मी प्रेम बावरी भाग दोन

मी प्रेमबावरी भाग 2

✍️अपर्णा देशपांडे 

मागील भाग

       अदितीने  आकाशकडून कुठलीही मदत घेण्यास नकार दिला , ह्याचे त्याला खूप वाईट वाटले होते . तिची आर्थिक परिस्थिती तशी चांगलीच वाटत होती ... त्यात ती कमावती ... एक मात्र होतं ..  तिचे वडील  कधीच दिसले नव्हते ... आणि तिने कधी उल्लेखही केला नव्हता .  तिला वडील नाहीयेत का ? आणि हा जयेश कोण ? हे प्रश्न मनात ठेवून आकाश काहीही न बोलता तिथून गेला , पण हॉस्पिटलच्या बाहेर न पडता तिथेच समोरील वॉर्ड जवळ थांबला . 

आपल्याला अदितीच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहिती नाही, मग अशा अवस्थेत आपण अदितीला तिची स्पेस दिली पाहिजे ... पण  पुन्हा तोच प्रश्न .. हा जयेश कोण ? स्वाती तर त्याच्याबद्दल काहीच बोलली नव्हती .

अदितीला त्याच्याशी का लग्न करावं लागणार ?  ह्या प्रश्नांची काही अंशी तरी उत्तरं येणं आवश्यक होतं . 

थोड्याच वेळात  एक तरुण त्याच्या समोरून गेला तो थेट अदितीजवळ . आकाश सावध झाला .

हाच जयेश असणार . तसा अंगापिंडानी चांगला वाटला . त्याने त्याच्या हातातील दोन पुडके अदीती जवळ दिले . एकात बहुतेक काही खाद्यपदार्थ असावेत ... आणि दुसऱ्यात ?..काय असेल ? 

काही मिनिटातच तो तरुण तिथून निघून गेला . 

तो हॉस्पिटलच्या बाहेर पडला आणि पाठोपाठ आकाशनेही गाडी मागे मागे नेली . 

       

*******

अदिती  खूप काळजीत होती .  आठ दिवसांनी आई कोमातून बाहेर तर आली , पण तिच्या उजव्या हाताला प्लास्टर होतं ...आणि डोक्याची जखम अजून ओली होती . 

तिने फोन करून तिच्या वैशाली मावशीला सोबतीला बोलावून घेतले होते . ऑफिसमधून घेतलेली सुट्टी संपत आली होती , तिला जॉईन करणं भाग होते .  हॉस्पिटलचे बिल ही प्रचंड आले होते . गेले काही दिवस ती पैशाची जुळवाजुळव करतंच होती . तो एक मोठा चिंतेचा विषय होता .

सानिकाच्या घरून डबा येत होता , पण आईला डिस्चार्ज मिळेपर्यंत तरी मावशीची मदत लागणार होती .  बाकी सगळ्यांशी बोलत असली तरी आकाशचे फोन ती बिझी आहे म्हणून टाळत होती . 

शेवटी आकाशने तिला ऑफिस जवळ गाठलेच ! 

तिला जबरदस्ती कॅफेमध्ये घेऊन गेला . 

"काय गौडबंगाल आहे अदिती ? मला सांग ! मी तुझी मदत करू शकणार नाही असं का वाटतं तुला ? ह्या जयेशचा तुझा काय संबंध ? ...  तुला माहितेय का की तो काय कामं करतो आणि कुणाचा मुलगा आहे ?"

"तो लाखन चोबेचा मुलगा आहे !...  हेच ना ? तुला काय गरज होती त्याचा पाठलाग करायची ?

आकाश ह्या लोकांपासून दूर रहा . ही माणसं सरळ नाहीत !"

" हे माहितेय न तुला ? तरीही तू ?.. मान्य आहे अदिती , की आपण अजून एकमेकांना पुरते ओळखत नाही , पण तुझ्यासारख्या मुलीने जयेशसारख्या मुलाशी  लग्न..? कम ऑन अदिती ! तू न .."  

