नाती गोती

      नाती गोती  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ शोभा वागळे 

रिडेव्हलपमेंटची तयारी पुढच्या महिन्यात सुरू होणार म्हणून  बिल्डर ने दिलेल्या ईमारतीत आम्ही रहायला आलो. सामान नीट लावे पर्यंत शेजारी पाजारी बघितलेच नव्हते. तरी आम्ही आलो त्या संध्याकाळी एक आजी येऊन आमची विचारपूस करून व "काही लागलं तर मी आहे हं" असं सांगून गेल्या. दोन दिवस मला जरा ही उसंत नव्हती. आमचे हे ऑफिसला व मुले शाळेत. मी एकटीच घर लावत होते. दोन दिवस आम्ही बाहेरचेच खात होतो. मुलं ही खुश होती हॉटेलच्या खाण्यावर.

दोन दिवसानंतर मला जरा वेळ मिळाल्यवर त्या आजीची आठवण आली. त्यांनी आपला फोन नंबर दिला होता तो मी पर्समध्ये ठेवला होता. म्हटलं बघुया, एवढ्या आस्थेने विचारत होत्या तर ओळख वाढवावी म्हणून मी फोन लावला.
"हॅलो मंगला आजी कां? मी शरयू, नवीन शेजारी"
"अहो थांबा. मी आजींना देतो हं" असे म्हणून त्यांनी "मंगल, ऐ मंगल, शरयूचा तुला फोन आहे. घे लवकर" असे म्हणून आजींना आवाज दिला. आतून "आले आले" असा आवाज  आला.
"हं शरयू, बोल.  मी मंगला बोलते. झालं का तुझं घर लावून?"
"हो आजी. त्या दिवशी मी कामात होते. आता तुमच्याशी बोलावं म्हणून फोन लावला. आजी वेळ असेल तर याल का थोडावेळ?'"
"हं. थोड्या वेळाने येते हो"
"बरं. या हं, मी वाट पाहते."असे म्हणून मी फोन ठेवला.

नवीन ठिकाणी गेल्यावर आपण ओळखी वाढवल्या तर आपला खूप फायदा होतो. ब्लॉकमध्ये राहणारी माणसे एकलकोंडी असतात असं म्हटलं जातं. त्या मानाने चाळीत बरं असतं. नवीन कोणी आले तर चाळभर गाजावाजा होतो. तसेच चाळीतल्या लोकांना ओळख करून द्यायला आणि घ्यायलाही आवडत असतं.

थोड्या वेळाने मंगला आजी आल्या. येताना चार बेसनाचे लाडू व चिवडा घेऊन आल्या आणि मला आग्रह करून खायला लावला. मला माझ्या आईची आठवण आली. मंगला आजीच्या लाडवांची चव अगदी माझ्या आईच्या हातच्या लाडवांसारखीच होती. मी आजींना बोलून ही दाखवले. त्या खूप आनंदित झाल्या.

नंतर मी माझ्या व माझ्या कुटुंबाबद्दल त्यांना सांगितले व त्यांचीही माहिती जाणून घेतली. मंगला आजी व त्यांचे पती माझ्या समोरच्याच ब्लॉकमध्ये राहत होते. त्यांना दोन मुले होती, एक मुलगा व एक मुलगी. मुलगा न्यूयॉर्कला व मुलगी  कॅनडाला. दोन्ही मुलांची दोन दोन अशी मिळून चार नातवंडे होती.

मुलं त्यांना त्यांच्या घरी बोलावत असत पण त्यांच्या मिस्टरांना परदेशात आवडत नाही म्हणून त्या इथे राहत. दोघेही सरकारी नोकरी करत होते. आता त्यांच्या पेन्शनवर सगळे ठीक चालत होते. मुलगा मुलगी आपल्या संसारात परदेशात रमली होती. भारतात त्यांचं येणं आता तसं कमीच झालं होतं.

नातवंडे लहान होती तेव्हा आजी आजोबा तिथे जाऊन रहात होती. पण आता ती मोठी झाली आणि प्रत्येक जण आप आपल्या कामात मग्न असल्याने आजोबांना तिथे बंदिस्त असल्यासारखे वाटायचे. स्वतः एकटं कुठे जाता येत नव्हतं. मोटारगाडी शिवाय पान हलत नव्हतं. आपल्या देशात स्वछंदी पक्ष्यासारखे फिरता येतं. आजूबाजूला आपले लोक, आपली माणसे असतात. एकमेकांकडे येणे जाणे असते, गप्पा टप्पा होतात. वेळ घालवायला अनेक साधने असतात. म्हणून ते दोघे भारतात येऊन राहिले.

