मोकळा श्वास आणि आत्मविश्वास

  मोकळा श्वास…. आणि आत्मविश्वास 

✍️ अपर्णा पाटोळे

      घरातली सगळी कामं,सासू सासऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या , औषधांच्या जबाबदाऱ्या पार पाडून दुपारच्या वेळी मानसी पडल्या पडल्या सोशल नेटवर्कवर टाईम पास करत होती. 

  जसं लग्न झालं तसं संसाराच्या व्यापात सगळ्या मित्र मैत्रिणींशी संपर्कच राहिले नव्हते. पण सद्ध्या सोशल मिडियावर अॅक्टिव्ह होऊ लागल्यामुळे कितीतरी जुन्या मैत्रिणींशी ती नव्याने कनेक्ट झाली होती.

तितक्यात तिला तिच्या शाळेच्या दिवसातल्या जिवश्च कंठश्च  मैत्रिणीचं स्टेटस दिसलं. मिसिंग यू प्रितम इटस् बीन थ्रि इअर्स  लाईफ इज रनिंग बट नाॅट फाईन वीद आऊट यू.

  तिची ती जिवश्च कंठश्च मैत्रिण म्हणजे *रेवा*. 

   त्यांच्याच सोसायटीत रहाणारी. दोघी एकाच शाळेत नंतर काॅलेजलाही एकत्रच.  आणि एक त्यांच्याच ग्रुप मधल्या प्रितमच्या ती प्रेमात पडली होती. पुढे दोघांनी लग्नदेखील केलं. 

खरं तर प्रितम होताच तसा उंच पुरा, गोरापान काळेभोर सिल्की केस अगदी एखाद्या हिरो सारख्या रूबाबदार व्यक्तिमत्वाचा, चेहऱ्यावर  खानदानी श्रीमंतीचे तेज झळकायचे त्याच्या. बाईकवरून काॅलेजमधे त्याची एन्ट्री व्हायची तेव्हा अशी एखादी क्वचितच असावी जी त्याला बघणे टाळेल. 

  इतर मुलींसारखाच मानसीच्याही तो मनात भरला होता, फर्स्ट इअर पासून . 

  पण मानसीचा स्वभाव भिडस्त शांत मनातलं मनात साठवणारी त्यामुळे प्रितमवरचे प्रेम ती कोणाजवळच व्यक्त करू शकली नाही. 

  रेवा अतिशय बडबडी ,चंचल मनात काही न ठेवणारी. दिसायला ही सुंदर वागायला बोल्ड, उंची रहाणीमान!!

  तिचा देखील प्रितमवर जीव जडला होता. एक दिवस बिनधास्त सगळ्यांसमोर तिनं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं!!

 काॅलेजच्या ब्युटी क्वीनला प्रितम नाही म्हणूच शकला नाही. 

   मग काय दोघांचं वेगळं प्रेम विश्व तयार झालं आणि ते ग्रुपमधून थोडे बाहेर पडल्या सारखे झाले.

अलिकडं रेवाला प्रितम मिळाल्यानं मैत्रिणीची ही गरज भासत नव्हती. 

  लास्ट इअर संपताच दोघांनी लग्न केलं. 

  मानसीने मास्टर्सला अॅडमिशन घेतली. तिलाही स्थळं बघणं चालूच होतं. मानसीचं रहाणीमान साधं होतं तरी दिसायला नाके डोळी रेखीव होती,  तिचं सात्विक सौंदर्य कोणालाही आवडेल असंच होतं. विवाह नोंदणी कार्यालयात तिचं नाव घातलं होतंच 

   जहागिरदार इंडस्ट्रीजच्या एकुलत्या एक मुलासाठी  अनिरूद्धसाठी तिला पसंती आली, मुलगी इतक्या मोठ्या घरात पडतीय! तिच्या आई वडिलांना आकाश ठेंगणं झालं अगदी!!

   आणि लग्न होऊन मानसी जहागीदारांची सून होऊन  तिच्या संसारात अडकली. 

