एक नवी सुरुवात

    एक नवी सुरुवात

✍️ स्मिता मुंगळे 
     उजाडायला लागलं तसं नीलिमा उठली.तशीही तिला रात्रभर अजिबात झोप आलीच नव्हती.सगळी रात्र कूस बदलण्यात गेली होती.काल दुपारी इथे आल्यापासून ती खूप अस्वस्थ झाली होती.सगळ्या जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या होत्या.खूप दिवसांनी ती अशी एकटी राहिली होती.नितीन,तिचा नवरा...गेल्यापासून गेले सहा महिने कोणी ना कोणी कायम तिच्यासोबत होतेच.सारख्या त्या आठवणी,ते सांत्वनपर शब्द,तिच्या एकटेपणाची काळजी करणारे लोक,एवढंच ती सहा महिने अनुभवत होती.या सगळ्यातून बाहेर पडून शांतता,बदल तिला हवा होता.
       आणि अचानक तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा,सुनीताचा फोन आला. नितीन गेल्यापासून ती वरचेवर फोन करत होतीच,तसाच चौकशीसाठी आला असेल फोन असे निलिमाला वाटले.पण ती फोनवर म्हणाली,”अग, आपल्या कॉलेजचे गेट टूगेदर आहे,सगळ्याजणी येणार आहेत तर आपणही नक्की जाऊयात.मी आधी तुझ्याकडे येते,आपण एकत्रच जाऊ.”निलिमाला मनातून खूप बरे वाटले. तिला या बदलाची खरंच खूप गरज होती.
     ठरल्याप्रमाणे दोघी इकडे कोकणात आल्या.कोकण...निलीमाचे अतिशय आवडीचे ठिकाण,तिचे आजोळ.लहानपणी कित्येक उन्हाळ्याच्या सुट्ट्या तिने इथे घालवल्या होत्या.या गावातील प्रत्येक ठिकाण तिला माहिती होते.शाळा संपल्यानंतर येणं थोडं कमी झालं.वयोमानानुसार आजी-आजोबा देवाघरी गेले तरी कधीतरी मामाकडे येणं व्हायचं पण लग्न झालं,जबाबदाऱ्या वाढल्या आणि इकडे येणं हळूहळू बंद होत गेलं.आता इतक्या वर्षांनी आल्यावर तिला हे गावचं अनोळखी वाटायला लागलं होतं. आता इथे नवनवीन हॉटेल्स झाली आहेत.त्यातल्याच एका गावापासून लांब,शांतता असणाऱ्या हॉटेलमध्ये त्यांचं काल गेटटूगेदर झालं आणि मन शांत करायला आलेली नीलिमा जरा जास्तच अस्वस्थ झाली.
    कालच्या कार्यक्रमाला सगळ्या मैत्रिणी तर जमल्या होत्याच पण वर्गातील काही मुलंही आली होती आणि “तो” सुद्धा आला होता.तो अजूनही तसाच दिसत होता, कदाचित जरा जास्तच रुबाबदार. खूप वर्षांनी सगळे भेटत होते त्यामुळे प्रत्येकाच्या मनात खूप सारी उत्सुकता होती.कोण कुठे असतं, काय करतं असे खूप प्रश्न. निलिमाला सगळ्यांबद्दल जुजबी माहिती तर मिळाली होती पण त्याच्याबद्दल अधिक काही तिला जाणून घ्यायचे होते.पण त्याला विचारायचे कसे?कारण कित्येक वर्षांपूर्वी त्याच्या भावनांचा आदर न करता तिनेच त्याला नाईलाजास्तव नकार दिला होता.
   काल अनेक वर्षांनी त्याला पाहिलं आणि सगळा भूतकाळात जागा झाला.त्यालाही आपल्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असेल का, तिला राहून राहून हा प्रश्न सतावत होता.
