टच अप

 

'टच-अप' 

सचिन देशपांडे 

जवळ जवळ सहा महिन्यांनंतर आज पहिल्यांदाच, बाहेर पडली होती अभ्यंकर फॅमिली. पुण्याला शेखरच्या चुलत भावाचं लग्न होतं... तिथेच चालले होते शेखर, शर्वरी आणि त्यांची लेक श्रेया. शेखरच्या आई, संजिवनी अभ्यंकर मात्र जाणार नव्हत्या पुतण्याच्या लग्नाला. वयवर्ष पंच्याहत्तर असल्या कारणाने... शेखरनेच मनाई केली होती आईला, त्यांच्याबरोबर येण्यास. "ह्या अशा दिवसांत उगिच तुझ्या वयामुळे, तुला कुठला संसर्ग व्हायला नको"... असं सांगत. जरा हिरमुसल्याच होत्या संजिवनीबाई त्यामुळे... आणि रुसूनच बसल्या होत्या खोलीत आपल्या. शेखर "येतो गं" सांगायला गेला, तेव्हाही गप्पच बसून होत्या त्या. शर्वरी आणि श्रेयाला मात्र जवळ घेत, त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत, श्रेयाच्या गालावर पापा देत... निरोप दिला होता त्यांना संजिवनीबाईंनी. 

संजिवनीबाईंना मुळात नटण्या - थटण्याची फार हौस असे. त्यांच्याकडच्या त्या जरी - काठाच्या साड्या म्हणजे तर... संजिवनीबाईंच्या भजनी मंडळातील इतर बायकांमधील, चर्चेचा विषय असे. उंच, शेलाट्या आणि तुकतुकीत गोर्‍यापान संजिवनीबाईंवर, त्या साड्या उठूनही दिसत असत. संजिवनीबाईंचे मिस्टर सदाशिवराव अभ्यंकर, पंधरा वर्षांपुर्वी गेले होते. पण जातांना बायकोकडून शब्द घेतला होता त्यांनी की, "जरी - काठाच्या साड्या नेसणं सोडणार नाही... मग कपाळ व गळा रिकामा ठेव वा नको ठेऊ". त्यामुळे मिस्टर गेल्यानंतरही संजिवनीबाई... पांढर्‍या किंवा फिकट प्लेन साडीत वगैरे, कधीच वावरल्या नव्हत्या. कपाळावरही टिकली लावत असत त्या... आणि गळ्यात त्यांच्या त्या दोन पदरी घसघशीत मंगळसुत्राऐवजी, फक्त एक साधी सोन्याची चेन घालत असत. कुठल्याही कार्यात अगदी मनापासून तयार होत असत संजिवनीबाई... आणि त्यांच्या ह्या दिसण्याचं, ह्या थाटा - माटाचं प्रचंड कौतुकच होतं... अभ्यंकर - आठवले अशा दोन्हीकडच्या कुटुंबियांत. 

तर शेखर आणि फॅमिली बाहेर पडल्यावर, संजिवनीबाईंना अधिकच खायला उठलं घर. इतक्या महिन्यांनंतर त्या, एकट्या असणार होत्या घरी. अगदी सकाळच्या सात वाजल्यापासून... ती लोकं रिसेप्शन, वरात वगैरे सगळं आटोपून... पुण्याहून निघून इथे पोहोचेपर्यंत. म्हणजे रात्रीचे १२ - १ कुठेच नव्हते गेले. अख्खा दिवस आता, 'आ' वासून उभा होता संजिवनीबाईंपुढे. "आंघोळ - पांघोळ, देवाचं वगैरे तर आटोपून घेऊ... मग बघू पुढचं पुढे"... असा विचार करत, संजिवनीबाई जागच्या उठल्या. नऊ वाजले होते घड्याळात... जेव्हा शेवटची पोथी खाली ठेवत, देवासमोर नाक घासत सांगता झाली होती... संजिवनी बाईंच्या पुजेची. "आता काय?"... असा प्रश्न स्वतःलाच विचारत, संजिवनीबाईंनी फ्रिज उघडला... बंद केला. ओट्यावरचं शेल्फ उघडलं... बंद केलं. "छे... शर्वरीही अख्ख्या दिवसाचं आपलं खाण करुन गेलीये. चुकलंच आपलं. आज आपणच करायला हवं होतं सगळं. तेवढाच टाईमपासही झाला असता". अगदीच सुन्न झाल्या होत्या संजिवनी बाई, आणि तितक्यात फोन वाजला त्यांचा. शेखरचा फोन होता. "पोहोचली वाटतं मंडळी... करा मजा मला बापडीला एकटं टाकून"... असा विचार करतच, फोन घेतला संजिवनीबाईंनी. आणि हॅलो म्हणतच होत्या त्या, की आठवलं त्यांना आपण लेकावर रुसल्याचं. मग लगेच "हॅलो" ची जागा "हूsss" ने घेतली. 

