पार्टनर

 पार्टनर

✍️ अमृता देशपांडे

विहंग येणार हे कळल्यापासून मधुराचं चित्त थार्यावर नव्हतं, कोणत्या तोंडानं त्याच्यापुढे जाऊ असं तिला झालं होतं... तसं तिला आपल्या वागण्याचा पश्चात्तप किंवा अपराधी भाव वगैरे नव्हता, पण तरी मनात खळबळ माजली होतीच. 'आईला बरं नाहिये' असं प्रथमेशला खोटंच सांगून ती मुम्बईहुन नागपूरला जायला निघाली होती. किती काळजी करत होता प्रथमेश तिची, 'वाटेत फोन कर, वेळेवर डबा खा, आजूबाजूला कोणी महिला प्रवासी किंवा चांगलं कुटुंब असेल तर त्यांच्याजवळच बस, कोणी त्रास देत असेल तर लगेच मला कळव, वगैरे वगैरे... नागपूरला घरी पोहोचल्यावर फोन कर, हे तर त्याने असंख्य वेळा बजावले होते. गाडी सुरू झाली तशी मधुराने खिडकीतून त्याला 'टाटा' केले, त्याची मूर्ती डोळ्यांपासून दिसेनाशी होईपर्यंत ती बाहेर बघतच होती. नकळत तिचे डोळे पाणावले...

'याच्या उलट विहंग...' गाडीच्या वेगासोबत मधुराचं विचारचक्रही जोरात फिरू लागलं...'पाच वर्षं झालीत आपल्या लग्नाला... लग्न कसलं, केवळ कागदी व्यवहार...  त्यावेळी विहंगच्या वडिलांची नाजूक तब्येत लक्षात घेऊन दोघांचे रजिस्टर पद्ध्तीने लग्न झाले, पण विहंगला पुढचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जायचे होते. पाच वर्षांत कधी त्यानं तोंड दाखवलं नाही कि कधी आपणहुन फोन केला नाही. मी फोन केला तर नेहमी तुटक-तुटक बोलणं, कधी खूप कामात आहे म्हणून, तर कधी खूप अभ्यास आहे असा बहाणा करून...' तिनं खूप प्रयत्न केला त्याच्या मनातलं जाणून घ्यायचा, त्याने घरच्यांच्या दबावाने तर आपल्याशी लग्न केले नाही ना, त्याचे कुणा दुसर्या मुलीवर तर प्रेम नाही ना... त्याला ती तिथे अमेरिकेत येते म्हटले तर म्हणायचा 'अजून मीच इथे सेटल झालो नाहिये, त्यात तुला इथे कसे आणू? इथले रूल्स खूप कडक असतात , वगैरे, वगैरे कारणं सांगून सतत टाळत रहायचा. मधुराला या सगळ्याचा अगदी कंटाळा आला होता...  

विहंग अमेरिकेत निघून गेल्यावर मधुरानेही आपल्या करियरकडे लक्ष केंद्रित करायचे ठरवले. एम्. बी. ए. करायला ती नागपूरहुन मुम्बईला गेली. तिथेच तिची प्रथमेशशी ओळख झाली. लाघवी आणि प्रेमळ स्वभावाच्या प्रथमेशने मधुराच्या मनात लवकरच घर केले. त्यात विहंगच्या विक्षिप्त आणि उपेक्षित वागणुकीने ती प्रथमेशकडे ओढल्या गेली. मधुरा आणि प्रथमेश आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

विचारांच्या तंद्रीत असतानाच तिचं उतरण्याचं ठिकाण आलं. तिला वाटलं होतं आज तरी विहंग घ्यायला येईल, पण तिची निराशाच झाली. तिची इच्छा सरळ आईकडे जाण्याची होती, पण ते बरं दिसलं नसतं म्हणून ती सासरी गेली. विहंग अपेक्षेप्रमाणे त्याच्या मित्राकडे, किरणकडे गेला होता. या दोघांच्या एवढ्या घट्ट मैत्रीचं मधुराला नेहमीच कोडं पडे. किरण विहंगचा बालपणीचा मित्र होता, त्यामुळे जिवाभावाची मैत्री असणे नैसर्गिक होते; पण या दोघांमध्ये मैत्रीच्याही पलिकडे काहीतरी नाते असावे असे मधुराला नेहमी वाटायचे. दिवस-दिवस त्यांचं खाणं-पिणं, अभ्यास, झोपणं सगळं एकत्र चाले. ती दोघं एकत्र असली कि त्यांना सार्या जगाचा विसर पडे. मधुराच्या घरच्यांचे आणि विहंगच्या घरच्यांचे घरोब्याचे संबंध असल्याने तिला हे सगळे ठाऊक होते.

