उंच माझा झोका

             *उंच माझा झोका*

✍️ स्मिता मुंगळे 

     "सुस्वागतम"......चा फलक असलेले ते भव्य प्रवेशद्वार,त्यावर पुरस्कारप्राप्त महिलांचे फोटो,सभोवती सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली कमान.... हे दृश्य म्हणजे अरुंधतीला अनपेक्षित धक्काच होता. तिने या अशा सोहळ्याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हा सगळा थाट बघून ती जास्तच अवघडून गेली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या नवऱ्याने बरोबर ओळखले अन खुणेनेच तिला 'घाबरू नकोस' असे सांगितले.

     खरे तर या पुरस्कारासाठी नाव देण्याची तिची तयारीच नव्हती. पण नवरा आणि मुलांनी मागे लागून तिला फॉर्म भरायला लावला. "यशस्वी उद्योजिका" हा पुरस्कार तिला मिळणार अशी जणू त्यांना खात्रीच होती.

      आपण जो व्यवसाय करतो तो आपल्या फावल्या वेळात. त्याला उद्योग तरी म्हणायचे की नाही हे देखील आरुला माहिती नव्हते. आईचा शिवणकामाचा वसा चालवायचा हा एकच हेतू तिचा हा व्यवसाय करण्यामागे होता.तसेही तिला दुसरे येत तरी काय होते? खरेतर लग्नानंतर कित्येक वर्ष फक्त 'पूर्णवेळ गृहिणीपद' एवढंच ती सांभाळत होती.

      लहान वयात लग्न होवून ती अगदी छोट्या गावातून मोठ्या शहरात आली. नंतरचे बरेच दिवस, वर्ष ती फक्त त्या शहरातच नाही तर  मोठ्या घरात रुळण्यासाठी धडपडत राहिली. कनिष्ठ मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबातून येऊन एका मोठ्या सधन कुटुंबात स्थिरावणे हे तिच्यासाठी आयुष्यातील मोठे स्थित्यंतर होते. तिथे रुजायला थोडा जास्त काळ जावा लागला. आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि कष्टाळू वृत्तीने तिने हळूहळू घरातील लोकांना आपलेसे केले. सासू सासऱ्यांचे पथ्यपाणी,हवे नको बघण्यात, आला गेला, सणवार, पाठोपाठच्या मुलांचे संगोपन यात तिला दिवसाचे चोवीस तास कमी पडू लागले. कला शाखेची पदवीधर असलेल्या तिला बाहेर जाऊन कुठे नोकरी देखील करायची नव्हती. त्यामुळे ती तिच्या घर संसारात खुश होती. "आदर्श सून" आणि "आदर्श आई" आणि अर्थातच "आदर्श पत्नी" हे  पुरस्कार मिळवणं हेच जणू आता तिचं ध्येय बनलं होतं. बाहेर कुठेही गेली असता कोणी विचारलंच,"तू काय करतेस?" तर "काहीच नाही....मी घरीच असते" हे सांगण्याची तिला आता सवय झाली होती.

        एके दिवशी, तिचा धाकटा मुलगा शाळेत जाताना अगदी सहज तिला म्हणाला,"आई,मी अन दादा शाळेत गेल्यावर दिवसभर तू काय करतेस ग? काहीतरी करत जा ना. माझ्या कितीतरी मित्रांच्या आया खूप काय काय करत असतात." लेकाच्या या बोलण्याने आरुला पहिल्यांदा याविषयी विचार करायला भाग पाडले. त्यानंतर एकदा दुपारी जेवणानंतर बघूया जमतंय का असा विचार करत तिने काही जुन्या कापडापासून एक गोधडी शिवायला घेतली. खरंतर तिला फारशी शिवणकामाची आवड नव्हती पण केवळ आईची आठवण म्हणून तिने आई गेल्यानंतर आईचे शिलाई मशिन इकडे सासरी आणले होते. गेले कित्येक दिवस ते मशीन नुसतेच पडून होते पण आज प्रथमच तिने त्याचा वापर केला. बघता बघता दोन तीन दिवसांत छान गोधडी तयार झाली, अगदी आई शिवायची तशी. एकाच गोधडीवरून तिच्या दोन्ही लेकांमध्ये, गोधडी कोणी घ्यायची यावरून भांडण सुरू झालं म्हणून आणखी एक गोधडी तिने शिवली. कितीतरी दिवसांनी नवनिर्मितीचा आनंद तिने उपभोगला. नाहीतर लग्न झाल्यापासून कित्येक वर्षे केवळ स्वयंपाकघर एवढंच तिचं कार्यक्षेत्र झालं होतं. मुलं गंमतीने त्या गोधडीला "मायेचं पांघरूण" म्हणत असत.