शेखर बोलत होता पलिकडून... "आई... आत्ताच पोहोचलो बरं का आम्ही. काकांकडेच आलोय. देव - देवकच चाल्लय इथे. आता फ्रेश होऊन, मस्त तयार होऊन निघूच आम्ही. शर्वरी नी श्रेया दोघीही, सुपर एक्साईटेड आहेत पैठणी नेसायला मिळणारेय म्हणून. श्रेयाला तर इथे चिडवायलाही सुरुवात केलीये की... साडी पहिल्यांदाच नेसतीयेस तेव्हा नीट चापून - चोपून नेस हो... नाहीतर कोणालातरी आवडायचीस तू, नी नेमकी साडी सुटायची. श्रेयाही तोर्‍यात सांगतीये सगळ्यांना... आज्जीची नात आहे मी... मला साडी कॅरी कशी करायची सांगणं म्हणजे, धोनीला हेलिकाॅप्टर शाॅट शिकवणं आहे कळलं का. हा हा हा... साॅल्लिड धम्माल चाल्लीये इथे. श्रेयाही बघ ना कशी ती. मी, शर्वरी दोघेही सांगत होतो तिला की, नवी साडी घे. पण तिला मात्र तुझीच कुठलीतरी साडी नेसायची होती. आणि मग बाबांनी तुला... तिच्याच बारशाची घेतलेली, पैठणी निवडली बघ तिने. आई... आई... अग श्रेया आली बरं का साडी नेसून. काय सुंदर दिसतीये म्हणून सांगू. हुबेहूब तुच तरुणपणची... मी फोटोंतून पाहिलेली. किती पटकन्न मोठ्या होतात गं लेकी. बरं आई... मी ठेवतो. मला ही तयार व्हायचंय... खास शेरवानी घेतलीये मी, माहितीये नं तुला. शर्वरीही येईलच इतक्यात बाहेर. आणि मला असाच बसलेला बघून, उगिच सगळ्यांसमोरच तासायची माझी. ठेवतो फोन. रात्री इथून निघतांना फोन करु... बाय". 

शेखरने फोन ठेऊनही दिला होता. संजिवनीबाईंना एका शब्दानेही न विचारता की, तू काय करतीयेस? एका शब्दानेही न सांगता की, आम्ही तुला मिस करतोय. संजिवनीबाईंचे मघापासून भरुन आलेले डोळे, झरझर वाहू लागले. त्या बसलेल्या खुर्चीच्या, शेजारील टिपाॅयवरच पत्रिका पडली होती. संजिवनीबाईंनी हातात घेत ती, पुन्हा उघडून वाचली. आमंत्रक म्हणून असलेलं स्वतःचं नाव पुन्हा मोठ्याने वाचत, स्वतःशीच खूश झाल्या त्या. दुपारी १२:२१ चा मुहुर्त होता. संजिवनीबाईंनी डोळे पुसतच घड्याळात पाहिलं, नी बोलल्या त्या... "दोन तास आहेत अजून. आपण असतो तिथे तर, आपणही अगदी मनापासून नटलो - थटलो असतो. असो...". असं म्हणत एक सुस्कारा सोडला संजिवनीबाईंनी... आणि जागेवरुन उठत किचनकडे त्या वळणार, तोच दारावरची बेल वाजली त्यांच्या. "आत्ता कोण बरं? केराची बादली तर बाहेर ठेवलीये आपण. दूध, पेपर, फुलपूडी सगळे केव्हाचेच येऊन गेलेयत. मग आत्ता कोण?". हा विचार डोक्यात चालू असतांनाच एकीकडे, मेन डोअर उघडलं संजिवनीबाईंनी. सेफ्टी डोअरमधून बघितलं त्यांनी, तर एक पंचवीशीची सुंदरशी मुलगी उभी होती हसत. संजिवनीबाईंनी तिला न ओळखल्याने, अर्थातच जाळीचा दरवाजा नव्हता उघडला. त्या मुलीला खुणेनेच "कोण ग बाई तू?" विचारलं त्यांनी. त्या मुलीने कोणालातरी फोन लावत, पुन्हा तोंडभरुन हसत... सेफ्टी डोअरच्या ग्रील्समधून मोबाईल, संजिवनीबाईंच्या हातात दिला. 

