ती एक यशोदा

     *ती एक यशोदा*

✍️ स्मिता मुंगळे 

     पालक आणि विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेल्या शाळेच्या त्या हॉलमध्ये शुभांगी कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात बसली होती.नेमका आजच नीरज सकाळी लवकर ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला गेला होता त्यामुळे ती आज पहिल्यांदाच शाळेत अशी बक्षीस वितरण समारंभाला आली होती. इतरवेळी दरवर्षी न चुकता नीरज येत असे.त्याला खूप वाटे की शुभांगीने देखील त्याच्यासोबत यावे पण मुलं कधीच तिने यावं यासाठी आग्रही नसतं. सुरुवातीला तिला वाईट वाटे पण हळूहळू या सगळ्याची तिला सवय होऊन गेली.तीही विचार करत असे,उगाच शाळेत जाऊन कशाला कोणाचे टोमणे ऐकून घ्यायचे? तिच्याकडे बघून आपापसातील कुजबूज तिच्या मनाला वेदना देऊन जाई. त्यापेक्षा न गेलेलंच बरं. मुलांनी घरी येऊन देवापुढे ठेवलेली बक्षिसं दिसतीलच की आपल्याला.शाळेच्या त्या भव्य सभागृहात बसल्या बसल्या तिच्या मनात एक ना अनेक विचार येत होते.पहिल्यांदाच शाळेत आल्यामुळे तिच्याशी बोलायला देखील कोणी ओळखीचे नव्हते.
       काहीच वेळात स्टेजवर प्रमुख पाहुणे स्थानापन्न झाले.दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. खरंतर सगळी मुले मुख्य कार्यक्रम म्हणजेच बक्षिस वितरणासाठी अधीर झाली होती. त्यांची सारखी चुळबूळ सुरू होती. प्रमुख पाहुण्यांनी मुलांना उपदेशपर असे सुंदर भाषण केले.त्यानंतर मात्र  पारितोषिक वितरण सुरू झाले.
      मुलं अतिशय उत्साहात व्यासपीठावर जाऊन बक्षिसे घेत होती.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.प्रायमरी विभागात धाकट्या निलला हस्ताक्षर,पाठांतर,निबंध स्पर्धा तसेच अभ्यासातीलही बरीच बक्षिसे मिळाली.तो स्टेजवर सारखा पळत जाऊन बक्षिसे घेत होता तेव्हा अनेकजण कौतुकाने त्याच्याकडे पहात होते .शुभांगीचा उर अभिमानाने भरून आला.
    त्यानंतर सिनिअर्सचे पारितोषिक वितरण सुरू झाले.दहावीत असणाऱ्या निकिताने अक्षरशः बक्षिसांची लयलूट केली.स्पोर्ट्स मधली अनेक बक्षिसे तर तिने घेतलीच पण त्याच बरोबर एनसीसी,त्या वर्षातील आदर्श विद्यार्थिनी हे विशेष बक्षीस देखील तिने पटकावले. त्यानंतर मात्र तिथे उपस्थित असलेल्या पालकांचे लक्ष नकळतपणे शुभांगीकडे गेले.तिच्या दोन्ही मुलांनी आजचा दिवस गाजवला होता.
     अचानक शाळेच्या मुख्याध्यापिकानी माईकवरुन घोषणा करून शुभांगीला स्टेजवर बोलावले.त्या म्हणाल्या,”तुमच्या दोन्ही मुलांनी एवढी बक्षिसे मिळवली आहेत.पण मला वाटते याचे श्रेय काही प्रमाणात तुम्हालाही दिले पाहिजे.”तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून शुभांगीचे अभिनंदन केले. ती खरं तर खूप अवघडून गेली होती. प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापिका आणि मुलांबरोबर तिचे फोटो काढले.शाळेतील अनेक पालक तिच्याकडे येऊन मुलांच्या हुशारीचे कौतुक करू लागले.मुलांच्या सर्वांगीण विकासासंबंधी अनेक प्रश्न पालक तिला विचारत होते.तिला नक्की काय बोलावे हेच कळत नव्हते.कारण मुलांच्या या यशामध्ये म्हटले तर तिचा वाटा होता पण मुलंच हे मान्य करीत नसल्याने ती या सगळ्यांपासून अलिप्त रहात होती.
