सून माझी लाडाची

 सून माझी लाडाची

अर्चना अनंत धवड 


"काय काकू कशा आहात. बरेच दिवसात दिसल्या नाही "बाजारात रीमाकाकु भेटल्यावर मी सहज चौकशी केली.


"अगं, रजतकडे गेले होते... सहा महिने त्याच्याकडेच होते..."


 त्या अखंड बोलत होत्या आणि मी फक्त ऐकत होते.... रीमाकाकूंचा स्वभावच असा की त्यांनी एकदा बोलायला सुरवात केली तासभर सुद्धा बोलू शकायच्या... तसंच आज त्या बोलत होत्या..


रीमाकाकू नेहमी आपल्या सूनेचे,ऋचाचे  खूप कौतुक करतात.इतके कौतुक करतात की दुसऱ्यांना हेवा वाटावा. अशाच आजही सुनबाईचं तोंडभरून कौतुक करीत होत्या.


मी त्यांना म्हणाले , " भाग्यवान आहेस काकू , इतकी छान सुन मिळाली".


"हो गं, ते तर आहेच. माझी सून आहेच कौतुक करण्यासारखी "


"या काकू घरी "असं म्हणून मी आपल्या रस्त्याने आणि त्या आपल्या रस्त्याने निघून गेल्या.जातांना मला रीमाकाकु आठवू लागल्या.. रीमाकाकु माझ्या चुलत काकू..अगदी लहानपणापासून मी त्यांना जवळून पाहिलं.. माझ्या डोळ्यासमोर त्यांचा जीवनपट आला...


रीमाकाकूंचं ग्रॅज्युएशन झालं आणि महेशकाकांसोबत प्रेमविवाह केला.. माहेर सासर दोन्हीकडून विरोध.... माहेरची दारं कायमची बंद आणि सासरहून अपमानित वागणूक..रीमाकाकूने आपल्या लाघवी स्वभावाने सासुसासऱ्यांचे मनं जींकली..आणि त्यांची आवडती सून झाली... अगदी वर्षभरात एका गोड मुलाची आई झाली ..सगळं सुखात चालू असतांना अचानक,महेशकाकाचा अपघाती मृत्यू झाला... रजत पाच वर्षाचा असताना काकू विधवा झाली.काकूंना अनुकंपा तत्त्वावर काकांची नोकरी मिळाली.

मुलासोबत सासूसासऱ्याची जबाबदारी पण काकुवर आली.


काकूंनी आपल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडल्या...


अगदी शेवटपर्यंत सासुसासऱ्यांची काकूने सेवा केली..


रजत छान शिकला . इंजिनियर झाला..चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागला. त्याच्याच कंपनीतीतील एका सुस्वरूप मुलीशी लग्न झाले....


एकल पालकत्व स्विकारताना किती त्रास झाला असेल काकूला ?पण जर त्यांना कोणी म्हटले की 'छान घडवले हो तुम्ही मुलाला'

तर त्यांच उत्तर असते, "मी काय केले?माझा मुलगा बिचारा स्वतः स्वतः च शिकला".


 उलट त्यांनाच वाईट वाटते की आपण मुलाला योग्य वेळ, पैसा देऊ शकलो नाही. त्या असं  कधीच म्हणणार नाही की मुलासाठी खस्ता खाल्ल्या. आपण आपलं कर्तव्य केलं इतकंच त्या म्हणतात .


मुलाला त्याची जाणीव आहे हा भाग वेगळा.

 

कधी स्वतः साठी जगल्या अस म्हणताच येणार नाही, कधी आवडीची साडी की दागिना घेतला अस आठवत सुद्धा नाही.

त्यांचा मुलगा म्हणजे त्यांच सर्वस्व....  मुलाच्या निर्णयाला ठाम पाठिंबा देणाऱ्या.. त्याच्या सतत पाठीशी राहणाऱ्या आणि मुलाच्या लग्नानंतर सुनेलापण तितकीच साथ देणाऱ्या, अशा माझ्या रीमा काकू...


मला आठवतय,  लग्नानंतर अगदी तिसर्‍या दिवशी ऋचा जीन्स अणि टॉप घालून होती. तस काकूचे नातेवाईक गावातील अणि मध्यमवर्गीय.


 कुणीतरी म्हंटल,"अग,निदान  चार दिवस साडी नेसायची ना"

 

काकू म्हणाली, "अग तिला नाही आवडत साडी अणि नेसताही येत नाही" काकूच्या उत्तराने समोरची बाई चूपच बसली... 


 मला काकूचे कौतुक वाटले.


ऋचा अणि रजत नोकरीनिमित्त बाहेर देशात राहायचे आणि काकू एकट्याच इथे असायच्या....


