मुक्ती

मुक्ती

✍️ सचिन देशपांडे 

जवळजवळ पाचेक वर्षांनी यंदाच्या श्रावणात, त्यांच्या घरी सत्यनारायणाची पुजा घालायचं ठरलं होतं. नेहमीच्या ओळखीतल्या गुरुजींना फोन केला होता... आणि आश्चर्य म्हणजे अगदी त्यांच्यासाठीच जसा काही राखून ठेवला होता दिवस नी वेळ, अशा तर्‍हेने गुरुजीही लागलीच मिळाले होते. त्या दोघांनी मग आपापल्या आॅफिसमध्ये सुट्टीही सांगितली होती... आणि विशेष म्हणजे दोघांच्याही बाॅसेसकडून अजिबात का-कू न होता, ती सँक्शनही झाली होती. प्रचंड खुश होती आता ती दोघं. सगळं जणू जुळनच आलं होतं, यथासांग सत्यनारायणाची पुजा संपन्न होण्यादृष्टीने. मग त्याने त्याच्या बाबांनाही सांगितलं फोनवरुन पुजेविषयी, आणि त्यादिवशी सकाळपासूनच त्याच्या घरी येण्याविषयी सुद्धा. 

बाबांनी फोन खाली ठेवला, नी त्यांचं लक्ष गेलं भिंतीवरील बायकोच्या फोटोकडे. आणि ते विचार करु लागले... मागलं सत्यनारायण जेव्हा झालं, तेव्हा ही सुद्धा होती. अगदी ठणठणीत होती. आम्ही जोडीनेच गेलो होतो लेकाकडे पुजेसाठी... अगदी सकाळपासूनच. आणि अचानक लेक म्हणालेला... आई - बाबा आज पुजेला तुम्ही बसायचं. आपण टिपाॅयवर चौरंग ठेऊ, आणि पुजा मांडू. तुम्हा दोघांसाठी नी गुरुजींसाठी खुर्च्या ठेऊ. काही त्रास होणार नाही कोणालाही. आणि मग हो - नाही... हो - नाही करता करता, अखेर आम्हीच बसलो पुजेला जोडीने. जवळपास तीसेक वर्षांनी. कारण लेकाची मुंज झाल्यानंतर, तोच बसू लागला होता पुजेला. लग्न होईपर्यंत एकटा, अन् मग बायकोसोबत जोडीने. मागल्या पुजेला आम्ही दोघं बसलो आणि... आणि... पुजा सांगून गुरुजी घाराबाहेर पडले न पडले तोच, ही सुद्धा धाडकन खाली कोसळली. 'ब्रेन हॅमरेज'... अवघ्या काही मिनिटांतच खेळ खलास झालेला. म्हणजे डाॅक्टरांनी घरी येऊन निदान केलं ते मृत्यूचच, आजाराचं नाही. तेवढाही वेळ दिला नाही हिने आम्हाला. ह्या आमच्या घरातून सवाष्ण बाहेर पडली होती ती, आणि सवाष्णच गेली... परंतू लेकाच्या घरी. मी मात्र पंधराव्या दिवशी आमच्या दोघांच्या ह्या घरी परतलो, ते एकट्यानेच. लेकालाही त्याच्या आईचं ते अचानकच जाणं इतकं लागलं मनाला की, त्यानंतर सत्यनारायणाची पुजा घालणंच बंद पडलं. इतक्या वर्षांची प्रथा होती आपल्या घराची, पण मी ही नाही बोललो काही लेकाला. कारण माझ्याही मनात, नक्कीच कुठेतरी कटूता होती... उदासिनता होती. आणि आता पाच वर्ष सरली सुद्धा हिच्याशिवाय आणि सत्यनारायणाशिवायही. पण मग ह्याचवर्षी नेमकं लेकाला पुन्हा का सुचावं पुजेविषयी? अस्वस्थ होत त्यांनी, दोन्ही हात जोडले बायकोच्या फोटोला. 