त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ती ओरडली, 

" तुला काय माहीत आहे आकाश ? का तू माझा पिच्छा पुरावतोय ? चूक झाली माझी की मी विसरले  माझ्या मर्यादा , आणि तुझ्याशी जवळीक दाखवली . मी जर जयेशशी लग्न नाही केलं तर रहातं घर तर जाईलच , पण प्रचंड कर्जात बुडालेली मी जेलमध्ये जाईन ... आणि आई रस्त्यावर येईल ."

" कर्ज ? कुणाचं ? अदिती ..मला ......."

आकाश हे बोलत असतांनाच  अचानक तिथे जयेश  आला . त्याच्यासोबत त्याचा  एक आरदांड मित्र पण होता . त्यांनी काहीही न बोलता सरळ आकाशवर हल्ला केला . त्याला लाथ बुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली . अदितीने मध्ये पडत त्याला वाचवायचा प्रयत्न केला , पण त्यांचा आवेश ती रोखू शकली नाही . 

" एकदाच शेवटचं सांगतो ! पुन्हा हिच्यासोबत दिसलास तर जिता ठेवायचा नाही ! आणि तू ग भवाने! ते ऑफिस ऑफिस खेळणं बास झालं !  आत्या बरी होतेय आता . उद्याच बिल भरतो मी हॉस्पिटलचं ! आणि त्यानंतर लगेच चार दिवसात लग्न उरकून टाकू ! चल आता ! बस गाडीत ! "

    आकाशला बराच मार लागला होता . तो कसा बसा उठून बसेपर्यंत जयेश अदितीला घेऊन गेला होता . ह्या अशा माणसाच्या हातात अदितीच्या आयुष्याची दोरी असावी ह्याचं त्याला भयानक वैषम्य वाटत होतं . 

काहीतरी निश्चय करून रात्री  त्याने अदितीला  फोन केला .

"अदिती ? कुठे आहेस ?"

" सॉरी आकाश , पण मी तुला सांगत होते न , की माझ्या नादी नको लागूस !"

" अदिती , ऐक !  तुझ्या आईचं हॉस्पिटलचं बिल मी भरतो . तू काळजी नको करुस ग ! त्या नालायक माणसाच्या हातात तुझ्या आयुष्याचे निर्णय का आहेत मला माहित नाही ! आणि तो तुझा नातेवाईक आहे ? आत्या कुणाला म्हणाला तो ? .. बोल न अदिती!"

" कारण ती माझी जन्मदाती आई नाहीये ! जयेश तिच्या भावाचा म्हणजे लाखनचा मुलगा आहे ! "

        अदितीने हे सांगितल्यावर आकाशला खूप आश्चर्य वाटले . कारण इतक्या दिवसात सानिका , स्वाती किंवा त्यांची आई ह्यांच्यापैकी कुणालाच  हे सत्य माहिती नव्हते . 

      आपल्या आयुष्याचं इतकं मोठं गुपित आपण इतक्या चटकन आकाशला का सांगितलं असेल

ह्याचा अदिती विचार करत असतानाच आकाश म्हणाला , 

"अदिती , तू नक्की कुठल्यातरी संकटात आहेस हे समजतंय मला . आत्ता तू कुठे आहेस ? ठीक तर आहेस न? "

            " मी ठीकच आहे , पण जयेश मला त्याच्या घरी घेऊन आलाय . वैभवी मावशीला ह्या लोकांनी बहुतेक वापस पाठवलंय.... आईजवळ सानिका किंवा तिची आई असेल .

आ काश , ऐक ! परवा आईला डिस्चार्ज मिळतोय .  आई  माझं लग्न ह्या गावगुंडाशी कधीही होऊ देणार नाही , हे लाखन मामांना माहितेय . जयेशला माझ्याबद्दल किंचितही प्रेम नाही , पण केवळ सूड म्हणून त्याला .......

