नाते गोड गुलाबी भाग एक

 नाते गोड गुलाबी : भाग एक 

लेखिका - अपर्णा कुलकर्णी 


अपर्णा आणि अभिषेक झोपले होते. दोघांमध्ये नवरा बायको सारखे काही नाते नव्हते. अपर्णा अगदी लाडाकोडात वाढलेली, बालीश, निरागस मुलगी आणि या उलट होता अभिषेक. समंजस, डॉक्टर, करिअर ओरिएंटेड, विचारी. दोघांचे लग्न त्यांच्या घरच्यांनी जबरदस्तीने लावून दिले होते. अभिषेक त्याच्या वडिलांचा शब्द मोडू शकला नाही आणि अपर्णा लास्ट ईयर मध्ये कमी गुण मिळवून पास झाल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचे ऐकले नाही.  अपर्णाचे वडील डॉक्टर होते आणि त्यामुळेच त्यांची आणि अभिषेकची ओळख झाली होती. अभिषेक खूप हुशार आणि कर्तबगार होता. माणूस म्हणून योग्य होता आणि अर्थात त्यांच्या अपर्णा साठी नवरा म्हणून पण.

त्यामुळे त्यांच्यात तसे नवरा बायकोचे संबंध नव्हते. अपर्णा खूप स्वच्छ मनाची होती त्यामुळंच घरात सगळ्यांची लाडकी होती. त्यांच्या लग्नाला पंधराच दिवस झाले होते. पण अपर्णाला अभी शिवाय करमत नसे. घरात खूप मंडळी होती, म्हणजे एकत्र कुटुंब होते आणि सगळ्यांनाच त्यांच्या लग्नाची, नात्याची कल्पना होती. त्यामुळे सगळे त्या दोघांना कसे एकत्र आणता येईल याचाच विचार करत असत. 

आज अपर्णा खूप आनंदात होती. कधी नव्हे ते तिच्या नवऱ्याने म्हणजे अभीने तिला इयर रिंग गिफ्ट केल्या होत्या आणि तिला त्या खूप आवडल्या होत्या. त्यालाही अपर्णाचा स्वभाव खूप आवडत असे, तिचं प्रांजळ मन तिच्याकडे आकर्षित करत असे. पण तो कधीच तिला हे बोलून दाखवत नसे. सतत तिच्या अल्लड वागण्यामुळे तिला ओरडत असे. पण नेहमीच तिच्या भल्यासाठी तो असे करत असे. त्या दोघांनाही एकमेकांशिवाय झोप लागत नसे. अपर्णाला अभिचा हात पकडुन झोपण्याची सवय लागली होती अगदी पहिल्या रात्री पासून.

  पहिल्या रात्री अप्पूचे डोकं दुखत असल्यामुळे अभिने तिच्या डोक्याला तेलाची छान मालिश करून दिली होती आणि तिला थोपटत झोपवत होता. त्यावेळी अप्पूने त्याचा हात पकडला आणि तशीच झोपी गेली. तिची झोपमोड होऊ नये म्हणून अभिने तो हात तसाच ठेवला होता आणि तेंव्हा पासून अप्पूला त्याचा हात पकडुन झोपण्याची सवय लागली होती. त्या दिवशी अभी कडून गिफ्ट मिळाल्यामुळे अप्पू आनंदात होती. तिला खूप लाड करावेसे वाटत होते अभिचे. पण अभिला तिने अंगाशी आलेले आवडत नसे. तिने त्याचा हात पकडला होता नेहमी प्रमाणे पण तिला झोप येत नव्हती तिची चुळबुळ चालूच होती. 

अभिने ते पाहून तिला विचारले, "काय ग अपर्णा झोप येत नाही का ?? ती म्हणाली नाही अभी आज झोप येत नाही. का डोकं दुखतयं का पुन्हा ??" अभीने विचारले.

 
ती म्हणाली, " नाही, काही दुखत नाही पण मला तुझे खूप लाड करावेसे वाटतात म्हणून झोप लागत नाही".

 
अभीला कल्पना आली की हिच्या डोक्यात भलतंच काहीतरी सुरू आहे. तो म्हणाला, "अपर्णा आज मी खूप दमलो आहे तू आता मला त्रास देऊ नकोस झोप आणि मलाही झोपू दे".

अप्पू म्हणाली,  "अभी आज तू मला गिफ्ट दिलेस त्यामुळे मला तुझे खूप लाड करावेसे वाटतात तर करू दे ना."

" अच्छा लाड म्हणजे नक्की काय करायचे आहे तुला?" अभीने विचारले.

ती म्हणाली " किस".
अभी म्हणाला, " काय, काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का ?? काहीही काय बोलतेस??"

" काहीही काय त्यात आपले लग्न झाले आहे मी बायको आहे तुझी हक्क आहे माझा तुझ्यावर".

अभीला तिच्या बोलण्यावर काय बोलावे समजेना. तो म्हणाला,  "तुला माहित आहे ना आपले लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहे. पण तरीही तुला हवंतर माझ्या हाताला किस कर आणि झोप".

