मुखवटा

   मुखवटा

✍️ दीपाली थेटे-राव

            सरकारी नोकरीतून रिटायर होऊन रमेशना आता दोन-तीन वर्ष होऊन गेली होती. नोकरीचा, वरिष्ठ पदाचा बराच उपयोग त्यांनी करून घेतला होता. त्याच्या खाणा-खुणा आजही त्यांच्या आजूबाजूला दिसत होत्या. त्यांचा आलीशान बंगला... तोही शहराच्या उच्चभ्रू सोसायटीत, परदेशी असणारी दोन मुले, मागील वर्षीच धूमधडाक्यात लागलेल्या नेत्रदीपक विवाह सोहळ्यानंतर सासरी गेलेली त्यांची मुलगी आणि तीही गडगंज हुंडा देऊन.... सारेच काही भव्यदिव्य...


  .... पण आज अचानक रमेश थोडे उदास झाले होते. कारण होतं त्यांचा ब्लड टेस्ट रिपोर्ट आणि कॅन्सरची शंका आल्याने केलेल्या इतर अनेक चाचण्या.  त्यांचे रिपोर्ट दोन दिवसांनी मिळणार होते. 


आणि ही काही तासांची तगमग मात्र उरली होती. 


      काही सुचेनासं झालं तसं ते सायंकाळी बाहेर पडले.  दारावरचा वॉचमन देखील आज आश्चर्यचकित झाला. कधीही कार.. ड्रायव्हरशिवाय बाहेर न पडणारे साहेब आज चक्क चालत निघाले होते...


       चालताना रमेशना जाणवलं... बऱ्याच गोष्टी त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला होत्या पण एसी गाडीतून काचा बंद करून फिरताना त्या कधी अनुभवल्याच नव्हत्या. 


       आनंदाने बागडणारी मुलं.... त्यांच्या आनंदाला सामावून घेणारी सुबक छोटीशी बाग...


        आज ते त्या बागेत फेरफटका मारायला शिरले.  भान विसरायला लावणारा आनंदाचा...सुखाचा सोहळा अनिमिष नेत्रांनी ते पाहत होते. 


 लोकं एकमेकांना हाय-हॅलो करत होते पण रमेश यांच्या ओळखीचं कोणीच नव्हतं, कारण आजपर्यंत त्यांना त्याची गरजच भासली नव्हती. 


        कोपऱ्यावर एक देऊळ होत छोटसं.  शेंदूर फासलेला दगडाचा देव... पण त्यालाही लोक झुकून आदबीनं नमस्कार करत होते. पुजारी त्यावर अजून शेंदूराचा थर लावत होता.  


          रमेशच्या मनात विचार आले,


' कसा असेल हा देव पूर्वी. शेंदूर थापून थापून याचा आकार पुरता बदलला आहे.' मुखवट्यावर मुखवटे.... 


       या विचारासरशी ते चमकले. आजपर्यंत तेही मुखवटे परिधान करूनच तर जगत होते. 


उच्च शिक्षणाचा...सरकारी नोकरीचा..


  जसंजसं पद वर चढत गेलं तसंतसे मुखवट्यांवर चढत जाणारे अनेक मुखवटे ......


     इतके की स्वतःच मूळ रूप कोणतं याचा विसर पडला होता.


         अचानक आठवला तो कुलकर्णी.... क्लार्क म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा. सकाळ संध्याकाळ हसून भेटणारा आणि रमेशचं हसू मात्र मग्रूर.. साहेबी.


            नेहमी म्हणायचा कुलकर्णी,


" साहेब कधीतरी या आमच्या घरी. जवळच राहतो.  तुमचा बंगला आम्ही पाहतो बरं बाहेरून."  


        आपण मात्र  कधीही म्हणालो नाही  की घरी येत जा रे.  या सामान्य कारकुनाची खिल्ली उडवायचो. त्याच्या सेंडऑफला तर उद्दामपणाचा कहरच केला आपण.  त्याच्या गरिबीची हेटाळणीच केली होती जणू.  त्याने घरी बनवून आणलेल्या खोबऱ्याच्या वडीची सुद्धा चेष्टा केली.'आज राहून राहून रमेशना सारं आठवतं होतं.


        ते कुलकर्णींच्या घरी जाण्यास निघाले. कुलकर्णीचे घर  छोटसं. गेट  उघडताच समोर दिसली रेखीव सुबक बाग , भरपूर फुल असणारी,  मन प्रसन्न करणारी,  दारापाशी काढलेली रांगोळी.. 


