कुठला लागलाय मेट्रोला

 कुठला लागलाय मेट्रोला   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ वंदना धर्माधिकारी

“आपण आज माझ्या पमा मैत्रिणी कडे जाऊ यात.” रश्मी श्रीला म्हणाली.

“मी, आणि तुझ्या मैत्रिणीकडे? ह्या!! काहीतरीच.  काल तर भेटल्या सगळ्या मैत्रिणी.”  चेहरा असा केला की किती  घाणीत दलदलीत त्याला चालायला सांगितलं.

“ते तुझे मित्र होते, आणि त्यांच्या बायका. माझे कोणीही नाहीत.” रश्मी खट्टू तर झालीच, पण संतापाची लहर जी उठली आत.

“मी येणार नाही. तू म्हणशील तिथे यायला मी काय बावळट आहे. जमणार नाही मला.”

“कां? मी नाही येत तुझ्या मित्रांकडे?”

“यायलाच पाहिजे. तिथे होत्या तिघी बायका. आता त्याच मैत्रिणी समजा.”

“माझ्या मैत्रिणीलाही नवरा आहे, आणि तोही त्याच घरात राहतो. समजलं. मलाही मैत्रिणी आहेत, त्या तुमच्या मित्रांच्या बायका, माझ्या कोणी नाहीत.” रश्मीचा आवाज रडवेला तरी उंचावलेला श्रीला नक्कीच जाणवला. पण त्याला थोडीच पडली होती तिला काय वाटते याची.

“उगीच नवीन काही सुरु करायचे नाही. मला आवडणार नाही. जमणार नाही. समजलं तुला देखील.” श्रीनेही अगदी नको इतके स्पष्ट बोलून घेतले अगदी नेहमीच्या सुरात.

आज रश्मी मात्र वेगळीच दिसत होती. स्त्री लग्न करून आपलं सगळं सगळं मागे ठेवून सासरी येते, तरी या पुरुषांना काहीच कसे वाटतं नाही.

‘विकेंडला एखादा टग्या नाही भेटला तर सोमवार उजाडे पर्यंत चुळबूळ चालू असते याची. मित्राचा विरह दोन दिवसांचा अजिबात सहन होत नाही त्याला. आणि मी......कधी नव्हे म्हंटल तर असे. थांब, आता माघार नाही. मला ना कुठे मोकळं सोडतं ना मी कोणाकडे जायचं म्हणायचं अवकाश तर हे असली थेरं. त्या दिवशी दादाचा फोन आला, होय दादाचं तो माझा. मावस भाऊ असला म्हणून काय झालं, किती एकत्र वाढलोत  आम्ही. तर म्हणे, ‘कुणालाही दादा दादा करायचं आता बंद करा.’ चांगली बघते काय करायचं ते.’

रश्मीचे बोल अगदी खरे होते. आजची लग्न झालेली स्त्री कधीकाळी लहान मुलगी होती. तिच्या अवतीभोवती प्रेमाचे तिचे हक्काचे लाडाचे धागे होते नात्याचे. त्यांनाच दूर करून ती आली म्हणून विसरेल का? किती हळवी आहे ती, कसं झेलत असेल हा दुरावा. तिच्याकडे कोणी आलं तर असा आव आणायचा की सगळे वेडे नालायक तुच्छ आहेत. थोबाड वाकडं करीत एकदोन शब्द फेकायचे आणि सरकवायची चप्पल पायात. महत्वाची कामे असतात यांना? का सहन करायचं बायकांनी असे वागणे त्याचे?

रश्मीने एक दीर्घ श्वास घेतला, नाक डोळे पुसले, एक करडी नजर श्रीवर आपल्या नवऱ्यावर टाकली आणि....एका दमात बोलली, “तुम्ही नक्की येणार नाही. तर ऐका, इथूनपुढे मला गृहीत धरायचे नाही. मी देखील तुम्ही म्हणाल तसं ऐकणार नाही.”

आजचा रश्मीचा पवित्र वेगळा होता. श्रीच्या मित्रांकडे किमान आठदहा वेळा जाऊन तासंतास घालवलेल, खरे तर तिच्या दृष्टीने वाया गेलेले तास तिला आठवले. त्या असतील चांगल्या बायका, गप्पाही मारल्या त्यांच्याशी. रश्मी लहान होती कोणे एके काळी. तिलाही मैत्रिणी होत्या खूप खूप. अगदी जिवाभावाच्या, मग नाही का वाटणार मैत्रिणीकडे जावे? पण, श्रीचे वागणे हे असे, आपलंच घोडं दामटायचं. बायकोला भावना असतात हा त्याच्या दृष्टीने विनोद होता. म्हणा, त्याला तरी कितपत होत्या कोण जाणे? एकच मी पणाची भावना अगदी लखलखीत चंदेरी होती.

