सापळा

 सापळा (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अनिता देशपांडे

      स्वतंत्र पूर्व काळातील गोष्ट असावी. रावसाहेब त्या काळातील जमीनदार त्यामुळे सुलोचानाबाई आणि रावसाहेब अवघ्या पंचक्रोशीतील मोठे प्रस्थ. त्यांचा शब्द मोडण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. घरी जमीनदारी असल्याने कुठल्याच गोष्टीची ददात नव्हती. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. 

      सुलोचना बाई रावसाहेबांच्या दुसऱ्या पत्नी. पहिल्या पत्नी जानकी बाईंच्या  चार मुली आणि एक मुलगा! तर सुलोचना बाईंच्या तीन मुली. पहिली पत्नी जानकी बाई पाचव्या बाळंतपणात निवर्तली होती. मोठ्या चार मुलींच्या पाठीवर पाचवा मुलगा झाला. त्या वेळेस जानकी बाईंचे वय असेल जेमतेम वीस वर्षे. न्हाण आल्या नंतर सासरी आल्यावर एखादे वर्ष खाली गेले असेल. नंतर मात्र दर वर्षी घरात नव्याने पाळणा हलतच होता. सगळेच मुलं लहान होते. त्यात जानकी बाईंचे देखील पोरवय! समज अशी फारशी नव्हती. घरी गडी माणसे असली तरी मुलांचे सगळे आईलाच करावे लागत असे. त्या सारख्या खंगत चालल्या होत्या, शेवटी पाचव्या बाळंतपणात मुलाला जन्म दिला आणि जानकी बाईंनी राम म्हंटले. मुलाचे तोंड बघणे देखील त्यांच्या नशिबी नव्हते. त्या वेळेस मोठी मुलगी जेमतेम सहा सात वर्षाची बाकी सगळ्या  तिच्या पेक्षा लहान. मुलांची काळजी घेण्यासाठी आई पाहिजे या सबबी खाली रावसाहेबांच्या मातोश्रींनी त्यांचा दुसरा विवाह करून दिला.....त्याच ह्या सुलोचना बाई! 

      पहिल्या पत्नी जानकी बाईंच्या पेक्षा सगळ्याच बाबतीत डाव्या! तरी रावसाहेबांचा मात्र त्यांच्यात अतीच जीव! पहिली पेक्षा दुसरी जास्त लाडकी असते.....आवडती असते.....हेच खरे! 

       रावसाहेबांनी विवाह केला तो मुलांची काळजी घेणारे हक्काचे माणूस असावे! मुलांना आई मिळावी म्हणून! पण झाले मात्र उलटेच! रावसाहेबांना आता दिवसरात्र सुलोचना बाईंच्या शिवाय काहीच सुचत नसे. त्या काळात पत्नी ला देखील सन्मानार्थी  अहो काहो अशी हाक मारत असत. रावसाहेबांचा तर सतत अहो सुलोचना बाई असा जप च चालू असे. त्याकाळात घरातील मोठ्या माणसांच्या समोर पती आणि पत्नी बोलत देखील नसत, अश्या काळात रावसहेबांचे असे वागणे त्यांच्या मातोश्रींच्या डोक्यात गेले नसते तरच नवल! आपल्या सुपुत्राच्या वागण्याने त्यांना लाज आणली होती.

        रावसाहेबांना पत्नी मिळाली होती........पण मुलांना मात्र आई नाही मिळाली. 

      मुलं त्यामुळे सतत आजी च्या मागे असत. धाकटा मुलगा "नरहरी" त्याला सगळे लाडाने "नाना" म्हणत, त्याला कापसाच्या बोळ्या ने दूध पाजुन जगवले होते आजी ने! तोच तर पुढे घराण्याचा वारस होता. त्याची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होते आजी आणि आजोबा! त्या काळात मुलींच्या शिक्षणा साठी शाळा वगैरे प्रकारच नव्हता. तरी ही मुलांना किमान अक्षरओळख तरी व्हावी म्हणून रावसाहेबांनी त्यांना शिकवण्यासाठी गुरुजींना घरीच यायला सांगितले होते. मुली बिचाऱ्या चुपचाप बसायच्या अक्षर गिरवायच्या, पण नाना मात्र अतीच बंडखोर! त्याच्या समोर गुरुजींनी देखील हात टेकले होते.

