मी प्रेम बावरी भाग तीन

 

मी प्रेमबावरी भाग 3

✍️अपर्णा देशपांडे

मागील भाग

       रेवतीला हे सगळं असह्य झालं होतं . ती  बेभान झाली आणि त्वेषाने लाखनवर चालून गेली .

त्याचं बखोटं पकडून तिने फडाफडा त्याच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली . वयाच्या सहाव्या वर्षी रावसाहेबांनी तिला आपल्या घरी आणलं होतं . तेव्हा लाखन हा आपला मोठा भाऊच आपल्या वडीलासारखा वाटत होता तिला ... आणि त्याने तिच्या आयुष्याशी असा खेळ केला होता . 

" बोल नालायका , माझी आदू कुठाय !! इन्स्पेक्टर साहेब , ह्याचे तुकडे तुकडे करून गिधाडांना खायला घाला !! नीच माणूस आहे हा !"  

"आंटी , प्लिज ! तुमची तब्बेत नाजूक आहे ,  सांभाळा ! " मागून आलेल्या स्वातीने रेवतीला बाजूला नेले . 

" ताई , तुम्ही  काकीला घरी घेऊन पोलीस स्टेशन वर या .  मी गाडी देतो . संदीप आणि आकाश नक्कीच अदितीला शोधून काढतील . 

फार दूर नसेल गेली ती . माझी माणसं पण येतीलच सोबतीला . चला तुम्ही . मी ह्यांचा थोडा समाचार घेतो . "   म्हणत इन्स्पेक्टरने दोघांना गाडीत घातले . जयेश कडून अदितीचा मोबाईल घेऊन त्याने आकाश जवळ दिला होता .

इन्स्पेक्टर रवीशने रेवती कडून रीतसर तक्रार नोंदवून घेतली  . दोघांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होणार होते . पण सगळ्यात आधी अदितीचा शोध घेणे आवश्यक होते . 

           संदीप आणि आकाश मंदिराच्या भोवताली , बाजूच्या बाजारपेठेत , शोध घेऊ लागले .  

तिच्या मैत्रिणी , ऑफिसचे सहकारी असे बरेच कॉल्स केले .. पण ती त्यांच्याकडे गेली नव्हती . थोड्याच वेळात दोन पोलीस कॉन्स्टेबल पण ह्या कामी लावल्या गेले होते . आकाशच्या निष्ठेचं संदीपला खूप कौतुक वाटत होतं .  अदितीकडून आकाशच्या प्रेमाचा स्वीकार केल्या गेला नव्हता , तरीही तिच्याबद्दल आकाशला वाटणारं प्रेम हे एकतर्फी नाही ह्याची त्याला इतकी खात्री होती हे विशेष होतं . 

रात्री थकून आकाश त्याच्या घरी गेला . त्याच्या मनात वेगवेगळ्या शंकांनी घर केलं होतं . अदिती जिवंत तर असेल न? जयेशच्या साथीदारांनी तिचं काही बरं वाईट तर केलं नसेल ?...नाही नाही असं काही होणार नाही . अदिती ...कुठे आहेस ग ?? 

 *******

सकाळी फोनच्या रिंगने आकाशला जाग आली . त्याने स्क्रीन बघितला आणि ताडकन उठुनच बसला . अदितीचा फोन होता .

" अदिती ? तू ? ऑल ओके ?"

" आकाश !! गेस मी कुठे आहे !! ..जस्ट कान्ट बिलिव्ह !! "

"लवकर बोल ग ! जीव जातोय माझा ! "

" आकाश , मी कोल्हापुरात आहे ! आणि आईला फोन न करता मी आधी तुला कॉल केला , कारण ... ते कारणच तसं आहे ! "

"कोड्यात नको बोलुस ग ! लवकर सांग काय ते !"

" आज मला माझे बाबा भेटले आकाश !! माझ्या आठवणीत करोडो वेळा डोळ्यासमोर येणारा त्यांचा चेहरा आज प्रत्यक्षात भेटला आकाश !! कसं सांगू , मी किती खुश आहे ! "

अदितीचा आनंद तिच्या आवाजात मावत नव्हता .  तिच्या वडीलांबद्दल आकाशला काहीच माहिती नव्हती ..... कारण खुद्द अदितीलाच त्यांचा शोध आत्ता लागला होता . 