तिच्या मैत्रिणीकडे जायचे तर घरात संताप, तमाशा, आरडाओरडा नेहमीचेच होते. मॉडर्न घरात असा कोंडमारा अनेकींना भोगावा लागतो. बायकोला गृहीत धरायचे आणि आपल्या करंगळीवर नाचवायचे. थोडा पाय नाचताना इकडं तिकडं झाला की बसलीच चपराक. तिच्या भावनांचा अगदी चोथा चोथा करताना शरम कशी वाटतं नाही यांना? ती बिचारी.

‘इथून पुढे नव्हे,’ तिने ठरवलं हे बिचारेपण तोडायचं. तेंव्हापासून दोघात शीतयुद्ध सुरु झालं. आठवडे गेले, रविवार सुट्ट्या कोणाकडेही न जाता आल्या तश्या गेल्या. कोणाला बोलावणे नाही, फोन नाही, दोघांची नोकरी एके नोकरी. घरातही संवादाला ग्रहण लागलेले. पुढे काहीतरी ठाम निर्णय घेतील असेच दुभंगलेले वातावरण.

पुढील आठवड्यात श्रीच्या काकू येते म्हणाल्या होत्या, त्यांना मेसेज करून टाकला ‘आपण आला नाहीत तर चांगल.’ एका नातेवाईकाला असा मेसेज टाकताना रश्मीला जड नक्कीच गेलं होतं. पण, त्याला जबाबदार श्रीच होता. काकूंनी नंतर ४/५ मेसेजेस टाकले होते. दोनतीन वेळा फोनही केले, पण रश्मीने ना उत्तर दिले ना काही बोलली. काकूंनी श्रीला फोन नव्हता केला. का असेल असं? तोच होता ना त्यांचा पुतण्या, अगदी सख्या चुलत दिराचा मुलगा. मग, त्याच्या बायकोला फोन करणारी काकू त्याला का नव्हती विचारीत, ‘का रे काय झालं, येऊ नको म्हणाली तुझी बायको रश्मी म्हणून?’

रश्मीच्या डोक्यात एकचं विचार काय व कसं करावं? अचानक एकदिवस ऑफिसमधून घरी येताना रश्मीला शाळेतली एक मैत्रीण लोकलमध्ये भेटली. ते देखील आज रश्मी जरा लवकर ऑफिसमधून बाहेर पडली, आणि आधीच्या लोकलमध्ये बसली म्हणून मैत्रीण भेटली. साहजिकच गप्पा रंगल्या.

 

 

किती नाही म्हंटल तरी काही वर्षे एकत्र होत्या दोघीजणी. ‘रश्मी आता आपल्याच ऑफिसमधील श्रीची बायको रश्मी आहे,’ हे  समजताच मंजिरीचा बोलायचं नूर बदलला.

“तू यांच्याच ऑफिसमध्ये आहेस. एकेकाळच्या मैत्रिणी हेच नाते ठेव माझ्याशी, श्रीची बायको म्हणून नको बोलूस.” रश्मीने जरा तुटक होऊन सांगितलं.

 

मंजिरीला जाणवलं तरी ती मोकळं बोलू लागली. “अगं, कसे वागतात श्रीशी सगळे ऑफिस मधले?  इतके गृहीत धरतात. कोणीही यावे, टपली मारून जावे. रागावू नकोस, पण खरं सांगते. तू म्हणालीस खरं त्याची बायको म्हणून बोलू नकोस. पण, मला त्याची कीव येते गं कधीकधी. किती बावळट आहे, आणि असे वागतात सगळेच त्याच्याशी?  त्याचा फायदा तर घेतातच, आणि शिवाय मस्करी तरी किती करावी एखाद्याची. एव्हरग्रीन टार्गेट सगळ्यांचे.”

 

रश्मी घुम्यासारखी खिडकीतून बाहेर. जे ऐकतं होती ते अगदी उलट होतं. तिच्या कल्पनेच्या परिघातल नव्हतच मुळी. तरी आश्चर्य वगैरे काही आलचं नाही डोळ्यात, ते होते शून्यात खिडकीतून खाली पडलेला कचरा बघतं. ‘तशीच आहे मी, पडलेल्या काचाऱ्यासारखी.....कशाला विचार करू?”

 

मंजिरीने रश्मीचा हात हातात घेतला, टचकन पाणी आलेलं. रश्मीने मंजिरीकडे मान वळवली. थोपटलं हाताला आणि म्हणाली, “मी कल्पना करू शकते, तुझे कसे होत असेल याची. बरं झालं तू भेटलीस. त्याला सुधारायला पाहिजे. तूच करू शकशील. मी आहे तुझ्या मदतीला. नाही म्हणू नकोस.”

