चिडचिड

 #चिडचिड

✍️अपर्णा पाटोळे

  तुला एकही गोष्ट ऐकायची नसते माझी हल्ली , मुद्दाम करतोयस तू , आता ते हेडफोन लावून बस, ऐकवत नाही ना चूक दाखवलेली!  स्वतःची चूक मान्यच करायची नाही .

ते हेडफोनच  मी कापून टाकते .आधी मला चीड येईल असं वागायचं आणि माझी बडबड ऐकवत नाही म्हणून हे असं हेडफोन लावून बसायचं!मी एकटी बरळत बसते वेड्यासारखी!! 

 बेडरूम मधून सायलीचा जोरजोरात आवाज येत होता. 

हल्ली हे नेहमीच व्हायला लागलंय! सायली छोट्या छोट्या कारणांवरून फार तणतण करते. कधी कधी टोकाची भूमिकाही घेते. हॉल मध्ये बसलेल्या वसुधाताई स्वतःशी पुटपुटत होत्या. 

काय करावं या पोरीचं? तशी चूक तिची एकटीची नसते पण थोडं शांतपणे घेतलं तर… बरं आपण मध्ये पडावं तर उगाच तिला वाटायचं मुलाची बाजू घेतीय. 

आवाज जरा जास्तच वाढला अन न राहवून वसुधाताई उठून आत गेल्या , बेडवर संदीपचे कपडे , सॉक्स , टॉवेल सगळं पसरलेलं होतं. 

आगं सायली जरा हळू पार शेजारी पाजारी आवाज जातोय!

आई प्लिज तुम्ही यात पडू नका! 

आगं झालं तरी काय एवढं? 

काही नाही गं , तिला असे भांडायचे अटॅक येतात मधूनच. 

काहीतरी चूक शोधायची आणि तणतण करायची! 

चुकून मी मळका शर्ट  वॉर्डरोबमध्ये ठेवला आणि हे सॉक्स इथे बेडखाली तसेच राहिले. फिरलं हीच डोकं! बरं म्हंटल चुकून झालं , उचलतो थोड्या वेळाने पण या बाईंना पेशन्स कुठे? आत्ताच झालं पाहिजे!! मग मागचे  महिन्या दोन महिन्यापूर्वीचे सगळे होशोब  उकरून काढत बसली आणि थांबायचं नावाच नाही. 

कंटाळा आलाय तेच तेच म्हणून मी हेडफोन लावून गाणी ऐकत बसलो तर अजूनच हिचा तिळपापड झाला!! 

 त्यावर सायली खेकसून म्हणाली झाली गाऱ्हाणी सांगून लाडक्या बाळाची?? 

संदीप तुझं चुकतंय बरंका , ती पण दिवसभर शिणून येते रे ऑफिस मधून .

घर, ऑफिस  पुन्हा  ते येता जाता  ट्रॅफिक आणि घरी आल्यावर तुझं असं वागणं ! 

आई मी हे उचलणारच होतो आणि चुकून तो शर्ट वॉर्डरोब मध्ये ठेवला गेला. तिला सॉरी म्हणून मी उचलतच होतो पण  तेवढा पेशन्स कोण ठेवणार? 

बरं आता बास गं सायली आधीच दमून आलियस आणि असा त्रागा करून त्यात भर पडलीयस. 

चल तू बाहेर ये , तो आवरून ठेवेल सगळं. 

वसुधाताई सायलीला घेऊन हॉल मध्ये आल्या आणि मस्त स्ट्रॉंग कॉफीचा मग तिच्या हातात देत म्हणाल्या 

 बाळा दमतेस दिवसभर ना? त्यात पिरियड्स चालुयत ना? 

कंबर पाय दुखतायत का खूप? मला सांगत का नाहीस हे? 

मला कळलं तर दोन दिवस तुला आराम करू देत जाईन.

संध्याकाळचा स्वयंपाक आज मी करते .

सगळं करायचा का अट्टाहास असतो तुला? 

मी वाचलंय या दिवसात हार्मोनल चेंजेस मूळे चिडचिड होते खूप , अगदी छोटंसं कारण पुरतं भडका उडायला. एकतर तुम्ही आजकालच्या मुली नीट जेवत नाही , त्यात भर सारखं बाहेरच खाणं , वीकेंडला पार्ट्या , ऑफिसचे 10 तास कमी पडतात म्हणून कधी कधी तिथली कामंही घरी घेऊन येता.कशी गं तब्बेत चांगली राहणार? 