काका गेल्यावरही काकूने सगळ्या सासरच्या लोकांशी प्रेमाचे संबंध ठेवले होते...काकाच्या सगळ्या जबाबदाऱ्या काकूने पार पाडल्या होत्या...


रजतच्या लग्नानंतर पहिल्या संक्रातीला काकूंचा मला फोन आला होता "अगं,रजत आणि ऋचा आलेय...पाहिला संक्रांत सण ना...परवा तीळवा करतेय ऋचाचा.. ये घरी "


"झाली का काकू तयारी...साडी घेतली होती की वनपिस, आजकाल साडी नेसत नाही ना गं मुली "मी सहज चौकशी केली.


"साडीच घेतली गं.. पण त्याचीही गंम्मतच झाली. माझी ऋचा एकदम स्पष्ट आहे. मला तिळवा करायचा होता. ते यायच्या आधी सगळी तयारी करुन ठेवली . साडी घेऊन ठेवली ब्लाऊज शिवून ठेवले. ऋचा आली, तिला साडी दाखवली  पण  तिला ती साडी नाही आवडली.

मी म्हंटल,"राहू दे. मी घालेल.. मी तिला पैसे दिले अणि दुसरी साडी आणायला लावली"


काकू इतक्या  सहजपणाने सांगत होत्या की बस .मला काकूंचं कौतुक वाटलं..


 मनात म्हंटले, "एखादी सासू असती तर किती मनाला लावुन घेतले असते".


मीही म्हंटल, "बरोबर आहे... त्यांना त्यांच्या पसंतीने घेऊ द्यावे"..


नंतर काकू सेवानिवृत्त झाल्या आणि वर्षातून सहा महिने मुलांकडे राहू लागल्या. तीथे गेल्या की सगळ्या कामात ऋचाला मदत  करतात.म्हणजे ऋचा तिला सांगत नाही पण काकूच आवडीने करतात.अगदी ऑफिसला जाताना डबा सुद्धा हातात देते.म्हणतेय बिचारी इतके दिवस तर स्वतः करतेच ना. तिला तेवढाच आराम अणि माझाही छान वेळ जातो.


दोघेही नोकरी करीत असल्यामुळे रजत ऋचाला कामात मदत करतो.अगदी बाळाला सांभाळण्यापासून तर ओटा पुसण्यापर्यंत.

 तेही काकू अगदी कौतुकाने सांगतात.तिकडे गेल्यावर  ऋचा कशी मला फिरायला नेते.मला कशी शॉपिंग करवीते. रजत मला कसा तब्येतीची काळजी घ्यायला सांगते. सगळे कौतुकाने सांगतात.


वर्षातून सहा महिने त्या मुलाकडे जाऊन राहतात.


अशाच एकदा काकू घरी आल्या.. त्यांचा टॉप मला खूप आवडला थोडासा आधुनिक डिझाईनचा होता.


मी म्हंटल, "काकू तुमचा टॉप छान आहे"


" अग ऋचाचा आहे. अगं ती डायटिंग करते त्यामुळे तिला हा टॉप  सैल होत होता.म्हणाली आई तुम्ही घालाल का?"


मी म्हटले "त्यात काय,? घालेल ना"


एकंदरीत काकू म्हणजे वेगळेच रसायन. कुठल्याही परिस्थितीत अडजस्ट होणारे.


‌काकू मुलाकडे गेल्या की मस्त एंजॉय करतात. त्यांच्या संसारात लुडबुड करीत नाही. त्यामुळे सुनेला, सासू आल्याचे दडपण येत नाही. तिला सासू न वाटता आईच वाटते. आईला जस हक्काने आपण काही काम सांगू शकतो किंवा कोणत्या न पटणार्‍या गोष्टीला विरोध करू शकतो. तसच ऋचा अणि काकूच नातं आहे.


ऋचा छानच आहे, प्रश्नच नाही  पण अशी सासू असल्यावर कोणती सुन उगाचंच भांडेल.मनात म्हटले ऋचा सारख्या सुना तर बर्‍याच असतील पण काकू सारखी सासू एखादीच असते .


कदाचित काकूसारख्या वागणाऱ्या सासवा पण बऱ्याच असतील पण तडजोड करून. कुठेतरी मनात अपेक्षा असते पण नाईलाजाने त्या चांगले वागतात.त्या चांगले तर वागतात परंतु वागताना मनात किंतू परंतु  असतो.


 रीमाकाकू जे काही वागते अगदी मनापासून अणि सुनेचे कौतुक ही मनापासून.कुणाकडून कुठलीही अपेक्षा नाही. ऋचा सारखी सुन मिळणे कठीण नाही त्यासाठी काकू सारखी सासू व्हावं लागेल.. नाही का?? 

 

©अर्चना अनंत धवड 

वरील कथा अर्चना धवड यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


ही कथा ही वाचून पहा.

नोटीस

Post a Comment (0)
Previous Post Next Post