  पण सगळं चित्र वेगळंच होतं 

    लग्न झाल्यावर तिला कळलं जहागीरदार शेअर बाजारात पुरते बुडाले आहेत! जहागीरदार  कर्जबाजारी झाले आहेत. जहागीरदार इंडस्ट्री डबघाईला आली आहे!

  त्याचा परिणाम अनिरूद्धच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक झाला आणि ते बेड रिडन झाले. त्याच्या आईने ही या सगळ्याचे टेंशन घेतलं आणि त्या देखील खचून गेल्या कुठले ना कुठले आजारपण त्यांच्या सारखे मागे असायचंच सगळी जबाबदारी आणि त्यांची कुरकुर अनिरूद्धवर पडली. 

  आई वडिलांची सेवा, त्याचं घर सांभाळायला त्याने अगदी योग्य, मानसीसारखी मुलगी हेरून आणली होती. 

  मानसी लग्न होऊन जहागिरदारांच्या घरी आली. 

सासू सासऱ्यांची सेवा घरातली कामं या सगळ्यातून तिला तिचं करिअर तिचे छंद सगळं मागे टाकावं लागलं. 

    हळुहळु अनिरूद्धचा बिझनेस परत सावरु लागला! 

  आणि तो जास्त वेळ घराबाहेरच असायला लागला. मानसीसाठी वेळ न देण्याची कारणंही त्याला मिळू लागली. खरंतर असल्या साध्या, मध्यमवर्गीय विचारांच्या मुलींमध्ये त्याला कधी इंटरेस्ट नव्हताच पण त्या वेळेची गरज म्हणून मानसीला बरोबर त्यानं हेरलं होतं. पत्नी म्हणून अनिरुद्धच्या नजरेत ती कधी भरलीच नव्हती.

   लग्ना नंतरचे काही थोडेच दिवस दोघं एकमेकांच्या सहवासात राहिले असतील. त्या सहवासातून एक अपत्य जन्माला आलं. 

आधीच साधं रहाणीमान त्यात तिच्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या, मुलाचे संगोपन  या सगळ्यात मानसी स्वतःकडे लक्षच देऊ शकत नव्हती. तिच्या अवतारातल्या रहाणीमानामुळे अनिरूद्ध ऑफिस पार्टीजला काॅन्फरंन्सला तिला बरोबर घेऊन जाणे टाळू लागला. अनिरुद्धच्या वागण्याने, झालेल्या फसवणुकीमुळे आणि नोकरी न करण्याच्या अटीमुळे ती आत्मविश्वास गमावून बसली!!

  बाहेर ऑफिसमधली सेक्रेटरी, रिसेप्शनिस्ट यांना बरोबर घेऊन अनिरुद्ध मजेत जगत होता 

  दर पंधरा दिवसांतून त्याची परदेशी काॅन्फरन्स असायचीच. दर वेळेला नविन सेक्रेटरी त्याच्या बरोबर असायच्या. 

  मानसीला या सगळ्याची कुणकुण लागलीच होती. पण तिच्या स्वभावानुसार  त्याला काही बोलू शकत नव्हती. जे आहे जसे आहे ते आपले नशिब त्यातून सुटका नाही असा विचार करून एकेक दिवस ढकलत होती.

   आज अचानक तिला रेवा आणि प्रितम बद्दल कळलं आणि ती जुन्या आठवणीत रमून गेली होती. जुने कॉलेजचे दिवस , तेव्हा पाहिलेली करिअर घडवण्याची  स्वप्न आठवून

तिला रेवाला भेटण्याची तीव्र ईच्छा झाली.

  आणि प्रितमबद्दल ऐकून फारच धक्का बसला. रेवाला आत्ताच्या आत्ता भेटून घट्ट मिठी मारावी तिला वाटत होतं. पण रेवा तर पुण्याला होती. मानसी लग्न होऊन मुंबईला आली होती. पुण्याला जायचं म्हणजे एक अख्खा दिवस जाणार तरी तिने मनाशी ठरवलंच उद्या आपण सकाळी लवकर पुण्याला जायला निघायचंच!