 

रश्मीचे एक ना दोन...

 

मंजीरीनेच कॅसेट सुरु केली. “तुला सांगते कसा त्रास देतात आणि हा कसा वागतो ते.  “माझा काउंटर थोडावेळ श्री बघेल.” “श्री, हे आज झालंच पाहिजे”  म्हणतं नुसते बाय करून पळणारे अनेक. श्री बसतो काम करीत आणि इतर मज्जा मारतात जातात टपरीवर. कधीतरी श्रीला नेतात, पण तिथे त्याचीच टिंगल होते, आणि चहाचे पैसे श्रीच देतो.”

 

“अगं, पण घरी तर ....” सांगाव का नको असं आलंच मनात रश्मीच्या. इतक्या वर्षांनी भेटलेली, नेमकी श्रीच्या ऑफिसमध्ये कशी ती.

 

“रश्मी, घरी नक्कीच याच्या उलट वागतं असेल. असेच ना. मला वाटलंच तुझ्यावरून. बाहेर कोणी ऐकत नाही ना, असे पुरुष घरी बायकोला नको करून सोडतात. मी समजू शकते त्याचे

 

 

घरातले वागणे. अगदी विरुद्ध असणार. तुला त्रास देत असेल असंच ना? मला वाटतं इथे जसा छळ होतो ना त्याची भरपाई तुझ्याकडे करतो. बघू यात काहीतरी. तू धीराने त्याला समजावशील. तो बदलेल, बावळट आहे, दुष्ट नाही, तसा भोळा आहे श्री.”

 

रश्मीच्या लक्षात सारे आले. खरं तर तिलाच तो गृहीत धरायचा. त्याच्या तालावर नाचवायचा, त्याला हवे तेच रश्मीने करायला पाहिजे असा दंडकच घरात. किती वर्ष सहन करणार रश्मी? नकोसा झाला संसार तिला, तरी बरं तीन वर्ष झाली तरी अजून बाळ नव्हतं घरात. त्यातही श्रीचेच म्हणणे मुलं इतक्यात नको, आणि गोळ्या मात्र रश्मीने घ्यायच्या. त्यावरही खूपवेळा बोलणं नव्हे वादावादी देखील झालेली. शेवटी माघार घेणारी हीच होती.

 

इतका विरोधाभास कसा असेल वागण्यात? तिथला सगळा वचपा घरी तर काढतं नसेल हा? मंजिरी सांगते ते खरं असेल तर......रश्मीचे विचारचक्र जोरात फिरू लागले. एकेक आठवताना तिला जाणवले.  

त्या दिवशी नंदिनी, समीरची बायको सहज बोलली, ‘श्री ने यांचे काम केलं त्यादिवशी आणि म्हणून चारची गाडी पकडता आली.’ कॉफी करायचं म्हंटल तर दुध नासलं, समीरने श्रीलाच बाहेर पिटाळलं. ‘श्री, जा ना कोपऱ्यावरून पिशवी घेऊन ये दुधाची.’ त्याचा उलगडा मंजिरीने असा केला, आणि रश्मी कोड्यात पडली.

का कोण जाणे, रश्मीला मंजिरीचे बोलणे पटले.  संसार वाचवण्याचा एक प्रयत्न करायला पाहिजे मला. कुठलीही स्त्री असाच विचार करते. मंजिरीचे उतरायचे ठिकाण जवळ आले, तसे रश्मी म्हणाली, “मंजिरी मला तुझा फोन नंबर दे. मी प्रयत्न करते. संसार वाचवायचा शेवटचा प्रयत्न असणार हा. तोही केवळ तू म्हणालीस म्हणून. करीन. मदत करशील ना मला?” स्वर अगदी कातर झाला, मंजिरीने तिला अक्षरश: कुशीत घेतलं. लोकल   मधल्या बायका देखील त्यांना जाणवल्या नाहीत. आता मात्र आलं स्टेशन, मंजिरी उतरेल. फोन नंबरची देवाण घेवाण झाली.

“कधीही ये, फोन कर, मी आहेच गं तुझ्या बरोबर... रश्मी... सांभाळ स्वत:ला” मंजिरी उतरली. पुढे चार स्टेशन्स गेली आणि रश्मी घरी आली. आज काही दाखवायचं नाही असेच ठरवलं तिने. दुसऱ्या दिवशी कशावरून तरी तोंड उघडले श्रीने.

