फोबिया

   फोबिया......

योगेश साळवी 

     आपली ज्युपिटर स्कूटी काढायला दिव्या इमारतीच्या पाठच्या बाजूला आली आणि तेवढ्यात तिला ते दृश्य दिसलं. एक लहानसे मांजराचे पिल्लू बिचारे  कोणाच्यातरी गाडीखाली येऊन चेंगरलेलं होतं. त्याच्या गतप्राण झालेल्या कलेवारापाशी काळ निळं पडलेलं रक्त साचलेलं होतं आणि त्या भोवती माशा घोंगावत होत्या. ते दृश्य पाहताच दिव्याच्या ओठांना कोरड पडली. पोटात मळमळायला लागलं.. उलटीची भावना झाली. चक्कर येऊन पडतो की काय असं वाटायला लागलं. शेवटी न राहवून ती तशीच परत फिरली आणि घराकडे जाण्यासाठी वळली.

      सात आठ वर्षापासून रक्त मग ते कुठूनही आलेलं असो तिला अशीच भीती वाटायची. कपाळावर दरदरून घाम फुटायचा. चक्कर यायची. मग बराच वेळ काही न करता दिव्या गप्प डोळे मिटून पडून राहायची.... सिलिंग फॅन चा वेग वाढवून... तिला आठवलं... आठ वर्षांपूर्वीची गोष्ट ...शेजारच्या चौबळ काकू ... रेल्वेमधून उडी मारून का रेल्वे ट्रॅक वर स्वतःला लोटून देऊन... त्यांनी आत्महत्या केलेली. दोन मुलांच्या त्या चांगल्या बाईला कसलंस वैफल्य आले म्हणे. त्यातच त्या बाईंने स्वतःचं जीवन संपवलं. पण मग नंतर त्यांचा तो तुकडे तुकडे झालेला देह... त्यावर टाकलेली ती पांढरी चादर आणि त्याचा पडलेला तो ठळकपणे दिसणारा रक्ताचा डाग... दिव्या शेजारी गेलेली त्यांच्या घरच्यांच्या सांत्वनाला पण मग विमस्कपणे त्या 

डागा कडेच पाहत राहिलेली बराच वेळ.

        त्या दिवसापासून मग रक्त ....मग अगदी हातावर मारलेल्या डासाचे का असेना ज्योतीला नकोसे वाटू लागलं.

महिन्याच्या त्या महत्त्वाच्या चार दिवसात स्वतःच्याच रक्ताचा त्रास होऊ लागला. तरी बरं हा त्रास सुरू होण्याआधी देवाने तिच्या पदरी  'श्रीपाद ' चे तिच्या गोड मुलाचे दान टाकलं होतं. पण आत्ताच्या तर दिव्याला वाटू लागलेलं की देवाने रक्त निर्माण नाही केलं असतं तर चाललं नसतं का...??

       टीव्हीवर जाहिरातीत पण रक्त दाखवतात. मारधाडीचे रक्तपात असलेले चित्रपट लागले की टाळायची च दिव्या...

मराठी ,हिंदी  सिरीयल मधील खोटा रक्ताचा आभास पण तिला नकोसा असायचा. डॉक्टरांकडे वगैरे जायचं झालं की मग आशिष.. तिचा नवरा खास तिच्याबरोबर यायचा... सोबत म्हणून. हो रक्ताची बाटली किंवा सिंरीज पाहिली तरी बीपी ची पातळी लगेच खाली यायची तिची... आणि मग गरगरायला लागायचं. एका प्रसिद्ध मानसोपचार तज्ञाकडे नेलं होतं तिला... तेव्हा त्यांना निदान केलेलं की रक्ताचा फोबिया झाला यांना.

        विमनस्क अवस्थेत दिव्या सोफ्यावर रेलून बसली असताना अचानक मोबाईल वाजला. ज्योतीचा.. तिच्या कामवाल्या बाईचा फोन होता. गेल्या चार दिवसापासून ज्योती कामावर आली नव्हती. बरं झालं... तिला विचारून घेऊ काय झालं ते दिव्याच्या मनात आलं.

      पटकन दिव्याने फोन उचलला.

     " बाईसाहेब,  माझ्या मुलीचा एक्सीडेंट झाला आहे दोन दिवसापूर्वी रस्त्यात बॉल आणायला म्हणून गेली आणि गाडीने उडवलं तिला. बरं झालं गाडीवाला भला माणूस होता.. मनाने आणि पैशाने पण श्रीमंत होता. गलती पोरीचीच होती तरी पण त्या माणसाने तिला गाडीत घालून हॉस्पिटलला भरती केलं. हॉस्पिटलचा खर्च पण त्या भल्या माणसाने केला. पण अंगातून बरेच रगात गेले तिच्या... आणि नेमके आज तिला लागणाऱ्या रक्तगटाची कमतरता आहे. संध्याकाळला ऑपरेशन आहे तिचं.. डॉक्टरांनी कोणी डोनर मिलतो का... बघायला सांगितले. काय करता येईल का... मला माझी मुलगी गमवायची नाही हो...." बोलता बोलता ज्योतीला हुंदका फुटला. पुढचं काहीच ती बोलू शकली नाही.

