दि.ची सा.

 दि.ची सा.

✍️ बीना बाचल 


तो संध्याकाळी घरी आला आणि ती दार उघडायला धावली.दार उघडताच तिचं लक्ष हातातल्या ऑफिस बॅग आणि दुसऱ्या हातातल्या हेल्मेट वर गेलं."हम्म,म्हणजे आजही नाहीच जमलं ह्यांना!"

तिची नजर कुठे आणि काय शोधतेय हे कळायला त्याला एक क्षण लागला," सो सॉरी अग, साफ विसरलो.तू सकाळी आठवण करून देते आहेस चार दिवस ;पण मी कामाच्या नादात साफ विसारतोय!उद्या नक्की आणतो"तिनं हसून बरं म्हटलं.

"अहो, दोन दिवसांवर दिवाळी आलीये अजून गॅलरीत आकाशकंदील लागला नाही, म्हणून आठवण करतेय.मलाही घरच्या कामात वेळ होत नाही बाहेर जायला!"तिनं पुन्हा एकदा तेच सगळं स्पष्टीकरण दिलं.

"अग, त्याला आत तरी येऊ देशील की नाही की दारातच झाडाझडती सुरू आहे?एवढं काय मेलं ते साडीच, कपाट तर भरलंय अजून किती भरणार आहेस" थरथरता हात आणि बिघाड झालेले कान बोलले.

"अहो,आईSSS, साडी नाही काही....." तिनं स्वर उंच केला पण तिच्या लक्षात आलं की काही उपयोग नाही!!

"काय बाई तरी, माझा लेक एवढा दमून येतो तर ही दारातच त्याची खरडपट्टी काढते. हिला काय जातं ......."थरथरता हात आणि बिघडलेले कान पुन्हा सुरू!

"हिला काय जातं... बोलायला! घरची कामं लवकर  आवरून जावं बाहेर ,कोण आहे इथे अडवायला....." घरातल्या ह्या रोजच्या संवादाने तीक्ष्ण जीभ झालेल्या  छोट्याशा हातांनी खाणाखुणा करत थ. हा.बि.का. (थकलेले हात, बिघडलेले कान)चा डायलॉग पूर्ण केला!!

"आचरट कुठली,मोठ्यांची अशी नक्कल करतात का?"तिने डोळे मोठे करत ती.जी.छो.हा.(तीक्ष्ण जीभ छोटे हात)ला दटावलं.

तेवढयात त्याला चहा आणि खाणं आणायला आत वळली आणि ते उरकलं की तिला  जेवणं आणि त्यानंतर चकलीची भाजणी भाजयची होती.

सगळे जेवण करून आपापल्या मोबाईल मध्ये घुसले, 

थ.हा.बि. का. नी झोपायला जाण्याआधी "भाजणी शांतपणे भाज,घाई करू नकोस नाहीतर वेंधलेपणा करशील गेल्या वेळी सारखा!" अशी आतापर्यंत 'य'वेळा दिलेली सूचना पुन्हा एकदा दिली.

तिला आठवून हसू आलं की गेल्या वेळी म्हणजे साधारण चौदा वर्षांपूर्वी तिच्या हातून भाजणी जरा जास्त भाजली गेली होती, नवीन होती तेव्हा ती ह्या घरात.

पण थ.हा.ना ती गेल्या वेळचीच असल्यासारखे आठवते त्याला कोण काय करणार!

तिनं हातानेच हो म्हटलं आणि त्या आपल्या खोलीत झोपी गेल्या.

ती पुन्हा  आपल्या कामाला लागली, अकरा वाजत आले होते ,तीही दमली होती पण हे काम आता उरकलं की सकाळी थोडं तिचंच काम हलकं होणार होतं.

'आपण हे उद्याचं काम आजच करून आज कधी रिकाम्या होणार आहोत देव जाणे!'तिचं तिलाच हसू आलं.

तेवढयात तो स्वयंपाक घरात डोकावला, ती कामात आहे बघून उगाच तिच्या केसांतून , बांगड्यांवरून ,पाठीवरून हात फिरवत राहिला.

'मी करू का मदत,बघू मला जमते का भाजणी'असं म्हणत त्यानं झारा तिच्या हातून घेतला मात्र दोन मिनिटात हात भरून आले त्याचे.

तिला ते लगेच समजलं,"राहू देत हो, उद्या ऑफिस आहे म्हटलं, भाजणी म्हणजे सोपं काम नाही हो"म्हणत तिनं त्याला झोपायला पिटाळले.

शेवटी सगळी कामं उरकून तीही झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी जे जे जी जी कामं येण्या जाण्याच्या वाटेवर असूनही विसरत होती ती ती तिनं आठवणीनं पूर्ण केली.

दुपारी सगळी खरेदी करून येताना एका हातात जड पिशवी, दुसऱ्या हातात आकाशकंदील घेऊन येताना ती दिसली तेव्हा कुठे थ.हा.बि. का. ना बरं वाटलं.

