मी प्रेम बावरी भाग एक

 

##मी_प्रेमबावरी भाग 1


✍️अपर्णा देशपांडे

      

    "आदी s , खाली ये न जरा ."  रेवतीची हाक आली तशी अदिती धावत खाली आली .

" मी जाऊन येते ग . आज कॉलेजला जायचं नाहीये न तुला ? "  रेवती ने विचारलं .

" नाही ग आई ,  उद्या आहे शेवटची ओरल. जा तू बिनधास्त ."  आई गेल्यावर दार लावून अदितीने  टी. व्ही सुरू केला .

 तिच्या लाडक्या राघवनचा मुव्ही होता . सगळं भान हरवून सिनेमा  बघत असतांना  सानिकाचा फोन आला .

 " अदे ,  'तिकडून'  दिदीच्या  साड्या आल्या आहेत . ये लवकर !!!" 

" व्वाव ! आलेच ! " म्हणत तिचे चपला पायात सारल्या, आणि शेजारी सानिकाकडे पळाली . स्वाती दीदीच्या सासरचे लोक खूपच हौशी होते . तिच्या पसंतीने चांगल्या पाच  साड्या घेतल्या होत्या .

घरी सगळ्यांना दाखवायला पाठवल्या होत्या , शिवाय ब्लाउज पण शिवायचे होतेच . 

    अदिती सानिकाची  पट्ट मैत्रीण असल्याने तिचा सगळ्यात सहभाग होता . ती सानिकाच्या घराच्या  पायऱ्या चढली , आणि धावतच आत शिरतांना  दारात पडलेल्या बुटावरून पाय  घसरला , आणि दणकून कुणालातरी  टक्करली  . 

  "  आई s ग s !! " ती कळवली , आणि दुसऱ्याच क्षणाला आ वासून बघत राहिली . 

' राघवन ? ..इथे?'

समोर एक अतिशय देखणा तगडा मुंडा उभा . जीन्स आणि चौकड्यांचा शर्ट . अगदी राघवनच . त्यालाच धडकली होती ती  .

आपण एकटक त्याच्याकडे बघतोय हे लक्षात येऊन वरमली  .

"ओह ! सॉरी !"  ती पुटपुटली . 

 " आदी , बघून चालत जा न ग! बाय द वे ,

हा आकाश . जीजू चा मित्र . आणि आकाश , ही माझी बेस्ट फ्रेंड , अदिती ."  सानिका बोलत होती , आणि अदिती मात्र एकटक आकाशकडेच बघत होती . मनात चाललं होतं ; 

' कसला हॅन्डसम आहे हा .' 

" आदी s !!"  सानिका ओरडली , तशी ती भानावर आली .

      " ठीक आहे , मी निघतो . काही निरोप असेल तर संदीपला किंवा आंटी ना कळवाल,  येतो ."  म्हणून संदीप जीजूचा तो मित्र गेला , आणि अदिती ओरडली .

" ए s s कसला हॉट आहे हा !!!!!"

" अदिती ! काय ग बावळट ! एकटक बघत होतीस त्याच्याकडे. कसं वाटतं ते !"

" काय करतो ग हा ? तुझ्या जिजूचा मित्र?"

" टेक्सटाईल इंजिनिअर आहे . 

 स्टार्ट अप आहे काहीतरी . मला नक्की नाही माहीत ....विकेट पडली न तुझी? बोलू का संदीप जिजूशी?"

" ए गप ! ..उगाच काहीतरी. जास्त बोलू नकोस ." 

        साड्या बघून कॉफी घेऊन अदिती घरी गेली , पण डोक्यात मात्र आकाशच होता .

स्टायलिश ....उंच...तगडा...सावळा..

आपल्या अख्ख्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये कुणीच असा नव्हता . तिला जॅम भुरळ पडली होती आकाशची .. पण त्यानंतर मात्र त्याची कुठेच गाठ भेट झाली नाही . काही महिने गेले .

  ****अदितीला  टेक्नोसिस मध्ये जॉब लागला होता . स्वातीच्या लग्नानंतर लगेच  आठएक दिवसांनी जॉईन करायचं होतं . पण ते नंतर ... सध्यातरी स्वातीच्या लग्नात मिरवायचं होतं .

  लग्नाच्या दिवशी सानिका आणि अदिती सतत स्वातीच्या दिमतीला होत्या . सकाळी अकराचा मुहूर्त होता . आता सकाळचे सात वाजले होते .

स्वातीला तयार करण्यासाठी ब्युटीशीयन आली होती . अदिती मात्र मस्तं  हिरवी  कांजीवरम नेसून तयार होती . सानिकाची अनेक आघाड्यांवर लगबग सुरू होती . 

"आदीबेटा , ही बॅग संदीप ला नेऊन दे न . त्याचा सूट आहे ह्यात ."  वंदना काकीने घाईघाईत एक बॅग तिच्याजवळ दिली .

     आपली कांजीवरम सांभाळत अदिती  ' वर पक्षात'  गेली . तिथे जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता . तिने दारावर टक टक केल्यावर दार उघडलं . 