'मधुरा बेटा, किती दिवसांनी आलीस! प्रवास तर ठिक झाला नं गं? विहंगला मी म्हटलं होतं, तुला घ्यायला जा म्हणून, पण तो माझं ऐकतोय कुठे, तो गेला आपल्या मित्राकडे... वाईट वाटून घेऊ नको हं...' विहंग कसाही असला तरी मधुराच्या सासूबाई प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या होत्या. 

'काही हरकत नाही आई, माझं विहंगशी फोनवर बोलणं झालं आहे. आणि मला माहितीये ना त्या दोघांची मैत्री...' मधुरा कसंनुसं हसत बोलली. आणि ती आपल्या, म्हणजे विहंगच्या खोलीत निघून गेली. 

यावेळीही विहंग मधुराशी अंतर ठेवूनच वागत होता, आणि मधुरालाही तेच अपेक्षित होतं.

आज कितीही उशीर झाला तरी विहंगशी काय ते बोलून, त्याला सगळं खरं काय ते विचारायचं. तसंच आपल्या आणि प्रथमेशच्या नात्याविषयीही सगळं खरं काय ते सांगून टाकायचं. सोक्षमोक्ष लावायचाच,असं मधुरानं ठरवलं. नेहमीप्रमाणे विहंग उशीरानेच परतला.  

'कुठे गेला होतास विहंग?'- मधुरा

'जरा किरणबरोबर होतो...'- विहंग

'ते माहितीये मला, किरणबरोबर कुठे होतास?' - सगळं बळ एकवटून मधुरा बोलली.

'आता तू काय माझी उलटतपासणी घेणारेस का? माझ्या मित्रासोबत होतो मी, कुणा मुलीबरोबर नाही...' विहंग वैतागून

'मी उलटतपासणी घेत नाहिये विहंग, बायको आहे मी तुझी. नाही, तू विसरला असशील आपल्यातलं नातं, पण मी नाही...' – मधुरा

'बायको आहेस म्हणजे काय माझ्या संपूर्ण आयुष्यावर तुझाच अधिकार आहे का?' - विहंग संतापला.

'प्रश्न अधिकाराचा नाहिये विहंग, अस्तित्वाचा आहे, तुझ्याकरता माझं काहितरी अस्तित्व आहे का रे? थोडीतरी जागा आहे माझी तुझ्या आयुष्यात? एकाच घरात राहून अनोळखी असल्यासारखा वागतोस तू? माझ्याशी नीट बोलत नाहिस, माझ्यासोबत कधी वेळ घालवत नाहिस, आपल्यात ‘नवरा-बायको’सारखं काही नातं आहे का विहंग?' – मधुरा

'असं काहीही नाहिये मधुरा, मी माझ्या रिसर्चच्या कामात व्यस्त असतो, म्हणून वेळ मिळत नाही गं, तुला माहितेय ना... मला अजून वेळ हवाय मधुरा, तुला सांगितलंय नं आधीच...' - विहंग अडखळत उत्तरला.

'अजून किती वेळ विहंग? पाच वर्षं झालीत आपल्या लग्नाला. एवढ्या वर्षांत लोकांना मुलं होतात...' – मधुरा

'मला आत्ता या विषयावर बोलायचं नाहिये...' असं म्हणत विहंग खोलीतून निघून गेला. त्यानंतर तो सरळ किरणकडे गेला. 'आज दिवसभर तर हा किरणसोबतच होता, आता परत... आज काय ते कळलंच पाहिजे!' असा विचार करत ती त्याच्या पाठलाग करत किरणच्या घरापर्यंत पोहोचली. त्या दोघांना समजू नये म्हणून अंगणातच एका खिडकीतून आंत बघू लागली.