रश्मीने त्याचे ऐकले खरे, श्रीची कळी खुलली. चला बायको वाकली. जाते कुठे. इथेच मरणार ती. लगेच फर्मान सोडलं पोहे आणि चहा कर मला भूक लागली आहे.

 

“दोन्ही मिळेल, इकडे या, कांदे मिरची कोथिंबीर लिंबू चिरून द्या. तरंच मिळेल नाहीतरी नाही.” रश्मीने अगदी शांत तितकेच ठामपणे सांगितलं. थोडा वरमला श्री. आला ओट्याजवळ. केलं  सगळं. तो तरी कुठे जाणार बायकोला सोडून.

खाणं उरकलं शांततेत. हीच योग्य वेळ म्हणून रश्मीने हात घातलाचं.  “श्री.तुझ्या मित्राच्या घरी दुध नासलं तर तू का गेला होतास दुध आणायला?”

एक ना दोन. चिडीचूप काही सेकंदांची. उलटी उफाळून आलेच वर.

“का म्हणजे? माझी मर्जी. मित्र आहे. आणलं तर गेलं कुठे?”

“बिघडलं नाही तिथे. घरात बिघडते डोके त्याचे काय? मी सांगितलं काही तर? काय होतं तुला?”

“मी दमून येतो.”

“मी काय सागरगोटे खेळायला जाते की काय? आणि तू रुपये आणतोस मी चिंचोके?”

“तुला काय काम असतं गं घरात. दोन माणसाचा स्वयंपाक करतेस तोही असा तसाच. इतकी टूरटूर”

“होय, आता यापेक्षाही अधिक होईल. समजलं.”

“गेलीस उडतं. मला काय करायचं ते मी करीन. नाही ऐकणार तुझं.”

“माझही आडलयं खेटर?” रश्मीनेही जोरात ठणकावले.

तोंड वेंगाडून टीव्ही बंद केला गेला. तंगड्या पसरल्या तशी त्याच्या जवळ कंबरेवर हात ठेवून रश्मी सरसावली पुढे. “इथे माझ्यावर गुरकतोस, हवेनको फार्मावतोस. आणि ऑफिसमध्ये काय करतोस रे तू? असाच कि वेगळा काहीतरी?”

 

“ऑफिस ते ऑफिस, घर ते घर.”

“सांग ना मला कसा ते? इथल्या सारखं की काही वेगळा असतो अवतार तुझा?  कितीजणांच्या ताटाखालचे मांजर आहेस? हा, तो, ते... म्हणे मित्र तुझे. तिथेही त्यांनी सांगितलेलं सगळं करीत असणार. त्यांची ऑर्डर सुटते, आणि तू खाली मान घालून बसतोस, बावळटासारखा.“

 

 

“तोंड सांभाळून बोल.” श्री चांगलाच चपापला. तरीही चढ्या आवाजात,“तू कोण मला सांगणारी त्यांची कामे करू नको म्हणून? मला काय वाट्टेल ते करीन. तुझं तू बघायचं. समजलं.” थोडी धाकधूक आलेली असली म्हणून माघार थोडीच घ्यायची, उलट आवाज करून तिलाच गारद करायचं असाच पुरुषी खाक्या. तोच कामास आला आणि नसलेल्या मिशीवर हात फिरला.

त्याच्याही वरच्या आवाजात रश्मी, “तुझी बायको रश्मी. मला वाट्टेल तसे वागवतोस, आणि तू काय आहेस समजलं.  ‘मला गृहीत धरायचे नाहीस. मी तुला आधीच सांगितले.’ ऑफिस मध्ये वागून दाखवं. जरा तिथेही नरड्यातून आवाज काढून दाखवं.”

श्रीची चांगलीच फाटली. ‘कोणी काय हिला सांगितलं असेल? कोण सांगणार. म्हणा, त्या तिघी आतल्या खोलीत गप्पा मारीत होत्या त्यांनी तर नसेल काही सुचवलं हिला. नक्कीच समीर आणि पंड्यांची बायको. दोघींनी कान भरले म्हणून तर म्हणाली त्या कोण्या बाईकडे जायचे. असू देत, एकदोन दिवस जातील, येईल ठिकाणावर. आज ऑफिसवर का घसरली ही?’

रश्मी आत गेली. श्रीचा टॅच्यू झाला. झोप दोघांनाही आली नाही. पुन्हा संध्याकाळी आलेच सामोरे. रश्मीने स्वत:चं चहा करून घेतला. श्रीला समजलं पण काहीच न बोलता, ती बेडरूममध्ये गेल्यावर पेटवलं काडीने आणि आदळलं पातेले त्यावर. स्वावलंबनाय नम:!

