद, भांडणं आणि त्यानंतर तिचं रियाला घेऊन माहेरी निघून जाणं. हाच का तो राकेश,ज्याच्यावर आपण कॉलेजमध्ये असल्यापासून जीवापाड प्रेम केलं..हा प्रश्न तेव्हा तिला रोज नव्याने पडत असे. किती छान होते ते कॉलेजचे दिवस.आई बाबा पुन्हा पुन्हा विचार कर म्हणून सांगत होते पण आपला राकेशवर,स्वतःच्या निवडीवर कोण विश्वास. आता वाटते आई बाबा सांगत होते ते त्यांचे अनुभवाचे बोल होते,तेव्हाच आपण त्यांचं ऐकायला हवं होतं.पण राकेशच्या प्रेमाचं भूत आपल्या मानगुटीवर सवार झाले होते ते काही केल्या उतरत नव्हते.

      लग्नानंतर मात्र काही वर्षातच राकेश बदलला.पण तोपर्यंत रमाला ती आई होण्याची चाहूल लागली होती.सुरुवातीला राकेशही खुश वाटला पण लवकरच त्याची गाडी पुन्हा रुळावर आली.मानसिक ताणतणाव आणि काळजी यामुळे रिया सातव्याच महिन्यात जन्माला आली. बरेच दिवस तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले.त्या काळात आई बाबांची खूप धावपळ झाली पण त्याही परिस्थितीत राकेश नीट वागला नाही. त्याची मनमानी सुरूच राहिली.आई बाबा जवळ नसते तर तिने एकटीने कसे निभावले असते देव जाणे,असा विचार त्या काळात कित्येक वेळा तिच्या मनात येवून जाई.राकेशच्या अशा विचित्र वागण्याने त्याचे आई बाबा देखील त्यावेळी गावाकडून आले नाहीत.ती बाळंतपणात माहेरी असताना एकाच शहरात असूनदेखील तो आठ आठ दिवस तिला आणि बाळाला बघायलाही येत नसे.त्याच्या अश्या वागण्याने तिचे आई बाबा देखील काळजीत पडले.बाळ तीन महिन्याचे झाले तरी राकेश तिला घरी घेऊन जायला तयार होईना तसे "राकेश,मला आपल्या घरी यायचे आहे,लवकरच" असे रमानेच त्याला सांगितले. तरीही आज उद्या करत त्याने आठ दिवस लावलेच.शेवटी एकदाची रमा तिच्या बाळासह तिच्या घरी परतली. लेकीच्या सहवासात तरी राकेश पहिल्यासारखे आपल्याशी नीट वागेल अशी तिला आशा होती.पण त्याचे वागणे काही बदलले नाही.

      रियाच्या बाललीला अनुभवण्यात,तिचे हवे नको बघण्यात रमाला दिवसाचे चोवीस तास कमी पडू लागले.हळूहळू राकेशचे वागणे देखील तिच्या अंगवळणी पडले होते. दिवसेंदिवस त्यांच्यातील बदल तिला जाणवू लागला होता. तो फारसा घरात थांबतच नसे.त्यातच तिच्या एका मैत्रिणीकडून राकेश त्याच्या ऑफिसमधील एका स्त्री सहकाऱ्याबरोबर बरेचदा दिसतो असे तिला कळाले होते. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा या हेतूने तिने एके दिवशी त्याला घरी आल्यावर विचारलेच.

      "राकेश मला तुझ्याशी थोडं बोलायचे आहे",असे तिने म्हणताच तिच्याकडे न पाहताच "नंतर बोलू,मी आत्ता थोडा गडबडीत आहे",असे म्हणून तो बाहेर जाणार तोच रमाने त्याला अडवले.

    "रमा,हा काय वेडेपणा चालवला आहेस?" राकेश तिच्या अंगावर ओरडत म्हणाला."अरे,मी वेडेपणा आधी केला आहे,आता खरी शहाणी झालीये.तुझ्यावर वेड्यासारखा विश्वास ठेवत होते पण तू माझा विश्वासात केलास."एवढे बोलतानाही रमाला रडू येत होते."कुठे कमी पडले रे मी?काय कमी आहे माझ्यात म्हणून तू ऑफिसमधल्या तुझ्या कलीग बरोबर फिरत असतोस.बरेच दिवस बघतीये तुझे वागणे.खरे तर तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवे होते.पण प्रेम केलं होतं ना रे मी तुझ्यावर. तू फक्त माझाच आहेस हे गृहीत धरून चालले होते,चुकलेच माझे." रमाचे असे तावातावाने बोलणे राकेशला अनपेक्षित होते.त्यामुळे सुरुवातीला तो गोंधळून गेला.पण केव्हातरी अशी वेळ येणारच याची त्याला कल्पना होती. आपल्या वागण्याचे कोणतेही स्पष्टीकरण न देता तो बाहेर निघून गेला.

