तुझं तूच बघ

 तुझं तूच बघ (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ वंदना धर्माधिकारी 

"आहो, रात्रीचा एक वाजला. सायली अजून नाही आली.”

“हुं.”

“फोन करा तिला.”

“बंद आहे.”

तेव्हढ्यात गाडीला ब्रेक लावल्याचा आवाज आला. दोघांनी खिडकीच्या दाराच्या फटीतून बघितलं. दोन मुले आली दोन गाड्यांवर. बाईकवर मागे सायली.

“बाय, गुड नाईट.”

गेट उघडल्याचा आवाज. आईबाबा पळाले बेडरूम मध्ये. सायलीने लॅचचे कुलूप उघडले. जोरात दार ढकलले. आवाज झालाच. जणूकाही त्यानेच जाग आली, अशा आविर्भावात आई आली बाहेर.

खोलीच दार उघडलं तसंच आपटल दाणकन.

“सायली, अगं आत्ता आलीस. किती वाजले?”

“एक वाजून दहा मिनिटे”

सायलीचा आवाज चढलेला. डोळ्यात आग संताप. आईला स्पष्ट जाणवला तिचा नूर.  तरी धीर धरून विचारलंच आईने.

“कुठे गेली होतीस इतक्यावेळ? आणि कोण बरोबर?”

“ सिनेमाला. तुला काय करायचं? झोपा तुम्ही.” चढलेला आवाज  ऐकून बाबा बाहेर आलेच होते.

“सायली. एक तर रात्री अपरात्री पर्यंत घराबाहेर राहतेस. शिवाय....”


“हो, काय म्हणायचं तुम्हाला. सांगून टाका ते सुद्धा. आत्ताच.” बाबांला  समजेना, काय झालं या पोरीला? अशावेळी काय बोलणार?

 

तशी साधीसुधी मुलगी. चांगली शिकलेली, संस्कारात वाढलेली, मोठ्यांचा मान आणि मन दोन्ही राखणारी. काहीतरी बिनसलं होतं मागल्या काही दिवसांपासून, एव्हढं खरं. ऑफिसमधून परस्पर बाहेर जाणं वाढलं होतं, कपडे जाताना एक, येताना एक असायचे. पर्समधून न्यायची, की ऑफिसमध्ये ठेवायची. कोण जाणे. डबा नेला नाही नेला. कधी बोलायची, कधी गप्पगप्प. एकदोन वाक्ये यायची नेहमीच्या पद्धतीने. तर कधी तुटेल, आणि बेताल होईल स्वर ह्याचा अंदाज बांधण अवघड होऊन बसलं होतं एका मुलीच्या आईबाबांना. तसं आई भोवतीची  घुटमळ सुस्तावली होती सायलीची. जणू, आई नकोच होऊ लागलेली. ह्या वयात थोडा फरक होतो मुलांच्या वागणुकीत. घरात कमी बोलतात, मिसळत नाहीत  फारसे. नातेवाईकांकडे जाणेयेणे टाळाटाळ केली जाते. हे समजू शकतो, यात तसे काहीच नवीन नाही, सगळीच मुले या वयात घरातल्यांपासून दूरदूर जाऊ पाहतात. या सगळ्या मोजमाप पट्ट्यांच्या पलीकडे काहीतरी घडतंय घरात आणि आपल्याला समजू नये, आपण हतबलतेने फक्त बघत बसायचं. हीच अपराधी भावना या दोघांना सतावित होती. काय करायला पाहिजे, म्हणजे सायली नीट सांगेल आपल्याशी. तरीही तिला स्पष्ट विचारायचं धारिष्ट दोघांनाही झालं नाही. हळूहळू तिच्यातला बदल आईच्या नजरेतून सुटत नव्हता.

 

बापाच्या मनाचीही घालमेल वाढत होती. तरीपण, एकदम तिला काही बोललं गेलं नाही. हेच खरं. म्हणावंस वाटलं तरी ओठावाटे बाहेर नाही पडलं. नुसती कालवाकालव शब्दांची. आणि अशी अचानक इतक्या उशिरा येऊनही आईबाबांवर रागावणारी सायली. ते दोघेही गप्प. जगाची असतेच प्रत्येकाला, रात्रीच्या शांततेत थोडा टिपेचा आवाज सुद्धा मोठ्ठा आदळतो. कुणी ऐकलं तर काय म्हणतील ही भीती असतेच. तशीच यांना होतीच.