" बघ,स्वतः च केलं असतेस काम तर वेळेत झालं असतं ना?"असा आपला रोजचा सवयीनं एक टो. मारून टाकला शिवाय"उद्या पुरुषांची आंघोळ आहे तेव्हा उटणं, तेल तयार ठेव हो" ही एक सू. पण देऊन टाकली!

तिनं ही दिवसभराची सगळी कामं उरकून पुन्हा 'आजच उद्याची तयारी केली'

दिवाळीची पहाट अजून उजाडत होती तोवर उजडायच्या आधीच तिनं तुळशी पुढे, अंगणात सगळीकडे लुकलूकणार्या त्या इवल्याशा पणत्या लावल्या ,त्या बघत ती तिथेच रेंगाळली.तिला उभ्या उभ्याच पेंग येत होती खरं तर पण आंघोळी मग औक्षण वगरे सगळं साग्रसंगीत व्ह्यायचं होतं.

त्याला छान सुगंधी तेलानं मालिश करायची होती आणि मग गरम पाणी देऊन आंघोळ!

खरं तर गेल्या आठवड्यापासून दिवाळी च्या तयारीत ती ईतकी दमून गेली होती की तिचे हात पाय भरून आले होते आणि पाठ ही !

पण जास्त रेंगाळलो तर थ. हा .चा आवाज चढेल म्हणून ती त्याला उठवायला म्हणून बेडरूममध्ये गेली.

पाहते तर काय बेडरूममध्ये च पाट मांडला होता त्यापुढे वेडीवाकडी महिरपीची रांगोळी,हळदी कुंकू वगरे सुद्धा.

बाजूला सुगंधी उदबत्ती आणि ऊन ऊन गरम केलेलं सुगंधी तेलही! 

'बाई ग, छो.हा.ने तयारी केली की काय म्हणून ती तिच्या खोलीकडे वळणार तोच त्याने तिचा  हात घट्ट पकडला आणि काही बोलू नकोस म्हणून तोंडावर बोट ठेवत सूचना दिली.

त्यानं तिला काही बोलूच दिले नाही, तिला पाटावर बसवले.

तिचे लांबसडक केस  सावकाश मोकळे केले,तिच्या दोन्ही कानात तेलाचे दोन थेंब टाकून तिच्या सुंदर केसांना अगदी मन लावून तेल लावले.ईतकं सुंदर तेल तर आई लावून द्यायची केसांना, तिला आईची आठवण झाली, तोच त्याने तिचे हात पुढे करायला लावले.'अहो, केसांना लावलं तेवढं पुरे, आता तुम्ही बसा मी लावते तेल'

त्यानं तिचं काही एक ऐकलं नाही, जरा जबरदस्तीनेच तिचे हात हातात घेतले आणि तेल चोळू लागला.पाठ सुद्धा इतकी छान मोकळी करून दिली  की तिनं सुखानं डोळे मिटले तो त्यानं तिच्या पायांना तेल लावायला घेतलं मात्र ती संकोचाने पटकन उठलीच'अहो,हा काय वेडेपणा ,पुरे आता '

'का? मी दिवाळीचं एकही काम न करता तुझ्याकडून दरवर्षी हक्कानं तेल लावून मस्त मालिश करून घेतो,गरम पाण्यानं अंघोळ मग ऐटीत औक्षण सगळं करतो.तू मात्र राब राब राबतेस आणि तुझ्या दुखऱ्या अंगाला तेलाचं बोट ही लागत नाही.

तेव्हा यावर्षी पासून तुझी  साग्रसंगीत अंघोळ व्हायला हवी, माझ्या आधी!"

तो नुसतं बोललाच नाही तर तेल घेऊन त्यानं तिचे पाय चेपले,

गरम पाणी काढलं आणि दोन तांबे का होईना तिला न्हाऊ घातलं.

तिनं च त्याला बाहेर पिटाळलं आणि यथेच्छ अंघोळ केली.बाहेर येते तर तो औक्षणाचं ताट घेऊन उभा!त्यानं तिला चुकत माकात का होईना ओवाळलं.

बाहेर हॉल मध्ये मात्र थ. हा.बि. का च्या फेऱ्या मात्र वाढल्या होत्या,"काय हा उशीर! कधी अंघोळी व्हायच्या कोण जाणे!"बडबड सुरूच होती  .

ती  आरडाओरडा ऐकून घाबरली खरी पण त्यानं तिला हातानेच थांब म्हणून खूण केली आणि नवीन दि .ची सा. हातात ठेवली.'अहो ,बाहेर काय सुरू आहे आणि तुमचं काय हे'तिला भारी काळजी वाटत होती पण 

"एखादा दिवस तुलाही बि. का.चं होता येऊच शकतं की"असं म्हणत तिला जवळ ओढलं,तीच तों. गो.के.आणि ह्या अचानक झालेल्या प्रेमाच्या वर्षावाने तिच्या डो. दो.थें.ओघळले हे ओळखण्याइतके तुम्ही काही ' हे'नाही,नाही का!!☺️


बीना बाचल

वरील कथा बीना बाचल यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post