दोन लघुकथा

 

श्रीमंत"

©️®️दीपाली थेटे-राव

टरर् टरर्टरर् टरर्


घड्याळाचा गजर वाजत होता. गजर बंद करून तसाच परत लवंडलो. जाग आली तेव्हा सकाळचे ६ वाजून गेले होते. आता उठणं भागच होतं. 


आयला उशीर होणार....


कालच बॉसनं बजावलं होतं, "उद्या जरा लवकरच ये. हे महत्त्वाचे कुरीयर पोहोचवायचे आहे".  आता उशीर झाला तर परत शिव्या ....नोकरीवरून काढण्याची धमकी ....


  त्याच्या पोटात गोळा आला


निलेश घाईघाईने उठला. आवरायला लागला.


एकीकडे आईने चहा आणून दिला व ती तिच्या डबा बनवायच्या कामात व्यस्त झाली. 


गरमागरम बटाट्याच्या भाजीचा वास घमघमत होता. त्याची आवडती भाजी......


पटापट आवरून निलेश डबा घेऊन निघाला. तेवढ्यात त्याच्या मित्राचा सुधीर चा फोन आला फोनवर बोलून तो घाईघाईत निघाला. 


  सायकलमध्ये मध्ये हवा कमी होती. ती भरण्यासाठी तो दुकानात गेला आणि लक्षात आले डब्याची पिशवी तर घरीच राहिली आहे आणि त्याचबरोबर पैशांचे पाकीटही. खरंतर हवा भरण्यापुरते सुट्टे पैसे त्याच्या वरच्या खिशात होते. ते त्याने वापरले.


   आता परत माघारी जायचं... डबा आणि पाकीट  घ्यायचं म्हणलं तर उशीर होणार आणि कुरियर वेळेत पोहोचलं  नाही तर साहेब रागावणार.  तशीच सायकल मारत तो ऑफिसमध्ये पोहोचला. सरांकडून कुरिअर घेऊन योग्य जागी पोहोचवून आला. काम नीट झालं म्हणून सरांनी कौतुक केलं. त्याच्या अंगावर दोन मूठ  मांस चढलं. 


   आता मात्र भुकेने पोटात कालवाकालव चालू झाली होती.  तो तसाच खालच्या चहाच्या टपरीवर गेला. एक चहा मागवला. सकाळ पासून ठणकणारं डोकं आल्याचा चांगला चहा प्यायल्यावर शांत होणार होतं. अचानक त्याला आठवलं की आपल्याकडे पैसे नाहीत. खरंतर महिनाअखेरीला बाकी काही हॉटेलमधलं खाण्यापुरती चैन त्याला परवडणारी नव्हती. आज एक कप चहा ला देखील त्याचा खिसा रिकामा होता. तो अचानक उठला आणि जाण्यासाठी वळला. तेवढ्यात चहा वाल्या काकांनी चहा आणून दिला, सोबत बिस्कीटही दिली.  प्रेमाने पाठीवरून हात फिरवून म्हणाले ,"अरे भूक लागली असेल तर सांगाव  रे.  इतके दिवस ओळखतो तुला.  तू काही पैसे बुडवणारा माणूस नाही. घे चहा घे आणि बिस्कीटही खाऊन घे. तेवढाच पोटाला थोडा आधार. "  साश्रुनयनांनी चहा वाल्या काकांकडे बघत त्याने चहा आणि बिस्किटं संपवली.


    तो परत ऑफिसमध्ये जायला वळला.  पाहतो तर ऑफिसच्या पायरीवर घामाघूम झालेली आई बसली होती आणि तिच्या हातात डब्याची पिशवी होती." अग किती वेळ अशी बसून आहेस इथे", त्याने विचारलं .  थरथरत्या हातांनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना तिने म्हंटलं "  लेकरा,  डबा घरीच विसरुन आलास.  मग मला लई चिंता वाटायला लागली.  काय खाशील उमजेना. मग अशीच चालत चालत तुझा डबा घेऊन इथवर आले."©️®️दीपाली थेटे-राव


  आता मात्र त्याचे डोळे पाणी पाझरू लागले.  आईला मायेनं जवळ घेऊन तिला त्यातील दोन घास घालून त्याने तिला घरी पाठवलं.  डबा घेऊन तो वर आला.  खायला सुरुवात करणार तेवढ्यात चौकातल्या हॉटेलातून सरांसाठी जेवणाचे पार्सल आलं.  त्याला वाटलं , सर खरंच किती लकी आहेत.  काही चिंता नाही.  हवं तेव्हा रोज रोज हॉटेल मधून जेवण मागवतात. आणि आपल्याला मात्र महिना अखेरीस जुळवाजुळवी करण्यात जीव टांगणीला लागतो. 