 रेवाला मेसेज ही केला . तिच्याकडून तिचा अॅड्रेस फोन नंबर घेतला आणि ति जायची तयारी करू लागली.

  तेवढ्यात अनिरूद्धचा फोन आला, "बॅग भरून तयार ठेव दिल्लीला काॅन्फरन्स साठी जातोय." 

  तिने त्याला फोनवर सांगितलं मी पुण्याला जातीय उद्या  . त्यावर तिला ऐकायला मिळालं आई बाबांना अशी कशी सोडून जाऊ शकतेस तू?  इतकं महत्वाचं आहे का मैत्रिणीला भेटणं? 

  त्यावर ती नकळत बोलून गेली सुरेखाला ठेवीन सोबतीला. शिवाय यश ही येतोय उद्या काॅलेज ट्रिप वरून.

  त्याच्या डाॅमिनेटींग बोलण्याला पहिल्यांदा तिनं शांतपणे प्रत्युतर केलं. 

   अनिरूद्ध एकटा तर नसेल जाणार दिल्लीला, बरोबर कोणीतरी असणारच तिला खात्री होती. 

  या निर्लज्ज माणसाला काहीच कसं वाटत नाही किती फायदा घेत आलाय माझ्या गप्प बसण्याचा.

 म्हाताऱ्या आई वडिलांना माझ्या स्वाधीन करून हा बाहेर मस्त मजा मारतो  कॅन्फरन्सच्या लेबल खाली. 

  त्याला ना बायकोची, आई वडीलांची ना संसाराची, मुलाची चाड आहे. वर म्हणायला मोकळा तुला तुझ्या माहेरच्या तुलनेत काही कमी पडतय का? 

    विचार करता तिच्या डोक्यात तिडीकच भरली. थोड्या वेळाने तिनं स्वतःला सावरलं. 

  मनाशी पक्कं केलं आपण जायचंच. सुरेखाला सगळ्या सुचना दिल्या, समजावलं !

 आई बाबांना सांगितलं  अन् त्यांची चिडचिड तिला अपेक्षित होतीच. पण ती डगमगली नाही. 

दुसर्या  दिवशी लवकर आवरून तिनं बस पकडली. 

  कितीतरी वर्षांनी ती अशी एकटी बाहेर पडली होती. 

  रेवाला फोन करून कळवलं मी निघालीय.

  तिने उत्तर दिलं मी तुला स्टेशनवर घ्यायला येते!

  रेवाशी बोलणं झाल्यावर मानसीने फोन स्वीच्ड ऑफ करून पर्समधे ठेऊन दिला. अनिरूद्धचा फोन आला तर काहीतरी डोकं फिरवणारं ऐकावं लागेल म्हणून . 

   खिडकीतून येणारी सकाळची ताजी हवा , निसर्ग एन्जाॅय करत तीन तीस कधी संपले कळलंच नाही. रेवा आलीच होती तिला घ्यायला. इतक्या वर्षांनी दोघी एकमेकींसमोर आल्या. कडकडून मिठी मारून भेटल्या. रेवाच्या घरी पोहोचल्या . प्रशस्त बंगला, दिमतीला नोकर चाकर रेवाचं घर फार छान होतं. प्रितमचे आई वडिल देखील त्यांच्या लग्नानंतर दोन चार वर्षात पाठोपाठ वारले. तिला मुल बाळ ही झालं नाही त्यामुळे एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच रहात होती. 

पण एकटेपणाला कवटाळून न बसता ती सावरली !!

स्वतः मधला  आत्मविश्वास ढळू न देता प्रितमचा बिझनेस सांभाळत कामात स्वतःला गुंतवून ती आनंदात जगत होती हे मानसीने पारखले. 

दोघींच्या गप्पा चालू झाल्या जुन्या आठवणी काॅलेजचे मित्र मैत्रिणी असे बरेच विषय होतेच!!