          नंतर मात्र तिला नवनवीन डिझाइन, रंगसंगती जुळवून वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या शिवून बघण्याचा छंदच लागला. फावल्या वेळात ती गोधड्या बनवून ठेवू लागली. कधी अचानक कोणी घरी आले तर त्यांना स्वहस्ते शिवलेली गोधडी भेट म्हणून दिली जावू लागली. हे वेगळं गिफ्ट कित्येकांच्या पसंतीला उतरत असे. काहींनी तिला आमच्यासाठी गोधड्या शिवून देशील का असे देखील विचारले. अरुंधतीचा आत्मविश्वास हळूहळू वाढू लागला. मुलांचे अन नवऱ्याचे प्रोत्साहन तर होतेच. आई काहीतरी वेगळं करतीये याचा मुलांना खूप आनंद झाला होता.

        अशातच एके दिवशी, आरुची शाळेतील मैत्रीण पद्मा तिच्याकडे कित्येक वर्षानी आली. गप्पांच्या ओघात आरुने तिला गोधड्याविषयी सांगितले. शिवून ठेवलेल्या काही गोधड्यांचे नमुनेदेखील तिने पद्माला दाखवले. त्या सुती, आकर्षक रंगसंगती असलेल्या आणि ऊबदार गोधड्या पद्माला खूप आवडल्या. "मला दोन गोधड्या विकत दे"अशी पद्माने आरुला गळ घातली. मात्र अनेक वर्षांनी घरी आलेल्या शाळकरी मैत्रिणीला गोधडी विकत देणे आरुला प्रशस्त वाटेना म्हणून तिने एक गोधडी मैत्रिणीला भेट म्हणून दिली. पद्माने या गोधडीला "मैत्रीची ऊब" असे नाव दिले. आपण मैत्रिणीला दिलेली भेट आरु विसरून देखील गेली होती.

        अचानक एके दिवशी पद्माचा फोन आला. म्हणाली,"आरु,मला पंचवीस गोधड्या शिवून दे ना. माझ्याकडे एक छोटा कार्यक्रम आहे तेव्हा आलेल्या पाहुण्यांना गोधडी भेट म्हणून देईल म्हणते." 

"अग, एकदम पंचवीस.... मी वेळ मिळेल तेव्हा एखादी शिवत असते."

आरु म्हणाली, "अग, मी काही लगेच उद्या दे म्हणत नाहीये,अजून महिना आहे.तेवढ्यात तर देशील?"......पद्माने तिला नाही म्हणायला वाव दिलाच नाही. शेवटी हो...नाही करत आरुने पद्माची ऑर्डर स्वीकारली.

      पुढचे पंधरा दिवस ती वेगवेगळी डिझाइन, रंगसंगती, कापड खरेदी यात रमून गेली. तिची कामाची लगबग नवरा आणि मुलं बघत होती. एक नवीन उत्साह तिच्यात संचारला होता. आता तिला वेळ कमी पडू लागला होता. पण सगळ्यांना थोडंच कौतुक वाटतं किंवा वाटलं तरी ते व्यक्त करता येतं? आणि तसेही कौतुक करण्यासाठी मन मोठं असावं लागतं हेच खरं... हे आरुला माहिती होते.

  "काय तरी ते नसते उद्योग. उगाच कापडाचे तुकडे जोडत बसायचे"....

"यापेक्षा कितीतरी छान रजया हल्ली बाजारात मिळतात. हिच्याकडून घेण्यापेक्षा दुकानातून आणलेल्या बऱ्या."..... अश्या कित्येक जिव्हारी लागणाऱ्या, नाउमेद करणाऱ्या प्रतिक्रिया आरुच्या कानावर येत होत्या. खूप दुखावली जात होती ती पण नवरा पाठिशी ठाम उभा होता.

"तुला यातून आनंद मिळतो ना, मग कर तू तुझे आवडते काम... इतरांच्या बोलण्याकडे का लक्ष देतीयेस".... या त्याच्या शब्दांनी आरुला काम करण्याचे बळ मिळत होते.

        बघता बघता वेळेआधीच पंचवीस गोधड्यांची ऑर्डर पूर्ण झाली. पद्माच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना ही भेट म्हणून दिलेली "प्रेमाची गोधडी" फार आवडली. एकप्रकारे तिथे आरुच्या व्यवसायाची जाहिरातच झाली. त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलेच नाही. घरी कामाला येणाऱ्या मावशींना व त्यांच्या सुनेला हाताशी घेवून तिने ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. सर्वानुमते तिने या तिच्या छोट्या उद्योगाला "मायेचं पांघरूण" असंच नाव दिलं होतं. बघता बघता या मायेच्या पांघरुणाचा  विस्तार चांगलाच झाला होता.