      कार्यक्रम संपल्यावर ती मुलांना घेऊन घरी आली.मुलांनी व्हिडीओ कॉल करून सगळी बक्षिसे बाबांना दाखवली."बाबा,आज तुम्ही शाळेत यायला हवे होते.आम्ही तुम्हाला खूप मिस केले",मुलांचे बाबांबरोबर सुरू असणारे बोलणे ती स्वयंपाक करताना आतून ऐकत होती.अजूनही मुलं तिच्याशी बोलायला उत्सुक दिसत नव्हती.ती मनातून खूप नाराज झाली.तरीही आज आपण थोडा संयम ठेवायचाच असे तिने ठरवले होते. त्यामुळे ती देखील स्वतःहून मुलांशी बोलली नाही. मनात विचारांचं वादळ घेऊनच ती तिच्या कामाला लागली.तेवढ्यात तिच्या ताईचा फोन आला.”काय ग एवढी का बिझी आहेस?”ताईने विचारले तसे एवढा वेळ रोखून धरलेला तिचा बांध सुटला आणि तिला भरून आल्यामुळे बोलता येईना. काहीतरी बिनसले आहे याची कल्पना येऊन ताईने विषय बदलला तसे शुभांगी अगतिक होऊन ताईला विचारू लागली,”ताई,काय चुकले ग माझे? जेवढे मी मुलांच्या जवळ जाण्याचा,त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतीये तेवढी मुलं माझ्यापासून लांब जातायेत.”ताई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण आज शुभांगी फारच अस्वस्थ होती.शेवटी तिला बोलून मोकळं होऊ दे असा विचार करून ताईने फक्त ऐकण्याचे काम करायचे ठरवले. शुभांगीला दुःखाचे कढ अनावर होत होते.आजपर्यंत अनेक वेळा तिने मुलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले होते. कधी ना कधी मुलांना आपल्याबद्दल आपलेपणा वाटेल या एकाच अपेक्षेवर ती होती.पण आज मात्र तिचा संयम संपला होता.असे काही झाले की प्रत्येक वेळी नीरज तिची समजूत घालत असे.पण आज नेमका तो ही घरी नव्हता.ती ताईला सांगू लागली,”काय चुकले ग माझे?प्रत्येकवेळी मीच का समजूतदारपणा दाखवायचा? किती लहान होती ही मुलं मी लग्न होऊन इथे आले तेव्हा.निकीताला पुसटशी तरी तिची आई आठवण असेल पण निलला काहीच आठवत नसणार हे नक्की.केवळ रंगाने मी डावी होते म्हणून लग्नाच्या वेळी अनेक नकार पचवलेत मी.निरजचं स्थळ आलं तेव्हा प्रथमच मी नकार देत होते.नको होतं मला असं दोन मुलांच्या वडिलांशी लग्न करून त्याच्या मुलांची आई होणं.पण तेव्हा आई बाबांनी किती समजावलं मला.’लग्न म्हणजे एक तडजोड असते ग’,असं आईनी अगदी अगतिकपणे सांगितलं मला म्हणून मग लग्नाला तयार झाले.मैत्रिणी, आजूबाजूचे लोक काय काय सांगत होते मला पण निरजचा स्वभाव,त्याने मला मुलांबद्दलचं दिलेलं आश्वासन यांवर विश्वास ठेवून मी लग्नाला तयार झाले.कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता मी त्या घरी प्रवेश केला.फार नाही पण माझीही काही स्वप्न असणारच ना ग ताई.किमान मुलांनी मला आपलं मानावं, एवढं तरी.काय चुकलं ग माझं मुलांशी वागताना?कुठे कमी पडले मी? त्यांच्याशी वागताना दुजाभाव होऊ नये म्हणून मी स्वतःला मूल सुद्धा होऊ दिले नाही. या मुलांची आई होण्यासाठी मी माझ्या मातृत्वाचं बलिदान दिलं.माझी मातृत्वाची स्त्रीसुलभ भावना दाबून ठेवताना मला किती त्रास झाला असेल ग. यापेक्षा आणखी काही असतं का?”
