आभासी जगातील शाश्वत प्रेम

 आभासी जगातील शाश्वत प्रेम..

अर्चना धवड


अनघा बऱ्याच वेळपासून  फेसबुक चाळत होती. तिला आज अस्वस्थ वाटत होते.ती कुणाच्यातरी मेसेजची वाट पाहत होती.


"हाय अनघा " असा मेसेज मेसेंजरवर दिसतातच अनघाने हाय टाकला.


"काय करीत होती?"


"तुझ्याच मेसेजची वाट पाहत होते "


"अनघा, ऐक ना! अगं, एक फोटो टाक ना तुझा "


"कशाला? आपलं बोलणं होतं ना. मग फोटोची गरज काय?"


"अगं, दोन वर्षांपासून बोलतोय आपण, तुझा एकही फोटो नाही फेसबुकवर. तुला बघावंसं वाटतंय "


"तुला विश्वास नाही का माझ्यावर? मी खरंच आहे की आभासी जगातील एक आभास आहे,असं तर वाटत नाही तुला? "हसण्याचे इमोजी टाकत अनघा म्हणाली.


"नाही गं, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. तुला अगदीच आक्षेप असेल तर जाऊ दे, नको टाकूस. तुझे विचार  इतके  सुंदर आहे की माझ्या मनात तुझी एक छानशी प्रतिमा तयार झाली.वाटतं  आपण जिच्याशी बोलतोय ती कशी असेल?"


"तसं नाही रे, ठीक आहे टाकते मी "


ती एक फोटो टाकते.


"वाहं!सुंदर...


अनघाचे बोलणे, विचार त्याला आधीच आवडत होते. तिच्या प्रेमातच पडला होता. फोटो पाहिल्यावर तर तिला मनामध्ये जीवनसाथीच ठरवून टाकलं.


फोटोमध्ये अनघा अप्रतिम सुंदर दिसत होती. गोरा रंग, बोलके डोळे आणि मंद हास्य असूनही थोडी गूढ वाटत होती.


मनात म्हणाला,आपल्याशी जी हसून खेळून बोलते त्यापेक्षा काहीतरी वेगळी वाटते अनघा.


दुसरं मन म्हणलं, "अरे फोटोवरून काय तर्क लावतोय  आपण ?असतो कुणाचा चेहरा थोडा गंभीर "


अनघा आणि अजयची दोन वर्षांपूर्वी  फेसबुकवर ओळख झाली. एकमेकांच्या पोस्टला लाईक, कमेन्ट करता करता एकमेकांचे मित्र झाले होते.


आता त्यांची दिवसातून एकदा तरी फेसबुकवर चक्कर व्हायची.


 एकमेकांशी चॅटिंग करता करता फोन नंबरची देवाण घेवाण झाली. 

आता ते फोनवर पण बोलू लागले. 


एकमेकांसोबत  समस्या, सुखदुःख शेअर करू लागले.


असच फोनवर बोलताना अजय म्हणाला, "अनघा, आपण दोन वर्षांपासून  एकमेकांशी बोलतोय.एकमेकांना न भेटताही असं वाटतं की आपण खुप जुने  मित्र आहोत.अग,मला तू आवडायला लागलीस.आपले विचार जुळायला लागलेत. मी तुझ्या प्रेमातच पडलो ग.आय  लव्ह  यू  अनघा !"


"अरे, हे काय? आपण कधी भेटलो नाही, एकमेकांना पाहिले नाही.असं कधी प्रेम होत का?"


"प्रेम म्हणजे काय असतं गं? एकमेकांचे विचार पटणे, एकमेकांना समजून घेणे. आपण एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखतो. एकमेकांना समजून  घेत आहोत तेव्हा हे प्रेमच नव्हे का? खरंच, आपण भेटलो नाही, कधी भेटायचं मग?


"अरे, हे काय? आपण चांगले मित्र आहोत एवढे पुरे आहे.भेटायची काय गरज आहे?


"का नाही.आपण एकाच शहरात राहतो आणि लग्न करायचं तर एकमेकांना भेटावं तर लागेलच " 


"हे काय अजय,  तू तर लग्नापर्यंत येऊन पोहचला.

तू माझा चांगला मित्र आहेस. याचा अर्थ आपण लग्न कराव असं थोडीच आहे "


"अनघा मी तूझ्या प्रेमात पडलोय. तुझ्याशिवाय जिवन ही कल्पनाच करवत नाही आपण लग्न करू या. वाटल्यास मी माझ्या आईबाबांना पाठवतो तुझ्याकडे.  त्याआधी आपण दोघे भेटूया कुठेतरी बाहेर.... 

सांग तुझं आवडत ठिकाण, एखादं गार्डन, एखादं  हॉटेल काहीपण जिथे तुला कंफर्टेबल वाटेल "



नाही हे शक्य नाही.... 


"का बर!काय कमी आहे माझ्यात. चांगली नोकरी आहे, घर आहे, एका विवाहयोग्य मुलात शोधतात ते सगळे गुण आहेत माझ्यात.

अग जात पण एक आहे आपली मग काय प्रॉब्लेम आहे?"


"नाही अजय.ते शक्य नाही"अनघा ठामपणे म्हणाली.


"का? दुसरा कुणी आहे तुझ्या आयुष्यात? तसं असेल तर सांग. तुझ्या मतांचा आदर करेल मी "


"नाही.. तस नाही "


"तुझ्या आजवरच्या संभाषणावरून तर मला असच वाटल की मी पण तुला आवडतो. मग नकार देण्याचं कारण काय?की तू असच मुलांना नादी लावते आणि नंतर....  "


"अजय, काय बोलतोस तू" अनघा त्याला मध्ये थांबवत म्हणाली. 