    तिकडे दुर्लक्ष करून तो घास तोंडात टाकणार तेवढ्यात त्याच्या कानावर फोनवरचं बोलणं ऐकू आलं. सरांच्या केबिन मधून ऐकू येत होतं, "  अग रोज रोज मी हॉटेलमध्ये जेवण मागवतो. पण त्याला ना चव ना ढव. तुझं ते क्लब आणि बाकी गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात का ? की तू माझ्यासाठी घरचं जेवण बनवू शकत नाही".  हे असं बरंच बोलणं चालू राहिलं...... पलीकडून ही उत्तरे येत होती..... 


      शेवटी सरांनी फोन खाली ठेवला आणि एक निश्वास सोडून त्यांनी पार्सल उघडलं.  निलेश ला काय वाटलं कोण जाणे.  त्याने आपला डबा उचलला आणि सरळ सरांच्या केबिनमध्ये घुसला.  सर," आज माझ्या आईनं स्पेशल बटाट्याची भाजी केली आहे.  तुम्हाला नक्की आवडेल. खाऊन घ्या आणि नंतर कशी झाली आहे ते मात्र सांगायला विसरू नका."


   डबा ठेवून तो केबिनच्या बाहेर पडला.  पाठमोरा असून सुद्धा त्याला सरांच्या डोळ्यातले अश्रू जाणवत होते.  खिशात दमडीही नसताना आणि प्रेमाने दिलेल्या चहा बिस्किटावर अर्धवट पोट भरलेलं असताना स्वतःचा डबा सरांना जेवायला देऊन आज तो जगातील सर्वात समाधानी व्यक्ती झाला होता.


त्याचं पोट प्रेमानं आणि आपुलकीने गच्च भरलं होतं.


खिशात एक पै सुद्धा नसताना आज तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता.


सर्वात श्रीमंत................


-----------------------------------------------------------------

"कृष्ण सखा"

©️®️दीपाली थेटे-राव

आज ऊर्मीचा मूड ऑफ झाला होता. कुठलंच दान मनासारखं पडत नव्हतं. असं वाटत होतं की आज पर्यंत जे काही केलं ते सारं काम मातीमोल ठरतंय. 

या प्रमोशनसाठी तिच्या फार अपेक्षा होत्या. काय नाही केलं होतं तिन. तिच्या आवाक्याबाहेरच्या अनेक गोष्टी तिन मेहनत घेऊन लीलया पूर्णत्वास नेल्या होत्या. सतरा वर्ष...... थोडीथोडकी नव्हती. त्याचं चीज आता होईल असं वाटत असताना यश हुलकावणी देत होतं.


घरच्या, वयात आलेल्या मुलीच्या ...अनेक जबाबदाऱ्या तिने सक्षम पणे पेलल्या होत्या, असीमला  त्याचे झळ ही न लागू देता आणि आता क्षणात सगळं संपल्यासारखं झालं होतं.


      ज्याला यश मिळत होतं तो तिच्याच डोक्यावर पाय ठेवून यशाच्या केक पायर्‍या चढत होता. तिने केलेल्या कामाचा मोबदला स्वतःसाठी मिळवला होता त्यांन. अन तेही प्रत्येक वेळी तिला डिवचून. देव जगात आहे की नाही हे विचारण्याची वेळ आली होती तिच्यावर आणि जर असेल तर तो हे असं सगळं शांतपणे का पाहत आहे. पार खचून गेली होती ती. एका स्त्रीसाठी एवढी सगळी आव्हान पेलणे खरंतर कठीण होतं.


