मुलाखत

 मुलाखत

✍️ सुनंदा सबनीस 

             त्या दिवशी अंबिकाबाई भिशीहून आल्या त्याच मुळी तणतणत. त्याचे काय बिनसले होते ते काही विनोदरावांना कऴेना.सारख्या पुटपुटत होत्या, आमचं नशिबंच मेलं फुटकं. त्या देविकेसारखं आमच्या घरी असे कुठे घडायला. वरून जरी दुःख दाखवित असली तरी आनंदाच्या उकऴ्या फुटत असणार तिला. सगळे लोक अगदी सहानुभूतीन चौकशी करताहेत नं, तिची.

              शेवटी विनोदरावांना अगदीच राहवलं नाही म्हणून त्यांनी विचारलं, अगं कय झालयं त्या देविकेकडे ?आणि आपल्याकडे नाही झालं?

                            'आहो तिच्या कडे चोरी झाली चोरी. 'ऑं! चोरी झाली ?' विनोदरावांनी अश्र्चर्याने विचारले. त्यात एवढं आश्र्चर्य वाटण्यासारखं काय आहे? तिचा नवरा तुमच्यासारखा नाही काही, चांगला बनेल आहे.ऑफिसमधे भरपूर वरकमाई केलीयं. चांगली दहा लाख कॅश(खरं खोटं देव जाणे)आणि तिचा सोन्याचा हार चोरीला गेलायं. आहात कुठं?

            मी जागेवरच आहे. मला तिच्या घरी चोरी झाल्याचं आश्र्चर्य नाही वाटलं, तर ते तुला इतक्या उशिरा कसं कायं कऴलं याचं आणि तुला तर या गोष्टीचा तुझ्या स्वभावाप्रमाणे आनंद व्हायला पाहिजे. तर तुला त्याचं वाईट वाटतयं? याचं आश्र्चर्य वाटतयं.

                        त्यात काय आश्र्चर्य वाटण्यासारखं आहे? आहो, आपल्याकडे चोर कधी फिरकेल तरी का? आपल्याकडे मुळी महिना अखेरी खर्चाची तोंडमिऴवणी कशीबशी होते. आणि घरात चोरांनी चोरावा असा एखादा मौल्यवान दागिना, वस्तू आहे का?

          माझं केवढं मोठं स्वप्न होतं. मला चोरांनी चोरी करताना बघायची होती. त्यांना रंगेहात पकडून पोलिसांना कऴवयचं होतं. आता हे सारं आपल्याकडे चोरी झाल्याशिवाय कसं घडणार?  आणि अजून एक गोष्ट म्हणजे पोलिस येईपर्यंत त्या चोरांना गप्पात गुंतवण्यासाठी मला त्यांची छानशी मुलाखत घ्यायची होती, म्हणजे आमच्या भिशीत देविका जो टेंभा मिरवत होती तो जरा कमी झाला असता.

                      आपल्याकडे मग न्यूज चॅनेलवाले आले असते. त्यांनी माझी मुलाखत घेतली असती.म्हणजे मगं मलाही चांगली टि.व्ही.वर प्रसिध्दी मिळाली असती. सारखीच त्या राजकारण्याची नाहीतर शेतकऱ्यांची किंवा कोरोनाग्रस्तांची मुलाखत. केव्हातरी अशा वेगळ्या कारणांसाठी घेतलेली मुलखत चांगलीच लक्षात राहिल नं लोकांच्या? तुमच्या ओळखीचा कुणी चोर आहे का?   शी   बाई,तुमच्या ओळखीचा कसा असेल चोर? तुमच्या ओळखीचा चोर कसा असणार ? चोराची ओळख चोरांनच असणार.  तुमच्यासारख्या शामळू लोकांकडे चोर ढुंकूनही पहाणार नाही.   देविकेला विचारलं तर?   छे ! छे ! बिलकूल नको ! चोरी माझ्या घरी आणि क्रेडट मात्र हिला. बिलकूल नको. उगीच का एवढा लॉक डाऊन असताना, एकत्रीकरणाला बंदी असताना, मेसेज करून, मुखपट्टया बांधून भिशीला बोलावले? कशाचंही भांड्वल करून क्रेडट घ्यायला तिला चांगलं जमतं.