   ती कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना तो तिच्या घराशेजारी रहायला आला होता. त्याच्या वडिलांची दर तीन वर्षांनी बदली होत असे. नवीन गाव,नवं कॉलेज असल्याने आणि दोघे एकाच वर्गात,त्यामुळे निलीमाने त्याला बरीच मदत केली होती. थोड्याच दिवसात दोघांची छान मैत्री झाली.एकत्र अभ्यास,निरनिराळ्या स्पर्धांची तयारी,असा बराच वेळ दोघे एकत्र घालवू लागले.आवडीनिवडी, छंद सारखे होतेच त्यामुळे मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं ते दोघांनाही समजले नाही.
   निलीमाच्या आईला साधारण कल्पना आली होतीच.त्यामुळे तिने, “आता हे शेवटचं वर्ष संपलं की तुझ्यासाठी स्थळं बघूया”असे निलिमाला सांगितले. आई सहजच म्हणत असेल,इतक्यात कुठे लग्न?असे वाटून निलीमाने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
    एक दिवस नीलिमा बाहेरून आली तर घरी कोणी पाहुणे आले होते. नंतर तिला आईने सांगितले की ते लोक निलिमासाठी स्थळ घेऊन आले होते. आता मात्र आईला सांगायलाच हवं,असा विचार करून नीलिमा आईला म्हणाली,”आई,मला प्रशांत आवडतो.माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत.पण त्याला अजून पुढे शिकायचे आहे.”
   तिचे बोलणे ऐकून आई म्हणाली,”अग, तुझे बाबा या स्थळावर खूप खुश आहेत,त्यांना पसंत आहे ते स्थळ.”
“पण आई,अग मला प्रशांत आवडतो.आमचे प्रेम आहे एकमेकांवर. तो हुशार आहे,पुढे शिकेल,आमचे विचारही जुळतात.”तिने आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. बाबांपुढे बोलण्याची तर तिच्यात हिंमतच नव्हती. बाबांचा हट्टी आणि रागीट स्वभाव ती चांगलाच जाणून होती.निलिमाला खूप हताश वाटत होते.
    लवकरच प्रशांतला भेटून तिने सगळे सांगून टाकले आणि त्याचा निरोप घेतला. त्या दिवशी घरी आल्यावर ती खूप रडली.नंतर मात्र त्याला विसरण्याचा प्रयत्न करत आता नवीन सुरुवात करायची असे तिने ठरवून टाकले.
   काहीच दिवसात बाबांनी पसंत केलेल्या मुलाबरोबर तिचे थाटामाटात लग्न झाले आणि ती सासरी गेलीदेखील.लग्नानंतर जेव्हा ती पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा प्रशांतच्या वडिलांची बदली दुसऱ्या गावी झाल्याचे तिला कळाले. खूप इच्छा असूनही तिने फार चौकशी केली नाही.फक्त प्रशांत पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेल्याचे तिला समजले.
     हळूहळू ती नवीन संसारात रमून गेली.नविन शहर,नवी माणसं, सगळ्यांशी जमवून घेत दिवस पुढे जात होते. यथावकाश तिच्या संसार वेलीवर फूल उमलले.आता मात्र तिला दिवसाचे चोवीस तास कमी पडू लागले आणि प्रशांतने तिच्या मनातून काढता पाय घेतला.तिच्या आयुष्यातून तर तो आधीच लांब गेला होता.
  मुलाच्या संगोपनात ती बुडून गेली.त्यांच्या बाललीला, आभ्यास घेणं, मोठं होणं आणि मुलांच्या यशाची शिखरं ती अनुभवत होती.नितीन,तिचा नवरा त्याच्या नोकरीत एक एक पायरी वर चढत प्रगतीपथावर विराजमान झाला होता.”सुख म्हणजे आणखी काय असतं?”,याचा तिला प्रत्यय येत होता.