एकदा ठरवलं शेवटचा प्रयत्न तर वेळ घालवायचा नाही, आज वाजलंचं आहेत तर फुटू दे ढोल, जाऊ ते तोल. तोही दोघांचा. माघार नाही म्हणजे नाही. रश्मी, ब्रेव्हो. लढ पोरी लढ. मागे नाही फिरायचेस. विचार मनात आणि पाय स्वयपाकघरात पडला. शेवटचा घोट घेतच रश्मीचे आगमन झाले, आणि श्रीने पहिला घोट घेतला.

 

“मी अतिशय सिरीयसली बोलणार आहे. त्यावर तुझा विचार काय? हे बघायचे.  यासाठी मी फार वेळ देणार नाही. माझी सहनशक्ती संपत चालली आहे. ताणतं आहे मी मला.” रश्मी तयारीनिशी आलेली. काय ते ठरवून आणि बोलली दुसरेच.

श्रीची पुरती तंतारणार होती, याची जणू चाहूल लागलेली त्याला. मुकाट चहा ढोसतं होता.

“आता मी जे सांगते ते ऐकायचं तर आहेचं. तसा बदल मला दिसला तर ठीक आहे. मला जसं सांगतोस ना तसेच ऑफिसमध्ये तेच तसेच तू इतरांना  सांगणार आहेस. इतरांची कामे करायची नाहीत. समजलं??? काय गप्प का? की पुन्हा सांगू.”

“तुला काय पडलं ऑफिसमधलं. घरातलं असेल तर बोल.” श्रीची कचकड्याची ढाल झाली.

“मी सांगते तसेच वागायचं. समजलं नसेल तर इंग्लिश मध्ये सांगू का?”

 

“मला करावी लागतात. मी करतो त्यांची कामे. तुझं काय जातं?”

“माझा संसार वाहतं चालला त्यामुळे. त्याचे काय करू? जरा अक्कल आहे का? घरात काय होतं आहे याची काही कदर? हा माझा शेवटचा प्रयत्न असणार आहे. जमलं तर ठीक, नाहीतर बघीन माझं मी काय ते. अगदी प्रामाणिकपणे करणार आहे. तू बदललास तर ठीक, नाहीतर आपलं नातं संपल हे नक्की.“

“सारखी अशी काय भाषा चालली तुझी? महिना होत आला, गेलोय का आपण माझ्या मित्रांकडे?”\

“मग, काय आत्ता जायचा विचार आहे का? जा खुशाल जा. माझ्याकडे कशाही साठी यायचं नाही हे ठासून ठेव मनात आणि जा बोंबलत उंडारायला.”

“अगं पण?” काकुळती फक्त

“जातानाच दुधाची पिशवी ने. म्हणजे बरं नाही का?”

“काय करू मी. तू अशी चिडतेस. आणि ऑफिसमध्ये सगळे मला चिडवतात.”

रश्मीला हसू आलं. एक, दोन तीन टाळ्या वाजवल्या तिनं. मस्त!

“मस्त काय? तुला बरं वाटलं ना ते मला चिडवतात हे ऐकून?”

“नाही, मला आश्चर्य वाटलं, माझ्यावर गुरकणारा तू. वाघोबा, तिथे कसा गप्पगुमान बसतोस शेपूट घालून? जिभली चाटत उभा समोर”

 

“हो. मला नाही जमत त्यांना नाही म्हणायला.”

 

“मला कसा वरच्या पट्टीत सांगतोस रे. तिथे दातखीळ बसते तुझी. गरीब बिचारा तू? ह्या ह्या ...ओवाळा याला.”

 

“मला त्रास देतात ते.” अगदी खरं खरं श्री बोलू लागला.

 

“आता कसं खरं खरं आलं बाहेर. काय?. मग, मी सांगते ते करणार??” रश्मीने पवित्र घेतलाच.

 

 

 

“मी तर चहाला देखील जात नाही त्यांच्याबरोबर आताशा. चहावाला देखील माझी मस्करी करतो.”

 

“अगदी सोप आहे. आपण बदला. इथे बायकोवर आवाजी बंद, आणि तिकडे सुरु करा. काय?” काय इतकं जोरात म्हंटल तसा श्रीने पाय वरचं उचलले आणि मुटकुळं करून बसला खुर्चीवर.

काही वेळ शांतता. स्मशान शांतता. कोण बोलणार पहिल्यांदा. खरं तर रश्मी सांभाळून घेणार आहे आपल्याला तर श्रीने सगळं सांगायचं की तिला. अशक्य असतात अशा गोष्टी, बायकोजवळ कमीपणा व्यक्त करणे पुरुषाला नाही जमतं. कितीही बावळट अगदी श्री सारखा असला तरीही. श्री खाली मान घालून गप्प बसला, कितीवेळ गेला कोण जाणे.

