मिसिंग पेजेस

  मिसिंग पेजेस  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अमृता देशपांडे

‘स्वानंदी, अगं स्वानंदी, जरा पाणी दे गं...' म्हणत अमोलने पायांतले बूट काढून फेकले. गळ्यातला टाय ढिला करत घाम पुसला. 'ए स्वानंदी, अगं कुठे आहेस? एवढं थकून - भागून माणूस घरी येतोय, कुणी पाणीही विचारत नाही इथे...' असंच काहीसं बडबडत बसला. बराच वेळ झाला तरी स्वानंदी बाहेर येत नाही असे पाहून 'ती बाहेर तर गेली नसेल ना' असा विचार अमोलच्या डोक्यात येऊन गेला... 'नाही पण दरवाजा उघडा टाकून? नाही, नाही स्वानंदी असं करणं शक्य नाही' असं मनाशीच पुटपुटत अमोल स्वतःच उठला. किचनमधून फ्रिजमधली पाण्याची बाटली घेत तो बेडरूममध्ये डोकावला. आणि बेडरूमच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या पलंगावर त्याने जे पाहिले, ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली... त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. स्वानंदी पलंगावर रक्ताच्या  थारोळ्यात पडली  होती. तिच्या  डाव्या हाताच्या  मनगटातून रक्ताच्या   धारा  वाहत होत्या.  बाजूच्या टेबलवर एक कागद व्यवस्थित  घडी करून  काचेच्या  ग्लास खाली ठेवला होता.  अमोलने थरथरत्या  हाताने तॊ कागद उचलला,  त्यावरील मजकूर वाचून अमोलचं डोकं सुन्न झालं. 'स्वानंदीने आत्महत्या केली!' त्याला पुढे काय करावे काही सुचेना,  म्हणून त्याने गडबडीत स्वानंदीच्या बहिणीला, आसावरीला फोन केला. आणि लगेच  पोलिसांना बोलावून घेतले. आसावरी ताबडतोब विमानाने पुण्याहून मुम्बईला आली. ती आली तेव्हा स्वानंदीच्या घरी पोलिस पंचनामा करत होते. अमोल एका कोप-यात जमिनीवर डोक्याला हात लावून बसला होता. त्याला बघताच तिच्या मनातील राग उफाळून आला, 'हे सगळं काय आहे अमोल?  तू असं वागशील असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं.  इतका त्रास दिलास  तिला, शेवटी जीवच घेतलास की रे माझ्या बहिणीचा......' आसावरी' हे बघा आसावरीताई, मी असं काहीही केलेलं नाहीये, गेले दहा दिवस मी तर घरी देखील नव्हतो. ऑफिसच्या टूरवर बंगलोरला गेलो होतो...' अमोल' हेच...  हेच ते, ऑफिसच्या कामाचे खोटे कारण सांगून मैत्रिणींसोबत हॉटेलिंग करणे,  तुला काय वाटलं हे सगळं स्वानंदीला कळणार नाही. तुझ्या या अशाच वागण्यामुळे सतत डिप्रेशनमध्ये असायची  ती बिचारी.. तिच्या फोनवरील बोलण्यावरून जाणवायचे ना मला....’ आसावरी गळ्यातील आवंढा गिळत म्हणाली.'एक्सक्युज मी, मिसेस आसावरी राजाध्यक्ष, तुमच्या बहिणीने आत्महत्या केलेली आहे, म्हणजे प्रथमदर्शनी तपासावरून तरी तसंच दिसतंय... शिवाय त्यांनी सुसाईड नोटही लिहलीये. पण त्या नोटवरून आत्महत्येचे नेमके कारण काही समजत नाहीये, म्हणजे माझ्या आत्महत्येला माझी मीच जबाबदार आहे असं त्यांनी त्यात लिहलंय. यावर तुम्ही काही सांगू शकाल का?' इन्स्पेक्टर जाधव