थोड्या वेळाने मंगला आजी आपल्या घरी गेल्या. माझ्या मनात मात्र एक गोष्ट खटकली. त्यांची दोन्ही मुले हल्ली भारतात येत नव्हती. कसं होईल ह्या आजोबा नि आजीचे. वय वाढत आहे. शरीर कधी दगा देईल सांगता येत नाही. पोटची मायेची मुले असून जवळ नाहीत. मनात विचार आला, माझ्या आई बाबांची पण हीच गत झाली असती जर मी परदेशी स्थळास होकार दिला असता तर! तसा माझा भाऊ सुरेश ही अमेरिकेत शिक्षणाकरता गेला होता. त्याला तिथेही चांगली नोकरी मिळत होती. पण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशातच करावा ह्या हट्टापायी तो भारतात आला. सायन्स अँड टेक्नॉंलॉजीच्या क्षेत्रात असल्याने त्याला वेळ मिळत नव्हता. तरी माझी वहिनी व भाचे आईबाबांबरोबर असल्याने त्यांचा छान वेळ जात होता. मी ही मुंबईत असल्याने महिन्यातून एक दोन वेळा दादरला जाऊन येत होते. माझी वहिनी नि आईचे चांगले सुत जमले होते. मला तर ती माझी वहिनी नसून मैत्रीणच वाटते. सासू सूनेचे भांडण तंटे नसले की घर एका नंदनवना सारखेच भासते.

मला सासू सासरे कुणीच नाहीत कारण मी एका अनाथ मुलाशी लग्न केले. नोकरी करताना प्रेम जमले. प्रेम हे निव्वळ प्रेम असते. चांगला होतकरू आणि सुशील स्वभावाच्या विजयने माझ्या आईबाबांचेही मन जिंकले होते. आता आमच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली. आमचा संसार सुखाचा चाललाय. उणे दुणे काढायला नातलग नसल्याने थोड्या फार कुरबुरी असल्या तरी टोकाची भांडणे होत नाहीत.

संध्याकाळी विजयला मी मंगला आजी बद्दल सांगितले. त्यालाही आजीबद्दल आदर वाटला.
"उद्या रविवार आहे आपण सगळे मंगला आजी नि आजोबांना भेटायला जाऊया का?"
"हो जाऊया. आजोबांशी पण ओळख करून घेऊ"

ठरल्याप्रमाणे रविवारच्या संध्याकाळी आम्ही आजीच्या ब्लॉकची बेल वाजवली. आजोबांनीच दार उघडले.
"कोण पाहिजे?"
"आम्ही आपले नवीन शेजारी, सबनीस."
"असं होय, या या. मंगला, तुझी लेक आली गं सह कुटुंब!"
आजी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. ओला हात पदराला पुसतच त्या बाहेर आल्या. आम्ही सर्वांनी आजी आजोबांचे चरण स्पर्शून वंदन केले. आजी आजोबांचे डोळे अश्रूने डबडबले. आजीकडे जायचे म्हणून विजयने ताजी फळे व बिस्किटस आणलेली पिशवी आजीला दिली. मंगला आजीने ही आपल्या नातवंडाना मायेने जवळ घेऊन कुरवाळले. त्या मायेच्या स्पर्शाची ऊब माझ्या मुलांनाही जाणवली. अजय व स्मिताच्या चेहऱ्यावरून ते आम्ही उभयतांनी जाणले.

तसे आम्ही त्यांना अनोळखीच होतो, पण काही क्षणांच्या सहवासानेच त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी व जिव्हाळा वाटू लागला की मुले खरोखरच आपल्या आजी आजोबांकडे आल्यासारखे वाटू लागले. आजोबा आतून खेळणी व पुस्तके आणून अजय व स्मिताला देत होते तर आजी एक एक डबा उघडून खाऊ मुलांसमोर ठेवत होत्या. दोघांच्या उत्साहाला ऊत आला होता. काय करू व काय नको असे त्यांना झाले होते. आपल्या दोन्ही नातवंडांचे प्रेम ती दोघं आमच्या मुलांवर ओतत होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखाच होता. सुख म्हणजे काय असतं ह्याची अनुभूती मला व विजयला त्या दिवशी आली.