   तिचा मुलगा वडिलांप्रमाणेच खूप हुशार. इंजिनिअर झाला आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला.नितीन त्याच्या व्यापात त्यामुळे निलिमाला बराचसा मोकळा वेळ मिळू लागला.घर आणि मुलगा यामध्ये ती इतके वर्षे एवढी व्यस्त झाली होती की तेच तिचं जग बनलं होतं.आता मात्र आपण काहीतरी केलं पाहिजे याची तिला जाणीव होऊ लागली.नितीनने तिला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सुचवले. नवीन मैत्रिणी बनव असेही सांगितले. निलिमानेही विचार केला, आत्तापर्यंत कधी मैत्रिणीबरोबर फारशी मजा नाही करता आली तर आता करूया,स्वतःचं असं एक वेगळं जग उभारूया.एखादी “लेडीज स्पेशल” ट्रिपची धमाल अनुभवूया.तिच्या लेकानेही तिला हेच सुचवले. तो तिकडे मजेत होता.”आई,तू आता स्वतःसाठी जग”,असं त्यानं म्हटल्यावर ती एकदम निर्धास्त झाली.
       पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.सगळं काही छान सुरू असतानाच तिच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली.एके दिवशी ऑफिसमधून येताना नितीनच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात तो जागेवरच गेला आणि क्षणात निलिमाचं आयुष्य बदलून गेलं. साता समुद्रापार गेलेला मुलगा त्यावेळी येऊ शकला नाही तेव्हाच तिला आता इथून पुढे आपल्याला एकटीलाच रहायचं आहे, हे लक्षात आलं होतं आणि म्हणूनच आता तिने स्वतःसाठी जगायचं, ते देखील स्वतःला हवं तसं,हे अगदी नक्की ठरवून टाकलं होतं.कारण नितीनच्या मागे तिने रडत,कण्हत आयुष्य घालवलेले नितीनला देखील आवडले नसते हे तिला माहिती होते.
    म्हणूनच काल तिने प्रशांतला एकटे गाठून आजची भेट ठरवली होती. इतक्या वर्षांनी त्याला भेटायचे, या कल्पनेनेच ती अस्वस्थ होती.मनात उत्सुकता, हुरहूर, अपराधीपणा अशा एक ना अनेक भावनांची गर्दी झाली होती.
    ठरलेल्या वेळी ती समुद्रकिनारी आली.प्रशांत आधीच तिथे येऊन थांबला होता. वेळ पाळण्याची याची जुनी सवय अजून तशीच आहे,तिच्या मनात येऊन गेले.सुरुवातीला दोघांनाही काय बोलावे तेच कळत नव्हते.खूप काही बोलायचे असूनही सुरुवात कशी करावी हे कळेना.बराच वेळ दोघेही समुद्राच्या लाटांकडे शांतपणे बघत होते.शेवटी निलिमानेच  त्याला विचारले,”कसा आहेस?” तिलाही माहिती होते की ती हे उगाचच विचारते आहे.तिच्याकडे न बघताच हसत तो म्हणाला,”मी ना,एकदम मजेत आहे.”नीलिमा म्हणाली,”अरे,मग तू हे माझ्याकडे बघून सांग ना.”त्यावर मला त्याची गरज वाटत नाही असे तो कडवटपणे बोलला.
  “बरोबर आहे तुझे.माझेच चुकले.मी तुझ्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतीये ना?”,हे बोलतानाही निलिमाला भरून आले.मग मात्र तो थोडा नरमला.”सॉरी,मी तुला दुखावले”असे म्हणत तो बोलू लागला.”काही जुन्या जखमा असतात,त्यावरची खपली निघाली की त्या पुन्हा वाहू लागतात आणि मग त्यातील वेदना अशी शब्दातून बाहेर पडते.कदाचित त्या जखमा कधीही न भरून येणाऱ्याच असतात.”