तशी अप्पू त्याच्यावर चिडली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली. अभिने पण तोंड फिरवले, पण त्याला झोप येईना. तो विचार करू लागला, ' हे नेहमी असं का होत माझे.  नको म्हणाल्यावर झोपली ना ती पण ती माझ्यावर चिडली म्हणून मी का अपसेट झालोय, माझी झोप का उडाली आहे. मी प्रेमात पडलोय का हिच्या ??'

त्याने मागे वळून पहिले तर अप्पूची चुळबुळ सुरूच होती. अभी तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "पकड माझा हात आणि झोप, झोप लागत नाही ना तुला ??"

अप्पू काहीच बोलली नाही. तेंव्हा तो म्हणाला,  "ठीक आहे कर काय लाड करावेसे वाटतात ते. मी काही नाही बोलणार".  तशी अप्पूची कळी खुलली आणि तिने त्याच्याकडे वळून तिचे लाल गुलाबी नाजूक ओठ त्याच्या गालांवर ठेवले आणि त्याचा हात पकडुन झोपली. अभी तिच्याकडे बघतच राहिला.

अप्पू खूप लाघवी होती पण तिला करिअरबद्दल काहीच वाटत नव्हते आणि अभिला त्याचाच खूप राग येत असे. तो नेहमी त्यासाठी तिला ओरडत असे पण अप्पू काही त्याचं ऐकत नव्हती. अभिने तिचे एडमिशन घेतले होते कॉलेज मध्ये पण अप्पूला कसलेही गांभीर्य नव्हते.  तो क्लिनिकमधून आल्यावर रोज रागावून तिला अभ्यासाला बसवे. तिचे नखरे झेलत स्वतःवर संयम ठेवत तिला शिकवत असे. अप्पू तशी हुशार होती पण आळशी होती. एकदा अभी तिच्यासाठी तिच्या आवडीचे समोसे घेऊन आला होता. तिने ते पाहिले आणि म्हणाली,  "अभी तू माझ्यासाठी आणलेस समोसे". 
तिला अशा छोट्या मोठ्या गोष्टीत खूप आनंद मिळत असे आणि तिला आनंदी बघून अभी पण खुश होत असे. त्याच्या हातातील समोसे तिने घेतले आणि पटकन त्याला मिठी मारून थंँक यु अभी असे म्हणून निघून गेली. तिच्या वागण्याची अभीला गंमत वाटत असे. काय मुलगी आहे ही कशी वागते असे स्वतःशी तो बडबडत असे. 

  हळू हळू अप्पू आणि अभी मधील नाते घट्ट होत होते. तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अशी अवस्था होती खरंतर दोघांची. पण दोघांचे स्वभाव आणि वागणे मात्र खूप टोकाचे होते. अप्पू मजा मस्ती करत बिनधास्त जगणारी होती तर अभी खूप समंजस आयुष्याकडे गंभीरपणे बघणारा होता. अप्पू त्याच्याशी खूप फ्रेंडली वागत असे.  दोघांचे नाते हे जबरदस्तीने बांधले गेले असले तरीही ते नाते आहे आणि ते मी हवे तसे वागून जपणार असे तिचे म्हणणे होते तर अभी मात्र त्यानेच घालून दिलेली नात्याची मर्यादा ओलांडायला तयार नव्हता. त्याला वाटे अप्पू कोणतीच गोष्ट गांभिर्याने घेत नाही. हे नाते तरी ती गांभिर्यांने जपेल की नाही कोण जाणे. लाडकोडात वाढलेली ही मुलगी सतत भांडत असते. उद्या जर आमचे मोठे भांडण झाले आणि ही गेली तिच्या बाबांकडे तर काय सांगावे. त्यापेक्षा हिच्यापासून लांब राहणेच बरे.

अप्पू नेहमीच त्याच्या अंगाशी येई, हक्क गाजवी, त्याचा हात घेऊनच झोपी जाई, अभीचे केस त्याला खूप प्रिय आहेत हे समजल्यावर मुद्दाम त्याच्या केसांना हात लावून त्याला छळत असे. अभिला याचा राग येई पण ती घरात नसेल तर तिच्या शिवाय याला एकही मिनिट चैन पडत नसे. एकदा ती तिच्या बाबांकडे गेली होती आणि तिच्या बाबांनी तिला थांबवून घेतले म्हणून तिथेच राहिली तर अभी रात्रभर जागाच होता. त्याचा हात पकडुन झोपायला अप्पू नव्हती ना. त्याने खूप प्रयत्न केले पण काही केल्या तो झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी तणतणच घरातून निघून गेला होता. घरातल्या सगळ्यांना हे पाहून हसू येत होते. संध्याकाळी तो आला तेंव्हा अप्पू अभ्यास करत होती तिला पाहून अभी खूप आनंदी झाला होता पण रात्री ती तिकडेच थांबली याचा राग पण होताच.

क्रमशः

पुढील भाग

वरील कथा अपर्णा कुलकर्णी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post