‘शक्यच नाही! इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगते, माझी बहिण आत्महत्या करूच शकत नाही. या अमोलचं म्हणजेच स्वानंदीच्या नव-याचं बाहेर एक अफेअर सुरू आहे. हे कळल्यापासून स्वानंदीने अमोलला डिवोर्स देऊन एका सामाजिक संस्थेत पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याची इच्छा माझ्याकडे बोलून दाखवली होती. आपलं आयुष्य हे केवळ आपलं नसून आपण या समाजाचंही काही देणं लागतो यावर तिचा ठाम विश्वास होता. असं असताना ती अचानक आत्महत्येचा निर्णय कसा घेईल? तिच्या मृत्यूत नक्कीच या नीच माणसाचा हात आहे, आणि यासाठी मी याच्या विरूद्ध कायदेशीर तक्रारसुद्धा नोंदवायला तयार आहे... ’आसावरी


' हे बघा आसावरीताई...'  अमोल


'मॅडम, तुम्हाला यांच्याविरूद्ध तक्रार करायची असेल तर तशी रितसर पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवावी लागेल.  आणि मिस्टर अमोल, तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल.  मी बॉडी पोस्टमार्टमला पाठवतोय. उद्या संध्याकाळपर्यंत सर्व प्रोसिजर झाल्यावर बॉडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल...' इ. जाधवपोलिस बेडरूममध्ये तपासणी करत होते. पण आसावरीची नजर काहीतरी शोधत होती. स्वानंदीला रोजनिशी लिहण्याची सवय होती, हे तिला चांगलेच माहित होते. तिच्या रोजनिशीमधून नक्कीच काहीतरी  हाती लागेल याची तिला खात्री वाटत होती.आणि स्वानंदीच्या कपाटात एका कोपऱ्यात तिला स्वानंदीच्या दोन डायऱ्या  सापडल्या. त्या तिने पोलिसांच्या नकळत आपल्या पर्समध्ये टाकल्या आणि ती तिथून निघाली.


.................................................


दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने स्वानंदीची पहिली रोजनिशी वाचायला सुरूवात केली. पहिल्या रोजनिशीत तिला फारसे काही आक्षेपार्ह सापडले नाही, कारण लग्नानंतरच्या पहिल्या वर्षातील काही प्रसंग त्यात वर्णन केलेले होते.  आणि  लग्नानंतरचं पहिलं वर्ष सगळ्यांचंच साधारपणे आनंदातच जात असतं, तसंच ते सगळं दिसत होतं. त्यामुळे पहिली रोजनिशी वाचायला आसावरीला फार काही वेळ लागला नाही. दुसऱ्या रोजनिशीला ती हात लावणार एवढ्यात तिचा फोन वाजला. फोन इन्स्पेक्टर जाधवांचाच होता. स्वानंदीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला असून त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी तिला पोलिस स्टेशनला बोलावून घेतले होते.पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टनुसार खूपच  धक्कादायक गोष्टी बाहेर आल्यात. स्वानंदीच्या शरीरावर ठिकठिकाणी चाबकाच्या फटक्यांचे व्रण होते, कुठे-कुठे चटके दिल्याच्या खुणा होत्या. शिवाय तिला मृत्यूपूर्वी गुंगीचे औषधही दिल्या गेल्याचे दिसत होते. त्याचप्रमाणे पोलिसांच्या तपासात असेही निदर्शनास आले की स्वानंदी कित्येक महिने मानसोपचातज्ञांकडे उपचार घेत होती, डिप्रेशनसाठी गोळ्या घेत होती. यासगळ्यावरून तर हेच निष्पन्न  होत होते की अमोल तिचा  शारीरिक आणि मानसिक छळ करत होता.परंतु इन्स्पेक्टर जाधवांनी सांगितले कि अमोल मात्र कुठल्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायला तयार नाही. हे सगळे समजल्यामुळे आसावरीचे डोके सुन्न झाले.घरी येऊन तिने ताबडतोब स्वानंदीची दुसरी रोजनिशी वाचायला घेतली. डायरीचे पान उघडणार, इतक्यात डायरीतून एक कागद खाली पडला. असावरी तो उचलून वाचू लागली, तो एका सामाजिक संस्थेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून रुजू होण्यासाठीचा फॉर्म होता. तो फॉर्म बघताच आसावरीला पक्की खात्री झाली की आपल्या बहिणीने आत्महत्या केलेली नाही. ती डायरी वाचू लागली... हळूहळू अमोलच्या स्वभावातले गुणदोष, त्या दोघांत उडत असलेले खटके याचं सविस्तर वर्णन स्वानंदीने या रोजनिशीत केले होते. त्यात तिने हेही नमूद केले होते की हळूहळू अमोलचे तिच्यातील स्वारस्य कमी होतेय हे तिला जाणवायला लागले होते. पुढे स्वानंदी स्वतःलाच दुषणे देत होती. आपण स्वतःच आपल्या नवऱ्याला सुख देण्यात कुठे कमी पडत आहोत असे तिने रोजनिशीत लिहून ठेवले होते. आपल्या साध्या - भोळ्या आणि हळव्या स्वभावाच्या बहिणीला किती मानसिक त्रास होत होता हे वाचून आसावरीला गलबलून आले. ती पुढे वाचू लागली, मग स्वानंदी आपले मन सामाजिक कार्यात गुंतवू लागली.  तिने लिहिले, की तिला त्यात खूप आनंद मिळत असे. पण अमोलला मात्र तिचे समाजकार्य, तळागाळातील लोकांशी बोलणे-चालणे पसंत पडत नसे, त्यामुळे स्वानंदीला मनाच्या एका कोपऱ्यात आपला जोडीदार आपल्यापासून दुरावल्याचे दुःख  सतावत होतेच...त्यातच एके दिवशी, स्वानंदी अमोलसोबत त्याच्या ऑफिसच्या एका पार्टीला गेली असताना तिला सगळ्यात पहिल्यांदा 'सई' दिसली. साधारण पंचविशीतली ती तरूणी खूपच सुंदर, आकर्षक आणि चेहऱ्यावर विलक्षण तजेला असलेली होती. तिला बघून आपल्याला क्षणभर  तिचा हेवाच वाटल्याचे स्वानंदीने लिहिले होते. सईचे अमोलसोबतचे सहज वागणे, बोलण्यातला मोकळेपणा, अमोलचे तिच्यासोबत कमरेवर हात ठेवून नाचणे या सगळ्यामुळे त्या दोघांतली जवळीक स्वानंदीला स्पष्टपणे जाणवली. अमोल तर जणू हे विसरूनच गेला होता, की त्याने आज स्वानंदीला-आपल्या बायकोला सोबत आणलेय. हद्द तर तेव्हा पार झाली, जेव्हा अमोलच्या एक-दोन सहकार्यांनी असे म्हटले, की अमोलचा जोडा स्वानंदीपेक्षा सईसोबतच अधिक शोभून दिसतो.' हे वाक्य स्वानंदीच्या जिव्हारी  लागले. तिने घरी येऊन आरश्यामध्ये स्वतः कडे बघितले,आपले खोल गेलेले डोळे, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे, निस्तेज चेहरा  हे सर्व बघितल्यावर क्षणभर तिने सईचा चेहरा डोळ्यांसमोर आणला, टप्पोरे डोळे, काळे लांबसडक केस, चेहऱ्यावरचे तेज हे सगळे आठवून तिला खूप खूप रडू आले. त्या दिवशीची डायरी तिने रडत-रडतच लिहल्याचे आसावरीला लक्षात आले, कारण त्या पानांवरही तिच्या अश्रूंचे डाग अजूनही दिसत होते...यापुढची डायरीतील पानऺ गहाळ होती, म्हणजे ती पानऺ तिथून व्यवस्थित फाडून टाकलेली आसावरीच्या लक्षात आली. 'यापुढची पानऺ कुठे गेली असतील? अमोलने फाडून टाकली असतील? कुठे लपवून ठेवली असतील?...' आसावरी विचार करू लागली, ती पुढची पानं केसच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची होती. 'काहीही झालं तरी ही फाडलेली पानं सापडायला हवीत, असा मनात पक्का विचार करून आसावरी घराबाहेर पडली.आता स्वानंदीच्या घरात जाणं तितकंसं सोपं नव्हतं, कारण तो बंगला पोलिसांनी सील केला होता. कंपाऊंड वॉलवरून उडी मारूनच आसावरी आत शिरली. बंगल्याचा मुख्य दरवाजा आणि मागील दरवाजा सोडून इतर कुठून बंगल्यात प्रवेश करता येतो का, हे बघत असतानाच ती बंगल्याच्या मागील बाजूस आली. तिथे एका भिंतीवर खूप साऱ्या झाडाच्या फांद्यांनी एकीकडची भिंत झाकून गेली होती. आसावरीला तर ती मुद्दाम झाकून ठेवल्यासारखी वाटत होती. तिने मोठ्या मुश्कीलीने तेथील फांद्यांचा कचरा बाजूला सारला. तिला तिथे एक कमी उंचीचे सागवानी दार दिसले, जे एका भल्यामोठ्या लोखंडी कुलूपाने बंद केले होते. 