पुजेचा दिवस उजाडला. बाबांनी सकाळी सात वाजताच, लेकाच्या घरची बेल वाजवली. आल्या आल्या मग हात - पाय धुवून बाबा, विष्णू सहस्त्रनामाकरीता तुळशीची पानं, एकेक करत वेगळी करायला बसले. सुनबाईने बाबांना चहा आणून दिला, नी ती पुन्हा स्वैपाकात गुंतली. गुरुजी आठ वाजता येणार होते... त्यामुळे मुलगा, सुन आणि नात असे सगळे आंघोळी - पांघोळी आटोपून जरी बसलेले... तरी तयार म्हणून कोणीच दिसत नव्हते. तिघेही घरच्या कपड्यांवरच होते. सुनबाईच्या हातातील बांगड्या - पाटल्या, स्वैपाकखोलीतील भांड्या - कुंड्यांशी गप्पा मारत होत्या. लेक चौरंगाला केळीचे खांब लावत होता. तर नात पुजेची बाकी सामुग्री गोळा करत, एके ठिकाणी आणून ठेवत होती. घरात देवासमोर लावलेली उदबत्ती... आणि नातीने मोबाईलवर लावलेला सुरेश वाडकरांचा गायत्री मंत्र, मंदपणे आसमंतात जोडीने दरवळत होते. एकंदरीतच घरचं वातावरण अतिशय मंगलमय झालेलं. पण बाबांना एक फक्त कळलं नव्हतं की, चौरंग टिपाॅयवर का ठेवलाय? 

तेवढ्यात गुरुजी आलेच... नी स्थिरस्थावर होत, पुजेची मांडामांड करु लागले. बाबा म्हणाले लेकाकडे बघत... "अरे जा आता तयार हो पाहू. सुनबाईलाही सांग. तुम्हाला पुजेला बसायचंय. गुरुजींचा खोळंबा नको उगिच आपल्यामुळे. ह्या दिवसांत जोडून पुजा असतात त्यांना". बाबा हे सांगेपर्यंत, सुनही आली होती बाहेर स्वैपाकाचा डाव हातात घेऊनच. आणि नातही जागची उठून, तिच्या बाबाजवळ जाऊन उभी राहिलेली. 

"बाबा... बाबा आज पुजेला तुम्ही बसायचंंय. अगदी व्यवस्थित तयार होऊन". लेक बाबांकडे बघत बोलला. 

"अरे पण... कसं शक्य आहे हे. मी हा असा एकटा. आणि... आणि त्यातून तुझी आईही ह्याच प्रसंगी... असं कसं चालेल अरे". बाबा आश्चर्याचा धक्का बसूनच उत्तरले.