तुझं गायनँक चेकअप कधी करून घेतलंयस? 

नाही केलय ना? वेळ कुठे असतो? 

चार सहा महिन्यांनी चेकअप करून घेत जा? हिमोग्लोबिन , थायरॉईड च्या टेस्टस करून घ्यायला हव्यात!

आई हे सगळं तुम्हाला कसं माहिती? 

आगं बरेच दिवस मी तुझी चिडचीड बघतेय , साधी साधी कारणं असतात अगदी , मला असं नाही म्हणायचं त्याचं चुकत नाही पण…

 त्याला चूक दाखवायचीच त्याची.  त्याच्याकडूनच करून घ्यायचं , पण शांत राहून! या चिडचिड करण्याने तुझ्या तब्बेतीचं नुकसान होतंय. बाथरूम मध्ये , बेडरूम मध्ये  झाडताना केसांचे मोठाले पुंजके सापडतात! 

हे केस गळणं ,डोळ्याखालची काळी वर्तुळं काय अवस्था झालीय? 

उद्यापासून तुझं डाएट मी सांगते तसं! 

सकाळी दुधाबरोबर शतावरी कल्प घेत जा.मी आणून ठेवलंय, सकाळी खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही!

डबा घेऊन जायला विसरायचं नाही .संध्याकाळच्या जेवणाचं मी बघत जाईन, पालेभाजी , कोशिंबीर जेवणात असायलाच हवी! तू मला मदत करायची .

 या सगळ्यासाठी  थोडं लवकर झोपून लवकर उठायचं म्हणजे कसा वेळ नाही मिळत मी बघते. रात्री तुळस , मेथ्या           अश्वगंधेचा काढा या दिवसांत घ्यायचा म्हणजे विकनेस वाटणार नाही. आणि तुमच्या वीकेंडला या सगळ्यातून सूट बरका. तुमचं पिझ्झा पास्ता खायची मुभा! 

त्यानंतरच्या  काही महिन्यात खरोखर सायलीचा चिडचिडेपणा कमी झाला होता , चेहऱ्यावर तजेला दिसू लागला होता. केस छान दाट झाले होते. 

संदीप आणि सायलीची भांडण देखील क्वचितच होत होती. 

एका रविवारी सकाळी घरकाम करणारी अलका आली तणतण करत , काय ताई आजकाल लईच भांडी टाकता तुम्ही, फरशीवर डाग किती पडलेत? आवरलं का तुमचं किचन मधलं चला बाहेर वेळ किती जातो माझा? 

तिची चिडचिड ऐकून सायलीने तिला विचारलं , तुझी पाळी चालुय का गं? 

त्यावर तिने मानेने होकार दिला . 

सायली  किचनमधून दुधाचा ग्लास घेऊन आली आणि 

अलकाला हाताला धरून सोफ्यावर बसवत म्हणली हे शतावरी कल्प घातलेलं दूध घे या दिवसात चांगल असतं. 

वसुधाताई कौतुकाने सायलीकडे बघत हसत होत्या ते पाहून सायली म्हणाली आई तिलाही त्रास होत असणार ना? 

हो बरोबर गं. 

आई तुम्हालाही होत होता का?

व्हायचा ग खूप , चिडचिड व्हायची अगदी यांची आणि माझी भांडण  पण व्हायची पण  माझी सासू कुठलं अस समजून घ्यायला , उलट मलाच ऐकवायची मुलाची बाजू घेऊन. 

पण माझ्या सुनेला मी समजून घ्यायला हवं हे मला ते आठवून कळलं गं. मी मासिकांमध्ये , आयुर्वेदाच्या पुस्तकात वाचून हे सगळं तुझ्यासाठी करायचं ठरवलं. आगं इतक्या दगदगीचं तुमचं आयुष्य, तब्बेत चांगली नसेल , मन:स्वास्थ्य नसेल तर तुमची  पुढची पिढी कशी असेल? 

आई sss म्हणत सायली वसुधाताईच्या गळ्यात पडली. 

APARNA…(ADP)


वरील कथा अपर्णा पाटोळे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

 

3 Comments

  1. खूप छान, एक स्त्रीच स्त्रीची व्यथा जाणवून घेऊ शकते.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post