 

दोन मिनिटाची शांतता भयानक होती. कुठला विस्फोट होईल, की  पुन्हा एकदा दार आपटून जाईल आत सायली, की रडेल, की ओरडेल?? दोन क्षणातील निरुत्तरित प्रश्न आ वासणारे होते.  आईबाबा एकमेकांकडे बघंत आणि  सायलीची ती विचित्र नजर एकदा आईवर एकदा बाबांवर. अचानक स्फोट झाला.        “ तुम्ही म्हणालात ना मला त्या दिवशी... तुझं तू बघ.  मग, जर मला  बघायचं असेल तर हे असेच चालणार. मी ऑफिसमधून परस्पर जाणार, उशिरा येणार, असेच कपडे घालणार. सिनेमाला जाणार. बघीन माझं मी.”

दाण दाण दाण!!!!! स्वत:च्या खोलीत गेली. जोरात दार ढकललं. क्षणार्धात फिरली, पुन्हा एका कटाक्षात दोघांनाही कापलं. दार बंद. कोसळले आईबाप. “काय करून बसलोत आपण. लग्नाचं बघत होतोत चांगल. नकार येत होते. जिथून होकार यायचा, तिथं सायलीचा नकार. पाच एक मुलं नाकारली तिने. मागील एक वर्ष असंच गेलेलं. वय वाढलं चोवीसच पंचवीस झालं. आईबापाला काळजी लागलेली. हिचं लग्न कधी ठरणार. आणि सहज बोलून गेले “तुझं तू बघ.”

बरं, विचारलं होतं तिला अगदी विश्वासात घेऊन, “ तुझं आहे का कुठे काही? कोणी आवडतो का तुला? असेल तर सांग आम्हाला. ग्रुपमधला आवडतो का तुला कोणी? आम्ही विचारू त्याच्या आईवडिलांना. फार वेळ नको लावूस. लग्न योग्य वयात झालेलं चांगलं. तशी अजून खूप मोठी नाहीस म्हणा. असेल कोणी खास तर सांगायचं बरं का आम्हाला.”

 

खूप हसली होती सायली हे ऐकून. “ आईबाबा, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. मी एकुलती एक. तुमची लाडोबा. तुम्हीच बघा माझ्यासाठी तुमचा जावई. मला मित्र खूप आहेत गं. कॉलेजचा ग्रुप तर तुम्हाला माहितच आहे. आणि ऑफिसमध्ये बरेच आहेत. मित्र म्हणून खूप चांगली आहेत ही मुले. पण, खरं सांगते, मला कोणी तसं आवडत नाही. कोणाशी लग्न करून सारं देऊ करावं असं मात्र नाही भेटलं. मला लग्न करावं असं वाटतं, पण ते करण्याजोगं क्लिकच झालेलं नाही. सो,फाईंड आउट.” इतकं स्पष्ट अतिशय विश्वासाने मुलीने आईबाबांना शांतपणे प्रेमाने सांगितले होते.

 

“आम्ही बघू गं तुझ्यासाठी  मस्त मुलगा. आणि लग्न तर अगदी थाटात करू आपण. हो ना. मग, खुश होईल माझी राणी. हो की नाहो बाबा.” आईने प्रेमाने लेकीकडे आणि नवऱ्याकडे बघितलं. झालं! तयारी सुरु झाली दुसऱ्या दिवसापासून. नावनोंदणीला सुरवात केलीच लगेच.  पत्रिका काढली, झेरॉक्स प्रती काढल्या, माहित असलेल्या विवाहसंस्था आठवल्या. कोणाचं कुठून ठरलं, कसं ठरलं, मग आपणही जाऊ तिथे नाव नोंदवू. दिवसभर बोलायला काहीतरी सापडलं होतं दोघांना. आठवून आठवून माहिती गोळा केली. रोजचं कुठेतरी जोडी जायची, भेटायची, बोलायची. पत्रिका, फोटो देणं सुरु झालं. ही झाली जुनी पद्धत, पण चांगली स्थळ इथेच मिळतील हा विश्वास होता दोघांच्याही मनात. असेच गेले काही दिवस. तसं,कुठेच काही विशेष झालं नाही.

