नोटीस

 



  #नोटीस -(अक्षरचाफा कथा स्पर्धा)

  ✍️ माधुरी वरूडकर 

         खालच्या आळीतील चाळीत एकच गडबड उठली. या कानाने त्या कानाला व त्या कानाने या कानाला गोष्ट सांगितली व सगळ्या दूर एकच बातमी पसरली. चिंधीबाईच्या घरी नोटीस आली होती. हे एक फार मोठा आश्चर्य होतं. चिंधीबाईने कधी पोस्टाचे कार्डही बघितले नव्हते. पोस्टमन घरी आला  तसे चिंधीबाईचे हातपाय चळाचळा कापू लागले. आपली काय चूक झाली? हे तिला  कळेना.

" घाबरू नका ताई, ही नोटीस आहे. आधी वाचून बघा."

" तूच वाच ना रे भाऊ! म्या शाळेचा तोंड बी पायलं नाय."

         एव्हाना सगळ्या चाळीभर पोस्टमन चिंधीबाईकडे आला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोस्टमनने पाकीट उघडलं आणि घाबरलेली चिंधीबाई हातापायातील ताकद गेल्यागत फतकल मांडून खाली बसली.

" बाई तुमची अमरनेळला इस्टेट आहे का?" "नाय रे भाऊ, विस्टेक वगैरे काही नाय." 

"फुलाबाई चाळ पाडण्यात येत आहे. तेथील खोली पंधरा दिवसात रिकामी करून समक्ष भेटावे." पोस्टमनने कागद वाचून दाखवला.

" हा  रे भाऊ, माह्या बापाची खोली त्या चाळीत हाय. त्याले चाळीस वर्षावरी दिस झाल्ले. बापाला आठ रुपये भाडं होतं. ते भरावं लागेलं का रे भाऊ?" आठ रुपयांचा आणि चाळीस वर्षाचा गुणाकार भागाकार चिंधीबाईला जमेना. तिचे डोके अजूनच चक्रावले.

"बाई तुला माहेरचं कोणी नातलग आहे का? त्यांना फोन कर."

 व्हय व्हय हाय ना! थोरली  बहिन हाय. थोडीफार शिकलेली हाय. शायेत चपराशिन  हाय."

"तू का नाही शिकली बयो!" पोस्टमन हसत म्हणाला.

" म्या नको असताना झाली नव्हं म्हनून तर माह्य नाव चिंधी ठेवलं हाय." चिंधीबाई कसानुकशी हसली. नमस्कार करत पोस्टमन गेला.

 तेवढ्यात फोन वाजला. तो बहीणीचा फोन होता.

  "गीताबाय तुलाच फोन करनार व्हती माय. मले नोटीस आली."

 "नोटीस आली म्हनून घाबरू नकुस. आपल्या बापान जाता जाता बेस काम केलं हाय. थ्या खोलीवर आपल्या दोघींची नावे लावली हाय."

 "बाबो असं हाय का? मंग आता कसं? म्या येथं, तू तेथं , खोली अमरनेरला कसं व्हावं माय?

 "जानं पडीन  आपल्याले."

 " मले काय उमजते अमरनेर ?कशी येऊ म्या?"

" पहिले म्या जाते.  तुह्या दाजीले घेऊन शान! मंग तुले घ्यायला येते. तुही सही लागेनं.  खोलीचे पैसे भेटतील बाय.