तिथे तिने जे पाहिलं, ऐकलं त्यावर तिचा विश्वासच बसे ना. तिच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडचं होतं... ती दोघं काहितरी बोलत होती, मधुरा कान देऊन ऐकू लागली. 

'अजून किती दिवस वाट पहायची आहे विहंग? तुझ्या बाबांच्या अटीप्रमाणे पाच वर्ष तू मधुरासोबत नातं टिकवलंस नं? आता त्यांच्या मृत्यूपत्रानुसार सगळी प्रॉपर्टीही तुझ्या नावे होणार. आता डिवोर्स कधी देणार आहे?'-किरण

'अरे आता तू काळजीच करू नको रे, ती स्वत: च कंटाळली आहे या सगळ्याला, सहज डिवोर्स देईल मला. उद्या सकाळीच तिच्याशी बोलतो, पण तू काही बोलू नकोस. मी लवकरच तुझ्या अमेरिकेत येण्याची व्यवस्था करतो. बस्स! मग तिथे तू आणि मी ! तिथे कोणीच आपल्या प्रेमात मध्ये येणार नाही. ना आई, ना मधुरा...' - असं बोलून विहंगने किरणला मिठीत घेतले.

मधुराचं तर डोकंच सुन्न झालं होतं, 'असं प्रकरण आहे तर! लहानपणापासूनची आपली मैत्री, पण या दोघांनी कधी आपल्याला कळू दिलं नाही. पण मग आपल्याशी लग्न का करावं विहंगनी? का असा विश्वासघात करावा? वडिलांच्या दबावामुळे? प्रॉपर्टीमुळे? पण म्हणजे त्यांनाही ठाऊक होतंका हे सगळं?  मग त्यानी तरी का फसवावं आपल्याला असं? समाजात बदनामीच्या भीतीने?' तिचं डोकं या सगळ्या प्रश्नांनी भंडावून गेलं होतं. पण काहीही झालं तरी उद्या सोक्षमोक्ष लावायचाच असं तिच्या मनानं पक्कं ठरवलं...

सकाळी विहंग घरी आला तो केवळ अंघोळ करण्यापुरताच खोलीत आला. मधुरा तिथे असताना त्याला कसेतरीच वाटायचे. आज मात्र मधुराने त्याचा हात धरून पलंगावर बसवले. 'विहंग, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय...'

' मलाही तुझ्याशी बोलायचंय मधुरा, पण कसं बोलावं, कुठून सुरवात करावी तेच कळत नाहिये...' विहंग अडखळत म्हणाला.

'मी सोपं करून देऊ का?... विहंग मला तुझ्या आणि किरणभाऊजींमधलं नातं समजलंय...' मधुराच्या या वाक्यासरशी विहंगने तिच्याकडे दचकून पाहिलं 'मी काल रात्री तुझ्या पाठोपाठ तिथे आली होती...'  विहंगने मान खाली घातली.

‘मधुरा लहानपणीपासूनच आम्ही एकमेकांकडे आकर्षित होतो, शिवाय जीवापाड मैत्रीही होतीच. आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचं आम्हांलाच कळलं नाही. आणि आम्हांला त्यात कधीच काहीच गैर वाटलं नाही... मी मुलींकडे कधीच आकर्षित झालो नाही. माझं किरणवर खूप प्रेम आहे, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय...' विहंग मधुराच्या नजरेला नजर न देता बोलला.

'यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही विहंग, It’s just natural. जगातले 90 टक्के लोक ज्यापद्धतीने आयुष्य जगतात, त्यापद्धतीने 10 टक्के लोक जगत नसतील तर त्याचा अर्थ ते चूक आहेत, किंवा ते कुठलं पाप करतायत असा होत नाही. आणि हे तुझं आयुष्य आहे, ते कसं, कोणाबरोबर घालवायचं हे ठरवण्याचा अधिकार केवळ तुला आहे. माझा प्रश्न वेगळाच आहे... 'एवढं बोलून मधुरा थोडी थांबली. 