 

एकदिवस, सायली आली संध्याकाळी ऑफीस मधून. बाबांनी लॅपटॉप ऑन केला. तसं अगदीच जुजबी येत होता हाताळायला. फक्त गाणी शोधायची यु ट्युबवर आणि ऐकायची. तशीच एक

सुरेल तान सायलीच्या आयुष्यात इथेही मिळेल. “सायली, ये राणी. मला सांग, ते शादी डॉट कॉम कसं बघायचं? तुझं नाव तिथे नोंदवू यात.” तीही लगेच आली, आईबाबांना शिकवलं, कसं काय असतं ते. म्हणाली,” बाबा, पण तुम्ही फक्त वाचा आणि बघा कुठला मुलगा तुम्हाला योग्य वाटतो ते. काही पाठवायचं झालं तर ते मात्र मी असतानाच करायचं. उगीच, काही चुकलं तर प्रॉब्लेम यायचा.”  तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. असा तिथेही शोध सुरु झाला. गती मिळाली वर संशोधनाला.

 

एक वर्ष होऊन गेलं. कधी तिकडून नकार, कधी पोरीचा नकार. फोनाफोनी, हो नाही  करताकरता काय करावं हे समजेनासे झाले दोघांना. हे असं होणार, याची कल्पना असेतेच लग्नाळू मुलाच्या मुलीच्या आईवडिलांना. काहीही कारण न देता, न सांगता सायली मुलांना नकार देत होती. आणि एकदिवस बाबांचा आवाज चढला, आईने उचलून धरला, “ काय सगळ्यांना नकार देतेस. तुझं तू बघं.”

 

अगदी पिन ड्रोप सायलेन्स मध्ये गेले पंधरा दिवस. एकदिवस सायलीला उशीर झाला. एकाचे चार दिवस व्हायला वेळ नाही लागला. सायली गप्प गप्प वावरत होती घरात. स्टाईल बदललेली आईच्या मनानं घेतलं, तसं नवऱ्याकडे बोलूनही दाखवलं. त्याचं एकच वाक्य, “बघेल तिचं ती. हल्ली सगळेच करतात लव्ह मॅरेज. ठरेल कधीतरी. भेटेल तिला. आपण आता लक्ष नाही घालायचं.” आईचा जीव खालंवर.

असेच दोन महिने गेले, आणि अचानक आज हा स्फोट झाला. सायली गेली झोपायला. झोप लागली असेल का तिला तरी? कोण जाणे? पण दिवसभर थकलेला जीव गेला असेल झोपेच्या कुशीत. इकडे सायलीचे जन्मदाते बसले कपाळाला हात लावून एक शब्दही न बोलता. एक वाजून दहा मिनिटाने सायली आली. आता दोन वाजून गेलेले. दोघेही गप्प. मनातल्या मनात स्वत:ला दोष देत होते. आपण असं  म्हणायला नको होतं, बरं रागाच्या भरात बोललो, तर नंतर तरी काहीतरी हालचाल करायला हवी होती. अशी खुन्नस देऊन किती दिवस काहीही न शोधता, कोणालाही फोन न करता आपण नुसते शांत बसलोत. मुलांकडचे एकदोन फोन आले होते, पण काहीच नाही सांगितले त्यांनाही.”

  आईबाबा पश्चातापात डुबले. वडील उठले लॅपटॉप पुढ्यात ओढला. लागले इमेल शोधायला. कुणाकडून काय आलं. आपण कोणाला काय लिहिलं होतं. हे नजरेखालून घालणं सुरु झालं. ‘हे’ काय करतात, हे आईने बघितलं आणि उठली जागेवरून. अडीच वाजता  कढई ठेवली, रवा काढला ओतला  कढईत. सवयीने उलधण फिरत होतं. शिरा झाला देखील तयार. हातखंडाच होता तसा. लेकीला सगळ्यात जास्त आवडणारा गोड पदार्थ म्हणजे शिरा. सायलीला डब्यासाठी शिरा करून ठेवला. टेबलावर तिचे डबे काढले. काल  दुपारी केलेला चिवडा एका डब्यात भरला, तोही लेकीला प्रियच होता. सकाळी उठायला जर उशीर झाला तर उगीच चिडचिड व्हायची. त्यापेक्षा, आत्ताच सगळं आवरून ठेवू यात.

