लिव इन रिलेशनशिप

 सदर कथा - "लिव-इन रिलेशनशिप" माझी 'अनघा लिखिते' असून, मी माझ्या स्वतःच्या परवानगीने तो "शब्दचाफा” या ब्लॉगवर प्रकाशित करण्यासाठी देत आहे. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे (माझ्या कडे) राखीव असून परवानगीशिवाय वरील लेख कुठेही वापरू नये.


लिव-इन रिलेशनशिप

          सुप्रियाची पाळी चुकली. ती टेस्ट करून आली होती. पॉझिटिव्ह रिपोर्ट हाती पडलाच भांबावून गेली. अमेय अमेरिकेत निघून गेला होता, तिने एक-दोन वेळा त्याचा फोन ट्राय केला, पण नो रिप्लाय... विचार करता करता झोप लागली...

          "आई.. आई.. " करत रडत तिची मुलगी तेजु तिला येऊन बिलगली. सुप्रियाने तिला जवळ घेत विचारलं, "काय झालं ?" तिने सांगितले की, "आई, उद्या पॅरेन्ट्स मिटींग आहे. तर टिचरने सांगितले की आपल्या आई-वडिलांना घेऊन या. माझ्या सगळ्या फ्रेन्ड्ना स्वतःचे बाबा आहेत. पण माझ्या जवळ नाही. तु चल ना. आपण मॉल मध्ये जाऊन नवीन बाबा विकत घेऊन येऊ या."

          सुप्रिया तिला समजवत म्हणाली, "अगं असे विकत थोडीच मिळतात. त्यासाठी लग्न करावं लागतं."

          तेजु, "पण आई, बेबी तर लग्नानंतर होतो... मग मी लग्नानंतर झाली असेल ना ? मग माझे तर बाबा कुठे तरी असतील ना... चल आपण त्यांना शोधु या."

          सुप्रियाला रडायला आलं, तिने तिला जवळ घेतले आणि रडू लागली. तिच्या समोर आता यक्षप्रश्न उभा होता... कशी आणणार मी अमेयला परत. कारण, अमेयने तर तिनं नाही म्हटल्यावर लग्न करून घेतले असेलच. त्याच्या घरचे मागे लागले होते.

          डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेजु छोट्या छोट्या हातांनी तिचे अश्रू पुसत होती, ती सुद्धा आपली आई रडतेय म्हणून रडायला लागली. तेजु, 'मला पण बाबा हवेत.‌.'

         सुप्रिया एकदम खाडकन झोपेतून जागी झाली, आपल्या पोटावर हात फिरवला... "बाप रे काय भयानक स्वप्न होतं हे !" पण हे स्वप्न उद्या सत्यात देखील उतरू शकतं. असा विचार येऊन ती शहारली.

         घड्याळात पाहिलं तर रात्रीचे नऊ वाजले होते. जेवण ऑर्डर केलं. विचार करायला लागली की अमेयने फोन नाही उचलला आणि कॉल-बॅक सुद्धा नाही केला. तो जातांना नाराज तर होताच, त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. केलं असेल का लग्न ?

         जेवण करून खिडकी जवळ बसली. रात्र झाली होती, बाजूच्या विंग मध्ये राहणारी नेहा सुद्धा प्रेग्नंट होती. ती सुद्धा आली होती हॉस्पिटलमध्ये, तेव्हा कळलं. ती शंकेने पाहत होती. ती तिच्या नवऱ्यासोबत हसत, गप्पा मारत शतपावली करत होती. आज सुप्रियाला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होत होता.

         बरेच दिवस झाले, अमेयचा काही फोन नाही. दिवस आता कसे बसे रेटले जाऊ लागले. आई-बाबांकडे पण जाण्याची सोय नव्हती. या अशा वेळी आनंदी वातावरण असायला हवं. पण आता शक्य नाही. आता नुसते प्रॉब्लेम्स राहणार. लोकांच्या विचित्र नजरा आता बोचु लागल्या होत्या. ऑफिसमध्ये सुद्धा चर्चेला उधाण आले होते. तिला पारूलची आठवण झाली, सहा महिन्यांपूर्वीच तिने कंपनी चेंज केली होती. त्यामुळे भेट होत नसे. तिचे ते लग्नानंतरचे दिवस आठवले.....