.................................................आसावरीने चाबीवाल्याच्या मदतीने ते उघडले, आणि ती आंत शिरली. ती एक दहा बाय दहाची छोटीशी अंधारी खोली होती. खोलीमधील अस्ताव्यस्त सामान आणि धुळीची पुटं पाहून ती अडगळीची खोली असल्याचे स्पष्ट जाणवत होते. खोलीला एकही खिडकी नसल्याने दिवसाढवळ्याही खोलीत उजेड नव्हता. आसावरीने तिच्या फोनची बॕटरी ऑन केली...


खोलीच्या विरूद्ध दिशेला एक दरवाजा दिसत होता, जो बाहेरच्या बाजूने लॉक होता. एका कोपऱ्यात एक खुर्ची, त्यावर एक जाडजूड चाबूक पडलेला दिसत होता. आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसत होते. त्याच्या बाजूला  लोखंडी सळया पडलेल्या दिसत होत्या. 'अमोल स्वानंदीला या लोखंडी सळयांनी चटके देत असेल का, या चाबकाने मारत असेल?' तिच्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली. ती त्या लोखंडी सळयांना हात लावणारच होती, की तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. 'यावर नक्कीच अमोलच्या हातांचे ठसे असतील...' तिने लगेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. आता अमोल चांगलाच अडकणार या विचाराने ती खूश झाली. पण डायरीतील त्या फाडलेल्या पानांचे कोडे मात्र अजून कायम होते...


पोलिस आल्यावर आसावरीने संपूर्ण खोली पोलिसांना दाखवली आणि स्वानंदीच्या त्या दोन डाय-याही पोलिसांना दाखवल्या. त्याचबरोबर ती फाडलेली पानऺ शोधण्यासाठी तिने स्वानंदीच्या घराची झडती घेण्याची परवानगी मिळवली. परंतु स्वानंदीच्या घरातील कोपरान् कोपरा तपासला तरी ती पानऺ काही सापडली नाहीत. तरीदेखील आसावरी निराश झाली नव्हती, त्या खोलीतील वस्तूंवरील फिंगरप्रिंटसवरून काहीतरी धागेदोरे हाती लागण्याची तिला दाट शक्यता वाटत होती.साधारण दोन-तीन दिवसांनंतर फिंगरप्रिंटस रिपोर्ट आलेत. ते रिपोर्ट्स पाहून आसावरी आणि पोलीस बुचकळ्यातच पडले. कारण त्या रिपोर्ट्सनुसार त्या खोलीतील खूर्ची, चाबूक, लोखंडी सळया या सगळ्या वस्तूंवर अमोलच्या बोटांचे ठसे नव्हते. तर ते नेमके कोणाच्या बोटांचे ठसे आहेत हे लक्षात येईना... परंतु यातून एक गोष्ट तर नक्की होत होती, की स्वानंदीचा कुणीतरी शारिरीक आणि मानसिक छ्ळ करत होते. आणि म्हणूनच आसावरीची शंका खात्रीत बदलली. आता आपल्या बहिणीचा मारेकरी कोण हे कळल्याशिवाय माघार घ्यायची नाहे, असा निश्चय तिच्या मनाने केला. त्यासाठी अजून काही दिवस मुम्बईतच राहण्याचे तिने निश्चित केले. 