      एकुलता एक मुलगा त्यामुळे घरी अती लाडावलेला. जबरदस्ती गुरुजींच्या समोर बसावे लागल्याने कसेबसे मोडके तोडके वाचायला शिकला. एक एक करत नाना च्या चार ही बहिणींचे विवाह झाले. दरम्यान रावसाहेबांचे पिताश्री छोट्याश्या तापाचे निमित्त होऊन देवाघरी गेले. त्या नंतर दोनच वर्षात रावसाहेब शेती वर गेले असताना बैलाने शिंगावर घेतल्याचे निमित्त झाले आणि रावसाहेबांच्या जीवावर बेतले.....ते.......पायावर निभावले. रावसाहेबांच्या हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आल्या आणि नाना ला रान मोकळे मिळाले. तसा देखील नाना घरात कमी आणि बाहेरच जास्त असायचा. तो कुठे जायचा.....काय करायचा......काहीच समजत नव्हते. कधी कधी कोणाकडून नाना बद्दल वेगळ्याच बातम्या यायला लागल्या. कोणी म्हणे तो स्मशानात दिसला! तरी कधी कोणी सांगत तो वेगळ्याच लोकांच्या संगतीत आला! नाना बद्दल गावात एक ना अनेक वांदता होत्या! त्यामुळे त्याच्या कोणी वाटेला जाण्याची हिम्मत करत नसत. 

      रावसाहेबांच्या मातोश्री देखील आता थकल्या होत्या. सुलोचनाबाईंनी तर कधीच मुलांकडे आई म्हणून लक्ष दिले नव्हते! रावसाहेब तर बाईल वेडेच! 

      आजीच्या मात्र एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती.....हल्ली मंगळवार, शनिवार, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण असेल की नाना आधीच घरातून गायब होतो. तो कधी घरी परत येईल, याची शाश्वती नसते. याचाच अर्थ नक्कीच हा जादू टोणा करणाऱ्यांच्या संपर्कात आला असावा! 

      त्यात थोड्याच दिवसांपूर्वी कोणी घरी येवून सांगितले होते आज आपल्या गावात अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती, सगळी शेती पाण्याखाली गेली असती. तुमचा नाना होता.....म्हणून गावाचे नुकसान होता होता वाचले! तुमच्या नाना ने चक्क पाऊस दुसऱ्या दिशेला वळवळत की हो! घरी सगळ्यांना ही बातमी नवीनच होती. याचाच अर्थ नाना अश्या काही विद्या शिकला होता नक्कीच! 

      एक दिवस घरी आला तोच काही रंगीबेरंगी काचेच्या उभ्या बाटल्या घेऊन! आजी ला त्या बाटल्यांबद्दल काही शंका आली, आजीने विचारले असता नाना ने स्पष्ट सांगितले, " आज्जे तू या बाटल्यांना हात लावू नको. त्या उघडू नको! त्यात भुतं बंद करून ठेवले आहे मी." नातवाचे बोलणे ऐकून आजी दाचकलीच! पण आपली चेष्टा करत असेल नाना असे वाटले. 

      " काही चेष्टा करतो होय रे या म्हातारीची! सांग बघू खरे खरे. कशाच्या बाटल्या आहेत या?" आजी ने विचारले. 

      "आज्जे तुझ्याशी खोटे बोलेल होय मी! अग खरच सांगतो या बाटल्यांमध्ये मी भुतं बंद करून ठेवले आहेत." नाना ने पुनरुच्चार केला. रावसाहेब आणि सुलोचना बाई देखील नाना चे आणि त्याच्या आजीचे बोलणे ऐकत होते. विषय बदलण्यासाठी रावसाहेबांनी नाना च्या विवाहासाठी बाजूच्या सावकाराच्या कन्येचे स्थळ आले....हे सांगितले. बघावयास कधी जायचे....असे विचारले. 