         पारूल आणि सुप्रिया दोघी बेस्ट फ्रेंड होत्या. सुप्रिया तिला नेहमी काकु बाई म्हणून चिडवायची. लग्न झाल्यावर पारूल सणासुदीला छान साडी नेसून यायची. इतर वेळी सासु-सासऱ्यांना जीन्स नाही आवडत म्हणून. पंजाबी ड्रेस किंवा कुर्ती-लेगींग असे ड्रेस असायचे, छोटीशी टिकली, सिंदूर स्टिकनी हलकेच भरलेला भांग. लग्नानंतर काही दिवसांतच गोड बातमी सुद्धा दिली तिने. चवथ्या महीन्यानंतर ऑफिसमधल्या इतर कलीग्ज् तिची काळजी घेत, तिच्या आवडीचे आणत. सासरी कोडकौतुक होत होतं. माहेरी गेल्यावर तर आनंदी आनंद होता. पुढे तिचं धुमधडाक्यात डोहाळे जेवण पार पडलं, नंतर बाळंतपण सुखरूप झाले, बारसं, पहीला वाढदिवस, सगळं ऑल वेल सुरू होतं.

         तेव्हा देखील अमेय सारखा मागे लागला होता, तो नेहमी म्हणायचा की बघ जरा पारूल कडे. पण सुप्रिया लग्न बंधनात स्वतः अडकवून घ्यायला तयार नव्हती.

         सुप्रियाला आज एका पाठोपाठ जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.

          लाडात वाढलेली सुप्रिया दिसायला सुंदर आणि हुशार, वडील चांगल्या हुद्द्यावर, मोठा भाऊ चांगल्या कंपनीत मोठ्या पॅकेजवर. आई होम-मेकर असली तरी सोशली खुप ॲक्टीव्ह्. भावाचे लग्न झाले, तिला सुद्धा स्थळं समोरून येत होती. पण तिला शिकायचं होतं पुढे, घरी आईची रोकटोक, म्हणून तिने होस्टेलमध्ये राहाणे पसंत केले. तिला आवडायला लागले होस्टेल मधलं मोकळेपणाने जगता येणारं जीवन, अमेयशी झालेली मैत्री, नंतर फुलत जाणारं प्रेम, कॉलेज संपल्यावर लगेच कॅम्पस सिलेक्शननी मल्टी नॅशनल कंपनीत भक्कम पगाराची मिळालेली नोकरी, अमेय सोबत लिव-इन मध्ये रोमॅंटिक क्षण सगळं सगळं तिच्या मनाप्रमाणे सुरू होतं. विकेंडला मस्त बाहेर फिरायला जाणे, एका मागोमाग एक मैत्रिणींचे लग्नाचे नंबर लागले, अमेयचा सुद्धा लग्नासाठी हट्ट सुरू झाला होता. आई-बाबांनी लिव-इन मध्ये राहण्याला प्रचंड विरोध केला. त्यानंतर त्यांनी नातंही तोडले आणि शेवटी अमेय सुद्धा कंटाळून निघून गेला. इतर मैत्रीणी आपल्या नवऱ्यासोबत छान मिरवत असतात लग्न समारंभात, मॉलमध्ये, पिकनिक आणि इतर ठिकाणी. सुप्रिया मात्र एकटीच होती.

          सुप्रिया आठवणीतुन बाहेर आली. उद्या पारूल घरी येणार आहे. तिला कळल्यावर जाम चिडली होती, उद्या घरीच रहा मला बोलायचे आहे म्हणाली.

दुसरा दिवस

          बेल वाजली. सुप्रियानी दार उघडले. पारूलच्या गळ्यात पडून रडली.

          पारूल तिला जवळ बसवून, पाठीवर हात फिरवत म्हणाली, "सुप्रिया, शांत हो पाहू. अशा वेळी रडू नाही."