 

झोप उडालेली. पहाटे पाच पर्यंत दोघे टक्क जागे. सायली झोपली.  आईने हळूच दार ढकलून बघितलं. जवळ जायचा धीर होईना. वाटलं, ‘जावं जवळ. हात फिरवावा अंगावरून. नको, उगीच काही झालं तर? पांघरूण तरी नीट करावं वाटतं. तेही नको, जाग आली आणि चिडली तर. बापरे!! नकोच. झोपली तशीच झोपू दे. मी  झोपले असते तर आले  असते का बघायला या वेळी कोणी मला?  नकोच. झोप राणी तू.’  पाचचे सुमारास बाबा बेडरूम मध्ये गेले ते तिथेच झोपले. सायलीकडे बघून हळूच दार ओढून घेत आई आपल्या बेडरूम मध्ये आली. अलगद कलंडली.

 

दररोज सकाळी ७.४० ला सायलीची कंपनीची बस यायची. तसं अंतर फार नव्हतं. सायली जायची स्कूटीवर. स्टॉप जवळच तिच्या मैत्रिणीच घर होतं. तिथे पार्क करून जायची. येताना तसाच परतीचा प्रवास. मैत्रीण इथे नव्हती, अमेरिकेत गेली होती लग्न करून. आज मात्र तिची स्कुटी तिथेच राहिलेली होती. सायलीने मैत्रिणीच्या आईला फोन करून गाडी राहूदेत तिथेच सांगितलं होतं अगदी वेळेत. जेंव्हा जेंव्हा ती ऑफिस मधून परस्पर कोणाबरोबर जायची तेंव्हा घरी फोन नाही करायची, पण या मैत्रिणीच्या घरी आठवणीने फोन जायचा. का म्हणून तिने आईवडिलांना सांगून जावे. शोध चालला होता तिचा नवऱ्याचा.

 

नेहमी प्रमाणे  सव्वा सहाला गजर झाला. कितीही झोपायला उशीर झाला तरी गजर ऐकताच सायली ताडकन उठून आवरायला शिकली होती. तसंच झालं आज. उठली. हॉलमध्ये सोफ्यावर लवंडली, क्षणभर. उठलीच लगेचच. रात्रीचा  राग तसाच, थोडा वेळा झोपलेला.  पाणी प्यायला

आली स्वयपाकघरात. गटागटा दोन घोट पोटात गेले तोच नाकाने काहीतरी सुचविलं. कढई दिसली. उलथन्याला शिरा लागलेला, तो ही तसाच पडलेला शेगडीवर. तसाच गेला तोंडात शिरा. 

तीच तिची लाडकी चव. ‘हे काय? आईने रात्री केला कि काय?मला आवडतो म्हणून.’ नजर भिरभिरली. टेबलावरील डबे बोलून गेले. नेहमी न्यायची तेच डबे. एकात भाजी भरलेली. दुसऱ्यात पोळ्या, गुळ तूप दाबीत. चटणी  एका डबीत. झीपलॉकमध्ये सॅलड. आणि चिवडा. तिने ओळखलं आई बाबा दोघेही झोपले नव्हते. आईने रात्री शीरा  केला. माझे डबेही भरून ठेवले’. आली तेंव्हा तिची नजर गेली होती ग्यासवर, तिथे सगळं आवरलेलं होत. तेही तिला आठवलं.

 

रात्रीचं चित्र सरकन सरलं. बेडरूम मध्ये डोकावलं तर, लॅपटॉप  उघडाच, वायरही तशीच लोंबती. तिला बाबाची शिस्त आठवली,  बाबा कधी असा ठेवतं नाहीत तो. म्हणजे बाबांनी काय केलं असेल. असू देत. दार लावून घेतलं. आपल्या खोलीत आली, एकदम भरून आलं आभाळ. ओक्साबोक्शी रडायला लागली. समजेना. काय करावं. बांध फुटला. आपलं चुकलं का त्याचं चुकलं.  समजेना काय करावं. हतबल झाली होती खूप. समजत नव्हते काहीच तिला... आणि आत्ता कोसळली. पहिला आक्रोश ओसरला. तशी धावत आली आणि आईबाबांच्या मध्ये घुसली. हुंदक्यान मागून हुंदके देऊ लागली. दोघांना समजेना काय झालं? कुठल्या संकटात तर नसेल ना पडली आपली लेक? मन चिंती ते वैरी ना चिंती. दोघांच्या अंगावर  सायलीने हातपाय टाकलेले, जणू बांधून ठेवलं आईबाबांना. इतकी रडली, इतकी रडली. रडू दिलं. तिचा आवेग कमी होऊ दिला. तसे ते दोघेही रडत होते, आतल्या आत मूकपणे. मुलीच्या आवाजापुढे त्यांनी ओठ दाबून धरले होते. तरी अलगद डोळे पुसतं होते. एकमेकांकडे बघत होते. तिच्या नकळत एकमेकांना स्पर्शातून काहीतरी सांगत होते. धीराचा होता तो स्पर्श. होईल ठीक सांगणारा. की, काळजीने घेरणारा.