*********

लखन आणि जयेश जबरदस्तीने अदितीला तळजाईच्या मंदिरात घेऊन जाणार होते .

अदिती तशी शांत होती . तिच्या वयाच्या सतराव्या वर्षापासून  तिच्या डोक्यावर ही जयेशची टांगती तलवार होती . आपल्या आईकडे खूप प्रॉपर्टी होती , पण सध्यातरी आपली पूर्ण मदार लाखन मामांवरच आहे ... आपल्यावर त्यांचे खूप मोठे कर्ज आहे ह्याच समजुतीने ती लग्नाचं ओझं बाळगून होती .

पण  आता अदितीशी लग्न होणार ह्या नुसत्या कल्पनेनेच  मोहरलेल्या जयेशने बोलता बोलता तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या . त्यात अतिउत्साहात चुकून तिच्या वडिलांचा उल्लेख आला आणि ती प्रचंड खुश झाली .

" माझे वडील जयेश ? मला सांग न त्यांच्याबद्दल.  प्लिज जयेश ." 

जयेशने बघितले , लाखन कामात होता .  मग त्याने निवांत तिला सगळी हकिकत सांगितली .......

.......

   रावसाहेब म्हणजे लाखनच्या वडिलांनी थोडीफार जमीन आणि काही मालमत्ता रेवतीच्या नावे ठेवली होती . पण बाकी जमिनीचे कागदपत्रं , हवेली हे लखनने ताब्यात घेतले होते . रावसाहेबांना रेवतीची खूप काळजी होती . आपला वाया गेलेला मुलगा लाखन तिचा घात करायला मागेपुढे बघणार नाही ह्या विचाराने त्यांनी एक मृत्युपत्र तयार केले . त्यांनी

आपली स्वतःची काही प्रॉपर्टी रेवतीच्या नावे करून दिली .

रेवती चे अपत्य सोळा वर्षाचे होईल तेव्हाच  ही पूर्ण प्रॉपर्टी रेवतीला विकण्याचा अथवा तिच्या अपत्याच्या नावे करण्याचा अधिकार मिळेल . असे त्यांनी त्या मृत्युपत्रात लिहिले होते . 

त्यांनी स्वतः रेवतीचे लग्न कोल्हापुरातील  एका  उमद्या मुलाशी लावून दिले . राजदीप सरंजामे हे एक  मेहनती तरुण  व्यावसायिक होते .  स्वतः अनाथ असल्याने  रेवतीला ते नीट समजावून घेतील असा रावसाहेबांना विश्वास होता . रेवती  ह्या लग्नामुळे अतिशय खुश होती , पण जगासमोर तिच्यावर मोठ्या भावाचे  खोटे प्रेम दाखवणाऱ्या लाखनच्या मनात अत्यंत क्रूर कारस्थान शिजत होतं . 

लग्नाला  चार वर्ष झाली तरी रेवतीला मूल होत नव्हतं . म्हणून त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली . ती म्हणजेच अदिती ! 

लाखन छोट्याश्या अदितीसकट रेवतीला काही दिवसासाठी  माहेरी  घेऊन आला . 

त्यातही लाखनचा दुष्ट हेतू असेल हे तिच्या बिचारीच्या लक्षातच आले नव्हते . 

रस्त्यात गाडीचा भीषण अपघात झाला असं सांगून राजदीप यांना दुसऱ्याच एका महिलेचे आणि मुलीचे छिन्नविच्छिन्न शव दाखवले .

बिचाऱ्या राजदीपने उद्वस्थ मनाने  पत्नीचा आणि मुलीचा  समजून त्या बेवारशी शवांचाच अंत्यसंस्कार केला .

       कळस म्हणजे अगदी ह्याच पद्धतीने त्याने रेवतीलाही तिच्या पतीबद्दल असेच खोटेनाटे सांगितले . दोन चार खोटे साक्षीदार उभे करून तिच्या पतीचा मृत्यू खरा भासवला .