रश्मीने फडशा पाडायचं चांगलंच मनावर घेतलेले आणि ती श्रीच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. अतिशय स्पष्ट आणि करारी आवाज, तरीही खालचा सूर घेतलेला, नजर श्रीवर आणि  रश्मीने श्रीचा घट्ट ताबा घेतला.

 

“तुला बदलायलाच हवे. मी सांगीन तसे वागत जा. बघं कसं होईल. आणि हो एक लक्षात ठेव. सर्वात महत्वाचे की  हा माझा शेवटचा प्रयत्न असणार आहे. आपलं घर आपला संसार टिकविण्याचा एक प्रयत्न. यापलीकडे काहीही नाही. हे मात्र व्यवस्थितपणे लक्षात ठेवून वागणार असलास तरंच मी काही सांगेन. नाहीतर मला माझा वेळ आणि ताकद वाया घालवायंच नाही. मान्य असेल तर सांग. मी तुला शिकवीन काय करायचे ते. संसार माझ्या एकटीचा नाही. तुला जर नको असेल तर मलाही नकोसाच आहे, तुझ्याही आधी पासून असे समज.”

 

आता मात्र श्रीची पार फाटली. उठला, आत जाऊनही आला. बसला बायकोसमोर. घुम्या कुठला. खुर्ची रश्मीच्या शेजारी होती, ओढली आणि समोर करून बसला. तिच्या चेहऱ्याकडे बघतं.

“मी सांगीन तसे वागलास तर कोणाची हिम्मत नाही होणार तुला गृहीत धरायची.”

संपूर्ण शरणागतीत, “पण मला कसे जमेल?.” इति श्री.

 

“घाबरायचे नाही. आपले काम करायचे, इतरांचे नाही. आवाज स्पष्ट पण पक्का जाणवला पाहिजे. त..त..प..प.. चालणार नाही. मान ताठ करून बोलायचं. जमिनीकडे बघतं बोलायचं नाही. माझ्याशी कसा बोलतोस ना वरच्यापट्टीत तसेही बोलायचे नाही. कमी शब्दात समजेल असे. कळलं का?”

 

“आणि हो, मध्ये मध्ये मला फोन करायचा. मी बोलेनच असे नाही. पण, फोन करायचाच. मी बंद केला तरी तू कानाचा मोबाईल काढायचा नाहीस. हं.. हो... नको... बरं.. बाय... बोलतं राहायचं.”

 

हे असे काही बोलायचं रश्मीच्या मनात नव्हतं किंवा मंजिरीनेही सुचविले नव्हते. एकदम आलं बोलून गेली. ‘असू देत, काही हरकत नाही. नाहीतरी कधी फोन करीत नाही मला. अगदी क्वचित महत्वाचा निरोप असेल तरचं. हेमाचा नवरा कसा रोज फोन करतो एकदातरी.... जाऊ देत. आपलं बघू आधी.’

 

मंजिरी आणि रश्मी पहिल्या  भेटीनंतर दोन वेळा भेटल्या होत्या दोन आठवड्यात. ऑफिसमध्ये काय होतं हे मंजिरीकडून तिला समजत होते. त्यानुसार घरी अभ्यास, पाठांतर, आवाजाचा सराव, बदलून धडे गिरवले जात होते. भट्टी चांगली जमली होती. हातात छडी घेऊन रश्मी उभी होती खमकी बायको.

श्रीलाही समजलं की मी नाही म्हंटल तर थांबेल हे सगळं. खरं आहे रश्मी म्हणते ते. एकदोन वेळा चेष्टा केली, मागे लागले, पण केले ज्याचे त्यांनी आपले काम. इतर मस्करी देखील कमी झाली होती. सगळे मागे बोलतं होते, पण समोर नाही. तेव्हढ्यास तेव्हढे ठेवल्याने आलबेल होतं ऑफिसात. आपलं काम बरं आणि आपण. स्वत:च्या टेबलावर डबा खात होता. सगळ्यांच्यात मिसळला नाही अजिबात. त्याला रश्मीची भीती वाटू लागलेली. आणि खरंच रश्मी गेली तर बापरे! त्याचा थरकाप होई. इकडे घरात तर काय हेडमास्तरीण बाईंचे धडे सकाळ संध्याकाळ दररोज. थोडे दिवस नाराजीने केलं तसे तर श्रीला बायको म्हणते ते बरोबर याचीही जाणीव झाली. तरी मोकळा संवाद अदृश्य होता. असेना का. काम होतय ना पाहिजे तसे यावर बारीक लक्ष ठेवून होती रश्मी.