     यावर नाना ने सांगितले, "आम्हास विवाह करायचा मानस नाही. आम्ही असे सडेफटिंग. आम्हास साधनेसाठी कधी ही स्मशानात तर कधी नदी च्या खोल पात्रात जावे लागते. त्यातून आम्ही जिवंत परत येवू याची शाश्वती नसते. त्यामुळे आम्हास पायात कुठलीच बेडी नको आहे. आम्हास विवाह करणे नाही." नाना ने असे निक्षून सांगितले. पण त्याच्या बोलण्याने विषयास तोंड फुटले होते! 

      "तुम्ही आजकाल सतत घराच्या बाहेर असता. ह्या जटा काय वाढवून ठेवल्या! आपण जमीनदार आहात. आपल्याला शोभेसे आपले राहणीमान आणि वर्तन असायला हवे. आम्ही थकलो आता, पूर्वी सारखे काम होत नाही. आपला इतका जमीन जुमला त्याकडे लक्ष द्या!" आज प्रथमच एका पित्याच्या भूमिकेतून बोलत होते रावसाहेब.

      "रावसाहेब आम्ही रोजच्या रोज शेतीवर जाऊ शकत नाही. पण शेतीवर चे कुठलेच काम कधी अडले आहे का? आम्हास या मध्ये रस नाही. एक कर्तव्य म्हणून आम्ही हे करतो. या पेक्षा आभास आमच्या भूतांचे खेळ करण्यास जास्त आवडते." नाना ने त्याच्या पिताश्री ना सांगितले. 

      "कसले खेळ करता तुम्ही?  शेतीकडे तर कधी फिरकत देखील नाही! तरी काम कसे होतात?" रावसाहेबांनी विचारले. 

      "या बाटल्यांमध्ये खरोखरीच आम्ही भीती बंदिस्त करून ठेवले आहे. त्यांना दर पौर्णिमा आणि अमावास्येला तृप्त करावे लागते. त्यासाठी ते कधी कोंबडी मागतात.....तर.....कधी बकरा मागतात, ते त्यांना द्यावे लागते. आपल्या शेतातील काम मी त्यांच्या कडूनच करून घेतो! अजून काही विचारायचे आहे का आपणास!" नाना ने बाटल्यांकडे बोट दाखवत सांगितले. यावर रावसाहेब, सुलोचना बाई तसेच आजी यांचा अजिबात विश्वास बसला नाही. 

      रावसाहेब आणि आणि ने तर हट्टच धरला, "आम्हास तुझे भूतांचे खेळ पहावयाचे आहे. या खेपेस आम्ही येणार ...तुमच्या बरोबर!" 

      नाना ने असा हट्ट करू नका म्हणून परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. अखेरीस रावसाहेब आणि आजी पुढे हार मानली.पण त्याच्या काही अटींवर तो खेळ बघू देणार होता. सुलोचना बाई, रावसाहेब आणि आजी तिघांनी त्याच्या अटी न ऐकताच मान्य केल्या! 

      पहिली अट होती, त्याने आखून दिलेल्या रिंगणाच्या बाहेर यायचे नाही! 

      दुसरी अट एकही शब्द कोणाशी ही बोलायचे नाही! 

       तिसरी अट काहीही झाले, काहीही बघितले तर कोणाला सांगायचे नाही! 

     चौथी आणि शेवटी अट कुठल्याही परिस्थितीत मध्ये पडायचे नाही! 

      आठ दिवसांवर पौर्णिमा आली होती. त्याचा चार दिवस आधीपासून नाना ची तयारी चालू होती. यावेळेस बकरा द्यायचा होता. .....भूतांना! बाबा ने आधीच बकरा आणून ठेवला होता. खेळासाठी लागणारे सगळे साहित्य आधीच जमा करून ठेवले होते. 