आजीचे व माझे काय बोलणे झाले होते ते मी विजयलाही  सांगितले होते. स्वतः पोरका असल्यामुळे त्यांच्याबद्दल विजयला ही सहानभूती वाटणे सहाजिक होतेच. अर्ध्या तासात येऊ म्हणून गेलो होतो तिथे दोन तीन तास आजीकडे कसे गेले कळलेच नाही. अजय व स्मितालाही आजीकडे खूप आवडले. एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि सुख लाभले होते.

रात्री झोपण्यापुर्वी मी माझ्या आईला फोन लावून मंगला आजी बद्दल सगळे सांगितले. विजय, अजय आणि स्मिता ह्यांना झालेला आनंद सांगितल्यावर आई म्हणाली, "छान केलं हं. मैत्री वाढव त्यांच्याशी. वयस्कर माणसे मायेची भुकेली असतात. तू मानलेली मुलगी हो त्यांची."
आईचे हे शब्द ऐकून मलाही खूप आनंद झाला. 

असेच दिवस भरभर चालले होते. ऑफिसला जाताना न चुकता विजय आजी आजोबांची विचारपूस करून जात असे. बाहेरच्या वस्तू काही आणायच्या तर त्यांना आणून देत असे. आजोबा त्याला नको नको म्हणत, तरी विजय ऐकत नव्हता. कधी कधी स्वतःच्या मर्जीने काही वस्तू आणून द्यायचा. आजोबा त्याला पैसे द्यायच्या मागे असत, तर विजय त्यांना "बाबा, मला मुलगा मानता ना, मग मला पैसे देणं बरं दिसतं का?" असं म्हणून त्यांना थांबवायचा.
विजय अनाथ असल्याचे कळल्यावर मंगला आजी नि आजोबा विजयला आपला मुलगाच मानत असत. कधी आजी आजोबा आमच्याकडे जेवायला यायचे तर कधी रविवारी आम्ही त्यांच्याकडे जायचो. आजीच्या हातचं माशांचं कालवण विजय व अजयला भारी प्रीय. त्यासाठी रविवारी विजय ताजे मासे आणून आजीला द्यायचा व मुलाच्या आधिकाराने त्याला हवे तसे त्यांच्याकडून करून घ्यायचा.

सोसायटीमधल्या बाकीच्या लोकांना अजब वाटायचे कारण आता आजोबा सर्वांशी प्रेमाने वागत होते. अगोदर ते लोकांशी जास्त मिसळत नव्हते. आमच्याही सोसायटीच्या लोकांशी ओळखी झाल्या. अवघ्या पंधरा दिवसात आमचं नाविण्य जाऊन आम्ही ही त्याच्यातले एक झालो होतो. अजय व स्मितालाही खूप मित्र मैत्रिणी मिळाल्या होत्या.

आमचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण, एक दिवस संध्याकाळच्यावेळी आजोबा फिरायला गेले होते तिथे चक्कर येऊन पडले. बाकीच्या मित्रांनी त्यांना घरी आणले.

त्याचवेळी विजय नेहमी सारखा त्यांच्या घरी डोकावला तेव्हा त्याला आजोबांना चक्कर आल्याचे कळले. त्याने तत्काळ त्यांच्या फेमिली डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टरही लगेच आले. तपासल्यावर त्यांनी हॉस्पिटलमध्ये एडमिट होऊन सगळ्या टेष्ट कराव्या लागतील असे म्हटल्यावर, विजयने मुलाप्रमाणे काळजीने सर्व व्यवस्था केली. रात्रभर तो हॉस्पिटलमध्ये ही राहिला. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर हृदय रोग असल्याचे कळाले. लगेच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. त्यांच्या मुलांना खबर कळवावी म्हणून आम्ही फोन लावले. पण दोघांचा कॉन्टॅक्ट होईना. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करावेच लागणार म्हटल्यावर विजयने सगळा पुढाकार घेतला. त्यांचा मुलगा ह्या नात्याने फॉर्म ही भरला.