  प्रितमच्या आठवणीने दोघीही खुप रडल्या. मानसीसाठी रेवाने स्वतः खास बेत केला होता. ती किचन मधे गेली जेवणाची तयारी करायला तेवढ्यात मानसीने सहज फोन चालू केला तर तितक्यात अनिरूद्धचा फोन आलाच,  "आई बाबांना मोलकरणीच्या भरोशावर सोडून आलीस"!! म्हणून त्याने बरच काही सुनावलं तिने फोन बंद करून सायलेंटवर टाकला. पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली ती रेवाच्या नजरेतून सुटली नाही. 

रेवाने तिला विचारलं त्यावर मानसीने सगळी तिची हकीकत सांगितली. अनिरूद्धच्या घरात ती कसं स्वतःचं अस्तित्व हरवून बसली आणि माणसात राहून देखील कशी एकटेपणाचे दिवस ढकलतीय ,अनिरूद्ध तिच्या रहाणीमानावरून कसं तिला हिणवतो! नवरा असताना देखिल ती विरक्त आयुष्य जगतीय!

सगळं सांगून मानसीला फार मोकळं वाटायला लागलं. या गोष्टी ती कोणाजवळ बोलू शकत नव्हती ते ती आज रेवाशी बोलली.  माहेरी आई वडिलांना काही सांगितलं तर त्यांचं उत्तर हेच असायचं घरच्या बाईने सगळं सावरून घ्यावं लागतं! दाग दागिने, पैसे सगळं असताना रडत का बसावं!!

मुलीचं लग्न करून आपली जवाबदारी संपली आशा मानसिकतेच्या आई वडिलांना तरी काय बोलावं? विचार करून नेहमीसारखीच गप्प राहिली.

  

   अनिरूद्धचे फोनवर फोन  येतच होते तिने फोन रिसिव्ह केला. त्याने संतापून मोठ्या आवाजात तिला परत सुनावलं आज तिचाही पारा चढला तु काॅन्फरन्सच्या नावाखाली तुझे  आजारी आई वडील माझ्यावर सोपवून कोणाकोणाबरोबर मजा मारायला जातोस मला माहितीय सगळं. इथून पुढे मी तुझ्या परवानगीने कुठे जायला मी तुझी बांधील नाही. तुझे आई वडील तुझी जवाबदारी आहे माझी नाही. यश ही मोठा झालाय त्याला आईची गरज नाही आता. वडील म्हणून तू त्याच्या बाकीच्या गरजा पुरवायला खंबीर आहेस .

  समाजाला दाखवण्यापुरत्या नात्यात मला आता नाही रहायचं. तुझ्या दृष्टीने मी गबाळी भोळसट बावळट असेन पण मी आता स्वाभिमानाने पुढचे आयुष्य जगेन. आई वडिलांची सेवा आणि घरकामं करायला एखादा नोकर तुला मिळू शकेल आणि फोन ठेऊन दिला. 

  रेवाने  सगळं ऐकलं होतं. ती रेवाला म्हणाली बरेच वर्ष बरंच काही सहन केलं आता मात्र सगळे बंध मी सोडून टाकायचे ठरवलय. 

  रेवा तुझ्या ओळखीने मला एखादी नोकरी बघ मी आता मुंबईला परत जाणारच नाही. त्यावर रेवा म्हणाली, "अगं माझ्याच ऑफिस मधे तू माझी असिस्टंट म्हणून जाॅईन हो की.  तुझी हुशारी माझ्या बिझनेसला नक्कीच उपयोगी पडणारी आहे."

    त्याप्रमाणे मानसीने रेवाचे ऑफिस जाॅईन केलं . दोघींनी कष्टाने त्यांच्यातल्या आत्मविश्वासाने कंपनीचं नाव मोठं केलं. 

दोघी एकमेकींना भेटून खुप आनंदात होत्या मानसीच्या सहवासाने रेवाचा एकटेपणा दूर झाला तर मानसीला रेवाच्या सानिध्यात मोकळा श्वास घ्यायला मिळत होता. आणि तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला!! त्या आत्मविश्वासात ती भरभरून आयुष्य जगू लागली.

©अपर्णा….(ADP)

वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

या लेखिकेची पुढील कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

👇

https://www.shabdchapha.com/2022/12/blog-post_29.html

Post a Comment (0)
Previous Post Next Post