"हो बाबा... आई पाच वर्षांपुर्वी ह्याच प्रसंगी गेली... अर्ध्यावरच. भले पुजा सांगून झाली होती... पण... पण सत्यनारायणाचा प्रसादही, तोंडी लागला नाही हो तिच्या. तिच्या आवडीचा स्वैपाक केला होता सगळा, पण ताटावर बसूही शकली नाही हो ती. आणि ह्या धक्क्यामुळेच मी, पुढे  कधी सत्यनारायणाची पुजा घालायचा विचारही करु शकलो नव्हतो. पण... पण मागच्याच आठवड्यात एके रात्री मी जेव्हा पाणी प्यायला उठलो, तेव्हा बाहेर टिव्हीचा उजेड दिसला मला. लेकीने मेनस्विच आॅफ केला नाहीये हे समजून, मी हाॅलमध्ये आलो. बटणं बंद करुन मी वळलोच नी मला आई दिसली, ह्या टिपाॅयच्या शेजारीच खुर्चीवर बसलेली. सुरुवातीला दचकलो मी, पण मग सावरलो. माझी आईच तर होती ती, भिती तरी कशी वाटणार होती मला. माझ्याकडे डोळे भरुन बघत मला म्हणाली... ह्या वर्षी तरी सत्यनारायण घालशील का रे? गेली चार वर्ष तुला दिसण्याचा, तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. अखेर ह्या श्रावणात यश आलं बघ. तेव्हा आतातरी निदान घालशील का रे सत्यनारायण? प्रसाद उष्टावला नाही मी त्या दिवशी, की माझ्या आवडीचा सुनबाईने केलेला बेतही. ती डाळींबीची उसळ नी उकडलेल्या बटाट्याची भाजी. आणि फक्त मला एकटीलाच आवडते म्हणून, शेंगदाणे घालून सुनबाईने केलेली ती आळूची पातळ भाजी. ती भाताची मूद, तीवर गोडं वरण नी चमचाभरुन तुप. काही म्हणजे काहीच तोंडी लागलं नाही रे... माझ्या एकटीच्याच नाही, तर तुमच्या कोणाच्याही. तो साजूक तुपातला केळ्याचे काप घातलेला शिरा... आणि त्यावरचं ते तुळशीचं पानही, तसंच राहिलं ना? कारण तुम्ही कोणीच तो खाल्ला नाहीत नंतर. ते... ते तुळशीचं पानच, छातीवर ओझं होऊन बसलंय रे माझ्या. आणि ह्या सगळ्याहूनही मुख्य म्हणजे... साधं डोळे भरुन बघताही नाही आलं रे मला ह्यांना. एवढं तीस वर्षांनी, मी अन् हे पुजेला बसलेलो जोडीने. मी मस्त पैठणी नेसलेले... हे सुद्धा नारिंगी सोवळ्यात कसे छान, गोरेपान दिसत होते. ह्यांना तसं ते उघडं नी फक्त जानव्यावर बघून वाटलं होतं की, असं हळूच जवळ सरावं ह्यांनी माझ्या... अन् मी त्यांना लाडाने दूर लोटावं. पण... पण ह्यांच्याआधी मृत्यूच जवळ सरकला होता माझ्या, ज्याला मी नाही लोटू शकले दूर. तेव्हा माझी ही अपुर्ण इच्छा, निदान ह्यावर्षी तरी पुर्ण करशील? ह्यांना तेच नारिंगी रंगाचं सोवळं नेसवून, पुजेला बसवशील? ह्यांच्या शेजारील खुर्चीवर माझी तसबीर ठेऊन, तिच्यावर मी नेसलेली तीच मोरपीशी पैठणी ओढशील? सुनेला अगदी त्याच दिवशीचा, अगदी तस्साच सगळा बेत करायला सांगशील? आणि हो... प्रसादाच्या शिर्‍यावरचं तुळशीपत्र बाजूला करुन, शिर्‍याचा पहिला चमचा ह्यांच्या हातावर देशील? हे जेव्हा खातील ना शिरा, मला तो मीच खाल्ल्यासारखा वाटेल मग. आणि बाबा... बाबा तुम्हाला सांगतो... ते... ते स्वप्न नक्कीच नव्हतं. म्हणूनच म्हणतोय बाबा... आज पुजेला तुम्ही बसायचंय. तुमचं नारिंगी सोवळं आत पलंगावर ठेवलंय, ते मस्तपैकी नेसून या. आईचा फोटो नी त्यावर ओढलेली तिची पैठणी, तयारच असेल बाहेर खुर्चीवर तुम्ही येईपर्यंत". इतकं बोलून त्याने त्याच्या लेकीकडे पाहिलं. नात मग आजोबांचा हात हळूवार धरुन, त्यांना आत घेऊन गेली. आणि दरवाजा ओढून, बाहेरच उभी राहिली ती.

.

.

.

पुजा यथासांग पार पडली... आरती झाली. आणि त्याने प्रसादावरचं तुळशीचं पान बाजूला करत, एक चमचा प्रसाद बाबांच्या हातावर ठेवला. बाबांनी त्याच्याकडून ते तुळशीचं पान मागून घेत, ते आपल्या तळहातावरील प्रसादाच्या घासावर ठेवलं. तो हात तसाच कपाळाला लावला त्यांनी आपल्या, आणि त्या तुळशीच्या पानासहीतच प्रसादाचा घास ग्रहण केला. ते तुळशीचं पान उदरात घेऊन जणू बाबांनी, अडकून पडलेल्या आईंना मोकळीक दिली होती. इथे बाबांच्या घशाखाली प्रसादाचा शिरा उतरत असतांना... तिथे बाजूलाच आईच्या फोटोवर ओढून घेतलेली पैठणी, अचानक आलेल्या हवेच्या झुळूकीने उडून पाठी सरकली होती. आणि पैठणीच्या काठाला घासला जाऊन... फोटोतील आईच्या कपाळावरील सुकलेल्या लाल गंधाचा पापुद्रा, खाली पडला. फोटोतील रिकाम्या कपाळाच्या आईला, कदाचित आज खर्‍याअर्थी 'मुक्ती' मिळाली होती.

---सचिन श. देशपांडे

वरील कथा सचिन देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post