एव्हाना मंगला आजीने आपल्या मुलीला फोन लावला. त्यांच्या मुलीने फोन घेतला आणि आपण किती असाह्य आहोत हे सांगितले.
"आई मी तुमच्याकडे येऊ शकत नाही व मदत ही करू शकत नाही. माफ कर मला. मी अविला फोन करून सांगते."
आजींनी त्यांच्या मुलाचा, अविचा, फोन येईल म्हणून बराच वेळ वाट पाहिली, मग त्यांंनीच फोन लावला.
"आई, तुम्ही हट्टाने गेलात भारतात. बाबांचे मित्र आहेतच ना, ते घेतील त्यांची काळजी. मी कशाला येऊ? पैसे हवे तर सांग, पाठवतो."
"बाळा, अशा प्रसंगी तू हवा ना रे!"
"सॉरी आई, आणि मला आता रजा ही मिळणार नाही."

विजयला हे सगळं कळल्यावर त्यांने सगळी जबाबदारी स्वतः घेतली. हॉस्पिटलचे डिपोजिटही भरले. दुसऱ्या  दिवशी ऑपरेशन ही यशस्वी झाले. आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असे डॉक्टरांनी सांगितले. विजयने पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज टाकला आणि सख्या मुलाप्रमाणे आजोबांची काळजी घेतली.

आजोबांना हॉस्पिटलमधून सरळ विजयने आमच्याच घरी आणले. मग मंगला आजींना पण आमच्याचकडे यावे लागले. ये जा करायला त्रास नको व आजीवरही सगळी जबाबदारी टाकणे बरोबर नव्हते. ते आपलेच आईबाबा आहेत असे आम्ही आजी आजोबांशी वागत होतो.

ऑपरेशन होऊन पंधरा दिवस उलटले पण त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा खबर घ्यायला फोन सुद्धा आला नाही. पोटची पोरं इतकी कृतघ्न निपजतात याचे आम्हाला खूपच नवल वाटले. प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना सर्व सुखसोई लाभाव्या म्हणून झटतात, खपतात. स्वतःच्या जिवाचे रान करून मुलांना वाढवतात. त्यांना त्यांच्या पायावर उभे करतात आणि पंख फुटले की ही पाखरे एकदाही मागे वळून पाहत नाहीत. तिरस्काराने माझे व विजयचे मन विटले आणि मनात विचार आला, मंगला आजी नि आजोबांना किती यातना झाल्या असतील!!

आजोबांची तब्बेत हळूहळू सुधारत होती. विजय आता  ऑफिसला जाऊ लागला. तरी आजी आजोबांना आम्ही आमच्याच घरात ठेवले होते. आजी खूप थकली होती तरी जमेल तशी मला मदत करत होती. एक दिवस मला दादरला  आईकडे जावे लागले. मुले शाळेत, हे ऑफीसला. त्या दिवशी आजी आजोबांना तीन- चार तास आमच्या घरात एकटे ठेवावे लागले. मुले यायच्या वेळेला मी घरी आले. घरी आले तेव्हा मंगला आजीनी माझ्याकडे एक डबा दिला.
"हे काय आजी, काय खाऊ केला हा"
"हो, माझा खाऊच आहे. पण आज हा खाऊ तुझ्या कपाटात ठेव"
"कपाटात खाऊ ठेऊ?"
"हो गं बाळ. माझे दागिने आहेत ते. घरात ठेवणे बरोबर नाही म्हणून तुझ्या कपाटात ठेव."
मी ही डबा माझ्या कपाटात ठेवला. संध्याकाळी मुले आली. विजयही ऑफिसमधून आला. रोजच्या प्रमाणे चहा-पाणी, गप्पा-टप्पा झाल्या. रात्री जेवणे वगैरे आटोपली. आता झोपायची तयारी करत होतो एवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेल्या आजी कोसळल्या. पहिल्यांदा वाटले त्यांचा ओला पाय घसरून त्या पडल्या असतील. पण दुर्दैव, आजींनी कायमचे डोळे मिटले होते. डॉक्टरांना बोलावले. त्यांंनी सिव्हीयर हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे हे कारण सांगितले.

आता त्यांच्या मुलांना दुःखद घटना सांगायलाच हवी म्हणून विजय फोन करू लागला तेव्हा आजोबांनी त्याला थांबवले.
"अवि किंवा शिल्पाला फोन करू नकोस. माझ्या आजारपणाचे त्यांनी किती मनावर घेतले? एक महिना झाला, एकदा सुध्दा त्यांचा फोन आला नाही. आता आई मेली म्हणून सांगितले तरी येणार नाहीत. आणि त्यांची मला गरज नाही. तुलाच आम्ही मुलगा मानलाय. तूच सगळी मुलाची कर्तव्ये पार पाड. आजच शरयूकडे तिने एक डबा दिला होता. त्यात दागिने व मंगलाने लिहिलेले पत्र व आमचे कायदेशीर इच्छापत्र आहे".