एकूण सर्व घटनाक्रमांचा विचार करता-करता तिला अचानक रखमा आठवली,जिने स्वानंदीच्या घरचे काम तिची हत्या व्हायच्या एक महिना अगोदरच बंद केले होते. तिच्याकडून काही माहिती मिळते का? या उद्देशाने आसावरीने तिची शोधमोहिम सुरू केली. शेजा-या-पाजा-यांकडून माहिती घेत तिचे घर गाठले. 


‘म्याडम, मी जे ऐकलऺ ते खरं हाय का? सावनंदीताईनं खुदखुश्यी केली म्हनं...' रखमा.


'आत्महत्या नाही हत्या!' आसावरी खिन्नपणे उत्तरली.


'हत्या? अवो काय बोलता ताई?... पर त्याईची कोणासंगं दुस्मनी असंन?   चांगल्या होत्या वं सावनंदीताई... गरीबाले लई मदत कराच्या... पर आंतून लई दु:खी व्हत्या... देव पन चांगल्या मान्साच्या बाबतीतच असं कायले करते काय म्हाईत...' रखमा कळकळीने म्हणत होती.

 

'रखमा, मला सांग, स्वानऺदीच्या घरी सुरवातीपासून तूच काम करत होती ना?’ आसावरी  


'व्हय' रखमा


'मग अचानक असं काम का सोडलंस?' आसावरी  


'तसं कायबी कारन नव्हतं जी, पर त्या सई म्याडम...' 


'सई मॅडम? कोण सई मॅडम?' आसावरी


'त्या कोन ते तर मले ठाव न्हाई जी... पर त्या सावनंदीताईला भेटायला लई येळा यायच्या. पन तुमाले खरं सांगू का म्याडम, त्या सई म्याडम काई चांगल्या मानूस नव्हत्या. त्या सावनंदीताईला लई वाईटसाईट बोलायच्या, आन त्या येकदा येऊन गेल्या ना म्याडम. का मंग सावनऺदीताई लईच लडायच्या...'


'अच्छा? बरं... आणि तू ते काम सोडून देण्याचं काय सांगत होतीस?' आसावरी  


 'राहू द्या जी म्याडम, आता त्या गोष्टी बोलून काय उपयोग! रखमा चाचरत बोलली. 


'नाही-नाही रखमा, मला सगळ्या गोष्टी कळायला हव्यात. माझी बहिण आत्महत्या करणा-यातली नव्हती गं रखमा... आणि तिच्या हत्येमागील खरा सूत्रधार कोण हे शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.  त्यामुळे तू अजिबात न घाबरता मला त्या सईबद्दल सगळ्या गोष्टी सांग, प्लीज!' आसावरी


'आता काय सांगू म्याडम, आजपर्यंत मी इतक्या घरात धुनीभांडीची कामं केली, कधी कोनाच्या घरातल्या किमती वस्तू, पैश्यांना हात लावला न्हाई, आनी आजपर्यंत कोनी माझ्या पारमानिकपनावर शक बी घेतला न्हाई... पर त्या बाईनं घेतला. निसता घेतला न्हाई त मी काम करत असताना गपचूप माझ्या पिसवीत सवताचं सोन्याचं कडं ठिवून मला चोर ठरविलं. देवाशपथ्थ म्याडम! मी काय बी केलं नाय. पर त्या बाईनं चोरीचा आळ घेऊन मला लई तरास दिला. त्यामुळच मी ते घर सोडलं. खरं सांगते म्याडम, सावनंदीताईवर माझा कदीच राग नव्हता. पर ती बाई सावनंदीताईवर जबरदस्ती करून तिला हवं तसं करून घ्याची...' रखमा


'असं आहे तर... ठीक आहे रखमा, फारच कामाची माहिती दिलीस तू... आता तू येऊ शकतेस. परत गरज लागलीच तर तुला बोलावून घेईन' आसावरी. रखमा गेल्यावर आसावरीला आठवले, की अमोलच्या ऑफिसमधली आणि त्याच्याबरोबर पार्टीत नाचणारी मुलगीदेखील सईच होती. फक्त आता स्वानंदीकडे येऊन तिला त्रास देणारी सई हिच का याची खात्री करून घेणे गरजेचे होते.