     नाना ने सकाळीच नदीवर जाण्यापूर्वी आजी, रावसाहेब आणि सुलोचना बाई तिघांच्या ही हातात आणि पायात एक लाल रंगाचा दोरा बांधला होता आणि तो नदीवर निघून गेला. भर दुपारी यांना सगळ्यांना नदीवर यायला सांगितले होते. 

      थोडे फार पोटात ढकलले आणि तिघे नदीवर आले. एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता! 

      नाना ने नदीच्या किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर एक मोठा चौकोन आखला होता! तिघांना ही त्या चौकोनात बसायला सांगितले. नाना ने सांगितल्या प्रमाणे सगळे आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसले. तसे ही भूतांना आव्हान करताना नाना एक सीमारेषा आखून घेत होता. कोणी ग्रामस्थ तिकडे फिरकले तरी ही त्यांना ती सीमारेषा ओलांडायची परवानगी नसे अमावस्या आणि पौर्णिमेला!  

      नाना ने आज काळे कपडे घातले होते. गळ्यात कश्याच्या तरी माळा घातल्या होत्या! तो नदीच्या पात्रात  चालत चालत बराच खोलवर गेला होता. आता नाना चा फक्त कंबरेच्या वरचा भाग दिसत होता. नदीच्या पात्रात उतरण्या आधी नानाने त्याच्या त्या पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या बाटल्यांचे झाकण उघडुन त्या सगळ्या बाटल्या आडव्या करून ठेवल्या होत्या! त्या बाटल्यांसाठी तयार केलेल्या रिंगणात गुलाल टाकलेला होता.  बकऱ्याची आधी  पूजा केली होती. बकऱ्याला काही खाऊ घातले होते की काय......कोणास ठावूक! पण बकरा एका जागी शांत बसून होता! 

      नाना चे आता काहीतरी हातवारे चालू होतें. काहीतरी मंत्र देखील म्हणत असावा बहुदा! पण रावसाहेब, सुलोचना बाई आणि आजी यांना बऱ्याच अंतरावर बसवले होते त्यामुळे त्यांच्या काहीच कानावर पडत नव्हते. नानाच्या हालचालीवरून त्यांना अंदाज लावावा लागत होता! बरे त्याने एक ही शब्द बोलण्याची मनाई केली होती त्यामुळे डोळ्यांना जे जे दिसते ते चुपचाप बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

      वातावरणात लक्षणीय बदल जाणवत होता. आतापर्यंत हवेत गारवा जाणवत होता. जसजसे नानाचे हातवारे वाढत चालले होते.....वातावरणातील गारवा कमी होऊ लागला होता. वातावरण आता कुंद झाले होते. आजीने दोन्ही हात जोडले आणि आकाशाकडे बघितले. बाटल्या आता एकमेकांवर आपटत होत्या त्याचा खळ्ळ खळ्ळ आवाज येत होता. आश्चर्याची बाब म्हणजे बाटल्या आपोआप आपटत होत्या, तरीही फुटल्या मात्र नव्हत्या! आता पर्यंत रिकाम्या दिसणाऱ्या बाटल्यांचा आतमध्ये काहीतरी हालचाल चालू झाली असावी. तिघांच्या डोळ्याची पापणी लवत नव्हती! 

      अरे हे काय!!!!

      अचानक निळ्या रंगाच्या बाटली मधून हळूहळू एक धुरकट आकृती बाहेर येत होती!  ती हवेवर तरंगत नाना च्या दिशेने निघाली होती! थोड्या फार वेळेच्या फरकाने उरलेल्या चार पाच बाटल्यांमधून देखील हाच प्रकार घडत होता. आजी आणि सुलोचना बाईंना दरदरून घाम फुटला. रावसाहेबांची अवस्था देखील या पेक्षा वेगळी नव्हती. 

      या धुरकट आकृत्यांच्या आकारमानात देखील फरक जाणवत होता. दोन आकृत्या पुरुषी वाटत होत्या तर बाकीच्या तीन त्यापेक्षा थोड्या लहान होत्या, म्हणजेच त्या स्त्रिया असाव्या! आता नाना च्या भोवती त्या सगळ्यांनी फेर धरला होता. नाना देखील त्यांच्यामध्ये सामील झाला होता. त्यांच्या बरोबर नदीच्या पात्रात पळत होता. नाना त्यांना हुकूम करत होता आणि त्या आकृत्या त्याचा हुकूम पाळत होत्या! 