      रमा हतबद्ध होऊन सोफ्यावर बसून राहिली.रियाच्या कळवळून रडण्याने ती भानावर आली.तिला खूप अपराध्यासारखे वाटले.या लेकराचा काय दोष? अलीकडे राकेशच्या अशा वागण्याने आपली खूप चिडचिड होते आणि मग रियाकडे दुर्लक्ष. रियाला जवळ घेताक्षणी ती हसू लागली तेव्हा त्या निरागस हास्यात रमा क्षणभर सगळं विसरून गेली.

    नंतर काही दिवस असे प्रसंग नित्यनेमाचे झाले आणि एका क्षणी रमाने निर्णय घेतला.राकेश तिच्या निर्णयाने काही फरक पडेल अशी तिची अपेक्षाच नव्हती."राकेश,उद्या मी रियाला घेऊन आई बाबांकडे जातीये.... कायमची",या रमाच्या बोलण्यावर फक्त 'हम्म' एवढीच काय ती त्याची प्रतिक्रिया होती.तिच्या जाण्याचे त्याला ना दुःख होते ना आनंद.रमाला वाटले कोणत्या मातीचा बनलाय हा माणूस,ज्याला बायको आणि मुलगी लांब जातानाही काहीच वाटत नाहीये.आपली निवड किती चुकीची होती याची तिला पुन्हा नव्याने जाणीव झाली.तर एक मन सांगत होते, परिस्थितीनुसार माणसं बदलतात.पण म्हणून एवढं बदलावं माणसाने?

        रात्रभर ती कूस बदलत राहिली.तिचं आणि राकेशचे घर पुन्हा पुन्हा डोळे भरून मनात साठवून घेऊ पाहत होती ती.ज्या घरात तिच्या डोळ्यांत संसाराची अनेक स्वप्न उमलली त्याच घरात आज ते डोळे अश्रू गाळत होते.आज रात्रदेखील मोठी झाली की काय असा विचार तिच्या मनात आला.

       सकाळी तिने मोजकेच सामान आणि लेकीसह घर सोडले.तिला निरोप देण्यासाठीसुद्धा थांबण्याचे कष्ट राकेशने घेतले नाहीत.उद्विग्न मनस्थितीमध्ये ती माहेरी आली.तिची ती अवस्था बघून पहिले दोन तीन दिवस आई बाबांनी तिला काहीच विचारले नाही.तिची भली मोठी जड बॅग बरंच काही सांगून जात होती. हळूहळू त्यांना रमानेच घडलेली हकीकत सांगितली. सगळे ऐकून ते देखील हतबद्ध झाले.

        कॉलेज संपल्यावर लगेच लग्न,पाठोपाठ बाळांतपण यामुळे रमाला नोकरी करता आली नव्हती.पण त्यावेळी तशी गरज देखील वाटली नाही पण आता आर्थिकदृष्ट्या आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. नोकरी शोधण्यासाठी रोज नव्याने प्रयत्न करू लागली.रिया आजीजवळ मजेत राही पण रियाच्या आईलाच आता नवीन जबाबदारी नको होती.काही दिवसातच रमाला याची जाणीव झाली. नुकतीच रमाने एका संस्थेत दिलेल्या मुलाखतीमधून तिची निवड झाल्याचे तिला समजले होते.आता प्रश्न होता तो फक्त आई बाबांना समजावून सांगण्याचा.पण ते कामही वाटले तेवढे अवघड नव्हते.लवकरच रमा रियासह आश्रमात रहायला आली.

      "आनंदाश्रम".....अगदी नावाला साजेशी जागा.रमा इथे आली तेव्हा अगदी छोट्या जागेत असणारा हा आश्रम आज दुमजली इमारतीच्या रुपात उभा आहे.या वीस वर्षातील या स्थित्यंतराची रमा साक्षीदार होती.

      लांब फेरफटका मारून ती आश्रमाच्या जवळ आली तशी "आनंदाश्रम " चा बोर्ड तिला लांबूनच दिसला."खरंच आज आपण हे जे आनंदी आयुष्य उपभोगतो आहोत ते या 

आनंदाश्रमामुळेच ",रमा मनात विचार करत होती.

