बदला

 बदला......

✍️ योगेश साळवी 

     गावाकडे जायचं झालं की त्या दिवसात आठवायची ती शहराकडे क्वचितच आढळणारी लाल रंगाची एसटी, लाल रंगाचा धुरळा उडवणारी बैलगाडी, लाल रंगाची माती, या मोठाल्या विहिरी, मोठमोठी हिरवी पिवळी शेते... आणि पंडित गुरुजींची विद्या.

       विद्या आणि माझ्या वयामध्ये सात-आठ वर्षाचा तरी फरक असेल. आमच्या वयोगटातील बरीच मुलं तिला विद्याताई म्हणायचे. मी मात्र तिला विद्याच म्हणायचो. आम्हा दोघांनाही वाचनाची आवड होती. गावाला गेलो की बहुदा रिकामा वेळ भरपूर असे. त्यावेळी आजच्यासारखे मनोरंजनाचे वेगवेगळे मार्ग... स्मार्टफोन वगैरे नव्हते. मग आम्ही मुलं पुस्तकातच रमून जायचो.

        विद्या कुठून कुठून मला पुस्तक आणून देत असे. उंचीने वाढलेली आणि वागायला प्रौढ माणसासारखी विद्या मला चेटकीणीची काळी जादू, लाल परी आणि काळा घोडा..... अशी तर कधी कधी किशोर, चांदोबा अशी पुस्तके आणून देत असे.

        " हे बघ आज तुझ्यासाठी काय आणलंय..." पऱ्या पलीकडे पंडितांचे घर होतं. तिथून ओढा पार करून माझ्या घराकडे येऊन पायरीवर बसून विद्या म्हणायची.

        " काय आणलं ...??"  बालसुलभ उत्सुकतेने मी विचारायचो.

       " किशोरचा दिवाळी अंक... तात्यानी माझ्यासाठी तालुक्यातून आणला होता. सोबत सुकी करवंद पण आणलीयत. " विद्या सांगायची.

          विद्याच्या बाबांना ती तात्या म्हणायची. खरे तर सर्व गावच त्यांना तात्या म्हणायचं . तात्यांचे सडकेवर किराणा मालाचे दुकान होते. त्या दुकानात ते सकाळपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असायचे. त्याकाळी गावात मोजून एक ..दोनच अशी सामान विकणारी दुकाने असायची.

        विद्याचे तात्या जोडीला जडीबुटीची औषधे पण नाममात्र दरात विकायचे. आजच्या भाषेत सांगायचं तर आयुर्वेदिक डॉक्टरच म्हणाना... त्यांच्या औषधाला.. हाताला चांगला गुण होता म्हणे. तालुक्याचा दवाखाना खूप अंतरावर असल्याने लोक जायचा कंटाळा करत असावीत. मग साधारण ताप सर्दी वर, खोकला ,पोट दुखीवर तात्या कागदाच्या पुडीत  चूर्ण, कसलीशी पावडर वगैरे बांधून देत.

त्यांच्या दुकानातच खलबत्ते, छोट्या आकाराच्या बाटल्या, पुड्या  यासाठी ठेवलेल्या असत. सकाळी लवकर उठून कधी तात्यांबरोबर तर कधी एकटी विद्या यासाठी त्यांना लागणारी झाडाची पाने, काही विशिष्ट प्रकारची फळे, पाला.. इत्यादी साहित्य आणून द्यायची. सुट्टीत गावाकडे आलो असताना मी कधी तिच्याबरोबर करवंद.. जांभळे आणायला आणि तिला मदत करायला म्हणून तिच्याबरोबर डोंगरावर रानात जायचो.

       तर विद्यानी असं काही किशोर, चांदोबा वगैरे आणून दिलं की मला त्याचा फार अप्रूप वाटत असे. त्या बदल्यात ती माझ्याशी का कुणास ठाऊक पण दबक्या आवाजात काहीतरी रहस्य सांगितल्यासारखी गप्पा मारत असे.

        " हे बघ विन्या... लांब बस... कोणाला सांगू नकोस ..मला आज कावळा शिवला आहे." एकदा पंडितांकडे गेलो असताना माझ्यापासून दूर जात अंधाऱ्या खोलीत विद्या मला म्हणाली. नेहमीसारख्याच बारीक दबक्या आवाजात....

     मला हे प्रकरण नवीन होतं. मी अर्थातच तिला त्याचा अर्थ विचारला.

      " ते तुला कळेल थोडा मोठा झाल्यावर... मला मात्र चार दिवस कोणाच्या जवळ जायचं नाहीये, काम करायचं नाहीये ...तुझ्या जवळ एखादा गोष्टीचे पुस्तक असेल तर दे मला... आणि त्या कोपऱ्यात तुझ्यासाठी दोन झाडावरचे आंबे ठेवलेत ते घे." विद्या अधिकारवाणीने मला म्हणाली.