    उद्विग्न मनाने गाडी चालवत ती घरी आली. आता घरी नवऱ्याच्या, मुलीच्या,.. अपेक्षा पूर्ण करणे, त्यांना हवं नको ते बघणे, खायला करणे आणि इतर अनेक गोष्टी ......खरंतर दुःख पचवून अपयश पचवणे तिला जड झालं होतं. काहीच करावंसं वाटत नव्हतं. हरल्यासारखं झालं होतं.


     असीम.. तिचा नवरा आज लवकर घरी आला कधी नाही ते. त्याला बघताच ती कोलमडून गेली. पण तो मात्र तिला नजरेआड करून आतल्या खोलीत गेला अन् ती पूर्णपणे खचली.


"हाच का तो ज्याच्याशी मी प्रेम विवाह केला. ज्याच्यावर विश्वास ठेवून माझं मन त्याला अर्पण केलं आणि आज हा माझ्या भावनाही समजून घेऊ शकत नाही."  तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले.


    काही वेळातच असीम बाहेर आला. त्याच्या हातात एक सरप्राईज गिफ्ट होतं. तो तिला जवळ घेऊन हळूच म्हणाला, "आजचा  दिवस तुझा.  आज आपण बाहेर जायचं जेवायला." ऊर्मीचा एवढा वेळ दाबून धरलेल्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती आवेगाने म्हणाली," असीम.. माझं प्रमोशन नाही झालंय"


तिचा हात हातात घेऊन तो विश्वासाने बोलत होता. त्याच्या प्रत्येक शब्दातून प्रेम पाझरत होत. "उर्मी,  तू ग्रेट होतीस आणि ग्रेटच राहशील. अग प्रमोशन्स काय येतील आणि जातील.  पण सगळ्या आघाड्यांवर खंबीरपणे टिकून राहणे आणि पुरून उरणं तुझ्यासारखं कोणा दुसऱ्याला थोडच जमणार आहे.  खरंतर तू खूप स्पेशल आहेस आणि युनिकही.  फक्त आताच्या घडीला ते तुला तुझं कळत नाहीये.  माझी उर्मी.. अशी खचून जाणाऱ्यातली नाही. तिची वृत्तीच मुळात लढवय्यी आहे . माणूस म्हणून तू खूप छान आहेस.  तुझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांभाळुन, जाणून घेऊन त्यांच्याबरोबर काम करणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणे यातच सगळं येतं गं. त्यामुळे तुझं अवलोकन..ते ही इतक्या थोडक्या स्तरांवर दुसरं कोणीही करू शकत नाही."


    लेक धावत तिच्याजवळ आली आणि तिला घट्ट मिठी मारत म्हणाली," आई तू खूप स्पेशल आहेस."


     दोघं हळूहळू तिला आत घेऊन गेले अन तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले.... खोलीमध्ये तिला आतापर्यंत मिळालेले विविध स्पर्धांमधले, वेगवेगळ्या स्तरांवरचे सर्टिफिकेट्स, मेडल्स खुबीने टेबलवर मांडून ठेवले होते. तिने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेणारे अनेक पुरस्कार,  तिच्या लेखांची पेपर मधील प्रसिद्ध झालेली कात्रणं.... सर्व काही तिला समोर दिसत होतं. जणूकाही तिच्या आतापर्यंतच्या आयुष्याच एक दालनच तिच्यासमोर उघडलं गेलं होतं आणि त्याच्या दारावर लिहिलं होतं....


" उर्मी, धिस इज व्हॉट यु आर."


    दोघांनी तिला जवळ घेतलं. तो स्पर्श तिला सांगत होता ..आम्हाला तुझा अभिमान आहे.


   आज तिचं खरंच प्रमोशन झालं होतं, मनाचं......

 चंचलतेकडून प्रगल्भतेकडे....

 अन् ते तिला दिलं होतं तिच्या जीवनातील सर्वात जवळच्या व्यक्तीने.. असीम...


तिचा कृष्ण सखा...

वरील कथा दिपाली थेटे राव यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


लेखिकेची दुसरी कथा खिडकी जरूर वाचा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post