 अचानक अदितीचा आवाज जाऊन तिथे दुसराच आवाज आला .  " ओ पावनं ! मार खाऊन पण अक्कल ठिकाणावर येईना का काय ! मुकाट राव्हा आपल्या जागं वर !  न्हाई तर परिणाम वाईट होत्याल !"  आणि फोन बंद झाला . 

        आता अदितीला नक्कीच धोका आहे , आणि आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या विचारात असतांनाच त्याला सानिकाचा फोन आला .

" आकाश , ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ये !  रेवती काकी आणि अदितीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ! "   सानिकाच्या फोन नंतर आकाश धावतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला . 

  अदिती सुन्न मनाने जयेशच्या घरात एका खोलीत बंद होती . गेल्या काही दिवसात तिचं आयुष्य कुठल्या कुठे बदललं होतं . एक यशस्वी इंजिनिअर असलेली ,  नोकरी करणारी ,  स्वतंत्रपणे स्वाभिमानाने रहाणाऱ्या आईची मुलगी , आकाश सारख्या एका सर्वस्वी तिच्यासाठी योग्य मुलाच्या सहवासात येते , आणि प्रेमाची कोवळी पालवी फुटायच्या आताच हे सगळं घडतं ! सगळंच  किती वेगात घडलं .

देवा , माझ्या आईची काळजी घे रे ! म्हणत तिने हात जोडले . 

"काय मागतेय देवाकडे ?"  जयेश तिच्या खोलीत आला होता .

" जयेश , तुला माझ्याशी लग्न करायचंय न ? मी कुठे नाही म्हणतेय ? पण आईचा डिस्चार्ज तरी होऊ दे ! "

तिच्या जवळ जाऊन बसत तिचे चेहऱ्यावरचे केस सावरत तो म्हणाला ,

" आत्याबाई जर तयार असत्या तर प्रश्नच नव्हता न राणी ? गेल्या वर्षीच बार उडवला असता आपण ! पण नाही !  तू तिची स्वतःची पोरगी नसूनही तिचा किती माज आहे बघ !  माझ्या बापानं तुझं शिक्षण केलं ,  एव्हढं मोठं घर गहाण ठेवलंय आमच्याकडे , त्याचं कर्ज फिटता फिटेना ... तरी  तुझ्या एका फोनवर तुला दोन लाख आणून दिले की नाही ? हा ? तरी इतका माज? "

" मी हात जोडते जयेश .. उद्या आईचा डिस्चार्ज  तेव्हढं होऊ दे ... मी तू म्हणशील ते करेन ."

आपला हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला आपल्या जवळ घेत तो म्हणाला ,

" ते तर तू करशीलच ग ..कुठं जाणार ? "  आपले दात दाखवत हसत त्याने तिचा हात हातात घेतला .  

" ए s s जया !!  तू हितं गुलु गुलू करत बसलास अन ती गायब झाली ना ! नागिणीची जात हिची ! कुठं नेलंस ग माह्या भहिणीला ? बोल !"

" कुठे नेलं म्हणजे ? मामा ? काय बोलताय ? आई तर हॉस्पिटलमध्ये आहे न !" 

"पळाली ती तिथून ! आयुष्यभर हेच केलं तिनं ! कुटं जाईल पळून पळून ? येईल बराबर हितच !"

  अदितीने गुढग्यात मान घातली . तिला रडू आवरत नव्हते . 

"तुम्ही कधीच समजून नाही घेतलं तिला . मामा , प्लिज बघा न ती कुठे गेली . मला नाही वाटत ती मला न सांगता अशी जाईल."  

     जयेश आणि लाखन चवताळले होते . आतापर्यंत आपल्या आश्रयाने रहाणारी आपली बहीण आणि तिची ही दत्तक मुलगी आपल्या हातून जात कामा नये म्हणून त्यांनी सगळीकडे रेवतीचा शोध घ्यायला सुरुवात केली . हॉस्पिटलचं बिल कुणाच्या नावाने भरलंय हे देखील त्यांनी तपासलं . ते रेवतीच्याच नावाचं होतं .