------------------------------------------------------------------------------------------

आता आसावरीसमोर खरे आव्हान होते. अमोलच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर तिला समजले की त्या ऑफिसमध्ये अमोल-सईच्या अफेअरची बरीच चर्चा होती. अमोलच्या कलिग्जनी सांगितले की, अमोल आणि सई कायम एकमेकांच्या सोबतच असायचे. इतकेच नव्हे तर, अमोलला कम्पनीच्या कामानिमित्त कुठे परगावी जायचे असल्यास तो कायम सईलाच आपल्यासोबत नेत असे. यासगळ्यावरून त्यांच्यातल्या अनैतिक सऺबंधाची कल्पना आसावरीला आलीच होती.


पोलीसांना विनंती करून आसावरीने सईला चौकशीसाठी पोलिसस्टेशनला बोलावले. आणि तिथेच तिने रखमालाही बोलावून घेतले. पोलिसांनी अमोललाही तिथे आणले.


सर्वप्रथम सईने तिच्यात आणि अमोलमध्ये असलेले अनैतिक संबंधच नाकारले. परंतु आसावरी मात्र चांगलाच अभ्यास करून आली होती. आसावरीने अमोलच्याच एका कलिगला हाताशी धरून भरपूर पुरावे गोळा केले होते. सईच्या राहत्या घराचे ईएमआय अमोलच भरत असल्याचा पुरावा, त्याचप्रमाणे उटी-शिमला, दार्जिलिंगला ऑफिसच्या कामानिमित्त केलेल्या सहली आणि तेथील हॉटेलमध्ये एकच रूम शेअर केल्याचे बील सादर केल्यानंतर सईची बोलतीच बंद झाली. रखमानेही स्वानंदीच्या घरी येऊन तिला त्रास देणारी सई हिच असल्याचे सांगितले.


पोलिसी हिसका दाखवल्याबरोबर सई पोपटाप्रमाणे बोलायला लागली... 'ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून मला अमोल आवडला होता. शिवाय त्याचे कंपनीतले पद, पगार यासगळ्यानी माझ्या मनावर भुरळ घातली होती. परंतु अमोल विवाहीत होता. तरीही मी त्याच्याशी मैत्री करून जवळीक साधली. त्याच्याशी गोड-गोड बोलून त्याचा विश्वास संपादित करून त्याच्या मनातलं काढून घेण्यात मी यशस्वी झाले. आता मला हे समजले होते की अमोल त्याच्या बायकोसोबत खूश नाही. मग मी माझ्या प्रेमाचे जाळे त्याच्यावर टाकले,


'खूप दिवस एकत्र मौजमजा केल्यानंतर आता मला अमोलला कायमस्वरूपी आपले बनवायचे होते. आणि त्यासाठी माझ्या रस्त्यातील सर्वात मोठा काटा होती त्याची बायको 'स्वानंदी'. माझा स्वत:चा सायकॉलॉजीचा अभ्यास असल्याने मला माणसाचा स्वभाव चांगल्या पद्धतीने ओळखता येतो. त्या दिवशी पार्टीत तिला बघितल्याक्षणीच मला समजले होते की स्वानंदीमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. तिच्याशी मैत्री करून मी हे काढून घेतले की स्वानंदी डिप्रेशनची पेशंट आहे. त्याचाच उपयोग मी तिचे मानसिक खच्चीकरण करण्यात करून घेतला. ती कशी अमोलची जोडिदार होण्यास पात्र नाहिये आणि तिच्यामुळेच अमोल दु:खी आहे हे मी तिच्या मनावर बिंबवले. मला काहीही करून तिला अमोलच्या आयुष्यातून काढून टाकायचे होते. मी तिला अमोलपासून घटस्फोट घेण्याविषयी सुचवले, तुझ्यामुळे अमोलचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होत आहे आणि अमोलसाठी मीच कशी योग्य जोडीदार आहे हे तिच्या मनात ठसवू लागले… 