"बर, तुला भेटायचं आहे ना?तू उद्या ये घरी भेटायला.मी पत्ता पाठवते. मग ठरवू पुढचं "अनघा संथपणे म्हणाली.


अजय दुसऱ्या दिवशी भेटायला गेला.बेल वाजवली. बाबांनी दार उघडले.


"काका, मी अजय देशमुख "


"अरे, ये ना, बस.अनघानी सांगितलं सगळं तुझ्याबद्दल "


"अग, पाणी आण अजय आला "


अनघाची आई पाणी घेऊन आली. अजयला आश्चर्य वाटले.त्याला वाटल अनघा येईल पाणी घेऊन.


बाबा त्याच्यासोबत गप्पा मारीत होते. त्याची चौकशी करीत होते. अजय अनघाला शोधत होता.


"काकू,अनघा कुठे दिसत नाही. बाहेर गेली का".


"नाही, घरीच आहे.तिच्या बेडरूम मध्ये आहे. जा आतमध्ये भेटून घे"


अजयला फार आश्चर्य वाटले. काय विचत्र फॅमिली आहे. एका अनोळखी मुलाला डायरेक्ट बेडरूममध्ये पाठवतात.


"ती किचनच्या बाजूची खोली आहे तिची "आईनी बेडरूम दाखवली.


अजय आत गेला.अनघा बेडवर लोडला टेकून बसली होती. फोटो पेक्षाही सूंदर दिसत होती.


"दिसायला तर सुंदर आहे पण काही शिष्टाचार आहे की नाही मुलीत? एकतर बेडरूममध्ये बोलावते.वरून राणीसारखी झोपून राहते.तब्बेत ठीक नाही की काय हिची? चेहऱ्यावरून तर फ्रेश दिसते "


"ये, बस "हसत खुर्चीकडे बोट दाखवून म्हणाली .


तो खुर्चीत बसला. संपूर्ण खोलीवर नजर फिरविली.छोटीशी नीटनेटकी खोली होती. बाजूला टेबलावर सूंदर पेंटींग होतं.


"अप्रतिम, तू बनवलंस हे.काय जादू आहे ग तुझ्या बोटात ". 


"हो ना. देव कुठलीतरी एक गोष्ट कमी देतो देतो तेव्हा काहीतरी जास्त  पण देतो"

 

"अग काय म्हणायचं आहे तुला. मला कळेल असं बोलशील?"


"काही नाही. तू बस ना "


तो खुर्चीवर बसला. खोलीभर नजर फिरविताना त्याच लक्ष बेडच्या मागे असलेल्या खुर्चीवर गेलं. बारकाईने पाहिलं तर ती व्हील चेअर होती. तो एकटक त्या खुर्चीकडे पाहू लागला.


"काय बघतोस? ती व्हील चेअर आहे. ती माझी आहे"


अजयला प्रचंड धक्का बसला. तो आश्चर्याने पाहतच राहिला.


"काय बघतोस अजय?अरे ती  माझी  चेअर आहे  माझी.

अजय,म्हणुन मी तुला लग्नाला नाही म्हणतं होते. आता कळलं ना"रडत रडत अनघा म्हणाली.


"अनघा, हे कधी झालं? म्हणजे कशामुळे "अडखळत अजय म्हणाला.


" मला लहानपणी पोलिओ झाला. त्यामुळे माझे पाय अधू झाले.मी चालू शकत नाही.सांग अजय आपलं  लग्न कसं शक्य आहे? 

अजय, तू शांत हो. म्हणूनच मी नाही म्हणत होते लग्नाला.थोडं थांबून अनघा परत बोलू लागली.


"अजय, अरे तू कशाला दुःखी होतोस?तू वाईट वाटून घेऊ नकोस . आपण चांगले मित्र आहोत आणि नेहमीसाठी राहू".

 

"अनघा मी तुला न बघता तुझ्या प्रेमात पडलो.तुझा फोटो सुद्धा मी नंतर बघितला.त्यामुळे मी तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम करतो.लग्न तर मी तुझ्याशीच करणार "तिचे डोळे पुसत अजय म्हणाला.


"भावनेच्या भरात निर्णय नको घेऊस अजय. लग्न म्हणजे आयुष्याची सोबत असते. तुला भविष्यात तुझ्या निर्णयाचा पश्चाताप व्हायला नको "


"नाही अनघा, लग्न तर मी तुझ्याशीच करणार. पूर्ण विचारांती मी निर्णय घेतला "


अजयनी तीला व्हीलचेअरवर बसवले आणि हॉल मध्ये आणले.


"काका, मला अनघा पसंत आहे. आम्हाला आशीर्वाद द्या "


"अरे तुझे आईबाबा. ते स्वीकारतील अनघाला सून म्हणून "अनघाचे बाबा अडखळत म्हणाले.


"नाहीच स्वीकारणार. मी त्यांचा आशीर्वाद मिळावा हा प्रयत्न करेल पण नाहीच मिळाला तरी मी अनघाशीच लग्न करणार "


"अनघाची आई, काहीतरी गोड कर गं, आज माझ्या अनघाच्या आयुष्यात सौख्य आलंय "बोलतांना अनघाच्या बाबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.


©अर्चना अनंत धवड 


ही कथा काल्पनिक आहे.आपण नेहमीच ऐकतो की फेसबुकवर फसवणूक होते.पण कधी असंही सुंदर प्रेम झालं तर? कल्पना करायला काय हरकत आहे.. कशी वाटली माझी कथा नक्की सांगा कंमेंट बॉक्स मध्ये. 


सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे


वरील कथा अर्चना धवड यांची असून कथेचे सर्व हक्क त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.

Post a Comment (0)
Previous Post Next Post