          "हम्म...", म्हणत डोळे पुसले. "थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते...", असं म्हणत डोळे पुसत आतुन पाणी आणलं.

          "कितवा आहे ?", पारूलने पाण्याचा ग्लास घेत विचारलं.

          "चार महिने उलटून गेलेत.", ती समोर बसत म्हणाली.

          "व्वा ! आणि मला काल कळलं. ते सुद्धा मी सहज फोन केला म्हणून."

          "नव्हती माझी हिंमत होत तुला सांगायला...."

          "बरं... कोण कोणाला माहिती आहे. आय मीन आई-बाबा, दादा-वहीनी, स्पेशली अमेय ?"

          "ऑफिसमध्ये सगळ्यांना माहीत झाले आहे आणि तुला. बाकी कोणालाच नाही."

          "अगं अमेयला तरी कळवायचे..."

          "तो नाही उचलत फोन. एखाद्या वेळेस त्याने लग्नही केले असेल. म्हणून नसेल उचलत."

          "अगं पण त्याच्या घरी जाऊन बघायचं नाही का ? त्यांना सुद्धा कळवायला हवं."

          "कोणत्या तोंडाने म्हणु ? ते मागे लागले होते. तेव्हा मी आपल्याच विश्वात रमले होते."

          "चल... तु तयार हो. आपण निघु."

          "कुठे ?", सुप्रियाने अवाक होऊन म्हटले.

          "अमेय कडे..."

          "पण..."

          "आपण चुकलो तर माफी मागण्यात कसली लाज.... यामुळे अजून प्रॉब्लेम वाढवायचे का ?"

          सुप्रिया तयार झाली. पंजाबी ड्रेस मध्ये पोट दिसत होते. दोघी कारमध्ये बसून अमेयच्या घरी पोहचल्या. अमेयची आई देवळात गेली होती. वडीलांनी दार उघडले.

          "पारूल... बरेच दिवसांनी आलीस. या बसा. अमेय अमेरिकेत गेल्यावर एकदा सुद्धा भेटायला आली नाही.", काकांनी सुप्रियाला दुर्लक्षित करत म्हटले. सुप्रियाला वाईट वाटले.

          "काका, माझ्या सासुबाई ॲडमिट होत्या, आता संसाराच्या व्यापात नाही होत, आधी सारखं."

          "हो. समजु शकतो."

          काकु सुद्धा आल्या. पारूलला पाहून आनंद झाला. पण सुप्रियाला पाहून आनंद मावळला. त्यांनीही चौकशी केली.

          "बरं, तुम्ही बायका बसा बोलत. मी जातो.", काका.

          "थांबा काका, मला महत्वाचे बोलायचे आहे, तुम्हां दोघांशी."

          "परत गुड न्यूज आहे का ?"

          "न्युज आहे, पण ती गुड तुम्हाला करायची आहे.  मला सांगा हा अमेय फोन का नाही उचलत ?"

          "त्याने तो नंबर काढून टाकला आहे.", काकु.

          "त्याच्या लग्नाचं...", पारूल अडखळत बोलली.

          "हिच्या मध्ये मन गुंतवून बसला आहे. आमचं, त्याचं सुद्धा वय वाढत जातंय. नातवंडं खेळविण्याचे स्वप्न पार धुळीला मिळाले.", काकु मुद्दाम सुप्रियाला उद्देशून म्हणाल्या.

          सुप्रियाला खूप हायसं वाटलं आणि पारूलला सुद्धा.

          "पण पारूल, तुला महत्त्वाचे काय बोलायचं आहे ?", काका.

          "काका, मी आज अमेयची नाही तर सुप्रियाची मैत्रीण म्हणून आली आहे. सुप्रिया प्रेग्नंट आहे. अमेयला तिने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. तुम्हाला सांगायची तिची हिंमत झाली नाही. अमेयचे बाळ आहे ते. त्याने लग्न करून दोघांचा स्विकार करावा, ही ईच्छा आहे."