     या दरम्यान नाना ने त्यांच्या कडून काही कामं देखील करून घेतली. पण अद्याप त्यांना खायला काही दिले नव्हते. 

      बघता बघता रात्र झाली की काय असे वाटायला लागले होते. एकदम अंधारून आले होते. संध्याकाळ तर झालीच नव्हती!  आकाशात आता फक्त चंद्र आणि चांदण्यांचा प्रकाश दिसत होता! समोरचे दिसण्यास आता त्रास होत होता. स्पष्ट काहीच दिसत नव्ह्ते. इतक्यात अचानक  दिवटी चा प्रकाश पडला! 

      भुतांचा जोर वाढला होता. नाना आता त्यांच्या ओरडत होता......जोरजोराने काहीतरी मंत्र म्हणत होता! भूतांवर मात्र त्याचा कुठलेच परिणाम होता नसावा! इतक्यात आक्राळविक्राळ हसण्याचे आवाज संपूर्ण आसमंतात ऐकू यायला लागले होते. अंगाचा थरकाप उडत होता. 

      त्या धुरकट आकृत्यांनी क्षणार्धात बकऱ्याचा फडशा पाडला होता! 

     लप लप जिभांचे आवाज ऐकू आले होते. 

      दुसऱ्याच क्षणाला पुन्हा त्या आकृती नाना च्या समोर उभ्या ठाकल्या होत्या! नाना ला आता दरदरून घाम फुटला होता. आज नेहमीपेक्षा काहीतरी विपरीत घडत होते! बळी मिळाल्यावर.....नाना ची आज्ञा झाल्यावर भुतं बरोबर बाटल्यांमध्ये जात असतं, पण आज मात्र त्यांना अजून बळी पाहिजे होता. या क्षणी ते शक्य नव्हते. नाना आता हात जोडून त्यांना विनवत होता, येणाऱ्या अमावस्येला यापेक्षा जास्त देईल म्हणून....

     अजून बळी मिळत नाही म्हणून भुतावळ चवताळली होती. आज आकृती आता नाना च्या मानगुटीवर बसली होती! 

      नाना ला त्याचा शेवट जवळ आला याची जाणीव झाली. त्याच्या शक्ती पेक्षा त्याने जागृत केलेल्या भुतावळी जास्त प्रबळ झाल्या होत्या! त्याचा हुकूम मानत नव्हत्या! 

       रावसाहेब, आजी, सुलोचना बाई या तिघांना ही आपल्या डोळ्यांनी आपल्या वंश संपताना बघावे लागत होते! 

      क्षणार्धात नाना ची करुण किंकाळी आसमंत चिरत गेली! 

नाना नदीच्या पात्रात दिसेनासा झाला होता! 

        नाना आता बाहेर येईल ....मग बाहेर येईल ...

करत तिघे ही तसेच त्या चौकोनात बसून राहिले होते. 

      सकाळी जेव्हा गावकरी नदीवर आले, बघतात तर काय .....

       चौकोनात तीन हाडांचे सापळे..... एकमेकांच्या हातात हात घातलेल्या अस्वस्थेत पडलेले होते!

      बाजूलाच एक प्राण्याचा सांगाडा आणि काही रंगीबेरंगी काचेच्या बाटल्या......

      रावसाहेबांच्या वाड्याचा दरवाजा सताड उघडा होता! 

      वाडा मात्र निर्मनुष्य होता! 

              सौ. अनिता देशपांडे ©®

4 Comments

 1. Great write up congratulations best wishes great grand success and more creative write up in times to come all the best

  ReplyDelete
 2. नेहमी प्रमाणे खूप छान अनिता ताई

  ReplyDelete
 3. अतिशय भन्नाट कथा ताई

  ReplyDelete
 4. छान होती कथा अजून अशा कथा वाचायला आवडेल.

  ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post