   “प्रशांत, खरंच माझं चुकलं,मीच तुला त्यावेळी खूप दुखावले. पण माझाही नाईलाज होता रे.बाबांपुढे मी नाही बोलू शकले.” निलिमाने नंतर तिच्या आयुष्यातील सगळा घटनाक्रम त्याला सांगितला.त्याचाही लग्नानंतर काहीच वर्षांत घटस्फोट होऊन त्याची पत्नी मुलगी घेऊन  विभक्त झाल्याचे त्याच्या बोलण्यातून निलिमाला कळाले. त्यानेही आयुष्यात खूप सोसले होते.
    खूप वेळ दोघे बोलत होते.निरोपाची वेळ जवळ आली तसे दोघेही भावुक झाले.पण निलिमाला मात्र आता आणखी वेळ जाऊ द्यायचा नव्हता.तिने प्रशांतकडे बघत थेट विचारले,”आता इथून पुढे आपण एकत्र यायला काय हरकत आहे?”अनपेक्षितपणे आलेल्या या प्रश्नाने प्रशांत कमालीचा गोंधळला.
“मी अगदी खरंच मनापासून विचारतेय”,असे नीलिमा म्हणाल्यावर तो म्हणाला,”अग, आता या वयात आपण असे एकत्र आल्यावर लोक काय म्हणतील?तुझ्या मुलाचा विचार केला आहेस का?तो हे मान्य करेल असे वाटते का तुला.”
      “लग्नापूर्वी बाबा काय म्हणतील या विचाराने मी तुला गमावलंय प्रशांत,आता मी इकडे एकटी कशी राहीन हा विचार मुलाने तरी कुठे केलाय?तुझी हरकत नसेल तर आपण एकत्र येऊया. आपण दोघेही एकटेपणाची झळ सोसतोय,आपल्या एकत्र येण्याने आपला एकटेपणा तर दूर होईलच पण आपलं आयुष्य देखील सुंदर होईल याची मला खात्री आहे.”
    “जे सुख नियतीने माझ्यापासून हिरावून घेतलं होतं तेच परत माझ्याकडे आलंय, आता मला तुझ्यापासून लांब जायचे नाहीये.सगळ्यांसाठी करता करता मी मला काय हवंय हेच विसरून गेले होते. आता मला माझ्यासाठी जगायचंय.ही एक नवी सुरुवात असेल.....,हल्ली तरुण मुलं मुली नाही का ‘लिव्ह इन’ मध्ये रहात,तसेच आपणही राहूया की,नवीन पण चांगलं असं काही स्विकारायला काय हरकत आहे?” असे बोलून प्रशांतच्या चेहऱ्याकडे ती उत्तराच्या अपेक्षेने बघू लागली तर त्याने फक्त स्मितहास्य करत तिला जवळ घेतले अन कृतीतून आपला होकार सांगितला.
     “चल निघुया,बराच उशीर झालाय असे निलिमाने म्हणताच,”थांबुया थोडा वेळ,आता सूर्यास्त होईलच.तुला आवडतो बघायला”,असे प्रशांतने म्हणताच,”म्हणजे अजूनही तुझ्या लक्षात आहे?” असे म्हणताना निलिमाला खरे तर भरूनच आले.आपली आवड इतक्या वर्षांनंतर ही याने लक्षात ठेवलीये याचं तिला आश्चर्य वाटलं.मावळणाऱ्या सूर्याकडे दोघेही बराच वेळ बघत बसले.समोर क्षितिजावर सूर्य अस्ताला जात होता पण इथे या दोघांच्या आयुष्यात सुख,समाधान अन आनंदाचा उदय होणार होता.
     निलिमाला आज मावळतीचे आकाशातील रंग थोडे जास्तच सुंदर भासत होते आणि संध्याकाळ खूप शांत,आश्वासक वाटत होती.

               सौ.स्मिता दिनेश मुंगळे,कोल्हापूर.
          
वरील कथा स्मिता मुंगळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.
   

  
   

   
 

1 Comments

  1. नव्या आयुष्याची सुरुवात नव्याने झाली.

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post