 आवाज तसाच.. काहीतरी रहस्य सांगते आहे असा... जणू काही कुणाला ऐकू गेलं असतं तर हिला फाशी देणार होतं.

      विद्याचे घर म्हणजे एक मोठा वाडा होता. या गावात पंडितांचा वाडा प्रसिद्ध होता. दूध दुभते, आंब्याची कलमे, शेतीवाडी भरपूर होती म्हणे. मात्र विद्याचे दुर्दैव असं की विद्येची आई तिच्या लहानपणीच गेली.... विद्याला सख्खा भाऊ किंवा सख्खी बहिण वगैरे कोणीच नव्हते. तात्या तर सारखे कामात असायचे. तशी विद्याला चुलत भावंडे होती पण ती वयाने फारच मोठी... तात्यांना चार भाऊ होते आणि सामाईक कुटुंब होते. पण ते कुटुंब गावातल्या त्या काळच्या बऱ्याचशा घरां सारखे जुन्या परंपरा पाळणारे 

आणि जुन्या चालीरीती कसोशीने जतन करणारे होते.

        माझ्या इतर भावंडांपेक्षा किंवा गावातील इतर कोणत्याही मुलामुलीं च्या पेक्षा विद्या चा ओढा माझ्याकडं जास्त असावा. मी गावाकडे तसा फार कमी म्हणजे शाळेच्या दिवाळीच्या सुट्टीत किंवा मग एप्रिल.. मे च्या उन्हाळी सुट्टीत यायचो. विद्याला मी आलो की फार म्हणजे फारच आनंद व्हायचा. तिच्या हसऱ्या चेहेऱ्यावर दिसायचाच तो. इतक्या दिवसात साचलेल्या मनातल्या कितीतरी गोष्टी कधी मला सांगेन असं होऊन जायचं तिला. अशा बऱ्याच गोष्टी तिच्या खास ठेवणीतल्या कुजबुजत्या.. दबक्या हळू आवाजात ती मला सांगायची.

      असंच एकदा सुट्टीत गावाकडे आलो असताना कानावर आलं की विद्या म्हणे गावातल्या एका मुलाबरोबर शहरात पळून चालली होती. दोघेही जण विद्या आणि तो मुलगा पकडले गेले. मग भरपूर मार खाल्ला दोघांनी घरच्यांचा. विद्याला आधीच तिच्या तात्यांचा खूप धाक होता. त्यात हे प्रकरण तिच्यावर चांगलेच शेकले. तिचं शिक्षण तसं दहावीनंतर थांबलं होतं त्यात आता कुणाकडे पूजेला लग्न समारंभाला वगैरे जाण्यावर पण निर्बंध आले. तिच्या समवयीन तारुण्यात वगैरे आलेल्या तिच्या मैत्रिणी नटून-थटून सजून अशा प्रसंगात मिरवत असताना विद्या पंडितांच्या त्या भल्यामोठया वाड्यात तिच्या अंधाऱ्या खोलीत बसून कसा वेळ घालवत असेल याची मी त्यावेळी कल्पना करी आणि मला वाईट वाटे. कारण त्यावेळी रिकामा वेळ घालवायची आजच्यासारखी टीव्ही.. स्मार्टफोन वगैरे साधने नव्हती. अर्थात बाहेर फिरण्यावर, चांगले चुंगले कपडे घालण्यावर बंधने आली असली तरी घरकाम, धुणीभांडी, केरकचरा, गोठ्यातील गुरांची कामं यात वाढ झाली असल्याने विद्याला फावला वेळ तरी किती मिळत असणार हा प्रश्नही होताच.

        सत्तर.. एन्शी च्या दशकात एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर एखाद्या खेडेगावात अशाप्रकारे पळून वगैरे जाण्याचा पडलेला डाग फारच महागात पडायचा. त्यामुळे का तर इतर काही गोष्टीमुळे नक्की माहिती नाही.. पण विद्याचे लग्न करून देण्यात तात्यांना बरेच कठीण गेलं असणार. कारण कोणत्या बापाला आईविना असलेल्या एकुलत्या एक पोरीचं लग्न व्हावं असं वाटलं नसणार... पण मग नंतरच्या काळात विद्याच्या बरोबरीच्या बहुतेक जणांची लग्न झाली तरी विद्या लग्नाशिवाय च राहिली होती. त्यावेळी मी मात्र विद्या पेक्षा बराच लहान असल्याने माझे आणि विद्याचे भेटणं चालूच असायचं. सुट्टीच्या त्या गाव भेटीच्या काळात पुस्तके.. त्यानिमित्ताने होणाऱ्या गप्पा.. ही आमच्यातील संवादाचा एक महत्वाचा दुवा होती.