        आपलं सर्वस्व गमावलेली रेवती पूर्णपणे कोलमडून पडली असतांना तिला जगण्यासाठी एकमेव कारण होतं , तिची मुलगी अदिती . 

   जयेश ने अति आनंदात  हे फार मोठे गुपित अदितीला सांगून टाकले होते . आपल्या आईचे पती ..म्हणजे आपले वडील अजूनही जिवंत आहेत हे समजल्यावर तिला रडू आवरले नाही . जयेशशी गोड गोड बोलून लग्नासाठी तयार होण्याचे कारण सांगून  ती मंदिरामागील एका खोलीत गेली .  तिथून मागच्या खिडकीतून उडी टाकून ती बाहेर पडली . 

********

आपल्या पतीला इतक्या वर्षानंतर पाहून रेवतीच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता . संपत्तीच्या हव्यासापायी लखनने ह्या तिघांची किती क्रूर थट्टा केली होती . जयेश गजाआड असल्याने अदितीच्या मनावरचं प्रचंड मोठं ओझं उतरलं होतं . 

पण एक गोष्ट तिला छळत होती ... फोनवर बोलणं झाल्यानंतर आकाशचा कुठेही पत्ता नव्हता . 

तिने किती कॉल्स केले , पण एकही फोन त्याने उचलला नव्हता .

त्या दिवशी कोल्हापूरवरून आपण आकाशशी बोललो ... मग तो कुठे गेला असेल ?

संदीपला पण काहीच सांगितले नाही ...

आपण आकाशशी नीट नाही वागलो ... ते त्याच्या भल्यासाठीच न?.. जयेश पासून त्याला वाचवायचं म्हणून आपण त्याला दूर लोटलं ... . पण त्याने शेवटपर्यंत आपली साथ सोडली नाही . आईला हॉस्पिटलमधून आणणे , धडपड करणे ..आपलं मन जिकण्यासाठी किती तगमग झाली त्याची....आकाश ? मी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाही रे !  

ह्या विचाराने तिला रात्र रात्र झोप लागली नाही . 

     आकाश त्याच्या ऑफिसमधून काम आटोपून बाहेरच्या खोलीत आला , आणि समोर अदिती ! फिकट गुलाबी रंगाचा रेशमी कुर्ता आणि त्यावर सुरेख ओढणी ! राघवनच्या एक प्रसिद्ध चित्रपटातील नायिकेची वेषभूषा . चेहऱ्यावर खट्याळ भाव . तस्सेच जसे संदीपच्या लग्नात तिच्या चेहऱ्यावर होते . 

"सॉरी राघवन .. आय मिन आकाश "

"......."

" सॉरी म्हटलं न ?"

" अनोळखी लोकांशी मी बोलत नसतो . आणि माझ्यापासून दूर रहा मॅडम ..."

" नाही राहू शकत ! आता अजिबात दूर नाही राहू शकत !"

" का ? ...सांग न ! का ?"

ती एकदम गप्प झाली .

तो तिच्या जवळ सरकला .

तिने अंग चोरले .

त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला हलकेच जवळ ओढले .

ती लाजून मान खाली घालून उभी .

त्याने एका हाताने तिचा चेहरा वर उचलला .

" सांग न . का दूर नाही राहू शकत ? "

" कारण आता मी फक्त तुझीच आहे ." 

" काय म्हणालीस ?" तिच्या आणखी जवळ सरकत त्याने विचारले .

" आय लव्ह यु "

" ऐकायला नाही आलं ."  खट्याळ हसत त्याने पुन्हा म्हटलं . तसं त्याच्या क्षणात ती जोरात ओरडली

"आय लव्ह यु स्टुपिड !!!" 

आणि त्याने आनंदाने तिला मिठीत घेतले ...म्हणाला 

" किती शहाणं झालं रे बाबा!" 

(समाप्त)

✍️ अपर्णा देशपांडे

वरील कथा अपर्णा देशपांडे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा लेखिकेच्या परवानगीने आम्ही शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

ही कथा वाचून पहा.

👇

देवाजीच्या मना









 

      

Post a Comment (0)
Previous Post Next Post