 

उठून बसली सायली. आईबाबांच्या कडे एकदा नजर टाकली. “तुम्हीच बघा माझ्यासाठी नाहीतर मी लग्न करणार नाही. मला नाही कोणी आवडत. ते नाटकी बोलण मला जमणार नाही. सिनेमाला  गेले होते, त्याने उगीचच हातात हात घेतला, मला आवडलं नाही. मी लाजले वैगेरे अजिबात नाही. हात सोडवून मात्र घेतला. मला नकोत हे असले पांचट चाळे. सगळं थिल्लर आहे. चाटू असतात साले. त्यांचे काय चुकले म्हणा. मी नाही अशी जाणार कोणाबरोबर परत कधी.  मला नाही जमणार हे असं जाणं. असले थेरं मला आवडणार नाहीत. तर, तुम्हीच माझ्यासाठी कोणीतरी शोधा. तुमची पसंती मला मान्य. जो शोधाल त्याच्याशी मी लग्न करेन. नाहीतर नाही

करणार. अजिबात नाही करणार मी लग्न. तशीच राहीन मी. चालेल मला... तुमची सायुराणी  कायम तुमच्या जवळ राहील.”

  “हो राणी, माझी सायुराणी. मी आणीन तुझ्यासाठी त्याला शोधून.” हुंदके देत बाबा बोलला. आईची तर वाचाच गेली आनंदाने. काय बोलणार. लेकीकडे बाबाकडे बघतं राहिली. घायाळ झालेली आई ती...  सायलीच म्हणाली, “आई, तुझ्याच पसंतीचे कपडे तू मला आणायचीस. किती छान छान होते माझे फ्रॉक, सगळेच ड्रेस. मला म्हणायचीस माझी राणी कशात छान दिसेल हेच मी बघते. हो ना आई? काय कुठला ड्रेस आवडला. मी एखादा काढला, तर त्याचा पोत, रंग, डिझाईन, मला काय चांगले दिसेल हे तूच मला सांगायचीस. नाहीतर दुसऱ्या दुकानात जायचोत आपण. माझ्यासाठी तुला पसंत पडल्या शिवाय कधी एकही कपडा घेतला नाहीस तू. अगदी आतले कपडे देखील किती चोखंदळ पणे निवडायची तू. हो ना.आई, हे खरं आहे ना... मग, तूच शोध ना नवरा माझ्यासाठी, नाहीतर जावई तुझ्यासाठी. तूच शोधू शकतेस माझ्यासाठी छान छान नवरा.” सायली एकदम घुसली आईच्या कुशीत. पुन्हा एकदा पोटात घ्यावं तिला ओढून असे झाले आईला. सारं सारं विरघळलं. धारा लागल्या तिघांच्या. आईने भरल्या डोळ्याने एकदा बाबाकडे बघितलं. त्याचेही तसेच होते.

 

आणि एकीकडे..... ह्या नादात आवाज ऐकूच आला नव्हता तिघांनाही. खालून हॉर्न वाजत होता.

 

“ये बाबा, तूच सांगा ना खाली जाऊन. कालचा तो मिलिंद आला असेल, मला न्यायला. माझी स्कुटी नाही म्हणून तो म्हणाला होता ‘मी येईन तुला पिक अप करायला’. मला नाही जायचं त्याच्याबरोबर. बाबा आज तू सोड ना मला.” उभा आडवा हार फिरवला चेहऱ्यावरून आणि लगेच बाबा धावला ल खाली.

 

“सोना, आज गेलंच पाहिजे का गं तुला ऑफिसला? नाही गेलीस तर नाही का चालणार?”

“चालेल की, नाही जात मी.”

©वंदना धर्माधिकारी

 

 

2 Comments

  1. खुप सुंदर... मनाला भिडणारी कथा

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post