रश्मीने शिकवणीच सुरु केली. तीन आठवडे गेले, आणि रश्मी म्हणाली, “सोमवारी, आपण दुपारी जेवायला बाहेर जायचे. शेजारच्याला सांगून बाहेर पड. मी मेट्रोजवळ थांबीन. तू तिथे येणार आहेस. समजलं का?”

“नको, नाही जमणार. खूप काम आहे.”

“काही झाले तरी पुढील शनिवारच्या आत एक दिवस दुपारी दोन तास तुला काढायचेत. आज इतकेच पुरे.” आणि रश्मी ताडताड पर्स उचलून बाहेर निघून गेली.

 

 

श्रीच्या पोटात गोळे यायला लागले. कसे बोलायचे, बाहेर पडायचे दोन तास? कोणाला सांगू? बाहेर? पुढील शनिवारच्या आत. सोमवार गेला, मंगळवार गेला... कोणालाच विचारले नाही. आणि कोणी श्रीलाही काही सांगितले नाही. इकडे दोघींची फोनाफोनी होत होती.

 

काहीतरी कारण काढून मंजिरी मुद्दाम श्री जवळ आली. श्रीची अवस्था तिच्या लक्षात आलीच, “का हो? आज काय तब्येत बरी नाही कि काय? की घरी भांडलात बायकोशी?” तेंव्हा अशी हसली मंजिरी की श्री गोंधळाला पार.  मंजिरीनेही चेष्टा केली त्याची. ती आधीपण कधीतरी त्याला उचकवायला डीवचायची पण परिणाम शून्य असायचा.

 

“नाही हो... पण, मला दोन तास उद्या बाहेर जावं लागेल, तुम्ही संभाळाल का माझं टेबल?”

केविलवाणा चेहरा करून खाली मान गेली परत.

 

“मी? तुम्ही करता का माझं काही काम? म्हणा, मीच कधी सांगत नाही तुम्हाला. सगळ्या गावचं खरकट काढावं लागतं तुम्हाला. माहीत आहे मला. विचारा त्याच तुमच्या मित्रमैत्रिणींना. मला का विचारता? आणि मी का करू?” मंजिरीने ताणलं जरा.  

 

“बरं. असू देत. बघेन मी.” इतकेच बोलला तो. मंजिरी निघून गेली. तो दिवस तसाच गेला.

दुसऱ्या दिवशी मंजिरी, “आज बुधवार आहे मला खूप काम असतं. तुम्हाला उद्या जायचं असेल तर मी दोनच तास लक्ष ठेवेन तुमच्याही कामावर. पण, वेळेत यायचं. आणि सांगते आधीच मी... आत्ता केलं, म्हणजे पुन्हा पुन्हा विचारायचं नाही मला. मला गृहीत धरायचं नाही. काय?”

 

“थ्यांक्स... उद्या चालेल.” इतकेच फक्त कसेबसे उमटले.

 

कधीतरी हश्यामधेही सामील व्हायची. त्याने श्रीला सपोर्ट मिळाला. त्यामागचे कारण आणि मंजिरी हे डाव फत्ते होत होते. बदल दिसत होता. दोघींनी मिळून एकेक गुगली टाकायला सुरवात केली आणि श्री बदलू लागला. त्याला आपल्या चुका कधी स्पष्ट तर कधी आडवळणाने दाखवून दिल्या. घरी आणि दारी.

 

काहीतरी सुधारत होतं. श्रीलाही उत्साह आला, घरात संवाद की काय व्हायला लागलं.

 

रश्मी त्याला लिहून द्यायची. लिहून पाठ करून तिच्या नजरेला नजर लावून शांत पण ठामपणे बोलायला लावायची.  सर्वाची पुनरावृत्ती ऑफिसमध्ये. चेष्टा झालीच त्याकडे 

 

संपूर्णपणे दुर्लक्ष उपाय सांगितला असल्याने त्रास झाला नाही. खूप मस्करी केली, पण श्री स्थितप्रज्ञ राहिला. त्याला हा शब्द देखील नसेल माहित कदाचित. पण, बसला गप्प आपलेच काम करीत. मंजिरीने बघ्याची भूमिका घेतलेली. तरी मधून मधून श्रीला बक्काब करायला यायची पुढे. इतरांशी बोलताना कधी श्रीच्या विरुद्ध तर कधी त्याचा बदल चांगला आहे, बदलला तर बरं हेही लोकांच्या मनावर तिने बिंबवले. ऑफिसमध्ये तिने खूप सांभाळून घेतले सगळ्यांना आणि श्रीला त्रासातून सोडवले. मंजीरीचे इतरांना पटतं गेले.