                  तुम्हाला एखादा असा कोणी माहित असेल तर बोलवा नं त्याला. आपण त्याला आपलं घर दाखवू, छान गप्पा मारू. विनोदराव कधी नव्हे ते उसळून म्हणाले, अगं ! तुझं डोकं बिकं फिरलयं  का? आपला कुणी पाहुणा चोर आहे? का आपला कुणी पाहुणा चोर आहे? त्याची मुलाखत काय घ्यायची, त्याच्याशी गप्पा काय मारायच्या? माझ्यापाशी बोललीस तेवढंच ठीक आहे. नाही तर कुणाला कळलं तर तुला वेड्याच्या इस्पितळात दाखल करायचे आणि माझी मुलाखत घ्यायचे डॉक्टर, तुम्ही ह्यांचा हा अजार एवढा वाढेपर्यंत गप्प कसे बसलात म्हणून. चोराच्या डोक्यावर काय पाटी असते का? मी चोर आहे म्हणून? का चोर बेल वाजवून, तुला नमस्कार करून, नमस्कार मी चोर आहे. मला तुमच्या घरीचोरी करायची आहे. तेव्हा तुमच्या घरात चोरण्यालायक काय काय आहे?  तुमच्या दृष्टीने सोयीची वेळ कोणती? मी केव्हा येउन चोरी करू शकतो असे विचारेल असे वाटते?

                  छे ! बाई तुमच्याशी ह्या विषयावर बोलायलांच नको होते. माझ्या मनांची घलमेल वुम्हाला कळणार नाही. जाऊ दे ! हा विषय बंद. हो बरोबर. विनोदराव म्हणाले. नाही तर तुमचे दिवटे चिरंजीव लगेच तुम्हाला महणतील, थांब ! मम्मी मी मोबाईलवर सर्च करतो आणि बघतो सापडताहेत का एक दोन चोरांचे पत्ते?

               हो आणि तुमच्या मातोश्री त्या लगेच एखाद्या ज्योतिषाला विचारायला जातील, आहो आमच्याकडे कोणी चोर चोरी करायला येईल असे वाटते काय? तुम्हाला कुणालाच माझी किंमत नाही, माझ्या मनाची कदर नाही. जाऊदे माझं नशिबंच फुटकं हे पुन्हा एकदा सिध्द होणार. आणि हे बघा, माझं जरा डोकं भणभणंतयं. सकाळी पोळी भाजी केली आहे, ती गरम करून तुम्ही जेवून घ्या तिघेही. भिशित माझं खाणं झालयं, मला भूक नाही. मी जरा बेडरूम मधे जाउन झोपते.

              जरा नाही ! व्यवस्थित झोप. आता साडे आठ वाजता रात्री जरा झोपलीस तर नंतर उठून तुला काय कुठं चोरी करायला जायचं आहे का? इती विनोदराव.

               तुमचा टोमणा कळण्याएवढी अक्कल देवाने मला दिली आहे बरं का? बरं, तेवढा दिवा बंद करा, फॅन चालू करा आणि टि.व्ही.चा आवाज जरा हळू ठेवा. अंबिकाबाई रागनं बोलल्या. पण थोड्या वेळानं त्यांना छान झोप लागली. नंतर काही वेळानं बेलचा आवाज आला. त्यांनी घड्याळात बघीतलं. साधारण 11 ते 11।। ची वेळ झाली होती. विनोदराव गाढ झोपेत होते. सासूबाई व चिरंजीव शेजारच्या खोलीत निवांत झोपले होते.

              इतक्या रात्री दादा कसा काय आला बरं. कारण ह्या करोनामुळे परगावहून तरी फोन केल्याशिवाय कोणी इतक्या रात्री येणार नाही. आणि त्याला तरी फोन करून यायला काय होतयं ? अगं बाई उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? म्हणून सरप्राईज द्यायला, शुभेच्छा द्यायला आला असेल.