          सुप्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती त्यांच्या पाया पडली. "काकु माझ्या हातून चूक झाली आहे. माफ करा मला. मी लग्न म्हणजे बेडी समजायचे. मला अडकायचे नव्हते."

          "म्हणजे तुझा नाईलाज झाला, म्हणून तु लग्नाला तयार झाली. हे असं नाईलाजाने नातं टिकत नाही.", तिला उठवत म्हणाल्या.

          "नाही. नाईलाज नव्हता. तो गेला तेव्हाच मला त्याची कमी जाणवली. मी फोन ट्राय करायची, पण नो रिप्लाय यायचा. मी रोज वाट पहायची.. दोन महिन्याने कळलं, मी अबॉर्शन करू शकत होती. पण आमच्या प्रेमाची आठवण मला जपायची होती. मला लाज आणि भिती वाटत होती की कोणत्या तोंडाने मी तुम्हाला सांगु. तुम्ही सर्व मला लग्नासाठी म्हणत होतात. एकटेपणाची जाणीव झाली मला, आमचं बाळ खरं तर सर्व गोष्टी डिझर्व्ह करतं, ते माझ्या मुर्खपणा मुळे हिरावले जात आहे. आई मला माफ करा प्लीज."

          तिला पश्चात्ताप झाला हे पाहून अमेयच्या आईला

लगेच तिची दया आली. त्यांनी तिला जवळ घेत समजावलं, "पोरी, लिव-इन मध्ये राहणं ही आपली संस्कृती नाही. नाती जपण्यात आनंद असतो, ते बंधन नसतं. तुझ्या आईने असं केलं असतं तर तुला चाललं असता का ? नाही नं. आपण आपल्या चांगल्या गोष्टी त्यांना शिकवायला पाहिजे, ना की त्यांच्या आपण अंगिकाराव्या."

          काका, "सुप्रिया, तु आता लगेच निघ."

          सगळे घाबरले.

          "बाबा, मी चुकले मला माफ करा.", सुप्रियाला रडु आवरत नव्हते.

          "बेटा, आता लगेच जा आणि तुझं सामान घेऊन ईथे राहायला ये. आपण अमेयला फोन करून बोलावून घेऊ. लगेच लग्नाचा मुहूर्त काढू. मग तुझ्या आई-वडीलांना पण ही गोड बातमी सांगु. त्यांची नाराजी सुद्धा दुर व्हायला हवी ना.", काका.

          ते अमेयला फोन लावून सगळं सांगतात. सुप्रिया नुसती रडत असते, तिच्याने बोलविल्या जात नाही. अमेय आठ दिवसांनी येण्याचं सांगतो. अमेयची आई सगळ्यांचं तोंड गोड करते आणि गणपती बाप्पांचा प्रसाद देते.

          "आज मी बाप्पांकडे म्हटलं होतं की आता माझ्या पोराचे सुद्धा लग्न होऊ दे, आम्ही आहोत तोवर नातवंडाचं सुख लाभु दे. लगेच त्याने माझी ईच्छा पुर्ण केली.", अमेयची आई.

          ते चौघे मग आनंदाने जेवण करतात. पारूल तिला घेऊन घरी जाते. तिचे कपडे आणि सामान घेऊन पुन्हा तिला अमेय कडे सोडते.

          "पारूल, आज तु मला पुढे येणाऱ्या संकटांतून वाचविले आहे गं. मी तुझी आयुष्यभर ऋणी राहीन."

          "वेडी कुठली ! आपण मैत्रीणी आहोत ना. मग एकमेकांना सावरायचे असतं."

          आठ दिवसांनी अमेय येतो. तिचे आई-वडील, भाऊ-भावजय त्यांचे लग्न लावून देतात. पाच महिन्याने गोंडस मुलीचा जन्म होतो. ती बाळाचं नाव तेजश्री ठेवते. सुप्रियाच्या आयुष्यात आता ऑल वेल असतं.

अनघा लिखिते

वरील कथा अनघा लिखिते यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post