सगळं मुद्दाम करते हे मात्र कोणाच्याही लक्षात आले नाही. याची देखील काळजी अतिशय खुबीने मंजिरी घेत होती. दोन मैत्रिणींचे सर्वांच्या न कळत फोन होत होते, भेटत होत्या. श्रीला अजिबात शंका आली नव्हती.

ऑफिसमध्ये श्री फार वेगळा वावरू लागला. गप्पा कमी केल्या. बरोबर जाणे मधूनच टाळायचे. पाचसहा महिन्यात बदल दिसून श्रीचा आत्मविश्वास वाढीस लागला. आठ दिवसाची सुट्टी काढून एक व्यक्तिमत्व विकास कोर्स करायला लावला. त्यासाठी रश्मीने त्याला फार मुश्किलीने तयार केले.

“हे बघ श्री. आता तुला जाणवतोय तुझ्यातला बदल. इतर तुला त्रास देत नाहीत. आणि मी तुझा त्रास घेत नाही.  असेच जर राहिलोत तरचं आपला संसार राहील. नाहीतर नाही. म्हणून, केवळ आपल्या घरासाठी तुला हा कोर्स केलाच पाहिजे. बघू, वाटलं तर मी येईनही कोर्सला, नाहीतर पुढेमागे करेन.”

असं रश्मी म्हणताच, “तू येणार असलीस तर मी जाईन. दोघे जाऊ. मला एकट्याला नाही झेपणार. तू आत्ताच चलं. नंतर नको. आता माझं ऐक ना रश्मी. प्लीज. येशील तू बरोबर? नाही म्हणू नकोस.”

 

तेंव्हा श्रीचा बांध फुटला. “खूप त्रास दिला मी तुला. ओळखलेच नाही मी. माझं काही चुकतं हे समजलं तरी तुझ्यावर ओरडत राहिलो.” आणि बायकोच्या खांद्यावर डोकं टेकवल. चार टिपं देखील गाळली.

 

श्री बदलला. रश्मी आतून भरून आलेलं, पण कोंडलं सारं आतच. नाही हळवी झाली त्याच्यापुढे. किंवा काय रडतोस असंही नाही बोलली. फक्त हातात हात घेऊन दुसऱ्या हाताने थोपटलं, एका पिल्लाला.

 

 

श्री मधील बदल सगळ्यांच्या लक्षात आला. श्री बरोबर रश्मीने देखील कोर्स केला. श्रीला  कोणी त्रास देईनासे झाले. इतरांनी त्याला स्वीकारलं आणि कौतुक केलं. मंजिरीला जिंकल्यासारख वाटलं, कोणाला अजिबात संशय देखील आलेला जाणवलं नव्हतं तिला. सारं कसं गुपचूप दोन मैत्रिणींचे.

आणि असेच एक दिवस अचानक....“रश्मी, रविवारी आपण दोघे आणि पमा, ते दोघे. पिक्चरला जाऊ नंतर डीनरला  जायचे. चौघे एन्जॉय करू.”

“रविवारी मी मोकळी असेन गृहीत कसे धरलेस?”

“चार दिवस आधी सांगतोय मॅडम. प्लीज...तुला गृहीत धरीतच नाही. त्याहीपेक्षा आता कोणालाही मला गृहीत धरायला जमणार नाही. फोन लाव लगेच पमाला. तीलाही  आधीच सांगू.”

“रिअली, ब्रेव्हो, श्री. खरंच! मनापासून म्हणतोस ना तू?” हे विचारताना रश्मीचे डोळे पाणावले.

“अगदी खरं, तुझ्या डोळ्यांतल्या पाण्या इतकं खरं. शप्पथ!”

“रश्मीला हुंदका आवरेना.”

“रश्मी... खूप चुकलं माझं. आता नाही होणार असे. विश्वास ठेव माझ्यावर.”

रश्मीचे डोळे त्याने पुसले. किती दिवसांनी, महिन्यांनी गालाला हात लागला होता. हातही बदलला, स्पर्श बदलला, आत खोलवर जाणीव झाली दोघांना. आपण बदललोत याची.

एक लहरशी सरसरली रश्मीच्या शरीरात. पण, लगेच रश्मीने तिला आडवलं. आत्ता नाही हलायचं. अजून जिंकायचं आहे थोडं. अलगद श्रीला दूर केलं, तिकडेच पडलेला पेपर उचलला आणि विचारलं, “कुठला लागलाय मेट्रोला?”

©वंदना धर्माधिकारी

1 Comments

  1. Nice story.. but too big narration.. It's like true story 👌👌

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post