सानिकाचं घर , आकाशचं घर ,सगळं धुंडाळून झालं .. . आकाशच्या घरी फक्त त्याचा नोकरच हजर होता . 

संतापाने जयेश अदितीकडे आला . 

" तुझा तो यार कुठे रहातो सांग !! त्यानेच नेलंय तुझ्या मायला ! अशी कशी गायब झाली आत्या? त्या पोराचे सगळे पत्ते दे ! नाही त्याचं टांग मोडून हातात दिली तर नाव नाही !"

" बेशक मोड !! तो माझा कुणीही लागत नाही ! मला फक्त आई सुखरूप हवी बस !! मला तर तो कुठे रहातो , त्याचे कोण मित्र आहेत हे काहीच माहिती नाही !!"

       

     अदिती बोलून तर गेली , पण आपल्याच शब्दांचं तिला खुप वाईट वाटलं . आई तिकडे आकाशसोबत सुखरूप असणार ह्याची तिला खात्री होती . .. कोण लागतो तो माझा ? का जीवावर उदार होऊन आईला वाचवतोय ? त्याच्या इतक्या प्रेमाच्या बदल्यात मी त्याला काय दिलं ? फक्त झिडकारत आले मी त्याला ... आकाश , कोणत्या तोंडाने तुझी माफी मागू मी ? 

********

"काकी , तुम्ही बिनधास्त इथे रहा . आकाश माझा बालमित्र आहे सख्ख्या भावापेक्षा जास्त जवळचा . स्वाती तर मुली सारखीच आहे तुम्हाला . इथे आराम करा . आणि आदितीची बिलकुल काळजी करू नका , आम्ही आणू तिला ."  संदीप , स्वातीचा नवरा रेवतीला आश्वस्त करत होता . आकाशने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला होता . 

" आकाश , स्वाती , संदीप मी तुमचे आभार .."

" नाही रेवा काकी  , आभार नका मानू . पण हे सगळं काय आहे ? आपण इतकी वर्षे शेजारी राहतोय , आम्हाला कधीच जराही वाटलं नाही की अदिती तुमची मुलगी नाही . कोण आहेत ही धमक्या देणारी माणसं ?" 

    आता इतक्या वर्षांनी सगळा इतिहास पुन्हा जागा होणार होता ...

*******

चोबे कुटुंब  म्हणजे गावातील एक हुकूमशाही श्रीमंत असं बडं प्रस्थ होतं . रावसाहेब चोबे यांना एकच मुलगा होता, लाखन . ह्या लाखनची लक्षणं काही ठीक नव्हती . आपल्या अत्यंत छंदी फंदी स्वभावामुळे अगदी तरुण वयातच त्याने रावसाहेबांची खूपसारी मालमत्ता देशोधडीला लावली . रावसाहेबांना एकच बहीण होती , जी अत्यंत गर्भश्रीमंत घरातील सून होती . पण एक अपघातात त्या बहिणीचा आणि यजमानांचा मृत्यू झाला , आणि त्यांची छोटीशी मुलगी रेवती म्हणजे लखनची  छोटीशी आतेबहीण त्यांच्याकडे आली . प्रचंड मोठ्या संपत्तीची एकमेव वारस म्हणजे चिमुकली रेवती !!! 

रावसाहेब आणि साहेबीण यांनी मात्र रेवतीला आपली मुलगी मानून तिचा सांभाळ केला . पण लाखनला  ही आपली आश्रप बहीण म्हणजे मोठी सोन्याची खाणच सापडली होती . 

      लांडया लबाड्यात तरबेज असलेल्या लाखनने रेवतीच्या संपत्तीचे सगळे कागदपत्र ताब्यात घेतले .  रेवती मोठी होऊन एक घरंदाज कुटुंबातील सुंदर तरुणी दिसू लागली . मुळंचं राजयोगी सौन्दर्य लपत नव्हतं . तिच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवणाऱ्या आपल्या मुलाच्या काळ्या मनसुब्याची रावसाहेबांना कल्पना होती . 