        "हे बघ ज्योती, तू आवर घाल स्वतःला. तूच धीर सोडला तर कसं चालायचं?? मी माझ्यातर्फे पूर्ण प्रयत्न करते. देव आहे तुझ्या पाठीशी. संध्याकाळपर्यंत जमवू काहीतरी..." दिव्याने ज्योतीला धीर दिला आणि मग तिच्याकडून मुलीला ऍडमिट केलं त्या इस्पितळाचा पत्ता, फोन नंबर, डॉक्टरांचे नाव...  माहिती लिहून घेतली.

          रेशमाचा... ज्योतीच्या मुलीचा चेहरा दिव्याच्या नजरेसमोर आला. अवघी सात-आठ वर्षाची रेशमा ज्योती बरोबर कधीकधी कामाला यायची. कामाला हातभार लावायची. अगदीच काही नसलं तर मग  'श्री ' शी दिव्याच्या मुलाशी खेळायची. मुन्सिपाल्टीच्या शाळेत शिकणारी रेश्मा चुणचुणीत होती. पोरीचे ऑपरेशन काही विघ्न न येता पार पडायला हवं. रेशमासाठी हव्या त्या रक्ताची सोय करायला हवी.

          रक्त..?? कोण देणार रक्त आयत्यावेळी..?? दिव्याने रक्ताचा तो नकोसा विचार झटकायचा प्रयत्न केला. पण का कोण जाणे यावेळी तिच्या मनानं पलटी खाल्ली. तिला आठवलं ,...आपला रक्तगट ओ पॉझिटिव्ह म्हणजे युनिव्हर्सल डोनर आपण. आपलं रक्त सर्वांना चालू शकते.

पण आपल्याला अशी ही रक्ताची भीती वाटते... मग.. मग काय करायचं ??

       विरार ला होतं हॉस्पिटल. दिव्याने स्वतःच्या मनाला खंबीर केलं . एका झपाटलेल्या क्षणी ती  ट्रेनमध्ये बसली तिकीट काढून विरारला जायला. हॉस्पिटलला लवकरात लवकर पोचून तिने त्या झपाटलेल्या अवस्थेतच दोन पिशव्या रक्तदान केलं. आज जणू रक्ताची भीती तिच्याकरता टाईम प्लीज घेऊन बसली होती. रेशमाच्या नशिबाने अजून दोन-तीन डोनर तिला मिळाले. तिचं ऑपरेशन निर्विघ्नपणे पार पडलं. दिव्याला त्यातून जे समाधान मिळालं ते निव्वळ अवर्णनीय होतं.

        या प्रसंगानंतर दिव्याने स्वतःहून बरेच ठिकाणी रक्तदान केलं. रक्ताची भीती जणू पळून गेली कुठल्या कुठे. रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्था आपण दिव्याला कार्यक्रमाला बोलावू लागल्या.

      आज गणेश चतुर्थी. घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं. त्याचं आणि रविवारचे औचित्य साधून दिव्याने पुढाकार घेऊन त्यांच्या सोसायटीत रक्तदानाचे शिबिर आयोजित केले आहे. दोनच आठवड्यापूर्वी सरकारी रुग्णालयात जाऊन यासंबंधी आवश्यक माहिती तिने मिळवली आहे. दोन-तीनदा राजकारणातील सत्तारूढ पक्षाच्या प्रतिष्ठित माणसाबरोबर रुग्णालयात केल्यामुळे

स्टाफ डॉक्टर तिच्या चांगल्याच माहितीतील आहेत. कुणाला भेटायचं, शिबिरात डॉक्टर कसे येतील, स्टाफ कसा येईल ; आवश्यक सामग्री... बाटल्या , कॉटस  कशी उपलब्ध होईल याची खातरजमा तिने स्वतः केलेली आहे. संबंधितांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक तिच्याकडे आहेतच. स्थानिक आमदारांनी या भल्या कामासाठी येणाऱ्या आणि सहभाग घेणाऱ्या सर्वांसाठी संध्याकाळी नाश्त्याचा खर्च उपलब्ध केला आहे. रक्तदानासाठी खास गणपतीच्या मांडवाशेजारी संलग्न एक मांडव उभा केला आहे. ब्लड बँकेचा टेम्पो टेचात येऊन हजर आहे. मागल्याच गाडीतून सिस्टर, बॉईज वगैरे उतरत आहेत. शिवाय दोन डॉक्टर येणार आहेत.

        ' गणेश चतुर्थी निमित्त खास रक्तदान शिबिर ' असं लिहिलेला मोठा फ्लॅक्स लावला आहे. साडेदहा अकरा पर्यंत आमदार साहेब येणार आहेत. नर्सेसनी सफाईने सगळं उरकायला सुरुवात केली आहे. हजार हजाराचे कॅम्प  घेणाऱ्या त्या लोकांना हा अगदी किरकोळ मामला आहे. थोड्याच वेळात एका मागोमाग एक रक्ताच्या बाटल्या भरून जाऊ लागतील. कॉफीची बिस्किटांची पाकीटे भराभर संपतील. कमीत कमी शे.. दीडशे लोक तरी आपल्या आवाहनावर रक्तदान करतील अशी दिव्याला आशाच नाही तर खात्री देखील आहे.

       

 योगेश साळवी    

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post