आणि माझ्या प्रयत्नांना यश आले, स्वानंदी अमोलला घटस्फोट द्यायला तयार झाली. अमोलपासून वेगळी होऊन कुठल्याशा सामाजिक संस्थेत सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यायचे तिने ठरवले होते. ह्हू! स्वता:च्या मनातील नैराश्य झाकण्याचे हे सगळे उपाय आहेत...सगळं माझ्या मनासारखं होत होतं, की अचानक कुठूनतरी तिला माझ्या ख-या बॉयफ्रेंडविषयी समजले,आणि मी पैश्यांसाठी अमोलसोबत करत असलेल्या प्रेमाच्या नाटकाविषयीही समजले. आणि तिने तिचा निर्णय बदलला! तिने मला ठणकावून सांगितले, की ती आता अमोलला घटस्फोट देणार नसून, माझे खरे रूप त्याच्या समोर उघड करेल... आता स्वानंदी आमच्यासाठी खूप मोठा अडथळा बनली होती.


'मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत मिळून हा अडथळा कायमचा संपवायचा प्लॅन आखला... पण मला माझ्यामागे काही पुरावा ठेवायचा नव्हता म्हणून मी रखमावर चोरीचा आळ आणून तिला कामावरून काढून टाकले. स्वानंदीला तिच्याच घरात स्टोअररूममध्ये कैद केले, डिवोर्स पेपरवर तिच्या सह्या घेण्यासाठी तिला मारहाण, चटके दिले. पण ती काही सही द्यायला तयार नव्हती. शेवटी आम्ही तिची हत्या करण्याचे ठरवले. परंतु हत्येला आत्महत्येचे स्वरूप द्यायचा आमचा प्लॅन होता. म्हणून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्या हाताची नस कापली, आणि तिची बॉडी तिच्या बेडवर आणून झोपवली. मी हळूहळू स्वानंदीच्या हस्ताक्षराचा सराव केला होता, त्याचा उपयोग करून ती सुसाईड नोट लिहिली. आणि तिच्या घरातून बाहेर आलो. दोन अडीच तासाने माझ्या लक्षात आले कि माझे ब्रेसलेट स्वानंदीच्या खोलीतच पडले होते. ते घेण्यासाठी आम्ही परत स्वानंदीच्या घरी तिच्या खोलीत गेलो तर स्वानंदीच्या बाजूला तिची डायरी पडलेली दिसली, ज्यावर रक्ताचे डाग दिसत होते. तेव्हा मला समजले, की स्वानंदीला प्रत्येक दिवसातील घटना तपशीलवार लिहायची सवय होती. माझे तिच्याकडे येणे-जाणे, आमच्यातील संभाषण सगळे-सगळे तिने तिच्या डायरीत लिहिले  होते. आणि शेवटच्या दोन पानांवर तिने जे लिहिले होते, ते माझ्यासाठी अत्यंत घातक होते… तिने मनगटातील वाहते रक्त बोटावर घेऊन लिहिले होते, 'अमोल, सई आणि तिच्या मित्रानेच माझा खून केलाय. सई तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही...'  


' याचा अर्थ तुम्ही निघून गेल्यावरही स्वानंदी जिवंत होती, थोडी शुद्धीवर आल्यावर तिने डायरीत आपल्या मारेकर-यांचे नाव तेवढे लिहून ठेवले. दुष्ट मुली, तू पैश्यासाठी माझ्या बहिणीचे आयुष्यच संपवून टाकले??? तुला मी कधीही माफ करणार नाही. कुठे आहे ती शेवटची पानऺ? कुठे लपवून ठेवलेस सांग लवकर...' आसावरी दु: खमिश्रित त्वेषाने ओरडली 


'ताई, ती पानऺ मी जाळून टाकली...' सई खाली मान घालून म्हणाली.