दुसर्‍या बाजूने त्यांची नात, श्रेया बोलत होती. "आज्जूडी... कशी आहेस डार्लिंग? बरं ऐक... ती बाहेर जी मुलगी आहे, ती माझी पार्लरवाली आहे. तिला खास बोलावलंय घरी आपल्या, तुला नटवायला. ती तुझा मेक-अप, हेअर स्टाईल वगैरे करेल मस्तपैकी. बाकी साडी नेसण्यात तर तुझा हात, कोणीच धरु शकणार नाही. तेव्हा तुझ्या रुममधल्या... तुझ्याच वाॅर्डरोबच्या खालच्या खणात, एक नवी - कोरी झकास पैठणी ठेवलीये. अगदी 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा' टाईप्स. ती मस्त नेस... आणि रामसूम तयार हो. अँड आॅफकोर्स... त्या मुलीला पहिलं घरात घे. सगळं आटोपलं तुझं की, ती मला काॅल करेल. सो बी क्विक ब्युटिफूल... अॅज यू हॅव ओनली, वन अँड हाफ आवर इन युवर हँड". संजिवनीबाईंना नातीचा हा मशिनगन गोळीबार, झेपलाच नव्हता. तरीही थोडंसं सावरत त्यांनी विचारलंच... "अगं पण मी मेलं इथे तयार होऊन काय करु?". श्रेया बोलली... "लांबून बाण आणिक सुसाट सोडता येतो डिअर. चल चल हरी अप... प्लिज किप द फोन डाऊन, अँड स्टार्ट गेटींग रेडी... बाय". संजिवनीबाई मग फक्त "अगं.. अगं.. अगं" बोलत राहिल्या पाव मिनिट, समोरच्या त्या शांततेसोबत.


.


.


.


जांभळ्या रंगाची भरजरी पैठणी नेसून, वयानुरुप सुटेबल मेक-अप करुन, केसांचा फ्रेंच रोल घालून... तयार झाल्या होत्या संजिवनीबाई. त्या पार्लरवाल्या मुलीने स्वतःवरच खूश होतं, त्यांच्या चेहर्‍यावरुन हात फिरवत... बोटंही मोडली होती कानांच्यावर. ठरल्याप्रमाणे तिने मग... श्रेयाला फोन लावला सांगयला की, "आॅल डन". संजिवनीबाईंना अजुनही कळत नव्हतं की, नेमकं काय चाल्लय. आणि तेवढ्यात श्रेयाचा काॅल आला... व्हिडिओ काॅल. त्या पार्लरवाल्या मुलीने... तो तिच्या टॅबशी कनेक्ट करत, रिसिव्ह केला. आणि टॅब संजिवनी बाईंसमोर ठेवला. संजिवनीबाईंना दिसले मग शेखर, शर्वरी आणि श्रेया... हसत हसत त्यांना हात करतांना. संजिवनीबाईंकडे बघत श्रेयाने, जोराची शिट्टीही मारली. त्या ही मग गोड लाजल्या. 

श्रेया म्हणाली... "आज्जूडी... कातिल दिसतीयेस. बरं ऐक... विसेक मिनिटांवर मुहुर्त आहे... किचनमध्ये टेबलवर एका वाटीत, कुंकू घातलेल्या अक्षता ठेवल्यायत... त्या हातात घेऊन बस. मंगलाष्टकांच्यावेळी तिथून तू अक्षता टाक. यू आर अटेंडींग मॅरेज फ्राॅम देअर माय बार्बी डाॅल... आहेस कुठे? आणि... आणि... डोन्ट थँक्स मी. हा सगळा खाटाटोप, तुझ्या लेकाने केलाय बरं का. ज्याच्यावर तू सकाळी रुसली होतीस. आणि ज्याने मघा झालेल्या तुमच्या काॅलमध्ये, मुद्दामहून तुझी काहीच विचारपूसही केली नव्हती. हा बघ... हा तुझा लेक... माझा बाबा... ही इज द कलप्रिट". इतकं बोलून श्रेयाने मोबाईल, शेखरकडे दिला. आता स्क्रिनवर माय - लेकच होते समोरासमोर... बघत एकमेकांना. दोघांचेही डोळे भरुन आले होते. शेखर तिथूनच पाया पडला आईच्या, नी म्हणाला... "कसली गोड दिसतीयेस गं आई". त्याला पुढे बोलताच येईना, गळा दाटून आल्याने. फोन श्रेयाकडे देत, तिथून सटकला शेखर. श्रेया म्हणाली... "रडून घे आज्जी. मी पाच मिनिटांत, पुन्हा व्हिडिओ काॅल करते. आणि हो... डोन्ट स्पाॅईल युवर मेक-अप टू मच". 

संजिवनीबाई उठून किचनमध्ये गेल्या, अक्षता आणायला. आणि देव्हार्‍यासमोर उभं रहात, हात जोडून रडू लागल्या त्या. दोनेक मिनिटांनी बाहेर आल्या त्या, डोळे पुसत नी तोंड भरुन हसत. आणि बसल्या त्या पार्लरवाल्या मुलीसमोर, टच-अप करण्याकरता. पण ह्यापेक्षाही त्यांच्या लेकाने, शेखरने केलेल्या... पुसट झालं की काय अशी शंका येणार्‍या, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या 'टच-अप' चं मोल... काही औरच अमुल्य होतं.


---सचिन श. देशपांडे


वरील कथा सचिन देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखकाच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post