ती गेटमधून आत आली तर दोघी तिघी आज्या आश्रमाच्या आवारात कोवळ्या उन्हात योगासने करत होत्या.एक आजोबा एकटेच प्राणायाम करत होते.रमाच्या मनात आले,कित्येक वर्षांपूर्वीची जखम आपण आजून कुरवाळत बसलो आहोत,त्या जुन्या जखमांवर रोज मलमपट्टी करतो आहोत आणि इथे आपल्या आजूबाजूला ही वृद्ध मंडळी सगळी कर्तव्य पार पाडून देखील आपल्याच पोटच्या मुलांकडून दुर्लक्षित होऊन,अवहेलना सहन करून देखील या वयात पुन्हा नव्याने आनंदी जीवन जगू पहात आहेत.कुठून येत असेल यांच्यात एवढी सकारात्मकता? 

      एवढे वर्ष यांच्या सहवासात राहून जर आपल्याला असं आहे ती परिस्थिती स्वीकारून आनंद शोधणं  जमत नसेल तर काय उपयोग? दोन वर्षांपूर्वी रिया उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली तेव्हापासून आपलं असं भूतकाळात हरवणं आणि त्या कटू स्मृती उगाळण चालू आहे.का तर रियाने भारतात परत यायला नकार दिला, लग्नच करणार नाही म्हणाली म्हणून. का करावं वाटेल तिला लग्न? कळत्या वयापासून आई वडील विभक्त झालेलेच तर बघितले आहेत तिने.आपण तरी तिच्याकडून का जास्त अपेक्षा ठेवतोय?प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे की.आपण तरी त्यावेळी आई बाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेतला.आता वाटतं,कदाचित तो गैरफायदा होता का?

      ती आश्रमात शिरणार तो बाजूच्या बागेत एक आजोबा माळ्याकडून नवीन फुलझाडं लावून घेत होते. झाडांना खत,छाटणी याविषयी सूचना देत होते.तिला उगाच हसू आलं.परवा हेच आजोबा सांगत होते, म्हणाले....आमच्या बंगल्याभोवती मी मस्त बाग केली होती. कित्येक प्रकारची सुगंधी फुलझाडं, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब,जास्वंद मी स्वतः लावले होते.आता बाग बहरली आहे,झाडं छान रुजलीयेत पण नाईलाजाने मी मात्र आज या वृद्धाश्रमात आलोय.मुलाच्या,सुनेच्या व्हाट्सअप डीपीमध्ये मला माझी बहरलेली बाग दिसते.बोलताना नकळत त्यांचा स्वर कातर झाला.

        आणि आज हेच आजोबा इथे बागकामाची हौस भागवून घेतायेत. कुठून येत असेल ही ऊर्जा? नातवंडांना गोष्टी सांगण्यासाठी आसुसलेले पाच नंबर रुममधल्या आजीचं मन त्या आश्रमातील इतर मंडळींना पुराणातल्या गोष्टी सांगत रमवतात. सुगरण असलेल्या आणि आजही घरातल्या माणसांना गरमागरम पदार्थ करून जेवू घालण्याची इच्छा आणि धमक असणाऱ्या दुसऱ्या मजल्यावरच्या रुममध्ये राहणाऱ्या आजी कधीतरी इथल्या स्वयंपाकघरात  आपले पाककौशल्य आजमावत.असे कित्येकजण आपण रोज अनेक वर्षे बघत आलो आहोत मग का आपल्या जखमेवरची खपली आपणच रोज नव्याने काढतो आणि स्वतःला शिक्षा देत रहातो.

      परवा आश्रमात व्याख्यान द्यायला आलेल्या त्या बाईंनी नाही का सांगितले....."माफ करायला शिका.जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला माफ करत नाही तोपर्यंत आपली जखम भरत नाही." या सगळ्या वृध्द मंडळींनी तर हे पूर्वीच अमलात आणले आहे. मग आपणच मागे का?

      मनाशी काही ठरवत रमा तिच्या कामाला लागली.आता तिला रिया भारतात परत न येण्याचे दुःख नव्हते ना तिच्या लग्न न करण्याची काळजी होती.आता ती राकेशने दिलेल्या दुःखद आठवणींना उगाळत बसणार नव्हती की त्याला बोल लावत बसणार होती.आता तिच्या अवतीभवती असणाऱ्या आनंदाश्रमातील सदस्यासोबत ती एक नवी बाग फुलवणार होती ...."आनंदाची बाग".

   सौ.स्मिता मुंगळे.

वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

        


Post a Comment (0)
Previous Post Next Post