"आजच दुपारी शरयू दादरला गेली तेव्हा वकिलांना बोलवून सर्व कागदपत्रांची कामे करून घेतली. आम्ही दोन्ही मुलांना त्यांच्या हक्काचे दिले आहे. बाकीचे तुझ्या आणि शरयूच्या नावे केले आहे. आमची सगळी जबाबदारी तुम्हा दोघांवर सोपवलीय. दोन्ही मुलांच्या वागणुकीचा आघात मंगलेला सहन झाला नाही. मला ती समजावत होती पण स्वतः आतल्या आत कुढत होती. तिचे पत्र वाचा, कळेल तुम्हाला. "मन खूप दुखावले हो पोरांनी. असं अनाथ जगणं नको वाटतं. त्रास होतो जीवाला", असं सारखं म्हणायची. तुम्ही देवदुतासारखे अनोखे नाते बंध जोडून आलात आमच्या आयुष्यात. तिच एक जमेची बाजू".

मी आजोबांना सावरले आणि विजयने त्यांच्या मुलांला फोन लावून आजीच्या मृत्यूची खबर सांगितली.
"तुम्ही उरकून घ्या सगळं. मला आता यायला जमणार नाही."
अविच्या बोलण्याने आम्ही हादरलोच, तरी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना फोन लावले आणि दुसऱ्या दिवशी आजीचे अंत्यविधी विजयने केले.

आजीने दिलेला डबा आजोबांनी आजी गेली त्याच दिवशी आम्हाला उघडायला सांगितला. त्यात आजीचे दागिने होते व आजीच्याच हस्ताक्षरातले पत्र.

चि. विजय व शरयू यांस,
अनेक आशीर्वाद.

दोन महिन्या अगोदर आपली ओळख झाली. ध्यानी मनी सुध्दा नव्हते की आपले एवढे नाते जुळेल. पण जुळले. दैवी योगच म्हणावा लागेल. दोन मुलांना शिकवले, सावरले. त्यांच्या करता सगळी कमाई खर्च केली. त्यांना कशाचीच कमतरता भासू दिली नाही. त्यांच्याकडून फक्त प्रेमाची मागणी केली होती. पण ती ही नाही मिळाली. अविचे बाबा थोडे हट्टी स्वभावाचे, पण त्याचा एवढा राग मनात धरावा हे  काही पटत नाही. मला वाटते माझीच चूक झाली असावी. माझ्याकडून संस्कारांची रूजवण झाली नसेल. म्हणून पोटची पोरे अशी निपजली!

विजय, तू स्वतःला अनाथ म्हणतोस, पण तुझे संस्कार बघून वाटत नाही रे. तू माझ्या पोटी का नाही जन्माला आला रे. मुलं असून आम्ही असे अनाथ झालो. देवानेच तुम्हाला आमच्याकडे पाठवले असेल.

आमच्या दोघांच्या संमतीने आम्ही तुला दत्तक पूत्र मानलाय. त्याचे कागदोपत्री सर्व व्यवहार केलेत. आमची जी मालमत्ता आहे त्याचे ही कायदेशीर व्यवहार करून ठेवले आहेत. आमच्या दोन्ही मुलांनाही त्यांचा हिस्सा दिलाय. पुढे काही वाद विवाद होऊ नये म्हणून सर्व तरतूद केली आहे. तुझ्यावर मात्र एक जबाबदारी टाकत आहोत. आमच्या पैकी कुणीही एक गेलं तर राहिलेल्याची काळजी व देखरेख करणे सर्वस्वी तुम्हा दोघांची जबाबदारी असेल.

तुमची खरी आई.
मंगला.

पत्रा सोबत घराची व कपाटाची चावीही होती. आजोबांची सेवा करून व होईल तितके त्यांना आनंदात ठेऊन मंगला आजीचे स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला.

                           ---समाप्त---

( स्व लिखीत कथा )

शोभा वागळे


ही कथा ही वाचून पहा.

मिसींग पेजेस

2 Comments

  1. छान कथा👌

    ReplyDelete
  2. फारच छान कथा. अभिनंदन!!

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post