त्यांनी बरीचशी जमीन , आणि मालमत्ता रेवतीच्या नावाने ठेवली , पण बाकी काही कागदपत्रांची पूर्तता करण्या पूर्वीच लाखनने त्यांचा घात केला . 

उरलेली सगळी मालमत्ता त्याने आपल्या ताब्यात घेतली . 

हे सगळं सांगताना रेवतीला दम लागत होता . सगळे भान हरपून तिची ही अद्भुत कहाणी ऐकत होते .

" हे  तुमचं सध्याचं राहतं घर काकी ? ते कुणाचं आहे ? "

"अग , हे घर एकेकाळी माझ्याच नावावर होतं . खूप जुनी वास्तू आहे हे तर बघून कळतंच न ? पण  लाखनने हडप केलं आणि वर मलाच आयुष्यभर असं भासवलं की मी त्याची आश्रित आहे . इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारस , पण  मला  खूप गरज असेल तेव्हा  उपकार केल्यासारखं मला मदत करत होता लाखन . वरून सारखी मला अदितीच लग्न जयेशशी लावून देण्याबाबत धमकी देतात हे ! नक्की अजून बरीच प्रॉपर्टी असणार जी अजून त्यांना मिळालेली नाही .

तशी माझी नोकरी आहे , पण ती कमाई तुटपुंजी आहे . मला ह्यांची सारखी मदत घ्यावी लागली .

 

आकाश मन लावून हे सगळं ऐकत होता . त्याला आता अदितीची चिंता होती . जयेश तिच्याशी तातडीने आणि जबरदस्तीने  लग्न लावून मोकळा होईल ह्याची भीती होतीच . 

आणि त्याला मित्राचा फोन आलाच !

" आकाश ,  मी आत्ता बघितलं . तुझी ती अदिती आहे न, ती इथे तळजाईच्या मंदिरात दिसतेय . असं वाटतंय की लग्न आहे तिचं .  तुला माहीत आहे का ?" 

     आकाश ताबडतोब उठला . सोबत संदीप ,रेवती आणि स्वाती होते .

आकाश ने निघता निघता त्याचा मित्र इन्स्पेक्टर रविशला फोन केला . सगळे तळजाईच्या मंदिराकडे निघाले . 

*****

"जयेश , मी तुझ्याशी लग्न तेव्हाच करेन जेव्हा मला माझी आई सुखरूप समोर दिसेल . नाहीतर मी तुझ्यावर जबरदस्तीने लग्न लावल्याची केस करेन लक्षात ठेव ! " अदिती सतत जयेश आणि लाखनला धमकी देत होती . निर्ढावलेल्या जयेशला तिच्या धमकीने काहीच फरक पडत नव्हता . 

तिला घेऊन ते मंदिरात पोहोचले . रेवतीच्या हिश्याची उरली सुरली मालमत्ता देखील त्यांना कायदेशीररीत्या आता अदितीमार्फत मिळणार होती . 

*****
आकाश आणि संदीप तातडीने मंदिरात पोहोचले . मागून आकाशचा मित्र इन्स्पेक्टर रवीश पण आला .. ताबडतोब सगळे आत आवारात पोहोचले . तिथे लग्नाचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते . जयेश आणि लाखन साळसूदपणे  देवीची पूजा करत होते . अदिती मात्र कुठेही नव्हती ! 

इन्स्पेक्टरने ताबडतोब दोघांना ताब्यात घेतलं , आणि चौकशी सुरू केली . तिथल्या पुजाऱ्याने सांगितलं की अदिती तिथे आली होती , लग्नाची तयारी पण सुरू होती ... पण तिने संधी साधून तिथून स्वतःची  सुटका करत पळ काढला ! 

अदिती तिथून गायब झाली होती !

(क्रमशः)

पुढील भाग

अपर्णा देशपांडे

        
वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.























Post a Comment (0)
Previous Post Next Post