      दाराचा आवाज आला तसा कुलकर्णी बाहेर आला आणि साहेबांना बघतात त्याच्या चेहऱ्यावर आदरातिथ्याचं हसू खुललं.  बायकोची ओळख करून देताना रमेशनी पाहिलं ते वहिनींचं प्रसन्न आणि समाधानाचं हसू , त्यांची लगेच आत जाऊन साहेबांसाठी काहीतरी खायला करायची लगबग. ....


        हे सारं रमेशना नवीन होतं.  कुलकर्णीच्या घरी प्रत्येक वस्तू नीट नेटकी ठेवलेली. भिंतीवर लावलेलं एकमेव वॉल हँगिंग बायकोच्या कलाकुसरीचं प्रदर्शन करणारं होतं.  प्रत्येक गोष्टीत  उत्साह,  समाधान ओसंडून वाहत होतं . 


    वहिनी पोहे घेऊन आल्या आणि सोबत होती खोबर्याची वडी..... 


    ती पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं तसं कुलकर्णींनी त्यांचा हात दाबला अन् खायचा आग्रह करू लागला.  त्याची शांत वृत्ती पाहून त्यांना भरून आलं.  कुठलीही गोळी न घेता प्रसन्नचित्ताने,  आनंदी आणि सुदृढ असणाऱ्या कुलकर्णीचा आता त्यांना हेवा वाटू लागला.  चौकशी करत करत त्यांनी पोहे व वडी खाल्ली.  ती वहिनींच्या सुगरणपणाची साक्ष देत होती.  कुलकर्णीची मुलंही खूपच संस्कारी आणि हुशार होती.  ते आदबीने रमेश यांच्याशी बोलत होते. 


          आता मात्र रमेशना मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. प्रामाणिक कुलकर्णीनं मुलांना चांगले संस्कार दिले होते आणि रमेशनी मात्र आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करून मुलांना पार बिघडवून टाकलं होतं.  मुलं त्यांच्या जीवावर पैसा उधळत होती आणि मुलगी... तिचं तर काही कारणास्तव प्रचंड हुंडा देऊन घाईघाईने लग्न लावलं होतं....


        त्यांना आपलं घर आठवलं...


  गेटवर उभा असणारा इस्त्रीच्या कडक  चेहऱ्याचा वॉचमन.., आत बंगल्याच्या  दारापर्यंत गेल्यावर कोर्‍या चेहर्‍याने दार उघडणारी मेड... "मॅडम" घरात असल्याच तर बेडरूममध्ये टीव्हीसमोर नाही तर क्लबमध्ये.   हा दिखाऊपणा आता त्यांना नको नकोसं करत होता.


      शून्य नजरेनं हरवल्यासारखं ते उठले आणि चालू लागले.  धावत मागे येऊन कुलकर्णीनं म्हटलं,


" साहेब, देवाचा प्रसाद घ्या.  आज एकदम हरवल्यासारखे वाटताय. काही टेंशन असेल तर नक्की दूर होईल. सारं काही ठीक होईल."  


हे आपुलकीचे शब्द त्यांना घायाळ करून गेले आणि ते ढसाढसा रडू लागले.  


त्यांना जाणवलं.... मरणाच्या दारात पोहोचू तेव्हा समाजातील आपली वाहवा करणारे लोक... आपली पत...  बंगला...  कार ... पैसा...... काहीही बरोबर नसेल.  एवढेच काय अंगावरचे कपडेही नेण्याची आपणास मुभा नाही.  बरोबर येणार आहे ते फक्त आपलं कर्म...चांगलं आणि वाईटही... "त्याच्या"  हिशोबात कोणतीही चूक नसेल वा रिश्वत घेतल्यानंतरची सारवासारवी ही....   


        हिशेब झाले होते आणि सारी वजाबाकी होऊन बाकी शून्य उरली होती....


        चालत चालत घरी येईपर्यंत रमेश यांच्या चेहऱ्यावरचे एकेक मुखवटे गळून पडत होते. आज पहिल्यांदाच घरात आल्यावर रमेश हात पाय धुवून देवासमोर आले. सायंकाळची सांजवात त्यांनी लावली. हात जोडून ते देवासमोर नतमस्तक झाले.


समईचा शांत उजेड त्यांच्या चेहऱाभर पसरला होता.....

..... दिपाली थेटे राव

वरील कथा दिपाली थेटे राव यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


Post a Comment (0)
Previous Post Next Post