'जाळून टाकलीस! तू ती पानऺ भलेही जाळून टाकलंस गं... पण एवढं करून तू सत्य काही मिटवू शकली नाहीस! सत्य थोड्या दिवसांकरता झाकून ठेवता येत असेल गं सई पण नष्ट कधीच करता येत नाही. ती पानऺ तू डायरीतून फाडलीस, पण डायरीच्या दो-याला त्यातील एका पानाचा चिटोरा मात्र तसाच अडकून राहिला. शिवाय तू पानं फाडताना एक चूक केलीस, तू स्वानंदीने लिहिलेली पानं तेवढी फाडलीस, पुढची कोरी पानं तशीच ठेवलीस, ज्यावर पेज नंबर छापलेले आहेत. त्यावरून ती पानं फाटलेली नसून फाडलेली आहेत हे स्पष्टपणे समजत होते. आणि त्या चुकीमुळेच आज मी सत्यापर्यंत पोहोचू शकली...’ आसावरी पुढे अमोलकडे वळून म्हणाली...


'बघितलंस अमोल, जिने तुझ्यावर निस्वार्थपणे प्रेम केलं, तिला तू झिडकारलंस. आणि जी तुझ्याजवळ केवळ तुझा पैसा, पद पाहून जवळ आली, तिला तू आपलंसं केलंस. अरे माझ्या बहिणीशी तू इतकं वाईट वागलास, तरी तिने कायम, अगदी शेवटच्या क्षणीही तुझाच विचार केला. अरे बायको म्हणजे तुला काय खेळणं वाटली का रे? खेळावंसं वाटलं तोपर्यंत खेळलं आणि कंटाळा आला की टाकून दिलं? आता नियतीचा खेळ तर बघ अमोल, काल तू माझ्या बहिणीशी खेळणं म्हणून खेळलास, आणि आज ही तुझी सई तुला खेळणं म्हणून वापरतेय! तिच्यासाठी तू म्हणजे फक्त एक हौस-मौज भागवणारं खेळणं आहेस! बरोबर नं सई?' आसावरीचं बोलणं ऐकून सईने मान खाली घातली.


'ताई, प्लीज मला माफ करा...' अमोल


'माझी काय माफी मागतोयस अमोल? तिची माफी माग जिला सात जन्म साथ देण्याची वचनं दिली होतीस. पण ती कुठे आहे आता तुला माफ करायला? अमोल, जोडिदाराच्या काही गोष्टी आवडत नसतील ना, तर त्याच्याशी तसं स्पष्टपणे बोलावं, दोघांनी मिळून प्रश्न सोडवावेत. बरं इतकं करूनही जर असं वाटत असेल नं, की आपलं नाहीच जमू शकत? तर सरळ कायदेशीररित्या वेगळं व्हावं. पण आपल्या जोडिदाराला अंधारात ठेवून दुस-या व्यक्तीशी संबंध जोडणं म्हणजे जोडिदारासोबत शुद्ध फसवणूक! ज्याचे परिणाम कधीच चांगले होत नाहीत. मला सांग ना, माझी बहिण तुझी जोडिदार म्हणून चांगली नसेलही कदाचित... पण एक माणूस म्हणूनही तिला जगायचा अधिकार नव्हता का?' आसावरी


'ताई, खरं सांगतो, विश्वास ठेवा, मी स्वानंदीला फसवत होतो हे खरंय... पण मला तिला जीवे मारायचं नव्हतं हो! आणि सई असं काही करेल मला वाटलंसुद्धा नव्हतं...' अमोल


'वाह! स्वत:च्या बायकोला फसवून जिला जवळ केलं, तीसुद्धा तुला पूर्णपणे कळली नाहीच!... इंस्पेक्टर साहेब, घेऊन जा या दोघांना माझ्या डोळ्यांसमोरून. मला यांचं तोंडसुद्धा पहायची इच्छा नाहिये. आता तुम्हा दोघांना कठोरात कठोर शिक्षा कशी मिळेल, याची काळजी मी घेईन...' हे बोलताना आसावरीच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहर्यावर बहिणीचे गुन्हेगार शोधून काढल्याचे समाधान दोन्ही दिसत होते.


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर

ही कथा ही तुम्हाला आवडेल.

कुठला लागलाय मेट्रोला


3 Comments

  1. Khup khup khup khupch chan 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. उत्कंठा आणि suspense अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवलाय... मस्त कथा!!

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post