हाय रे दैया !  समोर तोच , राघवन !  ती सटपटली .

" कोण आहे रे?"  आतून आवाज आला . 

" मी अदिती जिजाजी !  ते सुटाने सांगितलं , स्वातीला  नेऊन द्यायला ."  सगळा गोंधळ . शी ! शब्द कोलांटउड्या मारत होते .

दारात हात पसरून उभ्या त्या 'राघवन'  च्या चेहऱ्यावरील खट्याळ हसू बघून तिला आपली चूक समजली .

" ओह ! ते s s ..

" समजलं , समजलं . बाय द वे , अदिती ,  तुझ्यामुळे ह्या साडीची शोभा जरा जास्तच वाढलीये नाही ? "

" असं ? ओ मिस्टर ! तो सूट जिजूंना देणार की इथेच उभा रहाणार वायफळ बडबड करत?" 

म्हणून  हसून ती माघारी पळाली . 

    ' बघून घेऊ बच्चू!'  असं मनात म्हणत तोही आत गेला .

      मांडवात त्याची नजर सारखी अदिती कडेच होती . ती देखील डोळ्याच्या कोपऱ्यातून सारखी त्याच्याकडेच बघत होती.  

लग्न पार पडलं .  फोटो , जेवणं सगळं पार पडलं . 

अदिती स्वातीची बॅग आवरत होती . 

बाकी  सगळे विहिणीच्या पंगतीत होते .

" मी काही मदत करू ?"  मागून आकाशनी विचारलं  आणि अदिती दचकली .

 त्याला अचानक तिथे बघून  खरं तर खूप सुखावली होती .. पण म्हणाली ,

"आम्हाला येतात आमची कामं ." 

"आम्हाला शिकवा की मग थोडंसं ! "

  तिच्या डोळ्यात बघत आकाश धीटपणे पुढे आला . तिची नजर खाली झुकली . आपली पापणी वर उचलल्या जात नाहीये हे जाणवलं तिला .

"आम्ही निघतोय आता. "

तिची चलबिचल सुरू होती . 

"तोच कपडा आत बॅगेत टाकतेय आणि पुन्हा बाहेर काढतेय . काय .. लक्ष कुठाय ?" त्याने विचारल्या बरोबर ती दचकली . 

"दचकली की तर अजूनच सुंदर दिसतेस ग !" असं म्हणाला , आणि ती काही बोलायच्या आत माघारी फिरला . मी कॉल करेन असं हात हलवत खुणावत तो बाहेर पडला .

      तिला खरं तर त्याच्याशी बोलायचं होतं , पण इतक्यात संजना मामी आत आली .

"आदी , स्वाती ची निघायची वेळ झाली . ती जातांना  पुन्हा साडी बदलणार आहे का ?"

"नाही मामी . आता तिची बॅग बंद पण केली मी ."  स्वाती आता काही मिनिटात सासरी जाणार ह्या विचाराने अदिती ला गहिवरून आलं . 

         

********** घरी येऊन सगळं आवरून अदिती निवांत मोबाइलवर फोटो बघत होती , आणि फोन वाजला . 

     

        फोन आकाशचाच होता . अदितीला बरेच मित्र होते , पण कुणाच्याच फोनमुळे ती अशी अस्वस्थ झालेली नव्हती .... मग आजच का आपल्याला हे असं वाटतंय ?... असा विचार करतच तिने फोन उचलला . 

" हॅलो , आकाश ?"

" हाय ! माझा नंबर सेव्ह करून ठेवलाएस तू ?" 

तिने पट्कन जीभ चावली ... चुकलंच की आपलं.

"सेव्ह ? मुळीच नाही ! पण माझा अंदाज अगदी बरोबर ठरलाय ."

"का तुला असं वाटलं की मी फोन करेन म्हणून ?"

"कारण सानिका ने मला काही फोटो पाठवले आहेत , ज्यात एक मुलगा कायम माझ्याकडेच बघतांना दिसतोय ..  म्हणून! "

" मग ? तू नव्हतीस का बघत ....त्या मुलाकडे ?"

"मी ? मला किती कामं होते ... मला असल्या गोष्टींसाठी वेळच नव्हता ."

" असं ? .. मला पण माझ्या मित्राने काही फोटो पाठवले आहेत बरं का !!"

"......."  फोनवरच तिने चेहरा लपवला 

" आता बोल न "

" मी .. मला ... कामाचं ऑफिस आहे नाही .. सुट्टी ..उद्या .." शरमेने तिची बोबडी वळली होती .

" उत्तर मिळालं ... उद्या भेटू." 

       कसला द्वाड आहे हा ... म्हणत ती स्वतःशीच लाजली . 

          दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आकाश सरळ तिच्या ऑफिसपाशी गेला . ती बाहेर येईपर्यंत त्याने शांतपणे तिची वाट बघितली . ती बाहेर आली , आणि समोर आकाश !

तो असा अचानक सगळ्या स्टाफ समोर ..... सगळ्यांच्या नजरा दोघांवर ... ती अवघडलेली ... तो एकदम चिल्ल !!