      नोटीस आली ,फोन झाला रात्रभर चिंधीबाईला झोप आली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे ती वळत होती. माहेरी गीताबाई लाडकी होती. आणि चिंधीबाई नावडती! चिंधीबाई जन्माला आली आणि तिची माय गेली. बापानं आयुष्यभर तिचा राग राग केला. नवरा दारू पितो यासाठी सुद्धा तिलाच दोषी ठरवलं. व  तिच्याशी संबंध तोडले. बापानं आजारी असताना फक्त गीताबाईला बोलावलं. बाप गेल्यावर हिला गीताबाईने बोलावणं पाठवलं. अशा बापानं खोलीवर आपलं नाव लावलं आणि त्या खोलीचे पैसे मिळणार ही गोष्ट तिच्या पचनी पडत नव्हती. तिच्या डोळ्यातून  घळघळा अश्रू वाहू लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत काम करणे एवढेच तिला माहीत होतं .नवरा पक्का दारुडा होता. कामधंदा काहीच नाही. होतं नव्हतं ते त्याने दारू पायी बुडवलं. रोज दारू प्यायचा आणि हिला मारायचा दोन मुलांकडे पाहून ती जगत होती. चार घरचे धुणे भांडे करून घर चालवत होती. कधी कधी पाणी पिऊन ती पोटाला गच्च फडकं बांधून घ्यायची. भूक मरावी म्हणून ही युक्ती तिने केली होती. हळूहळू तिची भूक मरत गेली. आणि आता तर तिला भूकच लागत नव्हती. 

          एक दिवस मोठा मुलगा दारू पिऊन आला. तिने त्याला मार मारला. त्या दिवशीपासून तो परागंदा झाला. गायब झाला. लहानग्याकडे पाहून ते दुःख विसरायचा ती प्रयत्न करत होती. अशा परिस्थितीत तिने बापाला मदत मागितली नाही. एकटी सगळ्या पातळ्यांवर लढत राहिली. 

         चिंधीबाई उठून बसली. घामानं तिचं झंपर अंगाला चिटकलं होतं. तिने पदराने वारा घेतला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती.सकाळी ऊन व रात्री पावसामुळे अंग चिकट झालं होतं. सडकी गर्मी अंगाला झोंबत होती. शेजारी झोपलेल्या गणेशच्या तोंडावर तिने हात फिरवला.

             तेवढ्यात दारावर धाड धाड असा आवाज येऊ लागला. तिने नवरा आल्याचं ओळखलं. तिने दार उघडलं. 

"मले पैसे दे."

" कायचे?"

"तुह्या बापाचे !" तो तिच्या अंगाजवळ आला.

  "मले हात लावलास तर पाह्य! एकही पैसा तुले देणार नाय. गप गुमान झोप." मग नवरा काहीबाही बरळत राहिला. व झोपी गेला.

        नवरा झोपला. पण हिला झोप येईना. ती ताडकन उठून बसली. हिरवं झंपर, विटकी  साडी व गळ्यातली पोत तिने एकसारखी केली. गळ्यातील पोत काळवंडली होती. तिने दोन्ही पाय पोटाजवळ घेतले आणि गुढघ्यावर हनुवटी ठेवून ती रडू लागली. बापाच्या कटू आठवणी तिला छळू लागल्या.  त्याचं रागावणं, मारणं, दुजा भाव करणं, लग्नाच्या वेळी न विचारणं या गोष्टींसाठी  आत्ताही ती थरथरत होती. बापाची प्रचंड धास्ती तिच्या मनात होती. ज्या बापाने तोंडावरून कधी मायेने हात फिरवला नाही. जवळ घेतलं नाही. माझ्यासाठी रडला नाही. माझ्याकडे आला नाही. त्याची इस्टेट घेऊन काय करायचे? असे तिला वाटू लागले. माझ्या फाटक्या संसाराला त्याच्या पैशाचं ठिगळ  लावायचं नाही. तिने मनाशी पक्का निश्चय केला. पक्ष्यांच्या किलबिलाटात पहाट उजाडली. तसा तिच्या मनात लख्ख उजेड पसरला. आणि ती कामाला लागली.

              दोन दिवसांनी गीताबाईचा निरोप आला. तीन लाख रुपये खोलीचे मिळणार होते. ती सगळी चौकशी करून आली होती. 

"गीताबाय, म्या खोलीवरला हक्क सोडत हाय. तूच सगळे पैसे घेजो. देवाची आण घेऊन शान सांगतो, मले पैसा नको. मले देवानं बखळ देलं हाय." असं म्हणत चिंधीबाई हुंदक्यावर हुंदके देत रडू  लागली. आपल्या गरीब बहिणीच्या अजब निर्णय ऐकून गीताबाई  हबकली. जागच्या जागी थिजली.

                 © सौ माधुरी अ. वरुडकर 

                         

Post a Comment (0)
Previous Post Next Post