              अंबिकाबाईंनी आपला गाउन ठीक ठाक केला आणि त्या दार उघडायला बाहेर आल्या. आधी त्यांनी सवयीप्रमाणे दूर्बिणीतून बघीतले सुद्धा. आणि दादाच आहे अशी खात्री झाली. मास्क बांधल्यामुळे चेहरा नीट कळत नाही एवढंच कय ते. त्यांनी कडी काढली. तशी धाडकन दार उघडून तो माणूस आतंच शिरला आणि दरडावायला लागला. काय गं !  ए ! बहिरी आहेस? एवढा वेळ का लागला? आहो, तुम्ही कोण? मला काय माहित तुम्ही बाहेर आहात ते. अंबिकाबाई आता चांगल्याच घाबरल्या. आता या वेऴेला काय तुझी मुलाखत घ्यायला कोण पत्रकार किंवा चॅनेलवाला येईल का? बावळटासारखे प्रश्न विचारायचे नाहीत. फक्त घरातला माल कुठं ठेवलायं ते सांग. त्यावर अंबिकाबाईंनी थोडी चुळबुळ करायचा व्यर्थ प्रयत्न केला लगेच दरडावून तो ओरडला, ए ! जागची अजिबात हलू नकोस, नाही तर गोळींच घालीन. 

                  आणि तुमच्याकडे काय अपॉंइटमेंट घेऊन यायला पाहजे होते काय? त्यावर अंबिकाबाई घाबरत घाबरत म्हणाल्या, चेह-यावर मास्क लावल्यामुळे कऴत नाही नं. त्यावर चोर महाशय म्हणाले, आम्ही पूर्वीपासून मास्क बांधूनच हिंडतो. तुम्ही आत्ता बांधायला लागला आहात.

            आत्ताच तुझ्या त्या फडतूस मैत्रिणीच्या डोक्यात एक गोळी घालून आलोय. तरी धीर करून अंबिकेने विचारले, कोण देविका? य़े ! मला काय नावं गाव नाही माहित. तुझ्या घरात आत्ता कोण कोण आहे ते सांग पटापट. आणि तुझा आणि घरातल्यांचा जीव वाचवायचा असेल तर तुझ्या घरातल्या तिजोरीच्या चाव्या दे मुकाट्यानं. कुठं ठेवलाय तुमच्या घरातला किंमती माल?  फालतू बडबड ऎकायला मला वेळ नाही. त्यावर अंबिकाबाई म्हणाल्या, आहो, खरंच आमच्याकडे खूप किंमती सोनं नाणं किंवा मौल्यवान वस्तू नाही आहेत. मग तो म्हणाला, मग काय तिजोरीत कांदे बटाटे ठेवतां का? त्यावर हसून अंबिकाबाई म्हणाल्या, फारंच विनोदी बोलता बुवा तुम्ही. आहो, मी खरंच सांगते, आमच्याकडे तिजोरी नाही.

          "खरं बोल, नाही तर आधी त्या तुझ्या ढेरपोट्या नव-याला आणि घोरत पडलेल्या पोराला खल्लास करीन. मग बोलशील पटापट."

          आहो चोर महाशय, मी खरंच बोलतेय, आमच्याकडे माझ्या तल्लख मेंदू खेरीज किंमती, मौल्यवान काहीच नाही.

         ठीक आहे. मगं तुझाच भेजा खल्लास करतो.

          नका हो असं करू. तुमच्या मी पाया पडते. खरंच असं नका करू. नका करू.

          अंबिका, अंबिका अगं, काय झालंय? जागी हो.स्वप्न पडलं का तुला? कोणाच्या पाया पडत होतीस स्वप्नात? विनोदरावांनी विचरले. खजिल होउन अंबिकाबाई म्हणाल्या, हसणार नसाल तर सांगते, चोराच्या पाया पडत होते.


सुनंदा सबनीस 


वरील कथा सुनंदा सबनीस यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post