     शुभांगी उद्वेगाने बोलत होती. खूप दिवसापासून तिच्या मनात साठलेले आज बाहेर पडले होते.
  तिच्या ताईला तिच्या मनस्थितीची कल्पना येत होती.खरोखरच शुभांगीने स्वतःचे मातृत्व नाकारून नीरजच्या दोन्ही मुलांचे आईपण अगदी प्रेमाने स्वीकारले होते.निरजने देखील तिला अनेक वेळा स्वतःवर असा अन्याय करू नकोस असे समजावले होते.पण ती स्वतःच्या निर्णयावर ठाम होती.अर्थातच हे सगळे मुलांना माहिती नव्हते आणि ते समजण्याचे त्यांचे वय देखील नव्हते.पण तरीही ती मुलांवर करत असलेले प्रेम,तिची त्यांच्यासाठी चाललेली धडपड त्यांना कळावी आणि त्यांनी तिला आपली आई मानावे एवढीच तिची अपेक्षा होती.,
   आज मुलांनी शाळेत जी बक्षिसे मिळवली,त्यांचं एवढं कौतुक झालं त्यात तिचाही थोडा वाटा होताच ना.पण मुलं ते मान्य करायला तयार नव्हती. त्यामुळे ती खूप दुखावली गेली होती. आपल्या ताईला हे सगळं सांगितल्यामुळे तिला थोडं हलकं वाटलं.
      आता रात्री नीरज आल्यावर त्याला सांगून टाकूया की मी आता हरले,मुलाचं मन जिंकण्यात,त्यांच्या आईची जागा भरून काढण्यात मी कमी पडले असा विचार ती करत असतानाच निल आणि निकिता तिच्या खोलीत आले.दोघांच्याही चेहऱ्यावर अपराधी भाव होते. तिच्याशी बोलायला कशी सुरुवात करावी हे त्यांना कळत नसावे.दोघे एकमेकांकडे बघत ‘तू आधी बोल’ अशा अर्थी खाणाखुणा करत होते.
     शेवटी शुभांगीनेच त्यांना “काही बोलायचे आहे का?” असे विचारताच दोघेही एकदम “सॉरी आई”म्हणाले.शुभांगीसाठी हा एक आश्चर्याचा धक्काच होता.ती फक्त मुलांकडे बघत राहिली.
     निकिता तिच्याजवळ आली आणि म्हणाली,”खरंच आई आमचं चुकलंच.तू आमच्यासाठी खूप काही करत होतीस पण आम्हालाच ते कळत नव्हतं.आम्ही खूप वाईट वागलो ग तुझ्याशी.”
तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच निल जवळ आला आणि म्हणाला,”आई,आता इथून पुढे आम्ही असे नाही वागणार.आम्हाला आमची चूक समजली आहे.खरंच आम्हाला माफ कर.आम्ही तुला खूप त्रास दिला आहे.”
     मुलांनी स्वतः येऊन असे सांगितल्याने शुभांगी इमोशनल झाली.तिने मुलांना जवळ घेतले तसे दोघे तिला जास्तच बिलगले. तिघांच्याही डोळ्यातून अश्रू वहात होते.गेल्या कित्येक वर्षांपासून साठलेले असे डोळ्यावाटे बाहेर पडले होते. नुकताच बाहेरून आलेला नीरज ही माय लेकरांची भेट भरल्या डोळ्यांनी लांबूनच पहात होता.
        दुसऱ्या दिवशी निकिता कोणाशी तरी फोनवर बोलत होती.ती सांगत होती,"अग, माझ्या यशाचं,बक्षिसांच सगळं श्रेय नक्कीच माझ्या आईला जातं. या सगळयामागे तिचे कष्ट आहेत.म्हणून मी आणि नील एवढी प्रगती करू शकतो."
      तिचे हे बोलणे ऐकून शुभांगीला वाटलं,अखेर आपल्या प्रयत्नांना यश आले तर.मी देवकी होणं स्वतः नाकारलं पण मी यशोदा तरी होऊ शकले.
हेच तर हवे होते ना...आणखी काय हवं?

              सौ.स्मिता मुंगळे,कोल्हापूर.
       
      वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

    
 

Post a Comment (0)
Previous Post Next Post