        एकदा कुठल्याश्या वर्तमानपत्रात तिच्या भावाने बातमी पाहिली अन महिलादिना निमित्त देण्यात येणाऱ्या "आदर्श महिला उद्योजिका" या पुरस्कारासाठी आरुचा फॉर्म भरला. खरे तर आरुला याची काही गरज वाटत नव्हती. ती तिच्या या छोट्या उद्योगविश्वात खुश होती. एके दिवशी तिला "आदर्श उद्योजिका" पुरस्कार जाहीर झाल्याचा जिल्हा उद्योग केंद्रातून फोन आला आणि आरुसह तिचं संपूर्ण कुटुंब आनंदित झाले. हा पुरस्कार म्हणजे तिला व तिच्या उद्योगाला नावं ठेवणाऱ्याना दिलेलं सणसणीत उत्तर होतं.

      त्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिलंच नाही. आता मुलंही तशी मोठी झाली होती. आरु कायम घरातील जबाबदाऱ्या पार पाडूनच बाकी कामे करत असे. बघता बघता तिचा "मायेचं पांघरूण"  हा ब्रॅंडच तयार झाला होता. आता तिच्या गोधड्या फक्त महाराष्ट्रा बाहेरच नाही तर सातासमुद्रापार जात होत्या. आणि तिने ज्याची कल्पनाही केली नव्हती..  ना स्वप्न पाहिले होते तो आजचा सोनेरी दिवस तिच्या आयुष्य आला.

        मागच्याच महिन्यात केंद्र शासनाने जाहीर केलेल्या महिला उद्योजिका पुरस्कारप्राप्त महिलांच्या यादीत तिचे नाव आले. आरुला सर्वप्रथम आईची आठवण आली. या शिलाईमशीनच्या रुपात आई सारखी आपल्या सोबत असतेच असे तिचे ठाम मत होते. पण आता मात्र आईचा आशीर्वादच जणू कायम तिच्या पाठिशी आहे याची तिला खात्री पटली.

कोणतेही काम प्रामाणिकपणे केले की त्याला यश मिळतेच ही तिची श्रद्धा फलद्रुप झाली. मुलं देखील आईची धडपड, चिकाटी आणि सचोटी बघतच मोठी झाली होती. त्यामुळे त्यांना आईबद्दल नक्कीच आदर तर होताच पण तेवढंच आईचं कौतुकही होतं आणि अभिमानही.

म्हणूनच आज मुलं तिच्याबरोबर या पुरस्कार सोहळ्यासाठी खास वेळ काढून आली होती. एवढंच काय तर पुरस्कार स्विकारल्यानंतर काय बोलायचं याची सुद्धा लेकीने आईकडून तयारी करून घेतली होती.

        "अहो,जमेल ना हो मला बोलायला? ही मुलं उगाच मला नको त्या गोष्टीसाठी मागे लागतात. मी आत्तापर्यंत कधीच अशी एवढ्या लोकांसमोर बोलले नाहीये. खूप भीती वाटते", आरुने नवऱ्याला शेवटी मनातले बोलून दाखवलेच.

"काही नाही ग... उगाच टेन्शन नको घेऊस, छान बोलशील तू. मी सांगतो ना."... इति पतीदेव.

त्याच्या या बोलण्याने तिला धीर आला.

       या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून स्त्रिया पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. प्रत्येकीने आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, त्यातल्या अडचणी, दाखवलेली जिद्द असं बरंच काय काय सांगितले. प्रत्येकीची कहाणी खरंच वेगळी आणि प्रेरणादायी होती.

      आरुचे नाव जाहीर झाले अन तिने टाळ्यांच्या कडकडाटात व्यासपीठावर जाऊन पुरस्कार स्वीकारला. तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी प्रेक्षकांमधून उभे राहून टाळ्या वाजवल्या तेव्हा स्टेजवर उभी असलेली आपली आई त्यांना "आदर्श आई" आणि नवऱ्याला ती "आदर्श पत्नी" भासली. 'आदर्श उद्योजिका' पुरस्कारासोबत आरुला अपेक्षित असलेले पुरस्कार आपोआपच तिच्याकडे चालत आले.

        तिने तिच्या व्यवसायाची वाटचाल थोडक्यात सांगितली तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवून तिला दाद दिली त्यावेळी आरुला केलेल्या कष्टाचे चिज झाल्यासारखे वाटले. पुरस्कार घेवून ती दिमाखात खाली उतरली तेव्हा पाश्र्वभूमीवर "उंच माझा झोका...." हे गाणं वाजत होते.

     

✍️स्मिता मुंगळे.

    वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिककडे सुरक्षित आहेत      

       

        

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post