   "कार आणलीये मॅडम .. ड्रायव्हर हाजीर है ."

" तू ..असा .इथे ..सगळे कसे बघत आहेत बघ न "

" चल मग लवकर , कारमध्ये बस ."

" मी  माझी स्कुटर आणलीय न"

" चल ग , तुझी स्कुटर घडी करून डिक्कीत टाकतो .. मग झालं ?"

"चल बाबा , इथे नाटक नको उगाच ."  म्हणतच ती कारमध्ये बसली . गाडीत ती एकदम शांत शांत होती .

 तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसत त्याने सफाईने कार  'नियाज कॅफे' समोर उभी केली .

       दोघे  कॅफेत बसले असतांना त्याने आपले दोन्ही कान पकडले . 

" रागावू नका हो मॅडम ... मी असा अचानक सगळ्यांसमोर आलो म्हणून ... पण आढेवेढे न घेता सरळ सरळ सांगतो ... मला तू जाम आवडलीएस ... पहिल्या भेटीत हे नाही लक्षात आलं ,  पण संदीपच्या लग्नात मात्र विकेट पडली माझी ... मी टेक्सटाईल इंजिनिअर आहे ,  वेगवेगळ्या फॅशन डिझायनिंग कंपन्यांना  नवीन फॅब्रिक आणि इनोव्हेटिव्ह मॉडर्न प्रिंट्स  पुरवायचा व्यवसाय आहे माझा . तू पण इंजिनिअर आहेस , जॉब करतेस ...  स्वाती संदीपकडून तुझ्याबद्दल बरीच माहिती काढलीय मी ... आणि मला मला माहितेय की तुलाही मी पसंत आहे...त्यामुळे  प्लिज  तुझं मत सांग! ... घाई करू नये हे कळतंय. .. पण खरं तर .. मला घाई झालीये ."  एका दमात सगळं बोलून तो तिच्या उत्तराची वाट बघू लागला . 

    अदिती काही बोलणार इतक्यात सानिकाचा कॉल आला .  रेवती काकीचा म्हणजे अदितीच्या आईचा अक्सिडेंट झाला होता ,  गंभीर दुखापत झाली होती , आणि त्यांना 'प्रयाग'  मध्ये  नेण्यात आलं होतं . 

अदितीसाठी हा मोठा धक्का होता . तिला सावरत आकाश निघण्यासाठी  उठला , तशी ती म्हणाली , 

     " आकाश , तू नको येऊस प्लिज ! मी जाईन . फक्त माझी स्कुटर कंपनीच्या पार्किंगमध्ये आहे , ती घरी पोचवशील का ? " असं म्हणून त्याचं काहीही न ऐकता तिने कॅब मागवली . 

"काही लागलं तर लगेच सांग अदिती !" आकाश मागून ओरडला , पण अदितीने वळूनही बघितलं नाही .

आकाशला तिच्या अशा वागण्याचं आश्चर्य वाटलं , पण ती वेळ असा विचार करण्याची नव्हती .

      संध्याकाळपर्यंत आकाशने  अदितीला तीन चार कॉल केले,  पण तिचा फोन कायम बंद होता . त्याने न राहवून सानिकाला फोन लावला . 

" रेवती काकीच्या मेंदूला जबरी मार लागलाय आकाश . ती कोमामध्ये आहे . अदिती कुणाशीही काहीच बोलायला तयार नाहीये ... माझी आई आहे तिच्याजवळ ....

सानिका बोलत होती , पण आकाशला मात्र अदितीची काळजी वाटत होती .

         सानिकाने त्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यास मनाई केली होती . तरीही तो तिथे गेलाच .

आय.सी.यु. च्या बाहेर सानिका सुन्न बसली होती . 

त्याने तिच्या खांद्यावर हलकेच ठेवलेला हात तिने झिडकारला .

" अदिती s , "  आकाश तिला हळुवारपणे पुढे काही बोलणार इतक्यात तीच म्हणाली ,

" आता मला  जयेशशी लग्न करावं लागणार  आकाश. ज्याची मला भीती होती तेच होणार ...  हे असं कसं घडतं आयुष्यात?" 

आकाशसाठी हा फारच मोठा धक्का होता , पण तो काहीच बोलला नाही . कोणत्या अधिकाराने तो तिला समजावणार होता ... काय घडलंय तिच्या आयुष्यात पूर्वी ह्याची कल्पना नसताना.... आणि त्यांच्या नात्यावर कुठलेही शिक्कामोर्तब झालेले नसतांना . 

" तुझी काय अडचण आहे मला माहित नाही अदिती , पण मी  कायम तुझ्या सोबत असेन हे आश्वासन देतो .. " म्हणत तो तिच्या उत्तराची वाट बघत उभा राहिला .

तिने मान वर केली , आणि भरल्या डोळ्याने म्हणाली ,

" थँक्स आकाश , पण मला वाटतं की तू ह्यातून बाजूला राहिलेलं बरं ... सॉरी , पण तू आता निघ . जयेश येतोय ."

(क्रमशः)

पुढील भाग

अपर्णा देशपांडे

  वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.




Post a Comment (0)
Previous Post Next Post