        एकदा मग मुंबईला असताना कामावर खबर आली विद्यालय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले म्हणून. माझं कॉलेजचं शिक्षण नुकतंच संपवून मी नोकरीला लागलो होतो. विद्या बाबत ची ती बातमी समजताच रजा टाकून रत्नागिरीला आलो. रत्नागिरीच्या एका मोठ्या  इस्पितळात विद्याला दाखल केलं होतं. जंगलात तात्यांकरता नेहमीप्रमाणे औषधासाठी जडीबुटी आणायला गेलेली असताना रानडुकराने तिच्यावर गंभीर हल्ला केला होता म्हणे... बरीच दुखापत झाली होती तिला... अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले होते. मी इस्पितळात येऊन पोहोचलो तेव्हा धोका टळला होता. तरी बराच रक्तस्त्राव झाला होता. आता अति दक्षता विभागातून हलवून स्पेशल वॉर्डात स्वतंत्र खोलीत ठेवलं होतं.

         त्या खोलीत विद्या आणि मी आता एकटेच बसलो होतो. तिच्यासाठी आणलेली संत्री आणि शहाळे मी बाजूच्या टेबलावर ठेवलं.

          " विद्या.. खरं सांग तुझ्यावर जंगली प्राण्याचा खरोखर हल्ला झाला...?" आजूबाजूला कोणी नाही याची खबरदारी घेत मी विद्याला विचारलं.

    विद्या तिच्या दबक्या आवाजात नेहमीसारखं तिच्या खास शैलीत कुणी ऐकत नाही ना याची काळजी घेत सांगू लागली.

         " हो.. जंगली प्राणी होता तो... पण माणूस नावाचा... आपल्या गावच्या सरपंचांचा राजाभाऊंचा मुलगा.. विकास..." विद्या म्हणाली.

        खोलीत थोडा वेळ टाचणी पडली तरी आवाज होईल अशी शांतता पसरली. थोड्या वेळानं झाडावर बसलेला कावळा करवादून ओरडला तेंव्हा भानावर आल्यासारखी विद्या पुढं सांगू लागली.

        " त्यादिवशी तात्यांसाठी जडीबुटी, पाने आणायला मी डोंगरावर गेले होते. पाने गोळा करता करता मला उशीर झाला... दुपारचे बारा साडेबारा झाले असतील. रानात त्याच वेळेला विकास त्याची गुरे घेऊन आलेला.. मला एकटी बघून त्याने माझ्यावर झडप घातली.... आणि...."

विद्याला पुढे बोलवलं नाही.

       "पण हे तू कोणाला सांगितलं नाहीस..?"  मी विचारलं.

विद्या ने अशी बरीच रहस्य मला सांगितली होती.

      " नाही... फक्त तात्यांना आणि आता तुला सांगितलंय..

आणि सांगूनही काही उपयोग नाही... सरपंचांची ओळख सत्ताधारी पक्षात आहे. ते प्रकरण सहज दाबून टाकतील. अब्रू जाईल ती माझी आणि तात्यांची... आधीच गावाने मला वाईट चालीची म्हणून ठरवलं आहे." विद्या म्हणाली.

      " आणि मग तात्या....??" मी विद्याला विचारलं... काही अविश्वासनीय असं वाटलं असेल तर मी वाक्य असच अर्धवट सोडायचो हे विद्याला ठाऊक होतं.

       "हे बघ विन्या... कुणाला सांगू नकोस. सरपंच राजाभाऊ आणि तो नराधम... त्यांचा मुलगा विकास दोघे काल रात्री तात्यांकडे आले होते. म्हटलं तर माझ्या तब्येतीची चौकशी करायला... पण कशासाठी आले होते ते तात्या समजून होते. माझ्यावर दवाखान्यात झालेला खर्च तात्यांना देऊन मांडवली करायला बघत होते." 

      विद्या बोलता बोलता थांबली. मग एक भला मोठा  

निश्वास टाकून पुढे म्हणाली.

        " तात्यांनी जास्त काही न बोलता ती रक्कम घेतली. त्यांचा पाहुणचार केला. त्यांना चहा दिला करोली चा रस घातलेला....." विद्याच्या चेहऱ्यावर थोडे वेगळे भाव आणि डोळ्यात वेगळी खुनशी छटा उमटली हे बोलताना.

       करोळी चा रस घातलेला चहा.... मला काहीतरी आठवलं.

      खूप खूप वर्षांपूर्वी कधीतरी विद्या बरोबर करवंद गोळा करायला गेलो असताना विद्याने मला करोलीचे झुडूप दाखवलं होतं. त्या झुडुपाच्या  पाल्याचा रस वस्त्रगाळ करून थेंब दोन थेंब चाटवला तरी त्यात ऐन तारुण्यात असलेल्या पुरुषाला नपुंसक करायची शक्ती असते... त्याची कामेच्छा मरून जाते... अगदी नसबंदी केलेल्या कुत्र्यासारखा होऊन जातो तो..... ती भावना संपवणारे ब्रोमाइड विपुल प्रमाणात असतं म्हणे त्यात.

       आपल्या मुलीवरील अत्याचाराचा बदला तिच्या तात्यांनी आपल्या परीने घेतला होता.

~योगेश साळवी

वरील कथा योगेश साळवी यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post