'का थांबलीस मधुरा? बोल ना, विचार, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत ते सगळे विचार... खरं म्हणजे मी तुझा गुन्हेगार आहे, त्यामुळे तू जे काही बोलशील ते ऐकून घ्यायची माझी पूर्ण तयारी आहे...' विहंग अजूनही मान खाली घालूनच बोलत होता.

'एक मिनीट मी तुझ्याशी लग्न का केलं, हाच प्रश्न आहे ना तुझा? कारण मधुरा, तू जसं मला समजून घेतलं, तसं सगळेच नाही ना समजून घेऊ शकत... मी बाबांना माझ्या आणि किरणच्या नात्याविषयी सगळं खरं-खरं सांगितलं होतं गं. पण त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही. तुझ्या बाबांना दिलेल्या शब्दामुळे आणि घराण्याच्या इभ्रतीमुळे त्यांनी मला हे लग्न करायला भाग पाडलं. शिवाय मी जर असं केलं नाही तर प्रॉपर्टीतून बेदखल करण्याची धमकी त्यांनी मला दिली होती...' तो घडा-घडा बोलून गेला.

'पण म्हणून तू मला फसवलंस? तुला कोणी अधिकार दिला रे माझ्यासोबत असं वागण्याचा?'  - मधुरा

' हो मधुरा, मी म्हणालो ना, मी तुझा गुन्हेगार आहे, त्यामुळे तुला मला जी काही शिक्षा द्यायची असेल, ती मला मान्य आहे. मी तुझ्या भावनांशी खेळलो, तुझ्या आयुष्यातील महत्वाची पाच वर्ष वाया घालवली, त्याबद्दल मला आंतून  खूप अपराधी वाटत होतं... आणि म्हणूनच मी तुला दिवस-दिवस फोन करायचो नाही, तुझा फोन आला तरी तुझ्याशी नीट बोलायचो नाही.  ' एवढे बोलून विहंग मटकन जमिनीवर बसला.

'तुला शिक्षा केल्यानी माझी वाया गेलेली पाच वर्षं परत येणारेत? आपलं जेव्हा लग्न ठरलं नं विहंग, तेव्हा मी खूप खूष होते रे. किती स्वप्नं बघितली होती मी आपल्या संसाराची? तू तर अमेरिकेला निघून गेलास. पण दिवस-दिवस जेव्हा तुझा फोनही यायचा नाहीना, तेव्हा मनात नको-नको ते विचार यायचेत माझ्या...  तू जेव्हा फोनवर असं तुटक-तुटक बोलायचास, तेव्हा मला समजायचंच नाही रे, कि माझं काय चुकतंय... आणि… ' – मधुरा

'आणि मग मला खूप राग यायचा, तुझा आणि स्वत: चाही. या सगळ्या भावनिक घुसमटीत माझ्या मदतीला धाऊन आला प्रथमेश.  त्याने मला आधार दिला, प्रेम दिले आणि मी त्याची झाले. विहंग, तुझं किरणवर जेवढं प्रेम आहे, तेवढंच माझं प्रथमेशवर प्रेम आहे. गेली तीन वर्षं आम्ही रिलेशनमध्ये आहोत...' - सगळं सांगून टाकल्यावर मधुरालाही मोकळं वाटू लागलं.

‘म्हणजे तुझ्या मनात आता माझ्याबद्दल काही राग नाही? तुझी माझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही?' - विहंग. मधुराने नकारार्थी मान डोलावली.

'चला म्हणजे आता आपल्या दोघांच्याही मनात एकमेकांना फसवल्याची अपराधी भावना राहणार नाही. आपले दोघांचे मार्ग आधिपासूनच वेगळे होते, अपघातानेच ते एकत्र आले. इंग्रजीत ती म्हण आहे ना, Marriages are settled in heaven but celebrated on earth. आपल्या दोघांच्या settlement मध्ये थोडी गडबड झाली इतकंच...' विहंगच्या या वाक्यावर दोघंही खळाळून हसली.  


लेखिका - सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर


वरील कथा अमृता देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post